विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची : नागालॅण्ड

सैबेरियातील हिवाळ्यात हजारो किलीमीटरचं अंतर कापून भारतामार्गे दक्षिण आफ्रिकेत जाणारे तिथले ससाणे म्हणजेच अमुर फाल्कन. नागालॅण्डमध्ये केली जाणारी त्यांची कत्तल थांबवून त्यांचं संवर्धन करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आलं आहे.. राज्याराज्यांमधल्या घडामोडींचा वेध घेणारं नवं सदर

नागालॅण्डमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने उतरणाऱ्या अमुर फाल्कन या स्थलांतरित पक्ष्यांची खाण्या-विकण्यासाठी बेसुमार कत्तल होत असे. स्थानिक वन्यजीव प्रेमींनी २०१२ मध्ये हे हत्याकांड जगासमोर आणले. आज त्यांची शिकार कमी झाली आहे. गेल्या सहा वर्षांत हा शिकारी समुदायच पक्ष्यांचा पालक बनला आहे. इथेच जीपीएस टॅगिंग केलेला लाँगलेंग नावाचा पक्षी यंदा प्रवासाची दोन चक्रे पूर्ण करून भारतात परतला. पण त्याच वेळी मणीपूरमध्ये या यंदाच टॅगिंग केलेल्या, पक्ष्याची अवघ्या चार दिवसांत शिकार झाली. तरीही अमुर फाल्कनचा प्रवास गेल्या सहा वर्षांत बराच सुरक्षित झाला आहे, हे मान्य करावेच लागेल. कोणत्याही जिवाची शिकार वज्र्य न मानणाऱ्या समाजातील या परिवर्तनाविषयी माहीत असायला हवं.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

अमुर फाल्कन हे सायबेरियातील ससाणे. तिथल्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात स्थलांतर करतात. सैबेरियातून भारतावाटे दक्षिण आफ्रिकेत जाऊन पुन्हा आपल्या मायदेशी परततात. या थोडय़ा-थोडक्या नव्हे तर तब्बल २२ हजार किलोमीटरच्या उड्डाणात त्यांचे थवे अवघे दोन महिने नागालॅण्डच्या आश्रयाला येतात. तिथल्या दोयांग नदीवर धरण बांधल्यापासून त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

हे पक्षी खाल्लय़ामुळे रोग होतात, असा तिथल्या रहिवाशांचा समज असल्यामुळे पूर्वी त्यांची शिकार होत नसे, मात्र २००५-०६च्या सुमारास येथील स्थानिक लोक हे पक्षी खाऊ  लागले आणि दोयांग नदीत मासेमारी करणाऱ्यांनी अमुर फाल्कनची शिकार सुरू केली. जोपर्यंत साध्या बेचकीने आणि एअरगनने शिकार केली जात होती, तोपर्यंत बळी पडणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण थोडेतरी मर्यादित होते, मात्र एका गावकऱ्याच्या डोक्यातून मासेमारीच्या जाळ्याचा शिकारीसाठी वापर करण्याची युक्ती निघाली. ही युक्ती या पक्ष्यांच्या मुळावरच उठणारी ठरली. नदीकाठी असलेल्या झाडांवर अनेक जाळी एकमेकांलगत बांधून मोठा सापळाच तयार करण्यात येऊ  लागला. हे पक्षी दिवसभर उंचावरील विजेच्या तारांवर रांगेत बसून असत किंवा आकाशात मुक्तपणे विहार करत, मात्र संध्याकाळ होताच ते खाली झाडांवर येत आणि जाळ्यांत अडकून पडत. एअरगनमुळे एक व्यक्ती दिवसाला सरासरी १००-२०० पक्ष्यांची शिकार करू शकत होती, मात्र जाळ्यांमध्ये एकाच दिवशी हजारो पक्षी अडकून पडू लागले. हे पक्षी आजूबाजूच्या गावांत विकले जाऊ  लागले.

दारिद्रय़ात आयुष्य कंठणाऱ्या, मासेमारी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या मच्छीमारांना पैसे कमवण्याचा नवा आणि सोपा मार्ग दिसू लागला. अमुर फाल्कनचे महिन्या-दोन महिन्यांचे वास्तव्य येथील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग ठरू लागले. या काळात स्थानिक रहिवासी सुमारे ५० हजार रुपये कमवू लागले. पण त्याचबरोबर या परदेशी पाहुण्यांचा भारतातील अधिवास धोक्यात आला. २०१०मध्ये नागालॅण्ड सरकारने या पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी आणणारा आदेश जारी केला, मात्र तो कागदावरच राहिला. त्यांची बेसुमार कत्तल सुरूच राहिली.

२०१२ हे वर्ष मात्र ही स्थिती पूर्णपणे बदलवणारे ठरले. येथील स्थानिक पत्रकार, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव छायाचित्रकार, पक्षीप्रेमी यांनी या हत्याकांडाविरोधात आवाज उठवला. सरकारनेही त्यांना साथ दिली. ऑक्टोबर २०१२मध्ये तेथील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अमुर फाल्कन या पाहुण्या पक्ष्यांची शिकार बंद करण्याचे आदेश स्थानिक अधिकारी आणि परिसरातील गावांच्या प्रमुखांना दिले. याच वर्षी भारताने ‘स्थलांतरित प्रजाती संवर्धन करार’ स्वीकारला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावही वाढला. नदीकाठची जाळी हटवली गेली, मात्र हे परिवर्तन शाश्वत ठरण्याची शक्यता कमीच होती.

गेल्या काही वर्षांपासून या पक्ष्यांची शिकार हाच तेथील अर्थव्यवस्थेचा कणा झाला होता. त्यामुळे खुलेआम नाही, तरी छुप्या मार्गानी शिकारी सुरूच होत्या. वन विभाग आणि पोलीस बंदीची काटेकोर अंमलबजावणी करू लागले. शिकार करताना आढळणाऱ्यांना शिक्षा केली जाऊ  लागली. काही वेळा तुरुंगवासाचाही मार्ग अवलंबण्यात आला. अल्पावधीतच जलाशयाकाठची सर्व जाळी हटवली गेली. सापळा दूर झाला. नदीकाठी टाकून दिलेल्या जाळ्यांतही पक्षी अडकून पडलेले दिसत. त्यामुळे तो परिसरही स्वच्छ करण्यात आला. पक्ष्यांचे थवे पुन्हा निर्धास्तपणे विहरताना दिसू लागले.

शिकार करणाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक होताच आणि तो सुटेपर्यंत संवर्धनात यश येणे शक्य नव्हते. येथील काही पक्षीप्रेमी संस्था या पक्ष्यांच्या आणि नागालॅण्डला लाभलेल्या वरदानाच्या जतनासाठी धावून आल्या. त्यांनी लहान मुलांचे प्रबोधन करण्यासाठी इको क्लब स्थापन केले. चित्र, अभ्यास, गीतांच्या माध्यमातून पुढच्या पिढीच्या मनात या पक्ष्यांविषयी आदर, अभिमान निर्माण केला. या कत्तलीमुळे आपल्या राज्याची जागतिक स्तरावर होत असलेली बदनामी तेथील प्रसारमाध्यमांनी स्थानिकांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर तेथील काही स्थानिक मच्छीमारांनी स्वत:च शिकार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ‘अमुर फाल्कन रुस्टिंग एरिया युनियन’ स्थापन केली.

या पक्ष्यांबाबत शिकाऱ्यांना असणाऱ्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून घेण्याचे प्रयत्न सुरू  झाले. आज त्यांच्यापैकी काही ‘अमुर फाल्कन संरक्षण दला’त कार्यरत आहेत. पक्ष्यांचे वास्तव्य जेवढा काळ असते, तेवढा काळ ते जंगलात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडतात. उर्वरित रहिवाशांपैकी काही पर्यटक मार्गदर्शक झाले आहेत.

नागालॅण्डमधील शिकारी जमातींच्या भीतीने पूर्वी पर्यटक इथे फारसे फिरकत नसत. आज येथील पंगती हे गाव अमुर फाल्कनची राजधानी म्हणून ओळखले जाऊ  लागले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकार आणि हौशी पर्यटकही पक्ष्यांनी व्यापलेले येथील आकाश पाहण्यासाठी येतात. यंदा नोव्हेंबरमध्ये इथे अमुर फाल्कन महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. येथील पक्षी अभ्यासकांच्या मते गेल्या काही वर्षांपासून काही अमुर फाल्कन स्थलांतर करून परत न जाता इथेच राहात आहेत. जानेवारी, मार्चमध्ये देखील या परिसरात अमुर फाल्कन दिसू लागले आहेत. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचेच हे यश आहे.

जीपीएस टॅगिंग

या पक्ष्यांच्या लांबलचक प्रवासाचे रहस्य उलगडण्यासाठी येथील काही पक्ष्यांना जीपीएस टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासावर, मार्गावर, त्यांनी पार केलेल्या अंतरावर नजर ठेवणे शक्य झाले आहे. ही तशी खर्चीक प्रक्रिया असते. एका पक्ष्याला सॅटेलाइट रेडिओ ट्रान्समीटर लावण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च येतो. शिवाय त्याद्वारे माहिती संकलित करण्यासाठी लाखभर रुपये खर्च करावे लागतात. या दरम्यान अपघात, शिकार किंवा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास खर्च वाया जातो. या प्रक्रियेसाठी काही पक्ष्यांना जाळ्यात पकडून त्यातील सुदृढ पक्ष्यांनाच टॅगिंग केले जाते. त्यानंतर काही तास त्यांना तिथेच ठेवून घेतले जाते आणि नंतर मुक्त केले जाते.  यंदा ५ नोव्हेंबरला मणीपूर (नर) आणि तामेंगलाँग (मादी) या दोन पक्ष्यांना जीपीएस टॅगिंग करून मुक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या चार दिवसांत मणीपूरची एअर गनद्वारे शिकार करण्यात आली. शिकार कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यामुळे एअरगनचे परवाने रद्द करण्यावर विचार सुरू झाला आहे. मणीपूरची मादी तामेंगलाँग २५ नोव्हेंबरला सोमालियाला पोहोचल्याची नोंद झाली आहे.

स्थानिकांचं प्रेम

लाँगलेंग हा एक जीपीएस टॅगिंग केलेला पक्षी! तो दुसऱ्यांदा भारतात परत आल्याची बातमी वोखा जिल्ह्य़ात पसरताच त्याचे निश्चित ठिकाण जाणून घेण्याची उत्सुकता स्थानिकांमध्ये निर्माण झाली. आपल्या गावातून उडालेलं एक पाखरू हजारो मैल कापून पुन्हा पुन्हा सुरक्षित परतत असल्याचा आनंद त्यात सामावलेला होता.

२०१३ साली जीपीएस टॅग लावलेल्या काही पक्ष्यांनी आसाम, बांगलादेश, बंगालचा उपसागर, दक्षिण भारत, अरबी समुद्र, दक्षिण आफ्रिका असा प्रवास केला. नंतर त्यापैकी काही बोत्स्वाना येथे तर काही टांझानिया येथे गेले. तिथे काही महिने राहिल्यानंतर त्यांनी आपल्या मायदेशाकडे परतीचा प्रवास केला. २०१४मध्ये हे दोन्ही पक्षी पुन्हा भारतात परतले. त्यांचे आगमन साजरे करण्यासाठी छोटेखानी समारंभही आयोजित करण्यात आला होता.

त्यांच्याबरोबरच टॅगिंग करण्यात आलेला वोखा हा पक्षी मात्र दक्षिण आफ्रिकेत असल्याचेच दिसत होते. याचा अर्थ त्याचा टॅग तिथे पडला असावा किंवा तो मृत्युमुखी पडला असावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.