साप्ताहिक ‘लोकप्रभा’ला नवसंजीवनी देऊन स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या संपादक वसुंधरा पेंडसे-नाईक यांचा सुमारे दशकभराचा सहवास मला लाभला. या काळात कैक गोष्टी शिकावयास मिळाल्या. त्या सर्वच गोष्टींची उजळणी शक्य नाही. पण एका साप्ताहिकाला आकार देणाऱ्या शिल्पकार म्हणून त्यांचा मोठय़ा गौरवाने उल्लेख करावयास हवा. ‘लोकप्रभा’च्या संपादकपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेतले आणि मगच कामाला सुरुवात केली. प्राध्यापकी सोडून पत्रकारितेत आल्यामुळेही असेल, एक मूलभूत शिस्त त्यांच्या अंगी बाणली होती. त्यातच मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व असल्यामुळे त्या भाषेबद्दल, शब्दप्रयोगाबद्दल अत्यंत आग्रही असत. अर्थात याचा काहींना त्रासदेखील होत असे..यावरून त्यावेळी वादही भरपूर झाले. अगदी शब्दकोशातील संदर्भासह! त्यामुळे आपला लेख संपादकांकडे संपादनासाठी गेला की धास्ती वाटत असे. विशेषत: मला त्या बोलावून सांगत असत, ‘‘तुम्हाला उठाबशा काढायला लावल्या पाहिजेत.’’ पण आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी कधीही दर्जाबाबत, भाषेबाबत तडजोड केली नाही. मला वाटते त्यामुळेच ‘लोकप्रभा’ला एक दर्जा प्राप्त झाला. त्या काळी साप्ताहिकांना स्पर्धकदेखील प्रचंड होते. त्यांच्या या धोरणांमुळेच ‘लोकप्रभा’ या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकले. मला आठवतंय आम्ही सगळे एक मीटिंग घेत असू आणि पुढील कार्यक्रम ठरवत असू. या वेळीदेखील भरपूर खडाजंगी होत असे, किंबहुना अशी खडाजंगी झाली नाही तर ती मीटिंग कसली, असे खुद्द पेंडसेबाईंचे म्हणणे असे. आणि त्याही अत्यंत उत्साहाने चच्रेत सहभागी होत. मीटिंगनंतर अर्थात चहापान. त्यावेळी मात्र कौटुंबिक जिव्हाळ्याच्या गप्पा. यामुळे संपादकीय विभागातील  वातावरण खेळीमेळीचे राहिले होते. संजीवनी खेर, अनिकेत जोशी, अनिल डोंगरे असे सगळे त्यावेळी त्यांचे सहकारी होते. त्यांच्या मागणीनुसार यांना ‘लोकसत्ता’तून ‘लोकप्रभा’त वर्ग करण्यात आले होते. पुढे डोंगरे दुसऱ्या वर्तमानपत्रात गेले. त्याच वेळी मी आणि सतीश नाईक रुजू झालो. आपला संपादकीय विभाग आपणच तयार करावा असा पेंडसेबाईंचा प्रयत्न होता. पण सर्वानाच सर्वच गोष्टी कुठे शक्य होतात? असो. ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’मध्ये त्या सारख्याच लोकप्रिय होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीचा काळ खरंच खडतर होता. सारी भिस्त संपादकांवर होती. पेंडसेबाईंचा स्वभाव आणि कार्यशैलीमुळे अडचणींवर मात करणे शक्य झाले होते. कारण आव्हान मोठे होते आणि साधने अपुरी. पण पेंडसेबाईंनी न डगमगता त्यावर मात केली. त्यांचा लोकसंग्रह मोठा असल्याने त्यांनी कित्येकांना लिहिते केले. त्यात द्वारकानाथ संझगिरीपासून निखिल वागळे व पुष्पा त्रिलोकेकरांपर्यंत बऱ्याच लेखकांचा समावेश आहे. खुद्द ‘लोकसत्ता’तील अनेकांवर त्यांनी लेखनाची जबाबदारी सोपवली होती. एखाद्या साप्ताहिकाला आकार द्यावयाचा तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत बदल अपेक्षित असतो. हे सूत्र त्यांनी राबवले. चाकोरीबाहेरील मुखपृष्ठ तयार करण्याची जबाबदारी त्यांनी त्यावेळी या कलेतील वाकबगार समजल्या जाणाऱ्या प्रदीप शेडगे यांच्यावर सोपवली. त्यावेळी शेडगे बंधू कमाल आणि प्रदीप नाटकांच्या जाहिरातींसाठी गाजत होते. सुलेखनकार म्हणून त्यांची ख्याती होती. अक्षरांना वळण देण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यापाशी होती.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasundhara pendse naik
First published on: 22-07-2016 at 01:23 IST