scorecardresearch

गुणवत्तापूर्ण शिक्षण : शिक्षकच बदल घडवतील, पण.. (भाग ४)

शिक्षण विद्यार्थीकेंद्रित असायला हवं.

गुणवत्तापूर्ण शिक्षण : शिक्षकच बदल घडवतील, पण.. (भाग ४)

आज आपल्याकडचे शिक्षण शिक्षककेंद्रित आहे. ते विद्यार्थीकेंद्रित होणे गरजेचे आहे. त्यासाठी खूप गोष्टी बदलाव्या लागतील. मुळात शिक्षणाच्या प्रक्रियेत मेंदूचं कार्य लक्षात घेऊन अभ्यासक्रम आखावे लागतील.

आपल्याकडच्या शाळा, शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम हे सगळंच शिक्षककेंद्रित आहे. खरं तर ते विद्यार्थी केंद्रित असायला हवं असं शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती गेली बरीच वर्षे सांगत आहेत. आता कुठेतरी काही प्रमाणात का होईना शिक्षण विद्यार्थीकेंद्रित असायला हवं याचा विचार कसा सुरू झाला आहे हे आपण मागच्या लेखात, जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या काही प्रमाणात होत असलेल्या गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षणाच्या प्रयोगांमधून बघितलं. या शाळांमध्ये उपयोगात आणली जाणारी शिक्षणपद्धती ज्ञानरचनावादी आहे. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला मेंदू हा महत्त्वाचा अवयव शिकण्याचे काम नेमकं कसं करतो, शिकण्याची प्रक्रिया नेमकी कशी होते हे विचारात घेऊन त्याला पूरक अशी ही शिक्षणपद्धती आहे.

मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित (ब्रेनबेस्ड लìनग) शिक्षणाच्या अभ्यासक आणि सल्लागार डॉ. श्रुती पानसे मेंदू नेमकं कसं काम करतो याबद्दल सांगतात की आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की मेंदूचा अभ्यास करण्यासाठी माणसं मरेपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. किंवा उंदरांवर प्रयोग करून माणसांचे आडाखे बांधावे लागायचे तसं करावं लागत नाही. एफएमआरआय स्कॅनिंग या तंत्रज्ञानामुळे आत्ता मेंदूमध्ये नेमकं कुठं कुठं उद्दिपन (स्टिम्युलेशन) आहे, हे कळू शकतं. त्यामुळे जिवंत माणसाच्या मेंदूवर इलेक्ट्रॉड्स लावले तर कुठल्या भागात उद्दिपन सुरू आहे, हे पडद्यावर कळू शकतं. हे इलेक्ट्रोड्स अगदी तान्ह्य़ा बाळालाही लावता येतात आणि त्याची विचारप्रक्रिया तपासता येते. समजा मेंदूच्या एका विशिष्ट भागात भाषेची निर्मिती होते, दुसऱ्या एखाद्या भागातून भाषेचं आकलन होतं, तिसऱ्या भागातून गणित, चौथ्यामधून संगीताचं आकलन होतं. एखादा माणूस पुस्तक वाचत असेल तर त्याला इलेक्ट्रॉड्स लावून वाचन सुरू असताना मेंदूत नेमकं काय होत आहे ते समजू शकतं. समजा त्या माणसाने पुस्तक बाजूला ठेवलं आणि संगीत ऐकायला लागला तर कुठला भाग उद्दिपित होतोय हे समजू शकतं. याचा वापर करून न्यूरॉसायकॉलॉजी हे नवीन शास्त्र निर्माण झालं आहे. या शास्त्रामुळे मुलांना सुरुवातीच्या काळातले अनुभव कसे मिळतात, कुठल्या अनुभवांमुळे मेंदूत काहीतरी नकारात्मक घडलं, कुठल्या अनुभवांमधून मेंदू शिकला, कुठल्या अनुभवांमधून काहीतरी शिक्षण घडलं नाही, या सगळ्याचा अभ्यास केला जातो.

आपल्या मेंदूत न्यूरॉन्स असतात. लहान मुलापासून मोठय़ा माणसापर्यंत कुणालाही एखादा अगदी नवीन अनुभव येतो, त्यावेळी दोन न्यूरॉन्स एकमेकांना येऊन जुळतात. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वेळी नवा अनुभव आला की ते दोन न्यूरॉन्स जुळतात. आधी हे न्यूरॉन्स सुटे सुटे असतात. जन्म होताक्षणी जसजसे अनुभव येतात तसतसे न्यूरॉन्स जुळायला सुरुवात होते. डॉ. श्रुती सांगतात की एखाद्या छोटय़ा बाळाच्या घरी फक्त मराठी बोललं जातं असेल तर ते त्याच्या कानावर पडून मराठीचे दोन न्यूरॉन्स जुळतात आणि त्यांच्या साखळ्या तयार होतात. ते मूल फक्त मराठी शिकत गेलं तर त्या साखळ्या लांब लांब होत जातील. वयाच्या १० व्या वर्षी इंग्रजीचा पहिला शब्द त्याने ऐकला तर भाषेच्या भागात दोन न्यूरॉन्स जुळले जाऊन इंग्रजीच्या न्यूरॉन्सचं नवीन जाळं तयार व्हायला सुरुवात होईल. माणूस जे काही करतो त्याची मेंदूत अशी वेगवेगळी जाळी तयार होत जातात. सायकल चालवायला शिकताना ते लगेचच जमत नाही कारण तोपर्यंत त्या अनुभवाचे न्यूरॉन्स जुळलेलेच नसतात. पण नीट तोल साधत सायकल चालवायला यायला लागते तेव्हा दोन न्यूरॉन्स व्यवस्थित जुळलेले असतात. जेव्हा जेव्हा नवीन अनुभव येतात, घेतले जातात त्या त्या प्रत्येक वेळेला ही प्रक्रिया होत असते.

या सगळ्याचा शिक्षणाशी नेमका काय संबंध आहे, याबद्दल त्या सांगतात की मुलं शाळेत जातात तेव्हा ती भाषा, माणसं, गोष्टी, कविता असे काही ना काही अनुभव घेऊन आलेली असतात. शाळेत शिक्षक त्यांना शिकवायला सुरुवात करतात. पण तोपर्यंतच्या काळात या सगळ्या मुलांच्या मेंदूंनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर आधीच्या वेगवेगळ्या अनुभवांची नोंद केलेली असते. त्यामुळे ही मुलं आकलनाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर आलेली असतात, तिथून त्यांना पुढे नेणं हे शिक्षणाचं काम असायला हवं. आणि मुख्य म्हणजे ते मुलांच्या कलाने व्हायला हवं. त्यासाठी एकावर एक वीट ठेवत जशी भिंतीची रचना होत जाते, तशी ज्ञानाची रचना करत जायचं असतं. आधी जुळलेले न्यूरॉन्स हा एक टप्पा मानला तर आणि त्याच्या पुढचे न्यूरॉन्स जुळवण्याची जबाबदारी शिक्षकाची असते. या सगळ्यालाच ज्ञानरचनावाद म्हणतात.

डॉ. श्रुती सांगतात की मुलांच्या मेंदूच्या वाढीची ही प्रक्रिया लक्षात घेऊन त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचं नियोजन केलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा की वर्गात काही मुलांना पहिल्यापासून घरून खूप वाव मिळालेला असतो तर काही मुलांना अगदी गोष्टीदेखील ऐकायला मिळालेल्या नसतात. अशा वेळी जेव्हा शिक्षक  वर्गात एकच धडा सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवतात तेव्हा प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं असतं.  याा सगळ्यात ज्याला काहीही माहीतच नाही तो कायमच मागे राहणार. त्यामुळे प्रत्येकाचं आकलन वेगळं आहे, हे लक्षात घेऊन ज्याच्या त्याच्या कलाने शिकवलं गेलं पाहिजे.

आपल्याकडे असं होत नाही. वर्गात शिक्षक येतात, फळ्यावर काहीतरी लिहितात, ज्याला जे समजलं त्याने ते घ्या किंवा नका घेऊ  असं ते सगळं असतं. पण काही शाळांमध्ये असं केलं जात नाही. यासंदर्भात डॉ. श्रुती पानसे यांनी सातारा जिल्ह्य़ातल्या कुमठे बीट इथल्या शाळांचं उदाहरण दिलं. इथल्या शाळांमध्ये ज्याच्या त्याच्या आकलन पातळीनुसार त्याला पुढे पुढे शिकवत जातात. जो मुलगा मराठीत चांगला आहे त्याला त्याचे पुढचे अनुभव द्यायचे, जो गणितात चांगला त्याला त्याचे पुढचे अनुभव द्यायचे म्हणजे तो जिथे आहे, तिथून त्याला पुढे न्यायचं असं केलं जातं. अशी प्रक्रिया घडते तेव्हा ते खरं शिक्षण म्हणायला हवं. काही शाळांमध्ये फरशीवरसुद्धा चित्रे काढली आहेत. त्यावर मुलं खेळतात. २-४-६ अशा संख्या चित्रांच्या सहाय्याने लिहिल्या आहेत. ४ म्हटलं की मुलं चारवर जातात. १४ म्हटलं की १४ वर जातात. यातून संख्या, गुणाकार, बेरीज, वजाबाकी शिकत जातात. हे असं सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. यातून खरंच शिकणं ही प्रक्रिया घडते. काही शिक्षक म्हणतात की आमच्याकडे ७० मुलं आहेत तर आम्ही कुठे फरशांवर चित्र काढून शिकवत बसू. या सगळ्यातून मार्ग काढता येऊ शकतो. पण तशी  मानसिकता हवी. ती असेल तर शिक्षकाला फार काम करावंच लागत नाही. तो यातून आपोआप बाजूला राहतो आणि मूल आपोआप शिकत जातं. कारण त्याला शिकवायचं काही नाहीये. त्याला फक्त तसं साहित्य उपलब्ध करून द्यायचं आहे. अशी ही खरं तर चांगली संकल्पना आहे. ती जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळांमध्ये झाली आहे. पण बाकी खासगी शाळा यांपासून लांबच आहेत. ते अजून आम्ही प्रोजेक्टस करून घेतो वगैरे गोष्टीतच आहेत.

आनंददायी शिक्षण हवं असं म्हटलं जातं ते का यासंदर्भात त्या सांगतात की यावरचे जे मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित शिक्षणासंबंधीचे अभ्यास आहेत ते सांगतात की ज्यावेळी कुठल्याही प्रकारची भावना मनात असेल तर ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. म्हणजे एखाद्याला काल काय जेवण केलं ते लक्षात राहणार नाही, पण तुझ्या लग्नात काय जेवण होतं असं विचारलं तर ते कधीच विसरलं गेलेलं नसतं. कारण ते भावनांशी संबंधित असतं. हे स्पष्ट करताना डॉ. श्रुती सांगतात की शाळा म्हटलं की तुम्हाला काय आठवतं असं विचारलं तर ७० टक्केशिक्षक शिक्षा, मार वगैरे कटू आठवणी सांगतात. जेमतेम ३० टक्के जणाकडेच चांगल्या आठवणी असतात. जिथे त्यांचं कौतुक झालं ते त्यांना आठवत असतं. म्हणजे मग शाळेत चांगलं घडलं, कौतुक झालं तर ते मुलांना पुढे कायम आठवत राहील. त्यांच्या शाळेबद्दलच्या आठवणी सकारात्मक आणि भावनेशी जोडलेल्या असतील तेव्हाच हे होईल. म्हणून मुलांना मिळणारं शिक्षण आनंददायी असायला हवं.

मुलांना शिक्षा केली जाऊ नये असं आनंददायी शिक्षणात सांगितलं जातं. त्यामागेही मेंदूच्या बाबतीतला शास्त्रीय अभ्यास आहे, असं डॉ. श्रुती सांगतात. तो असा की  पृथ्वीवर उत्क्रांती होत होती तेव्हा सगळ्यात आधी जलचर आले. छोटा मासा आला तर त्याला खायचं आणि मोठा मासा आला तर पळून जायचं, हे त्यांच्या मेंदूमध्ये फीड केलं गेलं आहे. मुख्य म्हणजे ते आजही तसंच आहे. पुढे केव्हा तरी उभयचर प्राणी उत्क्रांत झाले. त्यांच्यानंतर सस्तन प्राणी आले. त्यांच्यामध्ये काही प्रमाणात भावना आहेत. त्या आधीच्या म्हणजे जलचर आणि उभयचर प्राण्यांमध्ये भावना हा प्रकारच नाहीये. या सस्तन प्राण्यातल्या माकडांमधल्या एप्स जातीच्या दक्षिण आफ्रिकेतल्या विशिष्ट बेटावर असलेल्या एका टोळीच्या खाण्यात चांगली, उच्च दर्जाची प्रथिनं आली आणि केवळ त्यामुळे माणसाचा आजचा मेंदू विकसित झाला, असं सांगितलं जातं. मेंदूचे आडवे तीन काल्पनिक भाग करून त्यानुसार विचार केला तर भाषा, गणित, संगीत, समीक्षा, चित्र, शिल्प हे सगळं मेंदूच्या  वरच्या भागात आहे. मधल्या भागात भावना आहेत तर खालच्या भागात अस्तित्व टिकवण्याची जाणीव आहे. आपला रक्तप्रवाह सारखा या तिन्ही भागांमध्ये फिरत असतो. जसं आपण त्याला वळवू तसा तो जातो. दोन माणसं बोलत असतील तर भाषेकडे त्यांचा रक्तप्रवाह असतो. बोलणं थांबवून त्यांनी सिनेमा बघायला सुरुवात केली तर मनात भावना निर्माण होतील. आणि जो वर असलेला रक्तप्रवाह आहे तो थोडा खाली भावनांकडे जाईल. त्या दोघांची त्याक्षणी भांडणं झाली तरीही हेच घडेल. पण त्या दोघांची भांडता भांडता मारामारी सुरू झाली तर त्यावेळी तो रक्तप्रवाह आणखी खाली रेप्टाईल ब्रेनकडे जातो. हा खेळ सारखा सुरू असतो. या सगळ्या शिक्षणातला उपयोग म्हणजे मुलं जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा रक्तप्रवाह निओ कॉर्टेक्सकडेच म्हणजे वरच्या भागात असायला हवा. त्यांच्या मनात जर भीती किंवा चिंता निर्माण झाली, ताणतणाव आला तर शिकण्याची प्रक्रिया कुंठित होईल. कारण शिक्षक रागावले तर मुलांना भीती वाटते. मग त्यांची शिकण्याची प्रक्रिया होत नाही. एखादी आई मुलाला अभ्यासाला घेऊन बसली आहे, आणि इतक्या वेळा समजावून सांगून तुला एवढंही कसं येत नाही म्हणून तिने दोन-चार फटके मारले तर मेंदूतला तो रक्तप्रवाह रेप्टाइल ब्रेनकडे जातो. त्यावेळेला मेंदूत एरवी निसर्गात मोठय़ा जिवाने छोटय़ा जिवावर हल्ला करण्याच्या वेळी घडते ती प्रक्रिया घडते. मेंदूच्या दृष्टीने आई मुलाला मारत नसते तर मोठा जीव छोटय़ा जिवाला मारत असतो. अशा वेळी ते मूल तिथे थांबतच नाही. ते पळून जातं किंवा मार सहन करतं. यापैकी काहीतरी एक घडतं, कारण आपल्या मेंदूमध्ये तसंच फीड केलेलं आहे. म्हणजेच रागावणं, मारणं याचा अतिशय नकारात्मक परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. हे सगळं शिक्षक नीट समजून घेतील तेव्हा त्यांच्या मुलांना हाताळण्याच्या पद्धतीवर परिणाम झालेला आपल्याला दिसेल. शिक्षकांना, पालकांना राग येतो तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्याही शरीरावर होत असतोच. हेही खरं आहे की मुलं कधी कधी सहन होण्याच्या पलीकडे खूप त्रासदायक वागतात. पण मग तेव्हा ती राग येऊ  न देता कशी हाताळायची याची काही तंत्रं आहेत. ती समजून घेऊन शिक्षकांनी, पालकांनी आचरणात आणावी लागतील.

त्या सांगतात की आपल्या शिक्षा करण्याचा, तुलना करण्याचा, मुलांमध्ये डावंउजवं करण्याचा, बोलण्याचा मुलांवर परिणाम होतो आहे हे लक्षात घेऊन जेव्हा सगळे शिक्षक सजग होतील तेव्हा फरक पडेल. नाहीतर दिवसांमागून दिवस महिन्यांमागून महिने, वर्ष सरतात, ती बोअिरग, काहीच न घडणारी असतात. त्यातलं मुलांना पुढच्या काळात काहीच आठवत नाही. कारण त्यांच्या मेंदूत त्या काळात काहीच घडत नाही. वेगळ्या अनुभवांचे न्यूरॉन्सही जोडले जात नाहीत. आणि लक्षात ठेवावं असं भावनांशी संबंधित चांगलंही काही घडत नाही. पण अलीकडच्या काळात  काही नवीन शिक्षक नवीन काहीतरी शोधू पाहात आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.

याचाच अर्थ असा की  शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदूचं महत्त्व लक्षात घेणं ही यापुढच्या काळातली अपरिहार्य गोष्ट आहे. डॉ. श्रुती सांगतात की आपल्याकडे २०१० च्या आसपास काही बीएड कॉलेजेसनी त्यांच्या अभ्यासक्रमात मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित शिक्षणाचा  थोडय़ाफार प्रमाणात अंतर्भाव केला. तो १५-२० मार्कापुरताच आहे, त्यामुळे बीएड पातळीवर एकूण अभ्यासक्रमातलं त्याचं प्रमाण वाढायला हवं. नुसतं बीएड नाही तर त्याखाली डीएड आणि पूर्व प्राथमिक पातळीवरच्या शिक्षकांसाठी मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित शिक्षणाचा   अभ्यास करणं सक्तीचं केलं पाहिजे. शिक्षक होऊ पाहणाऱ्यांना मुलांना कसं हाताळायचं हे माहीत असलं पाहिजे.

ही सगळी ज्ञानरचनावादी, आनंददायी शिक्षणाची शालेय पातळीवरची परिस्थिती आहे. या प्रक्रियेत मेंदूचं कार्य लक्षात घेण्याचा मुद्दा आता अधोरेखित होत चालला आहे. पण एवढय़ावरच पुरेसं नाही. तर शाळा संपवून मूल पुढे कॉलेजमध्ये जातं तेव्हाचं काय? तिथलं शिक्षण त्याला नेमकं काय देतं आणि काय द्यायला हवं याबद्दल शैक्षणिक तंत्रज्ञान तसंच शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयाच्या तज्ज्ञ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. वसुधा कामत यांनी सविस्तर मांडणी केली.

त्या सांगतात की, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल बोलताना लोकांच्या डोळ्यांसमोर मोठय़ा इमारती, १०—१५ एकर जागा अशा गोष्टी असतात पण मला गेल्या २० वर्षांंच्या अनुभवानंतर भारतीय शिक्षणपद्धतीची ही कमतरता जाणवली आहे की, आपल्याकडे वर्गात फक्त व्याख्यान दिलं जातं. शिक्षक बोलतात, कधी कधी फळ्यावर लिहितात, नोट्स देतात, एलसीडी प्रोजेक्टर वापरतात, त्यांनी नोट्स दिल्या नाहीत तर मुलं ते बोलताना नोट्स घेतात. मग शिक्षक स्वत: सांगितलेल्या  माहितीवर आधारित व्याख्या सांगा, वर्गीकरण करा किंवा स्पष्टीकरण द्या असे प्रश्न विचारून मुलांच्या आकलनाची परीक्षा घेतात. गेली २० वर्षे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक तंत्रज्ञान विभागामध्ये  शिक्षक वर्गात व्याख्यान देत नाहीत. तेव्हा कॉम्प्युटर आजच्या इतके मोठय़ा प्रमाणात नव्हते. आणि इंटरनेट सुविधा सर्वांना उपलब्ध नव्हती. तरीही लर्नर्स कम्युनिटीज करण्यासाठी विविध तंत्रे (३’२ ) वापरून आम्ही को क्रिएशन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाची सहनिर्मिती करीत असू.

विद्यार्थ्यांंना शोधायची मुभा दिली तर  ते अनेक गोष्टी शोधून काढतात, नुसती गुगलवरची माहिती नाही तर त्यावर चर्चा करतात, प्रयोग करून पाहतात.  हे सर्व एका तासात होत नाही. त्यासाठी  त्यांना पुरेसा वेळ द्यवा लागतो. मुलांकडे स्वत:हून शिकायची क्षमता असते. गुणवत्तापूर्ण शिक्षण असे असते. इमारती हव्यात, जागा हवी, चांगलं फर्निचर हवं. पण हे सगळं असूनही फक्त एकातर्फी भाषणे देऊन शिकवणारे शिक्षक असतील तर गुणवत्ता कशी साधणार? वास्तविक आता प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन असतो. महाविद्यालयात इंटरनेट/ वायफाय सुविधा असते. तर या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे. मोबाइल लर्निग हे आजच्या युगात खूप उपयुक्त ठरणारे आहे.  ही १७-१७ वर्षांची मुलं सतत तंत्रज्ञान वापरतात. ते नेहमीच कनेक्टेड  असतात. ‘ऑलवेज कनेक्टेड’  ही २१ व्या  शतकातील तरुणाईची खासियत आहे. तंत्रज्ञान वापरून त्यांना पुढे जायला मदत करण्याऐवजी ते वर्गात न वापरण्याचे बंधन घालणे कितपत सयुक्तिक आहे?

आज शिक्षणसंस्थांकडे इमारती आहेत, सुसज्ज लॅब आहेत पण त्या लॅबमध्ये कोणते प्रयोग करायचे, कसे करायचे  ते शिक्षक सांगतात. त्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. मग सृजनशीलता, नवनिर्मिती ही उद्दिष्टे  कशी साध्य  होतील असा प्रश्न त्या उपस्थित करतात.  या सगळ्यामुळे भरपूर ऊर्जा असतानाच्या काळात मुलांचा ७० ते ८० टक्के वेळ शिक्षकांचे व्याख्यान ऐकण्यात वाया जातो. त्यांच्या मते शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे अध्ययनास साहाय्य करणारी ज्ञानशाखा. अध्यापनाला अधिक महत्त्व न देता विद्यार्थ्यांचे अध्ययन कसे परिणामकारक करता येईल  याविषयी अभ्यास करणारी ज्ञानशाखा.

आज आपली  शिक्षणप्रक्रिया शिक्षककेंद्रित आहे. त्यामुळे वर्गात टेबल, खुर्ची, फळा, डस्टर, नकाशा, प्रोजेक्टर हे सगळं शिक्षकासाठी असतं. वर्गात तो नकाशा लावला जातो. शिक्षकांच्या हातात पॉइंटर असतो आणि शिक्षक तो नकाशा वापरून स्थाने दाखवितात. पण नकाशाच्या प्रती मुलांच्या गटाला देऊन त्यावर काही काम करायला देता येते, त्यामुळे विद्यार्थ्यांला स्वत: शोध घेण्याची, इतर सहाध्यायांबरोबर  काम करण्याची सवय होते अशी कौशल्ये विकसित होतात. मुलांना सांगा, गुगल मॅप वापरून परभणीहून गडचिरोलीला कसं जायचं ते दाखवा. ती पटापट सांगतील. वर वाटेतली गावं, दर्शनीय ठिकाणे देखील सांगतील. काही अपवाद वगळता आपले शिक्षक असं काही करताना दिसत  नाहीत. तुमच्याकडे इंटरनेट आहे, कॉम्प्युटर आहे आणि मुलं आहेत. प्रत्येक मुलाला एक कॉम्प्युटर द्यायची गरज नसते. चार—पाच मुलांना मिळून दिला तरी चालतो. रोज एक तास दिला तरी ते खूप काही करू शकतात. पण आपण त्यांना ती संधीच देत नाही.

त्या म्हणतात, मुलांनी ज्ञान निर्माण केलं पाहिजे. शिक्षक माहिती देतो, ज्ञान नाही. ज्ञान तुमचं तुम्हीच निर्माण करायचं असतं. रचनावाद म्हणजे तुम्हीच तुमच्या ज्ञानाची रचना करा.  वर्गात शिक्षक जे बोलतात, ती  सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. ती माहिती हातात आली की तिचं विश्लेषण करायला, त्या माहितीतून नवनिर्मिती करायला  आपण मुलांना शिकवलं पाहिजे, यावर त्या भर देतात.

प्रा. वसुधा कामत सांगतात की, उच्च शिक्षणामध्ये अध्यापन पूर्व प्रशिक्षण आवश्यक नाही त्यामुळे पदव्युत्तर पदवी (टं२३ी१२ ीिॠ१ी) घेतली की लगेच महाविद्यालयात शिकवू लागतात. पण वर्गात जाऊन शिकवायचं कसं ते त्यांना माहीत नसतं. मग बहुसंख्य शिक्षक त्यांना त्यांच्या शिक्षकांनी जसे शिकवले (भाषणे देऊन) तसेच शिकवायचा प्रयत्न करतात. वर्गात १०० विद्यार्थी असतील तर त्यांना ज्ञाननिर्मितीसाठी कसं तयार करायचं,  त्यांना अध्ययन प्रक्रियेत गुंतवून कसं ठेवायचं, त्यांची मानसिकता, एकविसाव्या शतकातली मुलं कसं शिकतात, हे सगळं शिक्षकाला  माहीत असायला हवं. हे शिक्षकांना कुणी शिकवत नाही. म्हणून शिक्षकांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज आपल्याकडे सगळं शिक्षण शिक्षककेंद्रित आहे, ते विद्यार्थीकेंद्रित व्हायला हवं.

प्रा. कामत यांच्या मते शिक्षकांनी मुलांना ज्ञानामृत पाजायचं हे बरोबर नाही. कॉलेज शिक्षण संपल्यावर ते पुढे त्यांना कोण ज्ञानामृत पाजणार आहे? सध्या असं होतं की मुलं कॉलेजची वर्षं संपून कामाला लागतात तेव्हा तिथे आवश्यक ती कौशल्यं त्यांच्याकडे नसतात. ती त्यांना तेथे आपल्या बळावर शिकावी लागतात. खरं तर ती शाळा किंवा कॉलेजमध्येच विकसित व्हायला हवीत. दहा लोकांशी बोलणं, त्यांच्याबरोबर एकत्र काम करणं, त्यांचं ऐकणं, माहितीचं विश्लेषण करणं ही सगळी आजच्या जगात आवश्यक असलेली कौशल्यं आहेत. पण शाळा, कॉलेजमध्ये हे काहीच शिकवलं जात नाही. मुलांनी शाळा कॉलेजमध्ये फक्त पाठांतर केलेलं असतं. ते किती दिवस पुरणार?

त्यांच्या मते वर्गात व्याख्यान देण्यापेक्षा ते व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करा, किंवा लिहून काढा आणि मुलांना घरी पाहण्या /वाचण्यासाठी द्या. मुलं ते पाहून/वाचून वर्गात येतील. त्यावर त्यांना गट स्वाध्याय द्या. आता मुलांकडे मोबाइल वगैरे असतो. त्यामुळे रेकॉर्ड केलेलं व्याख्यान कसं पाठवयाचं हा प्रश्नच येत नाही. आपल्याकडे वर्गात जी काही ४०—५० मुलं बसलेली असतात, त्यांना वर्गात काही बोलायला दिलं जात नाही. ती फक्त शिक्षकांकडे बघत असतात. प्रा. कामत सांगतात की, एकमेकांशी काहीच बोलायचं नाही यातून मुलांचा खूप मौल्यवान वेळ वाया जातो. जगात कुठेही वर्गात तुम्ही काय पाठ केलंय ते विचारत नाहीत. तुम्हाला विचार करता येतो का, तुम्हाला विश्लेषण करता येतं का, तुम्हाला प्रश्न सोडवता येतात का, तुम्हाला लोकांशी नीट संवाद साधता येतो का हे काम करायला गेल्यावर तपासलं जातं. पण ही कौशल्यं शिक्षकाचं भाषण ऐकून साध्य होत नाहीत. त्यांच्या मते विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात लागणारी कौशल्ये विकसित करणारं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणता येईल. आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सगळ्यांच्या हातात मोबाइल असतात. शिक्षकाचं सहा मिनिटांचं व्याख्यान रेकॉर्ड केलं तर त्यात खूप सांगता येतं. सहा मिनिटांचं यासाठी की आज अटेंशन स्पॅन सहा-सात मिनिटांचा झाला आहे.  तेवढं पुरणार नसेल तर मग आणखी सहा मिनिटांचा व्हीडिओ अशी मालिका देता येईल. मुलं वेळ मिळेल तेव्हा ऐकतील. ते जे काही ऐकलं असेल त्यावर ती वर्गात चर्चा करतील.

त्या सांगतात की असं आमच्या शैक्षणिक तंत्रज्ञान विभागात गेली २० वर्षं आम्ही या पद्धतीने शिकवतो आहोत. या पद्धतीने शिकून बाहेर पडलेल्या मुली सहज नोकऱ्या  मिळवतात, एवढंच नाही तर कमी कालावधीत त्या प्रमोशन्स घेतात. त्या स्वत: विचार करतात. पुढाकार घेणं, दुसऱ्याच्या कामात मदत करणं, आपले विचार मांडणं हे सगळं त्यांना इथे दोन वर्षं करायला मिळतं.

त्या इतर शिक्षकांना विचारतात की कॉलेजमध्ये मुलं त्यांच्या हातात तीन वर्षे असतात, मग अशी उच्च दर्जाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही का?  अभियांत्रिकीचे ८० टक्के पदवीधारक आणि  व्यवस्थापन शास्त्राचे ९० टक्के पदवीधारक नोकरीलायक नाहीत, असं कसं होऊ  शकतं?

त्यांच्या मते खरं तर करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. उदाहरणार्थ शाळा  महाविद्यालयातील बसण्याची व्यवस्था. ती  अगदी ठराविक असते. ती कधीच बदलली जात नाही. ती मुलांना आवडेल, त्यांना सोयीची असेल, त्यांना एकमेकांशी शेअर करता येईल अशी का नसावी?  अनेक शिक्षकांचा असा अनुभव आहे की वर्गात विद्यार्थ्यांंना एकमेकांशी चर्चा करू दिली तर ती अध्ययनात रममाण होतात. त्यांना चर्चेने प्रश्नांची उकल करण्यात, आपण शोधलेले उपाय सर्व वर्गाशी, प्रेझेंटेशनद्वारे  शेअर करण्यात आनंद होतो, त्यांना ते आवडते.

त्या सांगतात की महाविद्यालयीन शिक्षकांच्या १८—२० दिवसांच्या  प्रशिक्षण वर्गात व्याख्याने मोठय़ा प्रमाणात दिली जातात.  त्या वर्गातील प्रशिक्षणार्थीना एकमेकांशी  बोलायला वेळ मिळत नाही. एकमेकांचे विचार समजावून घेण्याची संधी मिळत नाही. वास्तविक मेंदू हा आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि सतत  एका जागी बसल्याने शरीराप्रमाणे मेंदूही थकतो. शरीराची हालचाल होणे अध्ययनात महत्वाचे आहे. आपल्या शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये मात्र कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर सक्त बंदी असते.

त्यामुळे मुलं वर्गातून बाहेर जाण्याची संधी शोधतात कारण त्यांना एकमेकांशी बोलायचं असतं. शेअरिंग करायचं असतं. नव्या कल्पना  एकमेकांना सांगायच्या असतात. हालचाल करायची असते. हे आपण त्यांना वर्गात करायला देतच नाही. आमच्या वर्कशॉपला वर्गात ३५-४० शिक्षक असतात. एकाच वेळी या सगळ्या शिक्षकांची पाचसात जणांच्या गटांमध्ये चर्चा सुरू असते. सगळे बोलत असतात पण कुणालाही एकमेकांच्या आवाजाचा त्रास होत नाही. कारण तिथे त्यांच्या गटात जे चाललेलं असतं त्यात त्यांना रस असतो. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला २० मजली बिल्डिंग नकोय. तुम्ही वर्गाचं वातावरण बदललं पाहिजे. बाकं काढून टाकली पाहिजेत. त्या सांगतात, एकमेकांच्या पाठीकडे बघणं बंद करून एकमेकांच्या चेहऱ्यांकडे मुलांनी बघितलं पाहिजे. हे घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचं शिक्षण सुरू झालं असं म्हणता येईल.

प्रा. वसुधा कामत सांगतात, जगात एक कोटी लोकसंख्या असलेले ८२ देश आहेत आणि आपल्याकडे केवळ शिक्षकांची संख्या (शालेय आणि उच्च शिक्षणात मिळून) एक कोटी आहे. (८६ लाख शाळेत आणि १४ लाख उच्च शिक्षणात)  तेच सगळा अपेक्षित बदल घडवून आणतील. पण त्यासाठी गरज आहे एवढय़ा प्रचंड संख्येने असलेल्या शिक्षकांवर लक्ष केंद्रित करण्याची.

मूल्यशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण

पूर्वी शाळांमध्ये मूल्यशिक्षण हा विषय होता. त्याचा वेगळा तास असायचा. आता तो विषयच काढून टाकला आहे. आणि सगळ्या विषयांमधून मूल्यशिक्षण मिळावं, प्रत्येक शिक्षकाने विचार करावा असं गृहीत धरलं गेलं आहे. मूल्यशिक्षण सुरू झालं तेव्हा ते असावं की नसावं असा खूप वाद झाला होता. काही लोक म्हणायचे की मूल्य वेगळी शिकवायला हवीत का, आत्तापर्यंत कुठे शिकवली गेली वगैरे. तरीही काही काळ का होईना, मूल्यशिक्षण दिलं जायचं. मूल्यांना धरून विचार केला जायचा. तासिकेला शाळेत उपक्रम घेतले जायचे. आता प्रत्येक शिक्षकाने आपला विषय शिकवताना विचार करावा, अशी अपेक्षा असते. मालवणमधल्या जय गणेश इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मेघना जोशी सांगतात की एक शिक्षिका म्हणून मला वाटतं की  मूल्यशिक्षण वेगळं शिकवायची गरज नाही. ते त्या त्या विषयात शिकवता येतं. उदाहरणार्थ गणित शिकवताना श्रीमंती-गरिबी हे सहज सांगता येईल. समानता हे मूल्य रुजवता येईल. पण आताची समस्या अशी आहे की शिक्षकांनी असं काही अवांतर सांगणंच कमी झालं आहे. मुलांनाही असं काही सांगणं ही लेक्चरबाजी वाटते. त्या म्हणतात की मूल्यशिक्षण आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण यांचा बराच संबंध आहे. मूल्ये रुजली, उदा वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजलं, तर तो विज्ञानाचा अभ्यास करताना आपोआप त्या संकल्पना समजून घेईल. त्या वापरेल आणि आपोआप विज्ञान हा विषय त्याचा चांगला होईल, गुणवत्ता सुधारेल. धर्मनिरपेक्षता हे मूल्य निर्माण झालं तर तो एकांगी विचार करणार नाही. त्याचा अभ्यासातही सर्वांगीण विकास होईल, गुणवत्ता सुधारेल. मूल्य शिक्षणाचा तास ठेवून ते होणार नाही. ते शिक्षकांकडूनच मुलांपर्यंत सहजगत्या गेलं पाहिजे. मुळात ही मूल्य शिक्षकांमध्ये असली पाहिजेत.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या