09 August 2020

News Flash

तळ्यावरचे पक्षी

कैकुंद्राहल्ली केरे. कानडीत केरे म्हणजे तळे. बंगलोरला आल्यास अशा या सुंदर जैववैविध्याने बहरलेल्या तळ्याला जरूर भेट द्या.

कैकुंद्राहल्ली केरे. कानडीत केरे म्हणजे तळे.

अनिता कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
विशेष

मी अलीकडेच ‘आर्ट अ‍ॅण्ड सायन्स ऑफ फोटोग्राफी’ हा छायाचित्रिकरणाचा दोन दिवसांचा कोर्स केला. मग त्यात जे शिकले ते प्रत्यक्षात करून पाहावे, हे ओघानेच आले पण फोटो घ्यायचे कशाचे आणि कुठे? मग गूगल देव मदतीला धावून आला. घरापासून आठ किमी अंतरावर एक अतिशय सुंदर तळे असल्याचे लक्षात आले.

या तळ्यावर खूप पाणपक्षी येतात. त्यातले काही थोडे दिवस राहून निघून जातात तर काही पक्षी बराच काळ तेथेच वास्तव्य करतात असे वाचनात आले. एका पक्षीप्रेमी मैत्रिणीमुळे मला पक्ष्यांची जुजबी माहिती झाली होती. तेव्हा मनात विचार आला, चला तळ्यावर जाऊ म्हणजे काही पक्षी बघायला मिळतील आणि फोटोही घेता येतील.

एका रविवारी कॅमेरा, लेन्स आणि दुर्बीण घेऊन  तळ्यावर पोहोचले आणि तत्क्षणी या तळ्याच्या प्रेमात पडले. गूगलने दिलेल्या माहितीनुसार या तळ्याचे क्षेत्रफळ साधारण ४८ एकर आहे. तळ्याचा आकार चमच्यासारखा आहे. ..या तळ्याच्या परिसरात उंबराचे मोठे झाड आपले स्वागत करते. फळांनी लागडलेल्या या झाडाचे खोड फिकट करडय़ा अणि पांढऱ्या रंगाचे होते. पाने हिरव्या रंगांची आणि लांबट होती. छोटी छोटी पिवळ्यालाल रंगाची फळं लगडलेलं हे झाड पक्ष्यांचं माहेरघर असावं. पोपट, मना, कावळे, भारद्वाज पक्षी झाडावर बसल्याचे दिसत होते. एक पोपट उंबराचेच एक छोटेसे लाल रंगाचे फळ खात बसला होता. एकदम फोटो देण्यास तयार होता जणू. या झाडाची पाने तसंच फळांचा वापर अनेक शारीरिक व्याधींवर इलाज करण्यासाठी होतो. झाडाची सावली म्हणजे निसर्गाने पक्ष्यांना दिलेले वरदान.

फाटकातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला जास्वंदीच्या सुंदर झाडांची लागवड केली आहे. तिची पिवळी, लाल, गुलाबी, नािरगी रंगाची फुले डोलत होती. पावलांनी डावीकडचा रस्ता धरला. विविध रंगांची उधळण करत डोलत होती सर्व फुले. डोळ्यांचे पारणेच फिटले. थोडय़ा अंतरावर काही जण व्यायाम करताना दिसले. तळ्याच्या पायवाटेवर दोन्ही बाजूला रांगेत अनेक झाडे उभी आहेत. प्रत्येक दहा फुटांवर एक एक झाड उभे होते. वड, िपपळ, सुरू, निलगिरी, कडुिनब, गुलमोहर, ताम्हण, कोरांटी, चाफा याबरोबरच काही रानफुलांची झाडं तसंच झुडपं रांगेत उभी होती.

तळ्याच्या साधारण मध्यभागी एक छोटेसे मानवनिर्मित बेट आहे. तेथे दाट आणि उंच वृक्ष आहेत. तेथे जाता येत नाही. बरेच पक्षी तिथल्या झाडांवर बसलेले दिसतात. दुर्बणिीतून पाहिल्यास काही ओळखूही येतात. पेंटेड स्टोर्क्‍स, पेलिकॅन्स, ब्लॅक हेडेड ईबीस असे मोठय़ा आकाराचे पक्षी तिथे होते. फोटो काढणे शक्य नव्हते म्हणून दुर्बणिीतून बघूनच आनंद मानला.

पक्षी दिसायला लागल्यावर मी माझा कॅमेरा सज्ज केला. मोठय़ा आकाराचा पेंटेड स्टोर्क्‍स अगदी काठावर येऊन बसला होता. तीन किलो वजनाचा गिधाडांच्या आकाराचा हा पक्षी पाणथळ जागेत वावरतो. त्याची चोच पिवळ्या रंगाची आणि टोकाकडे थोडी बाकदार, तर चेहरा मेणासारखा पिवळा. त्यावर पिसांचा अभाव असतो, पण बाकी शरीरावर पांढरीशुभ्र पिसे असतात. याचे पंख गुलाबी असून त्यावर आडवा, काळा पट्टा असतो. त्यांचे अन्न म्हणजे मासे. किनाऱ्याला मासे जास्त असावेत बहुधा. जवळपासच त्याची पिल्लेही होती. खूप कोलाहल माजवत होती भुकेपायी. पण हा पक्षी मात्र शांतपणे त्यांच्यासाठी अन्न शोधत होता.

त्याच्या थोडय़ा बाजूला पाण्यातून डोकावत असलेल्या दगडावर एक पाणकावळा  (उ१े१ंल्ल३) आपले ओले पंख वाळवत बसलेला होता. त्याच्या काळ्या रंगावर हिरवी झाक होती. गळ्यावर पांढरा ठिपका, चोच तपकिरी आणि निमुळती होती. इतर पाणपक्ष्यांच्या तुलनेत या पक्ष्याच्या तलग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण कमी असते. खूप वेळ पाण्यात राहिल्यास त्याची पिसे गळण्याची शक्यता असते. म्हणून तो आपले पंख वाळवतो.

अध्रे अंतर पार केले. तळ्याच्याच या भागात, मध्यभागी एक दगडी भिंत बांधलेली आहे. तेथील पाण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे, गुलाबी चोचीचे पेलिकॅन्स सकाळच्या उन्हांत ओळीत विहार करत होते. या पेलिकॅनची चोच मोठी असते आणि त्याचा गळा पिशवीसारखा असतो. म्हणूनच की काय त्याला मराठीत झोळीवाला असे नाव आहे. एक पेलिकॅन पाण्यात अचानक नजरेस पडला. त्याच्या पिशवीमध्ये एक मोठ्ठा मासा होता. पटकन फोटो घेतला.

त्याच सुमारास तेथे अजून एक पांढऱ्या, करडय़ा रंगाचा ‘ग्रे हेरोन’ पक्षी स्थिर उभा होता. अगदी हालचाल न करता. हा पक्षी असा तासन्तास उभा राहतो. त्याची संपूर्ण नजर माशाकडे असते. तो माशाच्या मागे जात नाही. तर माशाची वाट बघत उभा राहतो. मासा त्याच्या जवळ येतो, तेव्हा तो पटकन मासा पकडतो. खूप वेळ चोचीत पकडून ठेवतो.

तेथेच एक डार्टर पक्षी सापाप्रमाणे मान बाहेर काढून अतिशय वेगाने तरंगत होता. मला कळायच्या आत तो एक मोठा मासा चोचीत अडकवून बाहेर पडला. मग त्याने त्या माशाला आकाशात उडवले. जवळजवळ पाच-सहा वेळा. आणि मग खाऊन टाकले. मी असे ऐकले आहे की याच्याइतका पाण्यात वेगाने तरंगणारा आणि डुबकी मारणारा क्वचितच कुठला पक्षी असेल. पाणकावळ्यासारख्या दिसणाऱ्या या जलचर पक्ष्याच्या पंखावर चकचकीत धूसर रंगाच्या रेघा असतात. शेपूट लांब आणि पंख्याच्या आकाराचे असते. डोके आणि मान तपकिरी रंगाची, गळा पांढरा असतो. सर्पाकृती लवचीक मान, अणकुचीदार चोच ही डार्टरची वैशिष्टय़े आहेत.

डार्टर बघताना दूरवर एक निळा ठिपका दिसला. आता दुर्बणिीची मदत घेतली. जे दिसले त्याने डोळ्यांचे पारणेच फिटले. दूरवर एका फांदीवर निळ्या करडय़ा रंगाचा किंगफिशर बसला होता. त्याची नजर मात्र पाण्याकडे होती. काही कळायच्या आत तो भुर्रकन उडाला आणि चोचीत मासा पकडून तितक्याच तत्परतेने फांदीवर परत आला. पापणी लवायच्या आत त्याने गट्टमही केला मासा. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की फोटो काढायचा विचारही मनात आला नाही. पाणथळ जागेत राहणारा किंगफिशर हा अतिशय आकर्षक पक्षी आहे. त्याची रंगसंगती मनाला मोहवून टाकते. मी पाहिला तो व्हाइट चेस्टेड किंगफिशर होता. यांच्या अनेक जाती आहेत. सर्वच जाती एकापेक्षा एक सुंदर आहेत. साधारणपणे तीन जातींचे किंगफिशर्स या ठिकाणी दृष्टीस पडतात. व्हाइट चेस्टेड, पाइड तसंच कॉमन किंगफिशर्स.

तलावाचा हा मध्यभाग पक्ष्यांचा आवडता असावा. तेथेच सगळे जण गर्दी करून होते. एक अत्यंत सुंदर जांभळ्या निळ्या रंगाची, लांब पाय, लांब लांब बोटे असलेली, लालबुंद चोच आणि लोभस रंगसंगती असलेली कोंबडीप्रमाणे दिसणारी पर्पल स्वांपहेन तळ्याच्या काठावर तिचे अन्न शोधीत होती. तिच्याच जवळच तांबूस तपकिरी रंगाची कोंबडीसारखी दिसणारी ‘ब्राँझ िवगेड जकाना’ इकडे तिकडे पळत होती. काळे पंख, शरीर गर्द तपकिरी, लाल रंगाची शेपूट आणि पिवळी चोच असलेली ही पक्षीण सकाळच्या उन्हात अतिशय आकर्षक दिसत होती.

तळ्याच्या मध्यावर पाणथळ जागेच्या जवळच झाडं आहेत. त्यात निलगिरीची झाडं भरपूर आहेत. एक पानही नाही या झाडांवर. पण  पाणकावळ्याची घरटी आहेत. हे पाणकावळे नेहमी थव्यामध्ये राहतात.  थोडे पुढे गेल्यावर तळ्याचा शेवटचा टप्पा आला.

इतक्यात एका बारीकशा आवाजाने लक्ष वेधून घेतले. नीट पाहिले तर तळहातावर मावेल इतढा छोटासा, फिकट हिरव्या रंगाचा आणि टपोऱ्या डोळ्यांचा, सहा ते सात सेंटीमीटर लांबी असलेला एक छोटा पक्षी दिसला. कोण असेल बरं हा? फार विचार न करता पटकन त्याचे जवळून फोटो घेतले. आणि नशीब जोरदार होते. त्याचा सिंगापूर चेरी खात असलेला फोटो मिळाला. हा पक्षी इतका मोहक की विचारूच नका. नंतर गूगल केले तर लक्षात आले की हा तर फ्लॉवर पेक्र किंवा फुलटोच्या पक्षी आहे. मजा आली त्या छोटय़ा जिवाला बघून. इतक्यात सुंदर गर्द हिरव्या पिवळ्या रंगाचा आणखी एक पक्षी एका फांदीवर बसलेला दिसला. हा आपला वेडा राघू. उन्हाची तिरीप पानांना पार करत त्याच्यावर पडली होती. इतका अप्रतिम दिसत होता तो. सुंदर कोवळे ऊन सर्वच रंगांना खुलवून टाकते. फोटोग्राफीमध्ये योग्य प्रकाश अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

पुढे चालायला लागले तेवढय़ात कर्कश आवाजातले गाणे ऐकायला आले. मला हे गाणे ओळखीचे वाटले. ‘एशी प्रिनिया’ असणार बहुतेक. आणि अगदी समोरच एका छोटय़ा फांदीवर हे महाशय एक किडा तोंडत पकडून जग जिंकल्याच्या आविर्भावात विराजमान होते. एक छोटा जीव दुसऱ्या छोटय़ा जिवाला खाऊन आपली भूक भागवत होता. फार आध्यात्मिक अनुभव होता. जीवो जीवस्य जीवनम्..

या फेरफटक्यानंतर घरी जायची वेळ झाली, पण पाय निघत नव्हता. घरी आल्यावर गूगल करून आणखी माहिती मिळवली. त्या दिवशी बघितले ते सर्व स्थानिक पक्षी होते. साधारण थंडी पडू लागल्यानंतर स्थलांतर करणारे पक्षी येऊ लागतात. मन या कल्पनेने बहरून गेले. या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी फोटोग्राफी अजून चांगल्या तऱ्हेने शिकायची असं ठरवलं.

या अप्रतिम तळ्याचे नाव आहे, कैकुंद्राहल्ली केरे. कानडीत केरे म्हणजे तळे. बंगलोरला आल्यास अशा या सुंदर जैववैविध्याने बहरलेल्या तळ्याला जरूर भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:02 am

Web Title: wetlands a threat to birds in maharashtra
Next Stories
1 नि:शंक- निर्भय…
2 भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२०
3 डिजिटल लोकशाही
Just Now!
X