फेब्रुवारी महिना आला की तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेन्टाइन डे’चे. प्रेमाचा उत्सव साजरा करणाऱ्या या सणाला बाजारपेठेच्या दृष्टीनेही महत्त्व आलं असलं तरी ‘व्हॅलेन्टाइन डे’चं मूळ स्वरूप अगदीच वेगळं होतं..

डिसेंबरमध्ये सुरू झालेली थंडी फेब्रुवारी सुरू झाला तरी हाटायचं नाव घेत नसते. शाळा, कॉलेज, ऑफिस आणि घर यांच्याच भोवती आयुष्य फिरत असतं. डिसेंबरमध्ये जरा जास्ती खर्च झालेला असतो. जानेवारी हात आखडता घेऊनच घालवलेला असतो. अगदी फास्ट-फूडमधून बर्गर विकत घ्यायचा मोहदेखील टाळलेला असतो. पण हे सारं एखादा महिना सोसलं की आपणच आपल्या खर्चावर घातलेली बंधनं थोडी शिथिल करावीशी वाटतात. १४ फेब्रुवारीला येणारा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ तशी संधी देतो. फक्त खर्चाची तुलना केली, तर व्हॅलेंटाइन डे म्हणजे ख्रिसमसचं गरीब भावंडं वाटावं. मुख्यत्वे करून कार्ड, चॉकलेटं आणि लाल गुलाब यांची देवाणघेवाण होते. स्टफ्ड टॉइज, इलेक्ट्रॉनिक्सच्या छोटय़ा वस्तू, क्वचित हिऱ्याचे दागिने ही आधुनिक काळातली भर आहे. ‘तू माझा (किंवा माझी) व्हॅलेंटाइन होशील का?’ असं विचारून तरुण युगुलं आपल्या प्रेमाची कबुली देतात हे जरी खरं असलं, तरी मुळात प्रेमिकांकरिता असलेला हा दिवस आता मात्र इतरांच्या प्रति असलेलं प्रेम, कृतज्ञता व्यक्त करायलाही वापरतात. कार्ड, चॉकलेटं, गुलाबाची फुलं, भेटवस्तू, कँडल लाइट डिनर, असं होत होत अमेरिकेत आता या दिवसाचं संपूर्ण कमर्शियलायझेशन झालेलं दिसतं. ख्रिसमसच्या खालोखाल चॉकलेटं आणि भेटकरड यांची विक्री व्हॅलेंटाइन डेला होते.
दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात क्लाउडियस (दुसरा) या रोमन सम्राटाला रात्रंदिन युद्ध प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं लागे. सैनिक कुटुंबवत्सल असले, तर युद्धावर जायला तयार होत नसत. क्लाउडियसनी मग तरुण लोकांना लग्न करायचीच बंदी केली. ख्रिश्चन प्रीस्ट व्हॅलेंटाइनला हा सरकारी कायदा मान्य नव्हता; त्याच्या मते लग्नाला बंदी केली, तर तरुण लोक अनैतिकतेमध्ये गुरफटले जातील. त्याने सरकारी कायद्याला चॅलेंज करत इछुक तरुण-तरुणींची लग्नं लावून देण्याचा सपाटा लावला.
तरुण प्रेमिक जेव्हा व्हॅलेंटाइनच्या बोटातली अ‍ॅमथिस्ट या जांभळ्या रंगाची अंगठी बघत, तेव्हा त्यांना खूण पटे. आपल्याला मदत करणारा सेंट म्हणून ते त्याला लगेच ओळखत. रोमनसम्राटाच्या लोकांना ही त्याची खूण काही माहीत नव्हती. व्हॅलेंटाइन मग त्यांचे लग्न लावून देत असे. अ‍ॅमथिस्टचं फेब्रुवारी महिन्याचा बर्थस्टोन, आणि फेब्रुवारी-प्रेमिकांचा महिना आणि अ‍ॅमथिस्टचा गुणविशेष म्हणजे प्रेम, अशा समजुती अजूनही पुष्कळ लोकांच्या (अमेरिकेतल्या) मनात आहेत.
सरकारदरबारी जेव्हा व्हॅलेंटाइनचा गुन्हा कळला, तेव्हा त्याला क्लाउडियससमोर उभं करण्यात आलं. त्यानं आपली बाजू चांगल्या तऱ्हेने मांडली. त्याच्या बुद्धीची चमक, भाषेचं प्रभुत्व वगैरेनी सम्राट खूपच प्रभावित झाला आणि त्यानं व्हॅलेंटाइनला धर्मपरिवर्तन करायचा आग्रह केला. व्हॅलेंटाइन तयार झाला नाही, म्हणून त्याला फाशी दिले गेले. त्यापूर्वी तो थोडे दिवस तुरुंगात होता, तेव्हा त्यानं जेलरच्या अंध मुलीला आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून औषधं देऊन दृष्टी परत मिळवून दिली. त्यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले, असंही म्हणतात. फासावर जाण्याच्या आधी त्यानं ‘तुझा व्हॅलेंटाइन’ असा समारोप केलेलं पत्र तिला लिहिलं. तुरुंगात त्याला पुष्कळ लहान मुलांची पत्रं येत, आणि तोही त्यांना ‘तुमचा व्हॅलेंटाइन’ असा शेवट असलेली उत्तरे पाठवीत असे.
ख्रिश्चन लोकांनी व्हॅलेंटाइनची धर्मनिष्ठा, त्याला असलेली नीतिमत्तेची चाड, त्याच्यात असलेली अंधांना दृष्टी देण्याची दैवी शक्ती, वगैरे गोष्टींचं भांडवल करून आपल्या धर्माचा प्रसार करायचा प्रयत्न सुरुवातीला केला; परंतु मुळात वेगवेगळ्या शतकांमध्ये व्हॅलेंटाइन नावाचे अनेक संत होऊन गेले. सगळ्यांच्या आख्यायिकांची खूपच गुंतागुंत झालेली आहे. अजून थोडय़ा अशाच दंतकथा ख्रिश्चन लोक सांगतात, त्या खऱ्या असतीलच असे नाही.
ख्रिश्चन नसलेले लोक मात्र या हॉलिडेचा संबंध रोमन लोक साजरा करत असलेल्या ‘लुपरकलिया’ या उत्सवाशी लावतात. हा संततीकरिता केला जाणारा उत्सव असे. गावातल्या सगळ्या तरुणी आपलं नाव असलेल्या चिठ्ठय़ा एका बोलमध्ये घालीत. गावातले तरुण एक एक करून चिठ्ठी उचलत. तरुण-तरुणी अशा तऱ्हेनी ब्लाइंड डेटवर जात. ही डेट यशस्वी व्हावी आणि आपल्याला आयुष्याचा जोडीदार मिळावा अशीच सगळ्यांची इच्छा असे. १५ फेब्रुवारीला येणारा हा पारंपरिक रोमन सण ख्रिश्चिनिटीच्या प्रसाराच्या आधीपासून रोमन राजवटीत प्रचलित होता. सुरुवातीला बराच साधासा वाटणारा सण हळूहळू बऱ्यापैकी डीसेंट झाला. आधुनिक (१५व्या शतकापासून चालत आलेला) काळातला व्हॅलेंटाइन म्हणजे व्हॅलेटाइन या सेंटचे नाव आणि चिठ्ठय़ा लिहिण्याचा, आणि रोमान्सचा भाग लुपरकलिया या सणातला. रोमान्स, प्रेम, जिव्हाळा असे सगळे या सणाचे पदर आहेत. धार्मिकता, बायबल, चर्च इत्यादीचा पुसटसा संबंधही या सणाच्या आधुनिक आवृत्तीत राहिलेला नाही.
‘व्हॅलेंटाइन डे’साठी एकमेकांना द्यायची करड आता सगळीकडे सर्रास वापरली जातात. एस्थर हाउलंड या मेसॅच्युसेट्समध्ये राहणाऱ्या महिलेनं १८४० च्या सुमाराला करड तयार केली. कार्डाकरिता एम्बॉस्ड पेपर, लेस असं नाजूक सामान वापरत तिने परंपरा टिकवायचा प्रयत्न केला. लेसचे रुमाल हे तरुण लग्नाळू स्त्रिया अठराव्या शतकात वापरीत. बाहेर फिरायला गेलं असताना एखादा चांगला तरुण दिसला, तर त्याच्या समोरून जाताना रुमाल रस्त्यात अनवधानानं पाडायचा (!). तरुणाने तो उचलून दिल्यावर ओळख होऊन परिचय वाढायचा. व्हॅलेंटाइन डेच्या आणखीनही काही प्रतीकांचा वापर तिने करड तयार करताना केला आणि अजूनही तो केला जातो. डोव (कबूतर?) या पक्ष्याच्या जोडीला लव्हबर्डस म्हणतात. ही जोडी, प्रीतीचं प्रतीक असलेली लाल गुलाबाची फुलं, कामदेव, कँडी अशी प्रेमाची प्रतीकं आजही व्हॅलेंटाइन डेच्या कार्डामध्ये आणि भेटवस्तूंमध्ये वापरात असलेली दिसतीत. आजमितीला अमेरिकेत प्रत्येक वर्षी जवळजवळ १९० मिलिअन करड वापरली जातात (यातली फारच थोडी पती-पत्नींमध्ये दिली जातात.)
या सणाच्या दिवशी सुट्टी नसते. प्राथमिक शाळांमध्ये मुलं आपल्या शिक्षकांना आणि वर्गातल्या मुला-मुलींना खास करड, कँडी घेऊन जातात. शिक्षकांना स्टफ केलेलं छोटं अ‍ॅनिमल, हार्ट्स असलेला कॉफी मग, हार्टच्या आकाराचा चॉकलेटचा बॉक्स, लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ, हार्ट्स असलेला रेशमी स्कार्फ अशा छोटय़ा छोटय़ा भेटवस्तू देतात. वर्गाकरिता कधी पॉप-कॉर्नचा हार्टच्या आकाराचा मोठा फुगा, घरी आईने किंवा आजीने बेक केलेल्या बदामी आकाराच्या कुकीज असा खाऊही नेतात. शाळेची झाडलोट आणि इतर स्वच्छता करणाऱ्या कस्टोडियन्सना, कॅफेटेरियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नर्सला, शाळेच्या इतर ऑफीस स्टाफला आणि रोज दोनदा येणाऱ्या मेल कॅरिअरलाही कार्ड आणि एक-दोन चॉकलेटं द्यायला कोणी विसरत नाहीत. मुलांना सुट्टी नसल्याने त्यांना शाळेच्या बाहेर घेऊन जाता येत नाही; शिक्षक कधी कधी सगळ्या वर्गातल्या मुलांनी केलेली करड एकत्र करून जवळच्या ओल्ड होममधल्या वृद्धांना किंवा जनरल हॉस्पिटलच्या मुलांच्या वॉर्डला पोस्टाने पाठवितात. प्राथमिक शाळांमध्ये फक्त ५ वीच्या मुलांसाठी शाळा सुटल्यावर डान्स आणि अल्पोपाहाराची पार्टी शाळेची शिक्षक-पालक असोसिएशन ठेवते.
माध्यमिक शाळांमध्ये आणि हायस्कूल्समध्ये मुलं शाळेच्या पेरेंट-टीचर असोसिएशनकडून आपल्या व्हॅलेंटाइनसाठी खास भेटी ऑर्डर देऊन विकत घेतात. तरुण लोक आपल्या ‘खास’ माणसाबरोबर बाहेर जेवायला जातात. पती-पत्नी मुलांच्या बेबी सिटिंगची व्यवस्था करून बाहेर जेवणाचा प्लॅन करतात. या दिवशी खूप लग्न होतात. हा सण सगळ्या कुटुंबाबरोबर मात्र साजरा करत नाहीत. खास तरुण (किंवा निदान वृत्तीने तरी सदाबहार असलेल्या) लोकांचा हा सण आहे. मुळात तरुणांपुरता आणि तोही फक्त कार्ड आणि फुलांपुरता फार फार तर मर्यादित असलेला हा सण बिझिनेस कम्युनिटीनी अगदी ख्रिसमस इतका नाही, तरी बराच मोठा केला आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासाने जग जवळ आलं आहे हे आपण सगळेच जाणतो. भारतीय सण अमेरिकेत अजून फारसे ज्ञात नसले (आपण अजून इकडे अल्पसंख्याक असल्यानं असेल) तरी अमेरिकेतले पुष्कळसे हॉलिडेज भारतात साजरे व्हायला लागले आहेत. (निदान मोठय़ा शहरांमध्ये) व्हॅलेंटाइन डेही लाल गुलाबाची फुले देऊन साजरा केलेला दिसतो.
अमेरिकेने या परंपरागत सणाला एक वेगळा टच दिला आहे. फेब्रुवारी हा महिना १४ तारखेला येणाऱ्या व्हॅलेंटाइन डेकरिता- हृदयाच्या नाजूक बंधांचं कौतुक करण्याच्या दिवसाकरिता प्रसिद्ध आहे, पण हृदयाबद्दल वाटणारी ही जवळीक एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता एक महिनाभर वाटेल अशा विचारांनी अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने फेब्रुवारीचा सबंध महिना हृदयाच्या (विशेषत: स्त्रियांच्या) आरोग्याला डेडिकेट केला आहे. हार्ट्ची दुखणी हा स्त्रियांचा एक नंबरचा किलर आहे. गेली जवळजवळ ५० र्वष अमेरिकेत या सबंध महिन्याचा उपयोग हार्ट डिसीजच्या- विशेष करून स्त्रियांच्या- संबंधात लोकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्याकरिता केला जातो. पहिल्या शुक्रवारी लाल रिबन किंवा लाल रंगाचे कपडे घालणं, (हृदय, त्याचं प्रेमाशी असलेलं नातं, गाढ प्रीतीचा लाल रंग या सगळ्या लाल कपडे घालण्यामागच्या भावना आहेत). ‘मेसी’सारखी मोठी मोठी कपडय़ांची दुकानं आपण चांगल्या ‘कॉज’ला मदत करत असल्याची खूप जाहिरात करून लाल रंगाचे कपडे मोठय़ा प्रमाणात विकतात. (एकाच दगडात स्वार्थ आणि परमार्थाचे दोन पक्षी मारतात का?) शाळांमध्ये मुलांना व्यायामाचे महत्त्व, योगासनं शिकविणं, दोरीच्या उडय़ा, पळण्याच्या शर्यती ठेवणं, वर्गात हार्ट डिसीजची माहिती सांगणारी प्रश्नोत्तरं असलेली पत्रिका सोडवून घेणं (नंतर ती घरी आईकरिता घेऊन जाणं) हे सगळं महिनाभर चालू असतं. अमेरिकेत हृदयाशी व्हॅलेंटाइन डेबरोबर असंही नातं जोडलं गलं आहे.
शशिकला लेले