-सुनिता कुलकर्णी
वयाच्या अवघ्या ५३-५४ व्या वर्षी इरफान खानने एक्झिट घेतली. आजचं सरासरी वयमान आहे ७५ वर्षे. कुणीही निरोगी माणूस सरासरी एवढं आयुष्य जगतोच. म्हणजे इरफान २०-२२ वर्षे आधीच निघून गेला. त्याच्या चित्रपटविषयक कारकीर्दीला सुरूवात झाली ती १९८५ मध्ये. म्हणजे ३५ वर्षे या सिनेमासृष्टीत तो होता. त्याने बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडच्या काही सिनेमामधूनही भूमिका केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर त्याला यश उशिरा मिळालं आणि त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशा भूमिकाही तुलनेत कमीच मिळाल्या. पण त्या मिळाल्या कारण इरफान योग्य वेळी योग्य ठिकाणी होता. हे काय कमी महत्त्वाचं आहे? आता त्याच्या भूमिकाच बघा…

‘लंचबॉक्स’मधला साजन, ‘मकबूल’मधला मियाँ मकबूल, ‘पानसिंग तोमर’मधला द पानसिंग, ‘लाइफ इन मेट्रो’मधला माँटी, ‘हैदर’मधला रूहदार, ‘पिकू’मधला राणा, ‘ब्लॅकमेल’मधला देव, ‘हिंदी मिडियम’मधला राज, ‘करीब करीब सिंगल’मधला योगी…

उदारीकरणानंतर म्हणजे १९९१ नंतर अर्थव्यवस्था बदलत गेली तशी भारतीय समाजव्यवस्था बदलत गेली. सिनेमा बदलत गेला. त्याला बदलत्या अर्थव्यवस्थेबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाचीही जोड मिळत गेली. यातूनच मल्टीप्लेक्स आली. शंभर कोटी भारतीयांना अभिप्रेत धरून काढल्या जाणाऱ्या बिग बजेट सिनेमांबरोबरच लार्जर दॅन लाइफ सिनेमाच्या प्रेमात न पडता छोटे छोटे पण वास्तववादी विषय घेऊन, अर्थपूर्ण मांडणी करणारे सिनेमे तयार व्हायला लागले. समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यातली दरी कमी होत जाऊन ते एकाच वाटेवरून चालायला लागले.

इरफानने केलेले सगळे सिनेमे याच प्रकारातले तर आहेत.हे सिनेमे काढणाऱ्यांसाठी हुकमी एक्का म्हणून इरफान होता. तो योग्य वेळी योग्य ठिकाणी होता, म्हणूनच तर हे घडू शकलं.त्याची कारकीर्द १९८५ मध्ये सुरू झाली. जसा तो २०-२२ वर्षे आधी गेला, तसंच त्याची कारकीर्द २०-२२ वर्षे आधी म्हणजे १९६५ किंवा त्याच्या आसपास सुरू झाली असती तर? त्याला न्याय देणाऱ्या भूमिका नसत्या. अमिताभ नावाच्या वादळापुढे, तथाकथित हिरोगिरीला महत्त्व देणाऱ्या त्या काळापुढे कुणाचंच काहीच चाललं नाही. कितीतरी चांगले अभिनेते त्या काळाच्या लाटेत वाहून गेले. म्हणूनच इरफान योग्य वेळी योग्य ठिकाणी होता.भलेही काळाच्या अगोदरच निघून गेला. पण होता तेव्हा काळावर स्वार होत आपलं नाणं खणखणीत वाजवून गेला. त्याला आदरांजली.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfans time msr
First published on: 29-04-2020 at 17:24 IST