स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

करोना कालावधीत सर्वाधिक चर्चा झाली आणि होतेय ती म्हणजे वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्यासंदर्भात. मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा टाळेबंदीची घोषणा झाली तेव्हापासून देशातील लाखो लोक घरून काम करत आहेत. मात्र कामाच्या या पद्धतीकडे करिअरच्या चष्म्यातून पाहिलं तर अनेक गोष्टी बदलल्याचं जाणवतं. केवळ बहुराष्ट्रीय कंपन्याच नाही तर भारतीय कंपन्यांनीही टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास प्रोत्साहन दिलं. याच्या करिअर आणि त्यासंबंधीच्या गोष्टींवर झालेल्या परिणामांविषयी..

Adolf Hitler
Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘दीड वर्ष तर व्हिडीओ कॉलवर – अ‍ॅम आय ऑडिबल- माझा आवाज येतोय का, हे विचारण्यातच निघून गेलं,’ असा एक मजेदार संदेश गेल्या काही काळापासून बराच प्रसारित होत आहे. हा विनोद खरं तर घरून काम करणाऱ्यांची व्यथा मांडतो. अनेक जण घरून काम आणि घरचं काम अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत असल्याने नऊ ते पाच नोकरी ही संकल्पना सध्या तरी कालबा झाली आहे. करोना कालावधीत घरूनच काम करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याच्या सरकारी धोरणाला आता सव्वा वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र कामाच्या या नव्या पद्धतीमुळे करिअरकडे पाहण्याचा कंपन्यांचा आणि कर्मचाऱ्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे.

करोनापूर्व काळात घरून काम करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. त्यामुळे अनेकांचा बराच काळ या नव्या पद्धतीशी जुळवून घेण्यात गेला. या पद्धतीचे फायदे-तोटे सर्वानीच अनुभवले. कसं होणार, काय होणार, असे प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडले होते. पण सव्वा वर्ष उलटल्यानंतर आता आपण कुठूनही काम करू शकतो असा आत्मविश्वास अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. अर्थात त्यासाठी चांगलं तांत्रिक पाठबळ असणं गरजेचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. घरून काम करताना काही प्रमाणात जी मोकळीक घेणं शक्य होतं, त्याचा गैरफायदा घेतला गेल्याचंही काही ठिकाणी दिसून आलं. नऊ ते पाच या कालावधीत असणारं ऑफिस थेट घरात आल्यामुळे कर्मचारी कधीही उपलब्ध असेलच असं ग्रा धरलं जाऊ लागलं. त्यामुळेच ऑफिसमधून कधीही फोन येणं, दिवस संपला तरी काम न संपणं, अगदी सुट्टीच्या दिवशीही ‘एवढं जरा लवकर करून दे,’ असं सांगितलं जाणं, हे प्रकार वाढले. याचा खासगी आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ लागला.

या काळात कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ कॉलवरील चर्चापासून अनेक तांत्रिक कौशल्यं आत्मसात केली. काहींनी उत्साहाने तर काहींनी नोकरी टिकवण्यासाठी या बदलांची सवय लावून घेतली. आता नवी नोकरी मिळवू पाहणाऱ्यांना घरून काम करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्यं आत्मसात करणं अनिवार्यच आहे, असं मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या दीपश्री आपटे सांगतात. आज कंपन्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अगदी ध्यानधारणेपासून योगविद्येपर्यंत विविध प्रशिक्षणं वेबिनार स्वरूपात देण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सल्ला, मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दीपश्री सांगतात.

नवी पद्धत, नवे नियम

पूर्वी ऑफिसमध्ये जाऊन काम करताना पोशाखाविषयी बंधनं पाळावी लागत, ऑफिसच्या वेळा पाळणं बंधनकारक होतं. आता काही कंपन्यांनी हे शिष्टाचार घरून काम करतानाही पाळणं बंधनकारक केलं आहे. म्हणजे ऑफिस मीटिंगमध्ये व्हिडीओ कॉलवरून सहभागी होताना योग्य ड्रेसकोड असायला हवा, व्हिडीओ कॉलवर संवाद साधतानाचे नियम पाळायला हवेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे. न्यायालयीन ऑनलाइन सुनावणीदरम्यानही घरच्या कपडय़ांवर सहभागी झालेल्या वकिलांना न्यायालयाने समज दिल्याचे प्रकारही घडले आहेत.

अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना या नव्या शिष्टाचारांचं प्रशिक्षण देत आहेत. व्हिडीओ कॉल ज्या मंचावरून केला जातो, त्याची गुणवैशिष्टय़े, त्यातील तांत्रिक बाबी कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यापासून ते कॉल्सदरम्यानच्या वर्तणुकीसंदर्भातही अनेक गोष्टींचे धडे दिले जात आहेत. अर्थात हे प्रशिक्षणसुद्धा ऑनलाइनच दिलं जात आहे. कॉल सुरू असताना आजूबाजूच्या व्यक्तींचा आवाज येऊ नये म्हणून काय करता येईल इथपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्हणजेच दोन वेगवेगळ्या टाइम झोनमधील व्यक्ती संवाद साधत असल्यास कोणते नियम पाळावेत इथपर्यंत अनेक सूचना दिल्या जात आहेत.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर पुढचे काही महिने तरी अनेकांना घरूनच काम करावं लागणार असल्याने काही कंपन्यांनी कायमची संमिश्र कार्यप्रणाली स्वीकारली आहे. यात आठवडय़ातून एखाद-दोन दिवसच ऑफिसला यायचं आणि बाकीचे दिवस घरून काम करायचं. ज्यांचं काम ऑफिसला आल्याशिवाय होणं शक्य नाही, त्यांच्यासाठीच ऑफिस सुरू राहणार, अशी पद्धत स्वीकारण्यात आली आहे.

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आणि प्रवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेली घरून काम करण्याची पद्धत कंपन्यांसाठीही आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरत आहे. म्हणजे जागेचं भाडं, वीज वापर, इतर सेवा यावरील कंपन्यांचे पैसे वाचत आहेत. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये देण्यात येणारा प्रवास भत्ता हा इंटरनेटचे बिल भरण्यासाठी वापरण्यास सांगितलं आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करताना आवश्यक असणारं साहित्य खरेदी करण्यासाठी काही हजार रुपये देऊ केले आहेत. कामाची ही पद्धत आता दीर्घकाळ कायम राहणार आहे, हे दर्शवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती. आज अनेक प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये घरून काम करण्यासाठी स्वतंत्र खोली असल्याचा उल्लेख करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळेच आता घरामध्ये अन्य खोल्यांबरोबर ऑफिसची खोलीही असणं गरजेचं झालं आहे.

घरून काम हे अचानक ओढवलेल्या अकल्पित परिस्थितीशी साधलेलं अनुकूलन म्हणता येईल. या साऱ्याच्या सकारात्मक-नकारात्मक बाजू असल्या तरी हेच आता भविष्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणूनच यापुढे घरून काम करण्याची केवळ तयारी ठेवून चालणार नाही तर त्या संदर्भातली विविध कौशल्यं आत्मसात करणं, त्यासाठी आवश्यक साहित्य, घरात तंत्रज्ञान उपलब्ध ठेवणं (उदा.- राऊटर, वायफाय, इंटरनेट, लॅपटॉप, टेबल-खुर्ची), त्याची काळजी स्वतच घ्यायला शिकणं, लहान-मोठय़ा दुरुस्त्या करता येणं आवश्यक ठरणार आहे. अनेक कंपन्या लॅपटॉप वगैरेसारख्या गोष्टी पुरवत असल्या किंवा अगदी इंटरनेटचं बिलही देत असल्या तरी हा बदल सकारात्मकपणे स्वीकारणाऱ्यांना यापुढे प्राधान्य दिलं जाऊ शकतं. एके काळी कर्मचाऱ्यांना स्वप्नवत वाटणारं ‘घरून काम’ आता अपरिहार्य झालं आहे. त्यामुळेच या नव्या कार्यसंस्कृतीचा स्वीकार करा नाही तर बाजूला व्हा, अशी स्थिती आहे. टिकून राहण्यासाठी बदलांचा स्वीकार केला जाणं गरजेचं आहे.