scorecardresearch

कथा : चोरावर मोर

रोजच्या प्रमाणे बापट गुरुजी भृशुंड गणेश मंदिरातील मूर्तीला अभिषेक करताना अथर्वशीर्ष म्हणत होते.

कथा : चोरावर मोर

49-lp-artॐ नमस्ते गणपतये।

त्वमेव प्रत्यक्षं तत्वमऽसि।

त्वमेव केवलं कर्ताऽसि।

त्वमेव केवलं धर्ताऽसि।

त्वमेव केवलं हर्ताऽसि।

त्वमेव खल्विदं ब्रह्मासि।

त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्!

रोजच्या प्रमाणे बापट गुरुजी भृशुंड गणेश मंदिरातील मूर्तीला अभिषेक करताना अथर्वशीर्ष म्हणत होते. त्याचवेळी शेजारच्या खिडकीतून मंदिराबाहेरील ‘त्या’ विक्रेत्यावर त्यांची नजर पडली. काही दिवसांपूर्वी त्याने नवीनच थाटलेले हे पूजासाहित्याचे दुकान, या परिसरातील सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते.

तशी तर या गणेश मंदिराची परंपरा बरीच जुनी. पानिपतच्या लढाईला जाण्यापूर्वी सदाशिवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे दस्तावेज आहेत. पण इतक्या वर्षांत या गणरायाच्या आसपास असं पूजा साहित्याचं दुकान कुणी थाटलं नव्हतं. पूर्वी फक्त संकष्टीच्या दिवशी हार, फुलं, दुर्वा विकायला दोन-चार पोरंबाळं असायची.

‘हल्ली हे असंच होतंय. हा विक्रेता दिसला की माझं पुजेतलं लक्ष विचलित होतं.’ असं म्हणत बापट गुरुजींनी पुन्हा अथर्वशीर्षांला सुरुवात केली.

विघ्ननाशिने शिवसुताय। श्री वरदमूर्तये नमो नम:॥

अथर्वशीर्ष पूर्ण करून देवपूजा आटोपून ते मंदिराच्या गर्भगृहातून बाहेर आले. आता दुपारचा नैवेद्य वगैरे आटोपून देऊळ बंद करेपर्यंतची जबाबदारी आपल्या दोन्ही सहकाऱ्यांवर टाकून ते सरळ बाहेर पडले.

आज ‘त्या संगम पूजा साहित्य’मध्ये डोकावायचे. असे ठरवूनच गुरुजी तिकडे पोहोचले. तर दुकानात हीऽऽ गर्दी. या दुकानात लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी पडतील अशा वस्तू छान मांडून ठेवलेल्या. यात पूजेसाठी लागणारे हार, फुलं, नारळ, खडीसाखर, पेढे यांच्या बरोबरीने देवदेवतांचे फोटो, मूर्ती, धार्मिक साहित्य, देवपूजेची भांडी, देवांचे कपडे, रांगोळीचे छापे, स्टीकर्स, अंगठी, माळा, बांगडय़ा, पोळपाट-लाटणे, लॉकेट, किचेन, पेन, लहान मुलांसाठी कारसारखी खेळणी अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा संगम विक्रीसाठी ठेवला होता. बाजूला दोन बाके लावून त्यावर लोकांना बसण्याची सोय केलेली. टाइमपास म्हणून मग चिप्स, कुरकुरे, चॉकलेटस्, कोल्ड्रिंक वगैरे होतेच. दुकानाच्या बाहेरच बापट गुरुजींची नाना बेलसऱ्यांशी गाठ पडली.

‘‘गुरुजी, तुम्ही इकडे कुठे?’’ नानांनी लगेच टोकले.

‘‘आता तुमच्यासारखं बडं प्रस्थ इथे येऊ शकतं तर आम्ही का नाही?’’ बापट गुरुजींची कोटी.

मग नाना आणि गुरुजी दोघेही तिथेच बाहेरच्या बाकांवर जरा वेळ बसले. त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणून आणखी दोघे-चौघे लगेच तिथे पोहोचले. या सगळ्या मंडळींना असं आपल्या दुकानात बसलेलं पाहून तो विक्रेता मनातल्या मनात हसत होता, तर बापट गुरुजी अस्वस्थ.

पुढच्या काही दिवसांत त्याच्या दुकानातला लोकांचा वावर वाढतच गेला. कुणीही जाता येता हमखास ‘संगम पूजा साहित्य भंडार’मध्ये हमखास रेंगाळूू लागले. दुकानदारही कुणाला मज्जाव करत नव्हता, उलट सगळ्यांशी हसतखेळत बोलून तो सलगी वाढवू लागला. गुरुजींना मात्र या सगळ्यात काहीतरी खटकत होतं. शेवटी मनात या संदर्भात चालललेली खळबळ त्यांनी कोठेकरांना बोलून दाखविली.

‘‘बाबासाहेब, त्या ‘संगम’वाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’’

‘‘कोण? तो आपल्या देवळासमोरचा नवीन दुकानदार? का? काय झालं त्याचं?’’

‘‘परवा तो बापूंना आपल्या कार्यालयाबद्दल विचारत होता म्हणे.’’

‘‘तो तर नवखा. त्याला काय माहिती हवी कार्यालयाची?’’

‘‘तेच म्हणतो मी. आपल्या धंद्यात लक्ष घालावं ना त्यानी. कशाला नसत्या चौकशा करायच्या?’’

इतक्यातच नाना बेलसरे, बापू शेवाळे आणि हरबा तारे तिथे पोहोचले. त्यांनाही आपल्या चर्चेत सामील करून घेत गुरुजींनी सरळ बापूंनाच फर्मावले, ‘‘बापू, परवा तो ‘संगम’ वाला आपल्या कार्यालयाबद्दल काय म्हणाला ते सांगा यांना. सांगा.’’

‘‘मला एकदा कार्यालयात घेऊन चला म्हणाला हो तो.’’ बापू.

‘‘ऐका. ऐका.’’ गुरुजींना आणखीच चेव आला.

‘‘काय करणार तो तिकडे येऊन?’’ हरबा तारे भडकला.

‘‘मला पण त्यानी आडवळणानी तिथली माहिती विचारण्याचा प्रयत्न केला.’’ इति नाना.

‘‘नाना, तुम्हाला कल्पना नाही, पण मी बघत असतो ना मंदिरातून, अहो सारखं त्याचं लक्ष आपल्या कार्यालयाच्या इमारतीवरच खिळलेलं 50-lp-artअसतं. जसा काही अर्जुनाला दिसणारा माशाचा डोळा.’’ गुरुजी.

‘‘बेटय़ानं दुकानासाठी अशी मोक्याची जागा निवडलीय की अगदी सहज कार्यालयावर नजर ठेवता येईल.’’ बापू.

‘‘हे गणराया, कार्यालयावर काही संकट येऊ देऊ नकोस.’’ बापट गुरुजींनी लगेच गणरायाला हात जोडले.

‘‘म्हणजे गुरुजी यात काही घातपाताची शक्यता वाटते का तुम्हाला?’’ नानांनी शंका काढली.

‘‘चला. त्याला आत्ताच्या आत्ता इथून हाकलून लावू या.’’

हरबा तारे नेहमीच्या रांगडेपणानी बोलला.

‘‘नाना, आज संध्याकाळी आपल्या ‘दक्षता समिती’ची बैठक तुमच्या घरी घ्यायची का?’’ बापूंनी सुचविले.

‘‘चालेल. काहीच हरकत नाही.’’ नानांनी मान डोलावली.

‘‘पण बैठक ते दुकान बंद झाल्यानंतरच घ्यायची. शिवाय आपल्या पदाधिकाऱ्यांशिवाय इतर कुणालाही या बैठकीत प्रवेश द्यायचा नाही. हो म्हणजे याची जास्त वाच्यता नको.’’ बाबासाहेब कोठेकरांनी सल्ला दिला.

दुपारी आराम करतेवेळी बापट गुरुजींनी दोन वर्षांनी ‘दक्षता समिती’ची स्थापना झाली त्यावेळचा प्रसंग आठवला.

‘युवा चेतना संघ’ ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी एक अग्रगण्य संस्था. या संस्थेचे मुख्यालय शहरातल्या मध्य भागात, अगदी मोक्याच्या, वर्दळीच्या ठिकाणी. संस्थेच्या कार्यालयासमोर भलंमोठं पटांगण, जिथे चेतना संघातील युवकांना मैदानी खेळाचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं. उरलेल्या वेळात परिसरातील मुलांचा तिथे मुक्काम असतो. चेतना संघातील युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा बलशाली करणे हा मुख्य हेतू सुरुवातीच्या काळात या संस्थेचा होता. पुढे संघातील लोकांच्या निष्ठा बदलत गेल्या आणि काळाच्या प्रवाहात ते एका राष्ट्रीय राजकीय पार्टीशी जोडल्या गेल्या. पण मुख्यालय परिसरात राहणाऱ्या लोकांना आजही ‘चेतना संघ’ आणि त्याचं ‘कार्यालय’ हे वंदनीय ठिकाण. एक दिवस कुठूनशी अफवा पसरली, आतंकवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये चेतना  संघाचे मुख्यालय आहे.

त्या दिवशी कुणीही न बोलवता परिसरातील लोक अगदी स्वयंस्फूर्तीने एकत्र आले. चेतना संघाचं कार्यालय वाचविण्यासाठी काय करता येईल यावर जोरदार चर्चा झाली. एरवी घराबाहेर न डोकावणारे सुर्वे पोटतिडकीनं बोलत होते, ‘‘आपल्या देशात व राज्यात दिवसेंदिवस आतंकवादी कारवाया, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. हे सगळं आपल्या मोहोल्ल्यात येऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला आत्ताच काहीतरी करण्याची गरज आहे. आज इथे जो काही निर्णय होईल त्याला माझे आणि माझ्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य असेल.’’

‘‘या कामात आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो.’’ पोलीस खात्यात कामाला असलेल्या कदमांकडे पाहात शर्मा बोलले.

‘‘प्रत्येक घटनेत ‘रक्षणाची जबाबदारी पोलिसांची’ असे न म्हणता काही प्रमाणात ही जबाबदारी आपणही उचलली पाहिजे.’’ श्रीधर भावे सहजपणे बोलून गेले.

‘‘खरंय. ‘पोलीस यंत्रणा काहीच करत नाही’ असे म्हणत पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या मागे बरीच, काही आवश्यक व जास्त अनावश्यक कामे सतत लागलेली असतात.’’ प्रमोद कावळेनी भावेंच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

‘‘देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी पोलीस हजर असतीलच असे नाही. तेव्हा मी तर असे म्हणेन की 51-lp-artआता पोलिसांकडून फार अपेक्षा न करता आपल्यालाच पोलीस बनावे लागेल.’’ वामन जोशीसुद्धा पोलिसांची बाजू घेऊन बोलला.

‘‘पण कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून सरकारनं प्रयत्न करायला हवेत ना?’’ अविनाश कडू.

‘‘हे बघा. घटना घडून गेल्यानंतर करण्यासारखं काहीच उरत नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर ओरडण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअस.’ म्हणूनच मी म्हणतो आपण आपल्या मोहल्ल्यात एक दक्षता समिती स्थापन करावी.’’ दीपक कोठेकरने सल्ला दिला.

या मताला मात्र सगळ्यांनी एकमुखाने मान्यता दिली. प्रत्येक कुटुंबातून दक्षता समितीच्या सदस्यत्वासाठी नावे आली. त्यातील काही तरुण, तर दोन-तीन अनुभवी व्यक्ती अशा पंधरा लोकांची निवड पदाधिकारी म्हणून झाली.

सुमेध नगरारे, या पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या तरुणाने काहीही गडबड झाल्यास चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी / दक्षता संपूर्ण जमावाला तिथेच समजावली. तर इन्स्पेक्टर सूरज कदम यांनी गोळीबार झाल्यास कसे जागीच लोटांगण घ्यावे याचे प्रात्यक्षिक दिले. यानंतर जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया होत तेव्हा लोक स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन युवा चेतना संघाचे कार्यालय वाचविण्यासाठी काय काय करता येईल यावर चर्चा करत. आपल्याला असणाऱ्या माहितीची देवाणघेवाण करत.

आजची दक्षता समितीची बैठक अशी तडकाफडकी बोलावली होती, तरीही सगळे वेळेवर जमले. सगळे जमल्याची खात्री करून घेत बापट गुरुजींनी सुरुवात केली, ‘‘आज सामाजिक सुरक्षेची जबाबदारी सरकार व पोलीस यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाचीही आहे, याच उद्देशाने आपण आपल्या मोहल्ल्यात दक्षता समितीची स्थापना केली हे तर सगळय़ांना ठाऊक आहे. असे असतानाही काही दिवसांपूर्वी भृशुंड गणेश मंदिरासमोर सुरू झालेल्या ‘संगम पूजा साहित्य भंडार’ आणि तिथला विक्रेता याबाबत आपण इतके उदासीन कसे?’’

‘‘गुरुजी, काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला नीट कळलं नाही.’’ वामन जोशी उद्गारला.

‘‘अरे वामन्या, कसा रे तू? त्या दिवशी तो तुला आपल्या कार्यालयाच्या आतल्या भागाचा फोटो मागत होता, तरी तुला त्याबद्दल काहीच शंका आली नाही?’’

‘‘हो म्हणजे काय की कार्यालयातून एकदम नवीन माणसाला प्रवेश नाही ना आणि त्याला कार्यालय आतून कसे आहे याची उत्सुकता वाटत होती म्हणून मागितला त्यांनी फोटो.’’

‘‘मग लागलीच दिला की काय तू त्याला फोटो?’’  नानांनी विचारले.

‘‘असं काय विचारता नाना तुम्ही. आता बापूंनी त्याला आत नेत नाही म्हटलं, म्हणून त्यांनी फोटो मागितला. पण एवढय़ाशा गोष्टींनी असं चिंतित होण्यासारखं काय आहे त्यात?’’ वामनने आपलाच रेटा लावला.

‘‘हॉटेल ताजचा नुसता फोटो बघून दहशतवादी तिथे घुसून एवढा मोठा दहशतवादी हल्ला करू शकले ना?’’ बापूंचा प्रतिप्रश्न

‘‘पण फक्त एवढय़ाच कारणास्तव आपण त्याच्यावर अशा प्रकारचा संशय घेणे बरोबर नाही. आपल्या चेतना संघाचं कार्यालय हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असू शकतो.’’ चंदू पारखी बोलला.

‘‘मला दोन दिवसांपूर्वी तो कार्यालयाच्या मागच्या गल्लीत आणखी एका व्यक्तीसोबत दिसला, पण मी तिकडे दुर्लक्ष केलं.’’ रंग्या गोसावींनी आपल्याला असलेली माहिती दिली.

‘‘आम्ही सगळे बोरकरांच्या गच्चीवर पतंग उडवत असताना, तो फक्त कार्यालयाच्या वरच्या मजल्याचंच निरीक्षण करत होता.’’ बाळू पुरोहितने सांगितले.

‘‘म्हणून आपण त्याच्याकडे संशयास्पदपणे बघायचं?’’ चंदूने विचारले.

‘‘आपल्यापैकी कुणालाही तो कुठला? यापूर्वी काय करत होता? इथे कसा आला? संघाबद्दलच्या त्याच्या भावना काय? या प्रकारची त्याच्यासंबंधीची प्राथमिक माहिती नाही. त्यांनी मात्र आपल्यापैकी सगळय़ांकडून युवा चेतना संघ, त्याचे कार्यालय, तिथे होणारे महत्त्वाचे उत्सव, प्रसंग, तिथले पदाधिकारी, त्यांचे कार्य अशी बरीचशी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून तरी मला वाटते की आपण त्याच्या बाबतीत थोडी जागरुकता दाखवायला हवी. तो कुठे जातो? कुणाला भेटतो? कार्यालयाची चौकशी करण्यामागे त्याचा हेतू काय? वगैरे जाणून घ्यायलाच पाहिजे.’’ बापट गुरुजी बोलले.

‘‘ते ठीक आहे. पण म्हणून त्याचा उद्देश वाईटच असेल असं आपण का समजायचं?’’ चंदू त्याच्यावर संशय घ्यायला तयारच नव्हता.

‘‘इतिहासातल्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी तर आपण अगदी लहानपणी ऐकल्यात; आजही आपल्या मुला-नातवंडांना त्या गोष्टी सांगतोच. मग याच इतिहासातील गोष्टींमधून आपणही काही शिकायला नको?’’ गुरुजींनी सगळय़ांनाच सवाल केला.

जरा वेळ सगळेच गप्प होते. मग नानाच सगळय़ांच्या मनातले बोलते झाले. ‘‘गुरुजी, तुम्ही असं कोडय़ात बोलू नका. तुम्हाला काय म्हणायचंय ते सरळ सरळ सांगून टाका म्हणजे त्यावर तोडगा तरी काढता येईल.’’

‘‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या राज्यात जाऊन त्याची सुवर्ण नगरी सुरत लुटली ही कथा तर सगळय़ांनाच माहीत आहे. पण ‘सुरत लुटायची’ म्हणून काही महाराज सरळ तिथे दाखल झाले नाहीत. तर त्यासाठी त्यांनी खूप पूर्वतयारी केली होती.’’

‘‘हो तर, बहिर्जी नाईक आणि त्यांचे सहकारी जवळपास तीन महिने तिथे वेगवेगळय़ा वेशांत वावरत होते. या काळात त्यांनी सुरत नगरीची खडान्खडा माहिती काढली.’’ रंग्या उत्साहाने बोलला.

‘‘म्हणजे गुरुजी, हा तसा माहिती काढायला आलेला आधुनिक प्रतिबहिर्जी असावा असं वाटतंय की काय तुम्हाला?’’ बापूंनी विचारले.

‘‘ते तसं नसू दे हीच विघ्नहर्त्यांला प्रार्थना. पण आपण सावध राहायला नको?’’ बापट गुरुजी.

‘‘हा सावधपणा बाळगताना त्याला मात्र आपल्याविषयी संशय येता कामा नये.’’ नानांनी सावधानतेचा इशारा दिला.

‘‘शिवाय हा सजगतेचा संदेश सगळय़ा लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा? हा प्रश्न तर आहेच.’’ अतुल भुतेने विचारले.

‘‘बापट गुरुजींचा कीर्तन करण्यात हातखंडा, तेव्हा मला वाटतं उद्याच्या संकष्टी चतुर्थीला आपण भृशुंड गणेश मंदिरात कीर्तनाचे आयोजन करू गुरुजी, तुम्ही आपल्या कीर्तनातून परिसरातल्या लोकांना सजगतेचा संदेश द्या. चालेल ना तुम्हाला असं केलं तर?’’

52-lp-artसगळय़ांनाच ही कल्पना आवडल्यामुळे त्याला लगेच संमती मिळाली.

‘‘आजपासून आपण सगळय़ांनीच आता त्या ‘संगम’च्या विक्रेत्यावर  नजर ठेवायची आणि आपल्याला मिळालेली त्याच्या संबंधीची माहिती एकमेकांना कळवायची. उद्याच्या कीर्तनाविषयी मात्र घराघरात निरोप पोहोचला पाहिजे.’’ नानांनी सगळय़ांना सूचना दिल्या आणि बैठक संपली.

ठरल्याप्रमाणे ठीक सहा वाजता कीर्तनाला सुरुवात झाली. अंगात जरी काठी धोतर, त्यावर पांढरा शुभ्र कुडता ,डोक्यावर पगडी, गळय़ात तुळशीची माळ आणि फुलांचा हार अशा पेहेरावात बापट गुरुजी कीर्तनाला उभे राहिले. बाजूला तबला, पेटी, मृदुंग यावर साथ करणारे बसले होते. कीर्तनाची सुरुवात गुरुस्तवनाने झाली.

गुरुस्तवन  ‘‘गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:।

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:॥’’

‘‘मूकं करोती वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिम्

यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्॥’’

गणेशवंदन    ‘‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥’’

शारदा नमन

‘‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥

या ब्रह्मच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता।

सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडय़ा पहा॥

गुरुस्तवन, गणेशवंदन आणि शारदा नमन करत बापट गुरुजी मग भजनावर आले.

‘‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’’

‘‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम’’

‘‘राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की’’

असे दोन-तीन भजन म्हणता म्हणता जमलेल्या जनता जनार्दनाला त्यांनी आपल्यात सामील करून घेतले. आता आपल्या दुकानाकडे कोणी फिरकणार नाही हे लक्षात येताच ‘संगम’ वाला दुकान बंद करून निघून गेला. बापट गुरुजींनी सुरुवात केली.

जग हा धकाधकीचा मामला, येथे कोण पुसे अशक्ताला

शक्तीमुळे येती सुखे, शक्ती नसता विटंबना॥

गुरुजींनी हा श्लोक म्हटला आणि कीर्तनासाठी जमलेली जनता एकदम भानावर आली. दुसऱ्यांदा गुरुजींच्या सोबत श्लोक म्हणताना प्रत्येकाच्या मनात विचार येऊन गेला ‘अरे, हे तर युवा चेतना संघाचे घोषवाक्य,

गुरुजी बोलू लागले, ‘‘मंडळी, आजपर्यंत स्कंध पुराणातील अनेक कथा आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकल्या आहेत. पण आज मी तुमच्यासमोर अलीकडच्या काळातील काही घटनांवर प्रकाश टाकणार आहे. यातूनच स्वत:ला सावरण्याचे धडे आपण गिरविले पाहिजे. हाच आजच्या कीर्तनाचा मुख्य उद्देश.’’

लगेच लोकांच्या भुवया उंचावल्या. काही अघटित घडू नये. यासाठी घ्यावयाची ही काळजी हे तिथल्या चाणाक्ष जनतेने जाणले आणि प्रत्येक व्यक्ती गुरुजींचा एक एक शब्द कानांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू लागली.

गुरुजींनीही आपल्या खुमासदार शैलीत देशात ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया यांची रसभरीत वर्णनं सांगितली. त्यात होणारं राष्ट्राचं नुकसान, लोकांची वाढलेली असुरक्षिततेची भावना, फक्त स्वत:च्या सुरक्षेचा विचार करताना लोकांकडून होणाऱ्या चुका या सगळय़ांवर प्रकाश टाकला. ‘‘आज जे देशातील काही मोजक्या शहरांत, महानगरांतून चाललंय ते उद्या आपल्या शहरात, आपल्या मोहल्ल्यात होणार नाही असं तर आपण म्हणू शकत नाही. मग काही तरी घडण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आजच दक्षता घेतलेली काय वाईट?’’ असं म्हणून काय काळजी घ्यावी या विषयी लोकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये परक्या माणसावर एकदम विश्वास टाकू नये, आपल्या खासगीतल्या गोष्टी नवीन व्यक्तींजवळ बोलू नये, बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना द्यावी, कुठल्याही संशयास्पद गोष्टींची कसून चौकशी करावी असे मुद्दे प्रामुख्याने होते.

दहशतवाद्दांसाठी कुणा एका समाजाला, धर्माला दोषी न ठरविण्याचा सल्ला देताना ते म्हणाले, ‘‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कट्टरपंथीयांची इतरांच्या बाबतीतली ती एक विकृत मनोवृत्ती आहे.’’ दहशतवादीविरोधी कामात प्रत्येकांनी विशेषत: तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे सांगताना पालकांना उद्देशून ते बोलले, ‘‘भगतसिंग जन्माला यावा असे प्रत्येकाला वाटते, पण तो शेजारच्या घरी. घरच्या पाळण्यात कुठल्याही मातेला भगतसिंग नको. कारण भगतसिंग म्हणजे संघर्ष!’’

युवकांना शौर्याची महती सांगताना संस्कृतातील एक सुभाषितच त्यांनी सादर केले.

‘‘अश्वं नैव, गजंनैव, व्याघ्रं नैवच नैवच।

अजापुत्रं बल्िंा दद्यात, दैवो दुर्बल घातक:॥

अर्थात, परमेश्वर नेहमी शूर व्यक्तींसोबत असतो. दुर्बलांबरोबर तो कधीच नसतो. म्हणूनच घोडा, हत्ती किंवा वाघाचा बळी देत नाही. बळी बकऱ्याचा असतो कारण तो दुर्बल असतो.

दोन तासांच्या त्या कीर्तनामध्ये ‘युवा चेतना संघा’च्या सुरक्षिततेविषयी लोकांच्या मनात सजगता चेतवून गुरुजींनी कीर्तन संपविले. शेवट गीतेतील परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थय सम्भवामि युगे युगे॥ या श्लोकाने करताना ते म्हणाले ‘‘जेव्हा जेव्हा या भूमीवर दुष्प्रवृत्ती वाढतील, तेव्हा त्यांचा संहार करायला मी पुन:पुन्हा अवतार धारण करीन’’ असे भगवंताने गीतेत सांगितले असले तरीही आता भगवंताच्या अवताराची वाट न पाहता आपल्यातच वसलेल्या भगवंताच्या शक्तीमुळे आपल्याला दुष्कृत्यांवर आळा घालता येईल.’’

दुसऱ्या दिवसापासून ‘संगम पूजा साहित्य भंडारा’तील गर्दी तशीच होती, पण आता लोकांचा या दुकानाकडे, त्या विक्रेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. हळूहळू विक्रेत्यासंदर्भात वेगवेगळी माहिती गोळा होत होती. ‘‘त्याच्याकडे चंदेरी सॅन्ट्रो गाडीतून तीन धिप्पाड पुरुष येऊन गेले.’’ ‘‘तो नेहमी एकसारखी गाडी वापरत नाही. कधी पल्सर तर कधी युनिकॉर्न, शाईन अशा सगळय़ा महागडय़ा गाडय़ा वापरतो.’’ ‘‘गर्दीपासून दूर जात आज तो मोबाइलवरून कुठल्या तरी अगम्य भाषेत बोलत होता, पण नजर मात्र पूर्णवेळ कार्यालयावरच खिळलेली होती.’’ ‘‘टाटा एस गाडीतून त्याच्या दुकानातून भरपूर माल भरला गेला.’’ अशा प्रकारची अगदी साध्या गोष्टींची नोंद दक्षता समिती ठेवू लागली.

एकादशीच्या दिवशी त्याच्या दुकानातील अनाहुतांची लगबग बापट गुरुजींच्या नजरेतून सुटली नाही. त्या दिवशी बाहेर लोकांना बसण्यासाठी ठेवलेले बाक पण उचलले गेले होते. त्यामुळे दुकानातील वर्दळ आपोआपच कमी झाली हेसुद्धा दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांनी टिपले. रात्री दुकान बंद होण्यापूर्वी काही खोकी तिथून बाहेर पडताना दिसली. दक्षता समितीला या सगळय़ा घडामोडी संशयास्पद वाटल्या म्हणून रात्रीच जवळच्या पोलीस स्टेशनला या सगळय़ाची माहिती देण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन पवार यांनी जातीने या गोष्टीत लक्ष घातले. सूरज भोतमांगे, प्रेमदास, गौतम इत्यादी खबऱ्यांना त्यांनी कामाला लावले. सूरज घुरडे आणि सदानंद चौधरी या शिपायांना सोबत घेऊन त्यांनी स्वत: परिसराच्या नाकाबंदीचे काम हाती घेतले. त्यांनासुद्धा शहरात काही तरी घातपात होण्याची शक्यता असल्याची खबर मिळालेली होतीच.

अगदी नित्यनेमाने पहाटे पाच वाजता फिरायला जाणाऱ्या मुंधडा दाम्पत्याला त्या दिवशी नवी कोरी मारुती कार क्रॉस झाली आणि सौ मुंधडा त्या गाडीकडे बोट दाखवत बोलून गेल्या, ‘‘तो नवीन दुकानदार आता या वेळी इकडे कुठे फिरतो आहे?’’

श्रीयुत मुंधडांनी ताबडतोब ही खबर आपल्या सेलफोनवरून दीपक कोठेकरला दिली. ते दोघे फिरून परत आले तेव्हा रोजच्या पेक्षा आज रस्त्यावरची रहदारी त्यांना जास्त वाटली. नेहमीच्या फिरणाऱ्यांसोबतच काही अनोळखी चेहरेही रस्त्यावर दिसत होते. इतक्यात मघाचीच पांढरी मारुती कार दुरून येताना दिसली. मात्र त्याच्या मागच्या दोन्ही खिडक्यांमध्ये दोन बंदूकधारी होते. कार जरा जवळ येताच गाडीतील लोकांनी अंदाधुंद गोळीपार करायला सुरुवात केली.

‘‘सगळय़ांनी ताबडतोब जमिनीवर आडवे व्हा.’’ असा मोठय़ा आवाजातील सैनिकी आदेश देत मुंधडांनी जमिनीवर लोळण घेतली. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीही तिथेच रस्त्यावर आडव्या झाल्या. असे म्हणतात की ‘‘गर्दीला चेहरा नसतो.’’ म्हणून तर एकाने गोटा उचलला की लगेच गोटमार होते. इथेही तोच अनुभव आला. मुंधडा दाम्पत्याची ती कृती पाहून अनेकांनी त्यांचे अनुकरण केले. लोकांनी पळापळ न करता दिलेले सहकार्य पाहून त्या कार पाठोपाठ आलेल्या पोलिसांच्या गाडीतील जवानांनी उत्तरादाखल अतिरेक्यांच्या गाडीवर गोळीबार केला. आजूबाजूला गस्तीवर असणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांनीही मग अतिरेक्यांच्या गाडीच्या चाकावर निशाणा साधला. गाडी पंक्चर झाल्यामुळे गाडीतून बाहेर येऊन अंदाधुंद गोळीबार करत वेगाने चेतना संघाच्या मुख्यालयाकडे धाव घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अचूक टिपले. तर तिसरा आतंकवादी ड्रायव्हर सीटवरच यमसदनी पोहोचला.

त्या दिवशी दिवसभर सर्व न्यूज चॅनल्सवर हीच बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून होती. विश्वास पांडेंनी गंमत म्हणून केलेली बापट गुरुजींच्या कीर्तनाचे व्हिडीओ क्लिपींग कुठल्या तरी वाहिनीच्या वार्ताहराला मिळाले. गुरुजींनी कीर्तन या माध्यमातून केलेले आतंकवादविरोधी जनजागरण संपूर्ण देशभर खूप गाजले.

‘‘स्थानिकांच्या सहकार्याशिवाय आम्हाला असे घवघवीत यश मिळाले नसते’’ हे पोलीस खात्याने मंजूर केले. सहकार्य करणाऱ्या सगळय़ांना सरकारतर्फे गौरविण्यात आले. तर अनेक लोकोपयोगी कामांत कीर्तन माध्यमाचा वापर करण्यासाठी बापट गुरुजींची सरकारी नियुक्ती झाली.
शिल्पा प्रवीण ढोमणे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 18

ताज्या बातम्या