लिंबागणेश हे गाव मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ात, बीड शहरापासून २९ कि.मी. अंतरावर आहे. हे तसे अत्यंत प्राचीन गाव आहे. या गावाला ऐतिहासिक व धार्मिक अशी पाश्र्वभूमी आहे. गणेश पुराणांतदेखील या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिराचा उल्लेख आलेला आहे. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी या गावी येऊन गेल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्र’ यामध्ये उल्लेखित आहे. पेशवे या गावी येऊन गेल्याचा कागदोपत्री उल्लेख असून हे गाव सरहद्दीवर असल्याने मराठेशाही व पेशवाईत त्याला  फार महत्त्व होते. जवळच खर्डा हे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव होते. मार्च १७९५ मध्ये खडर्य़ाच्या झालेल्या लढाईत निजामांचा संपूर्ण बीमोड झाला होता. निजामाला त्या वेळी अनेक अटी मान्य कराव्या लागल्या होत्या. खडर्य़ाचा विजय म्हणजे मराठेशाहीच्या वैभवाचा कळसच होता,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नावातच  गणेश असल्यामुळे लिंबागणेश गणपतीचे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. मंदिराबाहेर एक बारववजा तीर्थकुंड आहे. व या कुंडास चंद्र पुष्करिणीतीर्थ असे नाव आहे. याच स्थानावर चंद्राने घोर तपस्या केली व गणेश यातून प्रकट झाले असे मानले जाते. सुमारे इ. स. १६ व्या १७ व्या शतकांत या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर  आहेत. या मंदिरातील गणेशमूर्ती साधारणपणे दोन ते अडीच फूट उंचीची शेंदूरचर्चित आहे. मंदिरात पूर्वाभिमुख गणेशदर्शन होते.

लिंबागणेश येथील गणेश मंदिरात  प्रतिवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवांस प्रारंभ होतो. ऋ षिमंचमीला त्याचे समापन  महाप्रसादाने होते. या पाच दिवसांत श्रींची भक्तिभावाने पूजा होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत चार दिवसांत चार दिशेला असलेल्या गावाच्या सीमे (शिव) वरील गणेशाची पूजा करून आमंत्रण देण्याची म्हणजे द्वारपूजनाची अतिप्राचीन परंपरा आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून कानिटकरांच्या किल्लेवजा वाडय़ातून प्रारंभ होतो. गावातील सर्व भक्तगण या द्वारपूजनासाठी मोठय़ा संख्येने पायी (पदयात्रा) जातात. पूर्वेला पद्मावती पूजन, दक्षिणेस बोरजाई पूजन, पश्चिमेला नवरा-नवरी माळ या प्रसिद्ध स्थानावर पूजन होते व चतुर्थीला नामाजीबुवा किंवा पोखराईचे पूजन होते.

या चार दिवसांच्या काळात मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. गणेशाला वस्त्रालंकार चढवले जातात. सायंकाळी गणेशाची आरती केली जाते. प्रसादासाठी संपूर्ण गावातून, घराघरांतून वेगवेगळ्या कडधान्यांची उसळ चार दिवस मंदिरात आणली जाते. सर्व उसळी एकत्र करून गणेशास नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यास सातळ असे म्हटले जाते. अखिल महाराष्ट्रात कुठेही ही प्रथा, परंपरा पहाण्यात येत नाही.

ऋ षिपंचमीस प्राचीन परंपरेनुसार या मंदिरातील एक शेंदूरचर्चित गणेशमूर्ती षोडशोपचार पूजा करून  छबिना सोहळ्यासाठी सजविली जाते. पालखीतून रात्रभर जागर करून छबिना उत्सव सुरू होतो. पेशवाई थाटांत पालखीतून गणेश विराजमान होऊन मिरवणुकीने निघतात. घरोघरी व दारोदारी रांगोळ्या, कमानी, लाइटिंग फुलांची सजावट, पायघडय़ा घातल्या जातात. सर्वत्र गुलालाची उधळण असते.  सूर्योदयाच्या वेळी मिरवणूक गावाच्या वेशीवर येते. या ठिकाणी सर्व मानकऱ्यांना प्रसादाचा नारळ दिला जातो व  पालखी मिरवणूक मंदिराकडे प्रस्थान करते. गावातील व बाहेरील अनेक शहरांतील लोक या उत्सवांसाठी मुद्दाम येतात. अशा प्रकारे ऋ षिपंचमी व  छबिन्यानंतर मंदिरातील उत्सव पूर्णत्वास जातो.

ज्येष्ठ मंडळींच्या मते मंदिरातील गणेशाचे तेजोवलय कानिटकरवाडय़ात प्राणप्रतिष्ठा झालेल्या मृण्मयी श्री मयूरेश्वर गणेशामध्ये प्रकटते. पुढील दशमीपर्यंत उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने सरकारवाडा, कानिटकरवाडा  येथे साजरा केला जातो. एक गाव एक गणपती ही संकल्पना लिंबागणेश नगरीत गेल्या अडीच-तीनशे वर्षांपासून चालत आलेली आहे. सरकारवाडय़ातील गणेश सभागृहांत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रवचने, व्याख्यान, भजनी मंडळांची भजने, कीर्तनसेवा, विविध स्पर्धाचे आयोजन  केले जाते.

श्रावण शुद्ध पंचमीस मूर्ती बनविण्यास प्रारंभ होतो. माणिकराव कानिटकर यांच्या घराण्याकडे हा मान पिढय़ान् पिढय़ा आहे. माती देणारे कुंभार मुळूकवाडी येथील वंशपरंपरागत आहेत. पारंपरिक पद्धतीने भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणेश कानिटकरवाडय़ात येतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेशाची शोडषोपचार पूजा व प्राणप्रतिष्ठा केली जाते. लिंबागणेशचा हा महागणपती परंपरेप्रमाणे मूळ नक्षत्रावर गौरीसह विसर्जनास प्रस्थान करतो.

याच मूर्तीची कानिटकरवाडय़ातून यात्रास्थानापर्यंत पालखी मिरवणूक प्रचंड गर्दीत, भजनी दिंडय़ासोबत, वाद्य – वाजंत्रीसह निघते. सायंकाळी यात्रास्थानाहून चंद्रपुष्कर्णी तीर्थाकडे प्रस्थान होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्रपुष्कर्णी तीर्थावर साश्रुनयनांनी गणेशाला निरोप दिला जातो.
रंजन कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha gash vishesh 2017 limbaganesh
First published on: 18-08-2017 at 01:04 IST