scorecardresearch

हनिमून स्पेशल : टिपिकल नको, ऑफबीट हवं!

हनिमून पर्यटनात असंख्य प्रयोग होताना दिसताहेत.

हनिमून स्पेशल : टिपिकल नको, ऑफबीट हवं!

वाढत्या प्रेमविवाहांमुळे लग्नव्यवस्था घरातल्या वडीलधाऱ्यांच्या हातातून तरुण पिढीच्या हातात आली तसतसा हनिमूनसाठीच्या ठिकाणांमध्येही बदल होत गेलेला दिसतो. आताच्या तरुण पिढीला ‘कुठंकुठं जायाचं हनिमूनला’ असा प्रष्टद्धr(२२४)न पडतच नाही. कारण त्यांना हटकून ऑफबीट ठिकाणीच जायचं असतं.

साधारण ऐंशीच्या दशकात कोणत्याही चित्रपटातला प्रेमी युगलांच्या पाश्र्वभूमीला निसर्ग असायचा तो श्रीनगरच्या प्रसिद्ध शालिमार गार्डनमधला किंवा म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमधला. अर्थातच प्रेक्षकांवरदेखील याचाच पगडा होता. त्यांच्या गुलाबी जीवनाची सुरुवातदेखील येथेच व्हायची. म्हैसूर, उटी, श्रीनगरच, दल लेक ही मधुचंद्राची त्यावेळची टिपिकल ठिकाणं होती. तर महाराष्ट्रात लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरान.. पण गेल्या दोन दशकांत जसंजसं पर्यटन विकसित होत गेलं तसतसं यात बदल होत गेले. अनेक नवीन ठिकाण हनिमूनर्सच्या यादीत येऊ लागली. आणि जुनी ठिकाणं नावालाच उरली.

आज आपल्याकडे मधुचंद्रासाठी देशांतर्गत ठिकाणांमध्ये सर्वाधिक पसंती आहे ती केरळ, सिमला, कसौनी आणि कुलू मनाली या ठिकाणांना. तर परदेशातील ठिकाणांमध्ये बाली, थायलंड, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका ही आयलंड डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणारी बेटं सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अर्थात हा सर्वसाधारण कल असला तरी त्याशिवाय अनेक नवे पर्याय समोर येत आहेत. त्यातून कल बदलताना तर दिसतो आहेच, पण भविष्यातील बदलांची चाहूल देखील लागतेय. नेहमीच्या पठडीबाहेरचं काही तरी हवे या भावनेतूनच टिपिकल काही तरी करण्यापेक्षा ‘ऑफबीट’ हवं, अशी मागणी गेल्या दोनचार वर्षांत चांगलीच जोर पकडताना दिसत आहे. नेमका हा बदल काय आणि कसा आहे हे त्यानिमित्ताने पाहणे रंजक ठरेल.

हनिमून हा मुळातच एक प्रकारची चैन या सदरात मोडणारा प्रकार असल्यामुळे अर्थातच दोन पैसे जास्त खर्च करायची तयारी येथे असते. मात्र त्या जोडीला योग्य त्या सर्व सोयीसुविधा, सुरक्षितपणा, पॅकेजेस आणि त्याचबरोबर पर्यटनस्थळाची वैशिष्टय़पूर्णता असेल तरच. या सर्वाची पूर्तता हाच घटक सध्याच्या लोकप्रिय ठिकाणांमध्ये प्रकर्षांने जाणवतो. केरळ असो की उत्तरेतले कोणतेही हिलस्टेशन किंवा परदेशातील ठिकाणं. या सर्वच ठिकाणी खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळतो हे दुर्लक्षून चालणार नाही.

सुरक्षा, सुविधा हे मुद्दे अगदी प्राथमिकतेने महत्त्वाचे असले तरी हनिमून पर्यटनात असंख्य प्रयोग होताना दिसताहेत. एकूणच काही तरी हटके करण्याची आजच्या पिढीची मानसिकता त्यामागे महत्त्वाची असल्याचे भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे विवेक गोळे सांगतात. त्यातच साहसी पर्यटन, वन्यजीव अभयारण्य यांचा विकास झाला आहे आणि त्याचबरोबर एकंदरीतच खर्च करण्याची क्षमता वाढली आहे, त्यामुळे अगदी नेहमीच्या ठिकाणाला जोडून यापैकी एखादा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे ते नमूद करतात.

दुसऱ्या एका सामाजिक बदलामुळे तर छानछोकीच्या हनिमून पर्यटनालादेखील छेद देतील असे कल हल्ली दिसून येत आहेत. हा बदल दिसतो तो वाढत्या प्रेमविवाहांच्या बाबतीत. अशा लग्नांमध्ये दोन अनोळखी जीवांच्या एकांताचे नावीन्य नसते. असा वर्ग हनिमूनसाठी फिरायला जात नाही. तर पर्यटनाचा एक वेगळा पर्याय पाहतो असे विहार ट्रॅव्हल्सचे हृषीकेश पुजारी सांगतात. आणि हे प्रमाण आज किमान २५ टक्क्य़ांच्या आसपास असल्याचे ते नमूद करतात. अर्थात हा कल प्रेमविवाहापुरताच मर्यादित असून, अजून तरी सरसकट सर्वच हनिमूनर्सना लागू झाला आहे असे दिसत नाही. याच जोडीने आणखीन एक बदल जाणवतो तो म्हणजे हल्ली एकंदरीतच मराठी कुटुंबांचे पर्यटन वाढले आहे. त्यामुळे नेहमीची बरीच ठिकाणं पाहून झालेली असतात. अशा वेळी वेगळं काही तरी शोधण्याकडे अशा हनिमूनर्सचा कल दिसून येतो.

हनिमून म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न. पण लग्नाआधीच अनेक वर्षे ओळख असेल (रिलेशनशिपमध्ये असाल) तर हनिमूनमध्ये हा भाग गरजेचा राहत नाही. अशा वेळेस ही जोडपी काही नवीन शोधता येईल का याकडे लक्ष देतात. अशांना मग दोन सुविधा कमी असल्या तरी चालतात, पण पर्यटन स्थळातील नावीन्यता त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच एखाद्या नेहमीच्या ठिकाणाला जोडून वेगळी दोन ठिकाणं पाहण्याकडे कल असतो. वन्यजीव, अभयारण्ये, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन अशा प्रकारांना त्यातून चांगलाच वाव असल्याचे सिमास ट्रॅव्हल्सचे डॉ. विश्वास केळकर सांगतात.

ऑफबीट हनिमूनला त्यामुळे चांगलाच वाव मिळताना दिसत आहे. भविष्यात या ट्रेण्डची चलती राहणार असल्याचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर नमूद करतात. आत्तादेखील अनेक जोडपी (प्रेमविवाह आणि ठरवून केलेले लग्न)अशा ऑफबीट ठिकाणांना निवडताना दिसत आहेत. सिमल्यामध्ये राहण्यापेक्षा तेथून दोनएक तासाच्या अंतरावरील ठिकाणी राहिल्यास खर्चात बचत तर होतेच, पण पर्यटनाचा एक वेगळा आनंद घेता येतो. त्यामुळेच मुक्तेश्वर, बिंसर अशा ठिकाणी देखील आम्ही हनिमूनर्सना पॅकेजेस दिल्याचे गुरुनाथ ट्रॅव्हल्सचे पांढरे नमूद करतात. तर लोकप्रिय ठिकाणांपेक्षा एकांतातील रिसॉर्टची वाढती मागणी जाणवते ती कूर्ग आणि वायनाड येथील वाढत्या गर्दीमुळे. डोंगरदऱ्यात असणारी ही रिसॉर्ट्स सध्या एकदम तेजीत असल्याचे हृषीकेश पुजारी नमूद करतात.

हनिमून पर्यटनाचे एखाद्या विशिष्ट ठिकाणासाठीचे कल कमी अधिक होण्यामागे सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सुरक्षेचा. हनिमूनर्ससाठी सुरक्षित वातावरणाची हमी हा त्यामागचा हेतू तर आहेच. अशा पर्यटनातील सुरक्षा, सुरक्षितता हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचे केसरी टूर्सच्या झेलम चौबळ सांगतात. अशा सुरक्षित वातावरणाची आणि सुरक्षित तांत्रिक प्रक्रियेची हमी असेल तर अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करणे सहज शक्य होते असे त्या सांगतात. त्यासाठी न्यूझीलंडमध्ये त्यांनी केलेला प्रयोग एकदम भन्नाट आहे. एका जोडप्याला न्यूझीलंडच्या हनिमून ट्रिपमध्ये चक्क हेलिकॉप्टरने थेट बर्फाच्छादित डोंगरावर नेले होते. तेथे त्या जोडप्याने पुढील दोन तास व्यतीत केले. जेवण केले. त्या रोमॅण्टिक वातावरणात हा अनुभव त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा होता. अशा प्रकारच्या प्रयोगामागे हल्लीच्या पिढीची मानसिक तयारी हा भागदेखील महत्त्वाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हनिमूनमध्ये असे प्रयोग होण्यामागचे मार्मिक कारण ज्ञानेश पांढरे सांगतात की, पूर्वी लग्न ठरवणे हे घरातील वडीलधाऱ्यांचे काम असायचे. त्यांच्या देखरेखीखालीच सर्व निर्णय घेतले जायचे. लग्न ठरविण्याचं काम जसं वडीलधाऱ्यांकडून नव्या पिढीकडे येत जातंय त्याच पद्धतीने हनिमून टूर्समधले कल बदलताना दिसत आहेत.

एकीकडे असे प्रयोग होत असले तरी, आजही बहुतांश लग्न ही ठरवून केलेली असतात. अशा वेळी आजही पालकांचा सहभाग अनेक निर्णयात अपरिहार्य असल्याचे झेलम चौबळ सांगतात. त्यामुळे पालक मुलांना कधी कधी अशा वेगळ्या प्रयोगापासून दूर राहण्यास प्रवृत्त करतात. जवळच्या ठिकाणी स्वत:ची गाडी घेऊन हनिमूनला जाण्यासदेखील अटकाव केला जातो.

हनिमूनच्या ठिकाणांबाबतीतील हे साधारण कल आहेत. तर हनिमूनच्या बदलत्या साजरीकरणाकडे हृषीकेश पुजारी सांगतात की, हल्लीच्या हनिमून पर्यटनातील दिखावा देखील खूप वाढला आहे. पर्यटन स्थळाबरोबरच हॉटेलची नावीन्यपूर्ण रचना, तेथील वातावरण, प्रत्येक खिडकीतून दिसणारा व्ह्य़ू, कॅण्डल लाइट डिनर वगैरे गोष्टींचं महत्त्व कमालीचं वाढलं आहे. इतरांना अशा गोष्टींबाबत सांगण्याची जी एक सहजप्रवृत्ती असते, त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.

गेल्या काही वर्षांत सर्वत्रच ऑनलाइनचा बोलबाला वाढला आहे. हाच ट्रेण्ड पर्यटनातदेखील रुजत आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून पॅकेज घेण्यापेक्षा थेट आपण माहिती घेऊन बुकिंग करण्याचा कल वाढताना दिसतोय, पण ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून घेतलेल्या पॅकेजमुळे मिळणारी सुरक्षितता जपण्याकडे बहुतांशांचा कल तसाच असल्याचे झेलम चौबळ आणि मिलिंद बाबर सांगतात. त्यामुळे ग्रुप हनिमून टरूसना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे त्या नमूद करतात. एखाद्या परक्या देशात अडचण आलीच तर उत्तरदायित्व कोणावर हा प्रश्न उभा राहतो. गुगल हा परमेश्वर वाटत असला तरी त्या वेळी नेमकं कोणाशी बोलायचं हा मुद्दा अनुत्तरितच असतो, असे त्या नमूद करतात.

थोडक्यात काय आर्थिक-सामाजिक बदलांचा थेट परिणाम आज हनिमून पर्यटनावर दिसून येत आहे. नव्या पिढीची वाढती क्रयशक्ती आणि पठडीबाहेरचं काही तरी करायची इच्छा यातूनच येणाऱ्या काळातील हनिमून टुरिझमचा सारा डोलारा असणार आहे.

परदेशी हनिमूनची चलती

एकंदरीतच पर्यटन क्षेत्रात सध्या परदेशी पर्यटनाची चलती आहे. देशांतर्गत भटकण्यासाठी येणारा खर्च आणि वेळ याचा विचार केल्यास तेवढय़ाच दिवसात तितकेच पैसे खर्च करून परदेशवारी घडते. अर्थातच परदेशवारीचा हा फंडा आता हनिमूनर्समध्येदेखील चांगलाच रुळला आहे. आजची पिढी हनिमूनबाबतीत चांगलीच नियोजन करणारी झाल्याचेच यातून दिसते. ईशा टूर्सच्या मिता रेगे सांगतात की, काही जोडपी तर लग्न साधेपणाने करून ते सर्व पैसे दर्जेदार परदेशी डेस्टिनेशनवर हनिमूनसाठी खर्च करतात. आयलंड नेशन्स म्हणून ओळखले जाणाऱ्या दक्षिण आशियातील ठिकाणांना अधिक पसंती मिळत आहे. तर थोडा उच्चवर्गीय गट हा मॉरीशस, मालदीवज्सारख्या ठिकाणी जाताना दिसत आहे. सेशेल्स हे आता हळूहळू का होईना, पण विकसित होत आहे. ते पूर्णपणे विकसित होईल तेव्हा मात्र अनेक आयलंड नेशन्सना त्यांची जोरदार स्पर्धा असेल.

जो कल देशांतर्गत हनिमून टूरिझमसाठी आहे तोच कल सध्या परदेशातदेखील दिसून येतो. श्रीलंका, थायलंड, बाली अशा ठिकाणी जाणारे हनिमूनर्स पठडीबाहेरचं काहीतरी शोधायचा प्रयत्न करताना दिसतात. थायलंडमधील को चांग, को ताओ, को लॅण्टा आणि क्राबी अशी नवी ठिकाणं विकसित होताना दिसत आहेत. तर कांचनबुरी आणि सूरत थानी येथील तरंगती हॉटेल्सदेखील लोकप्रिय होत आहेत. थायलंडची एकंदरीतच आक्रमक शैली असल्यामुळे २०१५ मध्ये जवळपास एकूण पर्यटकांच्या तीस टक्केम्हणजेच तीन लाख हनिमूनर्स थायलंडमध्ये गेले होते. सेशेल्स या अनेक बेटांच्या देशात देखील गेल्या वर्षीच्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल १८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थातच थेट विमानसेवा आणि तीदेखील सवलतीच्या दरात दिल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. इंडोनेशियादेखील सध्या याबाबत विचार करताना दिसत आहे.

परदेशी हनिमून पर्यटनात स्वित्र्झलड, आइसलॅण्ड, ऑस्ट्रेलिया अशा देशांनादेखील वाव आहे, पण सध्यातरी त्याकडे उच्चवर्गीयांसाठीच मर्यादित ठिकाण म्हणूनच पाहावे लागेल. अर्थात ज्या वेगाने परदेशी हनिमूनचा ट्रेण्ड वाढतोय, ते पाहता हे देशदेखील उद्या सवलती घेऊन स्पर्धेत उतरले तर आश्यर्च वाटायला नको. सध्या ऑस्ट्रेलियाच्या विमान भाडय़ात मिळणाऱ्या सवलती हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. अर्थात हे सारं देशांतर्गत बाजारपेठेला धक्का लावणारं असल्यामुळे त्यांनादेखील वेळीच काहीतरी हालचाल करावी लागेल हे निश्चित.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter –  @joshisuhas2

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2016 at 01:19 IST

संबंधित बातम्या