सांताक्लॉजपासून ते ख्रिसमस कॅरेलपर्यंत अनेक गोष्टींची रेलचेल असलेला सर्वाचा आवडता सण म्हणजे ख्रिसमस. वर्षांचे शेवटचे दिवस व येणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात म्हणजे ख्रिसमस.

फार वर्षांपासूनची जुनी प्रथा म्हणजे ख्रिसमससाठी फ्रूट मॅरिनेट करणे. त्याला हल्लीच्या काळात फ्रूट ‘मिक्सिंग डे’ असे म्हणतात.

ख्रिसमसच्या एक ते दीड महिने अगोदर सर्व ड्रायफ्रूट मनुका, बेदाणे, टुटिफ्रुटी, चेरी, काजू, बदाम, सुंठ पावडर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, वेलची पावडर, लवंग पावडरमध्ये ब्रॅन्डी, व्हिस्की, रम टाकून मॅरिनेट करून ठेवतात. या मॅरिनेट केलेल्या फ्रूटपासून ख्रिसमससाठी पल्म् केक किंवा पल्म् पुडिंग बनविली जाते.

लवकर लग्न व्हावे अशी ज्या मुलीची अपेक्षा असते अशा मुलींनी हा केकचा तुकडा कापडात गुंडाळून आपल्या उशीखाली ठेवला तर त्यांचे लवकरच लग्न होते असा समज (मिथ) इंग्लंडमध्ये आहे.

युरोप-अमेरिकेमध्ये जिंजर ब्रेड बनविण्याची प्रथा आजपण आहे, तर काही जण या जिंजर हाऊसचे फेस्टिवल करतात.

ख्रिसमस लॉग

साहित्य : ७५ ग्रॅम मैदा, ७५ ग्रॅम साखर, तीन अंडी, २०० मि. लि. क्रीम (फेटलेले), ५० ग्रॅम चॉकलेट फ्लेक्स.

कृती : एका भांडय़ात साखर व अंडी टाकून पूर्णपणे फेटून घ्यावे. त्यात हळुवार मैदा टाकून नीट एकत्र करावे व एका पसरट भांडय़ाला मायक्रोव्हेबल पेपर लावून त्यावर हे मिश्रण ओतून मायक्रो मीडियमवर ८-१० मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर पसरट भांडय़ाला क्रीम लावून एका बटर पेपरमध्ये गुंडाळून, रोल करून अर्धा तास तरी फ्रिजमध्ये ठेवावे. एका डिशमध्ये ठेवून त्यावर क्रीम व चॉकलेटने सजवावे.

ख्रिसमस पुडिंग

साहित्य : १०० ग्रॅम बटर, ५० ग्रॅम मैदा, १ अंडे, ५० ग्रॅम साखर, १०० मि.लि. रम, १०० मि.लि. ब्रॅन्डी, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर. बेदाणे २५ ग्रॅम, मनुका २५ ग्रॅम, चेरी २५ ग्रॅम, अंजीर २५ ग्रॅम, बदाम तुकडे २५ ग्रॅम, काजू तुकडा २५ ग्रॅम, अर्धी वाटी कॅरेमेल कलर.

कृती : एका भांडय़ात सर्व ड्रायफ्रूट, जायफळ पावडर, दालचिनी पावडर, रम व ब्रॅन्डी टाकून ३-४ दिवस भिजत ठेवावे. एका भांडय़ात बटर व साखर फेटून त्यात अंडे टाकून नीट फेटून घ्यावे. त्यात भिजवलेले ड्रायफ्रूट टाकून नीट एकत्र करावे. शेवटी मैदा टाकून एकत्र करावे. यात कॅरेमेल कलर टाकावा व डार्क बॅटर तयार होईल. कलर नसेल तर डार्क ब्राऊन साखर वापरावी. हे सर्व बॅटर काचेच्या बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडेसे बटर लावून झाकून मायक्रोव्हेवमध्ये मायक्रो हायवर दोन मिनिटे, त्यानंतर मायक्रो लोवर ८-१० मिनिटे व त्यानंतर मायक्रो मीडियमवर १-२ मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर बॅ्रण्डी सॉसबरोबर सव्‍‌र्ह करावे.

मारझीपात फ्रूट

साहित्य : २०० ग्रॅम काजू, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम पिठीसाखर, १५० मि. लि . पाणी, फूड कलर, फूड इसेन्स.

कृती : एका बाऊलमध्ये साखर व पाणी टाकून मायक्रो मीडियमवर ४-५ मिनिटे ठेवावे. काजूची बारीक पावडर करून घ्यावी. काजूची पावडर व पिठीसाखर एकत्रित करून घ्यावी. शुगर सिरप केलेल्या बाऊलमध्ये काजू व पिठीसाखर मिश्रण टाकावे व तसेच मायक्रो लोवर १-२ मिनिटे ठेवावे, लगेच काढून नीट मळून घ्यावे. जास्त मळू नये, कारण त्याचे तेल सुटून बाहेर येईल. थंड झाल्यावर त्यात फूड कलर व फूड इसेन्स टाकून आपल्या आवडीनुसार फ्रूट्स बनवावे.

दालचिनी ख्रिसमस स्टार कुकीज

साहित्य : ५० ग्रॅम बदामाची पावडर, ४० ग्रॅम साखर, एक अंडे (फक्त पांढरे), २५ ग्रॅम पिठीसाखर, ८-१० ग्रॅम दालचिनी पावडर.

कृती : एका बाऊलमध्ये बदाम पावडर, बारीक साखर व अंडय़ातले पांढरे घेऊन कणकेसारखे पीठ मळावे. हे पीठ रोल करून स्टार कटरने कट करावे. हे स्टार्स पसरट भांडय़ावर ठेवावे व मायक्रो मीडियमवर ६-८ मिनिटे बेक करावे. एका बाऊलमध्ये पिठीसाखर व दालचिनी एकत्र करून घ्यावे. जशा या कुकीज ओव्हनमधून बाहेर काढाल तेव्हा गरम असतानाच छोटय़ा गाळणीने त्यावर आइसिंग शुगर डस्ट करावि.

ब्रॅण्डी सॉस

साहित्य : तीन अंडी (फक्त पिवळे बलक), १०० मि. लि. ब्रॅण्डी, अर्धा चमचा जायफळ पावडर, १०० ग्रॅम साखर.

कृती : एका बाऊलमध्ये सर्व एकत्र करून फेटावे. मायक्रो लोवर अर्धा मिनिट ठेवावे. लगेच काढून परत फेटावे. असे हा सॉस जाड होईपर्यंत करत राहावे. सव्‍‌र्ह करताना हा सॉस थोडा वॉर्म असेल तर खूप छान लागतो.

जिंजर ब्रेड कुकीज

साहित्य : ६० ग्रॅम बारीक साखर, ५० ग्रॅम ब्राऊन साखर, ६० ग्रॅम बटर, ६० ग्रॅम लोणी, एक अंडे, १२५ ग्रॅम मैदा, २० ग्रॅम आले पेस्ट, १० ग्रॅम सोडा, ३० ग्रॅम काळे मध.

कृती :  एका बाऊलमध्ये बटर, ब्राऊन साखर, बारीक साखर व लोणी फेटून घ्यावे. त्यात अंडे टाकून परत फेटावे. त्यात मैदा, आल्याची पेस्ट, सोडा व काळा मध टाकून कणकेसारखे पीठ मळावे. याचे छोटे गोळे करून चपटय़ा काचेच्या प्लेटवर थोडेसे थापून मायक्रो मीडियमवर ५-६ मिनिटे बेक करावे. सर्व कुकीज बेक करून घ्याव्यात. थंड झाल्यावर  हवाबंद डब्यात ठेवाव्यात. साधारणत:

एक-दोन आठवडे या चांगल्या राहतात.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com