अलिबागजवळील रांजणपाडा येथील ‘द गिल्ड आर्ट गॅलरी’ या कलादालनात दिलीप रानडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन ३० एप्रिलपर्यंत सुरू आहे. ‘ड्रॉइंग्ज’च्या या प्रदर्शनात रानडे यांची नवी-जुनी रेखाचित्रं आणि कागदावरली रंगचित्रं आहेत, त्यामुळे त्यांच्या चित्रप्रवासाच्या टप्प्यांमध्ये प्रेक्षकाला शिरता येतं.. मुद्दाम अलिबागला जावं एवढी महत्त्वाची ही रेखाचित्रं का आहेत, याची चर्चा- अर्थातच प्रदर्शनाच्या अनुषंगानं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखाचित्रं हे दिलीप रानडे यांचं प्रमुख अभिव्यक्ती-माध्यम आहे. शिल्पं, कॅनव्हासवरची रंगचित्रं हेही त्यांनी केलं आहेच; त्या कामाची प्रदर्शनंही यापूर्वी भरली आहेत. परंतु रेखाचित्रांबद्दल कवी आणि समीक्षक रणजीत होस्कोटे यांच्याशी रानडे यांच्या झालेल्या दीर्घसंवादाचं पुस्तक हे रेखाचित्रांचा विचार किती समृद्ध असू शकतो, याची साक्ष देणारं आहे. त्यामुळे, ताज्या प्रदर्शनात कागदावरली चित्रंच आहेत, हा या प्रदर्शनाचा मोठा गुण ठरतो. रेखाचित्रं, रंगयुक्त रेखाचित्रं आणि रंगीत चित्रं अशी इथल्या चित्रांची वर्गवारी करता येईल. यापैकी रंगीत चित्रं अलीकडल्या दहा-पंधरा वर्षांतली आहेत; तर रेखाचित्रं गेल्या सुमारे ४० वर्षांतून निवडलेली असली तरी सन २००० नंतरची अधिक आहेत. अशा निवडीतून रानडे यांच्या चित्रप्रवासाचे काही टप्पे कळू शकतात- उदाहरणार्थ, चित्रात वापरलेली रेषा आधी सलग असे, तिची वळणं गोलाईदारच असत. पण पुढे ही रेषा जणू थांबत-थांबत विचार करत रेखल्यासारखी दिसू लागते. ‘सलगता म्हणजेच सहजता’ या गृहीतकाला आव्हान देणारी ही रेषा असल्यामुळे, या नव्या रेखाचित्रांतही वळणं असली तरी त्यांची गोलाई ही घटवलेल्या तानेसारखी नाही. (गाण्यातल्या तानेचं उदाहरण पुढे न्यायचं तर कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्या अनेक ताना अपुऱ्या राहूनही त्यामागला शोध जाणवतो, तशी ही नवी वळणं आहेत). आकाराची घनता दाखवण्यासाठी बारीक रेषांचा वापर १९७० वा १९८० च्या दशकांत करणारे रानडे, नव्या रेखाचित्रांमध्ये ठिपक्यांचे  दाट आणि विरळ समुच्चय वापरून घनता दाखवतात. त्यामुळे नव्या चित्रांमधली आकारांची घनता हीसुद्धा आभासीच आहे, असं प्रेक्षकाला वाटू लागतं.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artist dilip ranade
First published on: 22-04-2016 at 01:04 IST