-जय पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळाच्या जन्माची चाहूल लागली रे लागली, की आईला केशर खाऊ घातलं जाऊ लागतं. बाळ गोरं व्हायला हवं ना! ते जन्माला आलं की हळद-बेसनाचा मसाज सुरू होतो. जन्माच्याही आधीपासून सुरू झालेला हा अट्टहास मग त्या बाळाचं आयुष्य व्यापून उरतो. आणि त्यात ती मुलगी असेल, तर मग कहरंच! जन्मजात लाभलेला रंग अधिकाधिक उजळवण्याच्या प्रयत्नात आपल्या देशातल्या मुलींच्या पिढ्यान् पिढ्यांचं अर्धं अधिक आयुष्य खर्ची पडलं. कारण, कोणी विचारंच केला नाही, की गोरेपणाचा हट्ट कशासाठी? पण अलिकडच्या काळात या अर्थशून्य जनमान्यतेला धक्के बसू लागले आहेत. हे धक्के इतके जोरकस आहेत की गोरेपणाच्या बाजाराची अनभिषिक्त साम्राज्ञी म्हणून मिरवणाऱ्या फेअर अँड लव्हलीच्या नावातून फेअर हा शब्दच गळून पडण्याच्या मार्गावर आहे.

साहेबाचा वरचष्मा अद्याप उतरला नसल्यामुळे की काय कोण जाणे, पण भारतीयांना गोऱ्या रंगाचं प्रचंड वेड! तेही एवढं टोकाचं, की जन्मजात मिळालेला रंग क्रीम लावून बदलू शकतो का, याचा शोध घेण्याची तसदी आजही अनेकजण घेत नाहीत. कानी पडेल तो उपाय अंगीकारून पाहण्यास आपण नेहमीच सज्ज असतो. मुलगी गोरी असेल तरंच तिचं लग्न जुळेल, तिला उत्तम नोकरी मिळेल आणि काळी-सावळी असेल तर तिला आयुष्यात काहीच मिळवता येणार नाही, अशी भीती दाखवणाऱ्या फेअर अँड लव्हलीच्या अनेक जाहिराती गेली कित्येक दशकं झळकत राहिल्या. खरंतर गोऱ्या आणि काळ्या दोन्ही रंगांच्या मुलींसाठी त्या अन्यायकारकंच होत्या. अनेक काळ्या-सावळ्या मुलींच्या मनात त्यातून जाणीवपूर्वक न्यूनगंड रुजवला गेला. त्या न्यूनगंडाने त्यांना गोरेपणाच्या बाजारपेठेतला कायमस्वरूपी ग्राहक करून ठेवलं. तर गोऱ्या मुलींना जे काही यश मिळतं, त्याला कारण त्यांची बुद्धिमत्ता, मेहनत नसून केवळ त्यांचा गोरेपणा आहे, असा एक गैरसमज नकळत पेरला गेला. मुलगी ही केवळ एक शोभेची वस्तू आहे आणि केवळ सुंदर दिसणं हेच तिच्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, असं चित्र अनेक पिढ्य़ांवर बिंबवलं गेलं. त्यातून गोरं करणारे साबण, क्रिम, पावडर, स्क्रब, फेसपॅक, ब्लिच, मेकअपची विविध उत्पादनं तर खपवली गेलीच, पण अनेक महागडे सौंदर्योपचार करून घेण्यासही अक्षरशः भाग पाडलं गेलं. गोरेपणाच्या आशेने अशी उत्पादनं खरेदी करणाऱ्या मुलांचं प्रमाणही कमी नाही. पण आपल्या समाजात मुलांसाठी गोरेपणा, सौंदर्य अपरिहार्य नसल्यामुळे त्यांना होणारा उपद्रव तुलनेत मर्यादित आहे.

याआधी अभिनेत्री नंदिता दास, अभिनेता अभय देओल अशा बॉलिवुडमधील काही सेलिब्रिटींनी या फसव्या, अपमानकारक आणि निर्बुद्ध जाहिरातींचा जाहीर निषेधही केला होता. २०१४मध्ये अडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडियाने सावळ्या रंगाच्या व्यक्तीला दुय्यम दर्शवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली होती, मात्र त्यानंतरही अशा स्वरूपाच्या उत्पादनांच्या जाहिराती सुरू आहेत. बडे बॉलिवूड सेलिब्रिटी भरभक्कम मानधन घेऊन या जाहिरातींतून गोरेपणाची भ्रामक बाजारपेठ जिवंत ठेवत आहेत.

गौरवर्ण, सडपातळ बांधा अशी वधूची जाहिरात आता कालबाह्य वाटत असली, तरी आजही या अशा स्त्रीसौंदर्याच्या ठोकळेबाज कल्पनांवर बाजारपेठांत लाखोंची उलाढाल होत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या प्रसिद्ध नावात बदल केला, त्यामागेही अशीच बदलत्या बाजारपेठेची गणित असू शकतात. त्यामुळे आपण या बाजारातलं ‘गिऱ्हाईक’ तर ठरत नाही ना, हे पडताळल्याशिवाय केवळ जाहिरातीला भुलून उत्पादनं खरेदी करणं टाळलेलंच बरं.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lovely end of the un fair ad msr
First published on: 26-06-2020 at 13:10 IST