विजया जांगळे
लोकप्रभा दिवाळी २०२०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:ला शेतीप्रधान देश म्हणवतो तेव्हा त्यामागे कित्येक पिढय़ांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या ज्ञानाचं संचित असतं. त्या पिढय़ांनी निसर्गाला देवत्व बहाल केलं. त्याच्या प्रत्येक हालचालीचं सातत्याने निरीक्षण केलं. त्याला त्याच्या कलाने, गतीने वाढू देण्याएवढा संयम दाखवला. सारं काही इन्स्टन्ट मिळवण्याची घाई करण्यापेक्षा जे आहे ते दीर्घकाळ टिकवण्याएवढं शहाणपण त्यांच्यात होतं. हे शहाणपण आता आपल्या हातून निसटू लागलं आहे. आजच्या समृद्धीसाठी कायमचा कफल्लकपणा ओढवून घेतला जात आहे. अशा स्थितीत, या इन्स्टन्ट जमान्यातही काही गावखेडय़ांत, कडे-कपारींत दडलेल्या आदिवासी पाडय़ांत त्या शहाणपणाच्या खाणाखुणा आजही शिल्लक आहेत. या मातीतलं शुद्ध बियाणं त्या दुर्गम भागांत जपलं जात आहे. जमिनीत रसायनांची भेसळ न करता जुन्याच पद्धतीने वाढवलं जात आहे. शाश्वततेच्या वाटेवरच्या पाईकांविषयी..

अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातला डोंगराळ आदिवासी पट्टा.. तिथे मुसळधार पाऊस होतो. रासायनिक खताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी इथले शेतकरी गांडूळखत तयार करू लागले, पण प्रचंड मेहनतीने तयार केलेलं खत पावसापुढे टिकाव धरत नव्हतं. ते टिकून राहावं म्हणून काय करता येईल, असा विचार सुरू असताना ममताबाईंना एक कल्पना सुचली. खत सुटं टाकण्याऐवजी त्याच्या गोळ्या करून मातीत रोवून टाकल्या तर त्या पावसातही टिकून राहतील. त्यांनी तो प्रयोग करून पाहिला. प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी रासायनिक खतांच्या जशा ब्रिकेट्स मिळतात, तशा गांडुळखताच्याही ब्रिकेट्स तयार केल्या. २०१४ साली या ब्रिकेट्स भातशेतीसाठी वापरल्या आणि अतिशय उत्तम परिणाम दिसून आला. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांचा खत वाहून जाण्याचा प्रश्न सुटला.ममताबाई सांगतात, ‘भातासाठी आम्ही पूर्वी महागडी रासायनिक खतं घालायचो. साधारण पाच किलो बियाणं टाकून वाफा तयार करायचो आणि मग तयार झालेली रोपं शेतात लावायचो. पण दोन रोपांत कमी अंतर ठेवल्यामुळे त्यांना वाढायला जागाच मिळत नसे. बरंचसं बियाणं वाया जात होतं. बचतगट गटाच्या माध्यमातून आम्ही बायफच्या संपर्कात आलो. ते शेतीच्या पद्धती, नियम, सगळं शिकवायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खतनिर्मिती, परसबाग लागवड, कुक्कुटपालन, सौरदिवे, बायोगॅसनिर्मिती, चारसूत्री भातशेती, एसआरटी, एसआरआयसारख्या लागवडीच्या पद्धती, फुलशेती, बांधावरील फळबाग लागवड अशा अनेक गोष्टी शिकलो. आता दोनच किलो बियाणं पेरलं तरी आधीपेक्षा जास्त भात उगवतो..’

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamatabai maticha dena lokprabha diwali issue 2020 dd70
First published on: 13-11-2020 at 06:58 IST