निन्जा हातोरी ही एक फॅण्टसी. या कार्टूनमधलं व्यक्तिचित्रण मला खूप आवडतं आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हातोरीचा आवाज. ‘डिंग डिंग डिंग डिंग’ असा त्याचा आवाज फार गोड वाटतो. मजा यायची ऐकताना. निन्जा या कार्टूनमध्ये केवळ मनोरंजनच नाही तर प्रत्येक भागानंतर विशिष्ट बोध दिला जातो. या कार्टूनमधल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी लक्ष वेधून घेतात. कियानचा इनोसन्स, निन्जाची त्याला मदत करण्याची हातोडी, आमाराची सतत कियानची खोडी काढण्याची सवय, शिशिमानूचा मूर्खपणा सगळंच एकत्रितपणे मज्जा आणतं. विशेषत: या कार्टूनचं डबिंग त्यात एक मजा आणतं. कार्टूनच्या शेवटी निन्जा जो काही बोध देतो त्याचा अर्थ तेव्हा लहान असताना कळायचा नाही, पण जेव्हा आता पुन्हा बघितलं जातं तेव्हा वाटतं इतकं साधं आपल्याला कळलं नाही? विनोदाचा भाग सोडून देऊ, पण एखादी कठीण, क्लिष्ट वाटणारी गोष्टसुद्धा सहज एखाद्या छोटय़ाच्या गोष्टीमधून कळायची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजीच्या सिरियल्सपेक्षा ही कार्टून्स अधिक जवळची वाटायची. कारण शाळेत घडलेली एखादी गोष्ट लगेच या कार्टून्समधून रिलेट व्हायची. हे कार्टून बघून शाळेत केलेली चर्चा, गप्पा आजही आठवतात. आजही अशा चर्चा होतात पण, आता या चर्चेसाठी व्यासपीठ आहे ते व्हॉट्सअ‍ॅपचं. खरंतर एखाद्या कार्टूनवर चर्चा करण्यासारखं काय आहे, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण, निन्जा आहेच तसा. त्याच्याबद्दल बोलावं असंच आहे ते कार्टून. निन्जा हे नावंही किती गोड वाटतं उच्चारायला. शिवाय शाळेत असताना कार्टूनसंबंधी गप्पा मारणं म्हणजे केवढं ते कौतुक वाटायचं. त्यातच निन्जा हातोरी हे कार्टून बोधपर दोन गोष्टी सांगतं. म्हणूनच तर त्याची गंमत वेगळी होती. आतासुद्धा कार्टून्सच बरी वाटतात. कारण ते कल्पनाविश्व आहे आणि त्यात रमायला कुणालाही आवडतं. म्हणजे आजही विविध चॅनल सर्फ करताना एखाद्या चॅनलवर एखादं कार्टून लागलेलं दिसलं की रिमोटवरचं बोट आपसूकच त्याच चॅनलवर थांबतं. फक्त हातात वेफर्सच्या बरणीऐवजी मोबाइल असतो आणि आजीच्या आठवणी.
ऋतुजा फडके

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fantasy ninja
First published on: 06-05-2016 at 01:26 IST