भूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी  दहा ठिकाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गातला एखाद्या घटनेने मनमोहक रचना निर्माण होते. नेहमीच्या पर्यटनात अशा ठिकाणांची फारशी चर्चा नसते; पण त्या ठिकाणच्या एखाद्या कृतीने त्या विवक्षित ठिकाणाला पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळते. असेच काहीसे सांगेत्सर लेकबद्दल म्हणता येईल.

तवांग आणि परिसरात सुमारे १०० हून अधिक तळी आहेत; पण हा सांगेत्सर लेक काही नैसर्गिक नाही. १९५० साली भूकंपात डोंगराचा अख्खा कडा व्हॅलीत कोसळला. व्हॅली मुळातच पसरट असल्यामुळे कडय़ाच्या या भागाच्या अलीकडे पाणी साचत गेले. मध्ये असणारी झाडे पर्णरहित झाली, बुंधे शाबूत राहिले. कालांतराने तेदेखील नष्ट होतील. व्हॅलीच्या पसरटपणामुळे या तलावाची खोली आठ-दहा फुटांपेक्षा अधिक नाही. जी काही खोली आहे ती फक्त मधल्या भागात. दोन्ही बाजूंनी डोंगर आणि दरीत हा निसर्गरम्य असा तलाव. काही वर्षांपर्यंत पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नव्हता. माधुरी दीक्षितच्या ‘कोयला’ चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण येथे झाले. तेव्हा सांगेत्सर लेकला  ‘माधुरी लेक’ म्हणून नवीनच ओळख मिळाली.

मात्र येथे राहण्याची कसलीही सोय नाही. तुम्हाला कॅम्पिंग करायचे असेल तर करू शकता. मात्र येथे पोहोचेपर्यंत बरेच प्रयास करावे लागतात. तवांग ते सांगेत्सर या वाटेवर १६ हजार ५०० फुटांवरचा बूमला पास पार करावा लागतो. येथे असणाऱ्या आर्मीच्या कॅम्पने एका रस्त्याचे नाव शिवाजी पथ ठेवले आहे. तशी पाटीच आहे येथे. इंडो-चायना सीमेवर होणाऱ्या फ्लॅग मीटिंग बूमला पासपासून साधारण ११ किलोमीटरवर होतात. विशेष परवानगी काढून येथे जाता येते. तवांग येथील सैन्यदलाच्या कार्यालयात तशी परवानगीदेखील मिळते. प्रत्यक्ष मीटिंगच्या काळात तेथे जाता येत नाही.

अरुणाचलच्या पर्यटनात तवांगला मुक्काम करून सांगेत्सर पाहता येते. तवांगला हॉटेल्स सुविधा प्राथमिकच आहेत, पण अरुणाचलचा संपूर्ण प्रवास हा सिनिक म्हणावा असा आहे. या रस्त्याने प्रवास करणे जरा परिश्रमाचेच आहे, पण अशी निसर्गलेणी पाहायची असतील थोडे परिश्रम करायला हरकत नाही.

दलाई लामा तिबेटमधून भारतात आले ते तवांगमार्गेच. येथेच भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोनास्ट्रीदेखील आहे. अरुणाचलमध्ये असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार व्यवहारांची सवय असल्यामुळे दिवस लवकर उगवत असला तरी कामकाज उशिरा सुरू होते आणि संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी कामकाज बंद होताना घडय़ाळातला दिवस बराच शिल्लक असतो.

या भागात पर्यटनाचा विकास करण्याची गरज खूप आहे. त्यातूनच या भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल. आज वर्षांला फार फार तर ३५-४० हजार पर्यटक येथे येतात. अरुणाचलमध्ये फिरण्यासाठी इनर लाइन परमिटची आवश्यकता असते. ही परवानगी मिळवणे काही अतिकठीण काम नाही. तवांगबरोबरच अरुणाचल पक्षिनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. इगलनेस्ट राष्ट्रीय उद्यान, पाक्के अभयारण्य ही आवर्जून भेट द्यावी अशी काही ठिकाणे आहेत. उत्तर पूर्वेकडील राज्यांच्या पर्यटनाला जोडूनच अरुणाचलची भटकंती करावी.

केव्हा जाल : फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत. फेब्रुवारी-मार्चपर्यंत तळी गोठलेली असतात. एप्रिल-मेमध्ये मात्र पाण्याची मजा औरच असते. पाण्याच्या विवक्षित अशा नैसर्गिक रंगाचा आनंद अनुभवता येतो. या काळात सूर्य अधिक काळ असतो. तरीदेखील तवांगचे तापमान पंधरा डिग्रीच्या वर जात नाही. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर – नोव्हेंबर या काळातदेखील जाता येते; पण हिवाळ्यात वाटेतील पासेस (खिंडी) बंद होण्याची शक्यता अधिक, तसेच तापमान शून्याच्या खाली जाते.

कसे जाल : गुवाहाटीमार्गे भालूकपाँग, बोमदीला, दिरांग आणि तवांग. तवांगच्या आधी साडेतेरा हजार फुटांवरील सेला पास पार करावा लागतो. अरुणाचलमध्ये जाण्यासाठीचे इनर लाइन परमिट गुवाहाटी किंवा भालूकपांगच्या बॉर्डरवर मिळते.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com

 

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honeymoon special special destinations sangetsar lake
First published on: 18-03-2016 at 01:18 IST