प्रभाकर बोकील – response.lokprabha@expressindia.com

‘लॉकडाऊन’च्या काळात काय करावं, वेळ कसा घालवावा, असा प्रश्न कधी पडला नाही. वाचनालय-पुस्तकांची दुकानं बंद असली तरी, घरचा ‘अक्षरसंग्रह’ हाताशी होताच. पन्नासेक वर्षांपासून थोडंफार कमवायला लागल्यापासून- जमवलेली, काही भेट म्हणून मिळालेली, काही एकदोनदा वाचलेली, तर काहींची पारायणं झालेली, पुस्तकं भरपूर होती. सुरुवातीलाच हाताशी आलेल्या व्यंकटेश माडगुळकरांचं ‘प्रवास एका लेखकाचा’ वाचताना लक्षात आलं की, लहानपणी झालेल्या अक्षरसंस्कारांविषयी, त्यातून निर्माण झालेल्या वाचनाच्या आवडीविषयी, स्वत:बरोबर इतरांच्या पुस्तकांविषयी, कधी इतरांच्या वाचनाविषयी, केलेल्या पुस्तकं संग्रहाविषयी, पुस्तक प्रकाशक-विक्रेत्यांविषयी लेखकांजवळ सांगायला भरपूर काही असतं. भले-बुरे अनुभव असतात. मग त्या दृष्टीने निवडक पुस्तकं वाचताना बराच खजिना सापडत गेला. जुन्या काळच्या आठवणी, त्या काळची पुस्तकं, त्या पुस्तकांच्या किमती, पुस्तकांची जत्रा, पुस्तकांचे प्रकाशन सोहळे.. याविषयी मनोरंजक किस्से समोर आले आणि.. अक्षरश: ‘अक्षरजत्रा’च भरली!

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
The order issued by Reserve Bank in February 2013 regarding private banks
अन्यथा: अनुलेखांचं औदार्य!

स्वत:च्या लिखाणाविषयी लिहिताना तर व्यंकटेश माडगूळकर सुरुवातीच्या ‘नामांतरा’विषयी सांगतात.. ‘गावाकडं’ ही माझी कथा ‘नवभारत’ दैनिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. लेखक म्हणून ग. दि. माडगूळकर हे नाव छापलेलं बघून मी चकित झालो! ही सुधारणा ‘नवभारत’च्या कम्पोझरनं केली होती. कथेवरचं व्यं. दि. माडगूळकर हे नाव त्याला चुकीचं वाटलं असावं. व्यं. ऐवजी त्यानं ‘ग.’ केलं! पुढे ही चूक पुन्हा होऊ नये याची काळजी मी घेत राहिलो. व्यं. दि. ऐवजी ‘व्यंकटेश माडगूळकर’ असं लिहू लागलो!’ हे तर ‘नाव ठेवण्या’विषयी झालं. पण मुळात लेखक कसा ‘जन्म’ घेतो ? सांगण्यासारखं काही असलं तरच लिहिण्याची इच्छा निर्माण होणार. लिहिण्याची आवड मनात निर्माण होण्यासाठी आधी वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी, वाचनाचा होणारा परिणाम जाणवायला हवा. त्यांच्या अशा वाचनाविषयी माडगूळकर सांगतात, ‘मला आठव्या वर्षांपासून खूप वाचायला मिळालं. आधी मोठय़ा भावानं दिलं, नंतर प्रेमळ शिक्षकांनी दिलं, पुढं मित्रांनी दिलं. आपण ‘दोन धोतरे-दोन सदरे’ असं राहावं, पुस्तकं मात्र विकत घ्यावीत, वाचावीत आणि आनंद घ्यावा, हे वयाच्या विशी- बाविशीतच कळलं. चांगली पुस्तकं वाचण्यात असतो, तसा चांगली पुस्तकं जमविण्यातही आनंद असतो! मी विशीतच मिळवता झालो. मी १९४८-४९ मध्ये मुंबई या महानगरातच होतो. फुटपाथवरच्या विक्रेत्याकडून जुनी मासिकं, साप्ताहिकं घेऊन वाचण्यात आनंद असे. यातही बरीचशी परदेशी असत.. नंतर केव्हा तरी ‘वाल्डेन’ हे हेन्री थोरोचं पुस्तक वाचलं आणि वाटलं, विशी—बाविशीत हे पुस्तक हाती पडतं तर किती बरं झालं असतं! कदाचित माझ्या जीवनाने अगदी वेगळं वळण घेतलं असतं. आजवर वाटली ती दु:खं एवढी भयानक वाटली नसती. नाही तरी आपली दु:खं म्हणजे लहान लहान पस्तावेच असतात. दु:ख हा फार मोठा शब्द आहे. महाभारतातल्या पात्रांना जी भोगावी लागली, त्यांनाच दु:ख हे नाव सार्थ वाटतं!.. अत्यंत संस्कारक्षम वयात वाचलेल्या प्रभावी पुस्तकाचा परिणाम होऊन जीवनाचा प्रवासच बदलला, असं घडल्याचं दिसतं. धर्मानंद कोसंबींनी लहान वयात बुद्धचरित्र वाचलं आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलली, हे झालं थोरामोठय़ांचं!’

मुळात व्यंकटेश माडगूळकर अफाट वाचक होते. त्यासाठी विषयांचं कुठलंच बंधन नव्हतं. तरी पुस्तकं विकत घेण्याचीसुद्धा प्रत्येकाची मर्यादा असतेच. मग असं सर्वागीण वाचायला कुठं मिळणार? माडगूळकर सांगतात, ‘कोल्हापूरच्या नगर वाचन मंदिरात रोज संध्याकाळी दिसणारांत मी असे.. मला वाचनाचा फार नाद होता. रोज एक पुस्तक मला पुरत नसे. एक पुस्तक तीन-चार तासांत वाचून संपल्यावर पुढं काय करायचं? मग मी तीन-चार वाचनालयांचा वर्गणीदार होई. दिवसातून तीन-तीन पुस्तकं मी घरी घेऊन जाई. ‘जॉन स्टाईनबेक’ हा अमेरिकन लेखक माझ्या ओळखीचा झाला तो त्याच्या ‘रेड पोनी’ या कथेमुळे. आणि ही कथा असलेलं पुस्तक वाचलं ते कोल्हापूरच्या नगर वाचन मंदिरात. त्या काळी मी अधाशीपणे वाचलं ते कोल्हापुरातच! कोल्हापुरात मी लिहायला लागलो. ‘मौज’चा रौप्यमहोत्सवी अंक तेव्हाच निघाला. ‘पडकं खोपटं’ ही माझी कथा या अंकात प्रसिद्ध झाली!.. पुण्यात स्थायिक झाल्यावर एकदा एक वाचक मला म्हणाला, मी अजून एकटा आहे. माझ्याबरोबर एक दिवस तुम्ही मुंबईला या. आपण हिंडू, फिरू, जेवू, पुस्तकांच्या दुकानात जाऊ. संध्याकाळी परत येऊ. सगळा खर्च मला करू  द्या. मला नेहमी वाटतं, तुम्ही लिहिलेलं वाचून मला आनंद होतो, त्याबद्दल मी तुम्हाला काय देऊ शकतो? एवढं केलंत तर मला फार बरं वाटेल. मी आनंदानं होकार दिला. आम्ही डेक्कन क्वीननं मुंबईला गेलो. फोर्टमध्ये हिंडलो. उत्तम हॉटेलात जेवलो. पुस्तकांची दुकानं पाहिली. एका मोठय़ा पुस्तकांच्या दुकानात नेऊन तो वाचक मला म्हणाला, तुम्हाला आवडेल ते पुस्तक घ्या. मी त्याची किंमत देतो. मी घेतलं, कॅरॅनो दी बर्गेरेक : बाय एडमंड रोस्टॅण्ड (CYRANO DE BERGERAC : BY EDMOND ROSTAND). ही प्रत अजूनही माझ्या पुस्तकांत आहे.’

त्यांच्या पुस्तकांचा संग्रहदेखील वाचनाइतकाच अफाट. पुस्तकंदेखील किती असावीत? या संग्रहाविषयी माडगूळकर म्हणतात, ‘कधी कधी माझ्या मनात येतं, पुस्तकं फार झाली. काय करायचं इतक्या पुस्तकांचं? देऊन टाकावीत! मग आटपाडीच्या वाचनालयाला मी बरीच देऊन टाकतो. ही सगळी पुस्तकं मराठी असतात, कारण ‘इंग्रजी कोण वाचणार?’ असं वाचनालयाचे कार्यकर्ते मला विचारतात.. आता लागणार नाहीत अशी पुस्तकं मी माळ्यावर ठेवून देतो. एकदा शिवाजीनगर एस.टी. स्टॅण्डजवळच्या फुटपाथवरच्या पुस्तकं विक्रेत्याला मोठय़ा कॅनव्हासच्या थैल्या भरून पुस्तकं दिली. तो म्हणाला, ‘याची किंमत काय देऊ?’ म्हटलं, ‘काही नको!’ मी आजवर तरी पुस्तकं कधी विकली नाहीत..

‘उत्तम पुस्तकं वाचायला मिळाली तर, मी माळ्यावरचा कोळीदेखील होईन,’ असं हेन्री डेव्हिड थोरो म्हणाला आहे!

व्यंकटेश माडगूळकर एकूणच त्यांच्या पुस्तकांविषयी, त्यांच्या किमतीविषयी सांगताना जुन्या आठवणीत रंगून जातात.. १९४९ साली लियाम ओ’फ्लेहर्टीची ‘फेमिन’ ही कादंबरी मला सहा रुपये नऊ आण्यात मिळाली. मोपांसाच्या अठ्ठय़ाऐंशी अधिक अठ्ठय़ाऐंशी कथांचे दोन लठ्ठ संग्रह प्रत्येकी दहा रुपये पाच आणे किंमत देऊन पंचावन्न साली विकत घेतले. ह. भ. प. पांगारकरांचे ‘समर्थ संजीवनी’ सहा रुपये, कवी श्रीकृष्ण पोवळे यांचे ‘अग्निपराग’ अडीच रुपये, ‘ब्रदर्स कार्माझाव‘ चौदा रुपये.. वगैरे. ‘एवढी पुस्तकं ठेवणार कुठे? भाडय़ाच्या दोन खोल्यांत?’ बायकोचा प्रश्न. ‘एका खोलीत जमिनीपासून आढय़ापर्यंत पुस्तकांची शेल्फ करायची. तीच आपली बसा-उठायची खोली. आपलं उठणं-बसणं पुस्तकांच्या संगतीत होणं केव्हाही बरं!’ कालांतराने माडगूळकरांनी प्रभात रोडवर प्लॉट घेऊन घर बांधलं. बांधकामाच्या काळात पानशेतचा पूर झाला. काम रखडलं, खर्च दुपटीने वाढला, तरी घर पूर्ण झालं. त्या घराविषयी माडगूळकर सांगतात, ‘घराला नाव पाहिजे. मी ते ‘अक्षर’ ठेवलं. अक्षरावर घर झालं होतं! नाटय़-साहित्य-चित्रपटांतले नामवंत ‘अक्षर’मध्ये येऊन गेले!’ असे सगळे ‘अक्षरप्रेमा’तून माडगूळकरांच्या स्वत:च्या ‘नामांतरा’पासून, घराच्या ‘नामकरणा’पर्यंतचे किस्से!

व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘अक्षर’चे आर्किटेक्ट होते बडोद्याचे ‘लेखक-समीक्षक’ माधव आचवल. त्यांच्या ‘किमया’ या पुस्तकाविषयी सुनीता देशपांडे त्यांच्या ‘सोयरेसकळ’मध्ये लिहितात, ‘मराठीतल्या निवडक अजरामर पुस्तकांची यादी करायची झाली तर त्यात माधव आचवलांच्या ‘किमया’चा अंतर्भाव करावाच लागणार.. उत्तम प्रतीचा कागद, मांडणी, आकार सर्व काही बेतून ‘मौज’ प्रकाशनाने हे पुस्तकं त्या काळात मोठय़ा कौतुकानं काढलं. आवृत्तीही फार प्रतींची नाही. किंमत अवघी पाच रुपये. हे पुस्तकं खूप नाणावले, नावाजले गेले, पण खपले मात्र नाही.. इतक्या सुंदर, दर्जेदार पुस्तकाविषयी असं का घडावं?’ पु. ल. देशपांडेदेखील त्या पुस्तकाविषयी ’आपुलकी’नं लिहितात.. ‘किमया’ हे मला माधवच्या पुस्तकाचेच नव्हे तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाचेच नाव वाटते. सदा जागृत राहून पाहाणे म्हणजे काय, अनुभवणे म्हणजे काय आणि त्या अनुभूतींची तितक्याच वेधक शब्दांतून अभिव्यक्ती करणे म्हणजे काय, याचा अनुभव घ्यायचा असेल तर माधवचे ‘किमया’ वाचावे. मराठी साहित्याचे लेणे म्हणावे असा हा ग्रंथ आहे.’

खुद्द पुलं म्हणजे ‘अक्षरविश्वात’ चौफेर मुशाफिरी करणारा आनंदयात्री.  त्यांच्या वाचनाविषयी—लेखनाविषयी लिहिताना दोन पिढय़ा ते मागे जातात.. ‘माझ्या घरातच ग्रंथप्रेमाचं वातावरण होतं. माझे आजोबा लेखक होते. त्यांच्या भेटीला बरीच साहित्यिक मंडळी यायची. त्या मैफलीत मला मज्जाव नव्हता. त्यामुळे वाचनाबरोबर लेखनाचीही आवड होती. पस्तीस—छत्तीस साली, म्हणजे मी मॅट्रिकच्या वर्गात असताना ‘खुणेची शिट्टी’ ही माझी गोष्ट ‘मनोहर’ मासिकाच्या एका अंकात छापून आली. संपादक शं. वा. किर्लोस्कर यांनी ती विनोदी (!) गोष्ट केवळ भूतदयेपोटी छापली असावी असं मला वाटतं. माझं कौतुक वगैरे झालं.. पण त्याआधी मी एक कारवारचं वर्णन करणारा लेख ‘किर्लोस्कर’ मासिकासाठी पाठवला होता. माझ्या आयुष्यात ‘साभार परत’ आलेला तो पहिला अन शेवटचा लेख!’ असं मिश्कीलपणे सांगतात. पुलंचं वाचन कसं आणि किती असावं? एका आठवणीत ते लिहितात, ‘त्यावेळी मी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुट्टीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काऊंटरवर पडलेला ‘शिवचरित्रा’चा पहिला खंड हाती पडला. ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे’ नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेला पहिला खंड वाचत मी काऊंटरपाशीच खिळून राहिलो.. ते दहाखंडी चरित्र घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले.. आणि काहीतरी अद्भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखं वाटलं!’

इतर लेखकांविषयी जशी पुलंना आस्था होती तसंच आवडलेल्या कवींच्या कविता रंगमंचावर वाचून सादर करणं हा पुलं आणि सुनीताबाईंचा छंदच होता. असे कित्येक प्रयोग त्यांनी केले. या कवितेतून व एकूणच आपल्या साहित्यातून ‘फँटसी’ फारशी  आढळत नाही याविषयी पुलं म्हणतात, ‘फँटसी’चा पहिला स्पर्श बालकवींच्या ‘फुलराणी’ कवितेत आला. (परिकल्पना—देवदूत हे सारं पाश्चात्त्यांचं!) म्हणून मी मर्ढेकरांना लिहिलं, ‘फुलराणी’चं इंग्रजीत भाषांतर करून वोल्ट डिस्नेला पाठवा. वॉल्ट डिस्नेच्या प्रतिभेनं या कवितेला किती सुंदर रूप आलं असतं!’ हे सारं पुलंच्या ‘अक्षरप्रेमा’पोटी! इतरांच्या वाचनाविषयी देखील पुलं भरपूर लिहितात. गोविंद तळवलकरांच्या वाचनाविषयी पुलं म्हणतात, ‘गोविंदराव तळवलकर हे खूप वाचतात, हे मी स्वानुभवाने सांगतो. कारण त्यांच्याकडून मागून आणलेल्या पुस्तकात, त्यांनी पेन्सिलने खुणा केलेल्या मला आढळतात. आणि तो भाग खरोखरीच अधिक मननीय असतो. आमची मैत्री ही ग्रंथप्रेमातून जुळली. अर्थात त्यांचं ग्रंथप्रेम हे आमच्या ग्रंथप्रेमापेक्षा सहस्रपट आहे.’

पुस्तकं लिहिणं, ती छापली जाणं, त्यासाठी मुद्रक—प्रकाशक— वितरक हवा. आणि अखेर वाचकापर्यंत पोचण्यासाठी ‘विक्रेता’ देखील हवाच. पुण्यातल्या जिमखान्यावरच्या ‘इंटरनॅशनल बुकडेपो’च्या ‘पुस्तकप्रेमी’ विठ्ठलराव दिक्षितांच्याबद्दल देखील पुलं भरभरून लिहितात, ‘विठ्ठलरावांच्या दुकानात पुस्तके महाग मिळतात, असा एक आरोप आहे. परंतु हा आरोप पुस्तकं विकत घेणाऱ्या मंडळींकडून होत नाही.. एरवी दोन आण्याला मिळणारे पंचांग, ज्येष्ठ—आषाढापर्यंत दीड आण्याला मिळते, म्हणून दोन महिने पंचांगाशिवाय काढणारी मंडळी, त्यांच्या दुकानातली अत्यंत दुर्मीळ पुस्तकं सहासात महिने ‘जांगड’ म्हणून घेऊन जातात, अन वाचून झाली की, ‘नोकरास पाठवून घेऊन जावी, तूर्त आवश्यकता नाही’, म्हणून विठ्ठलरावांना चक्क मोडीत चिठ्ठी पाठवतात!.. ‘वास्तविक पुस्तकविक्रेत्याने पुस्तकं वाचलीच पाहिजेत असा आग्रह नाही.. विठ्ठलरावांचे तसे नाही. त्यांच्या डोक्यात थोडासा हक्सले, जरासा केन्स, वुडहाऊस आहेत, अरविंदबाबू, राधाकृष्णन, नेहरू आहेत, सावरकर आहेत, फडके आहेत, फॉस्टर आहे, मास्ती वेंकटेश अयंगार आहेत, लीन युटांग आहेत, थोडेसे विनोबा भावे देखील आहेत.. आणि म्हणूनच विठ्ठलराव ‘इंटरनॅशनल’ आहेत!’

पुलंच्या अत्यंत आवडीचा लेखक म्हणजे पी. जी. वुडहाऊस. या वुडहाऊसची एक जीवघेणी आठवण पुलं सांगतात.. ’१६ फेब्रुवारी १९७५. सकाळच्या गाडीनं पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो. वर्षांनुर्वष हा माझ्या प्रवासातला सोबती. त्याची पुस्तकं शिळी व्हायलाच तयार नाहीत. माझ्या प्रवासी—बॅगेत इतर कोणतीही पुस्तकं असली तरी वुडहाऊस हवाच! तसा घेतला. तेवढय़ात दाराच्या फटीतून ‘सकाळ’ सरकला. पहिल्या पानावर  वुडहाऊसच्या निधनाची बातमी. एका हातात कधीही न मरणारा  वुडहाऊस आणि दुसऱ्या हातात ९४व्या वर्षी वुडहाऊसच्या निधनाची बातमी सांगणारा ‘सकाळ’! त्या क्षणी मला वुडहाऊसच्याच एका उद्गाराची आठवण झाली. ‘लिओनारा’ ही त्याची एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर वुडहाऊस उद्गारला होता, ‘आय थॉट शी वॉज इमोर्टल!’ वुडहाऊसच्या निधनाची बातमी ऐकल्यावर  जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनी हेच म्हटलं असेल, ‘अरे, आम्हाला वाटलं की तो अमर आहे!’ खुद्द पुलंविषयी तरी वेगळं काय म्हणणार! त्यांचं ‘अक्षरसाहित्य’ तसंही वुडहाऊसच्या साहित्यासारखं.. कधीही कालबा न होणारं!

‘डोंबिवलीने माझा  हात धरून पाटीवर ‘श्री’ लिहून घेतली..’ असं म्हणणारे शं.ना. नवरे त्यांच्या वाचना-लिखाणाविषयी ‘अघळपघळ’पणे सांगतात. वाचनाची आवड शन्नांना त्यांच्या डोंबिवलीतल्या शाळेतल्या  वाय. पी. हुदलीकर सरांमुळे लागल्याचं सांगताना ते म्हणतात. ‘ते गणित आणि सायन्स शिकवायचे. वर्षभराचा पोर्शन महिना दोन महिने आधीच संपवायचे आणि मग त्या तासांना गोष्टी सांगायचे. एक गोष्ट आठाठ पिरियड चालायची.. तास संपताना गोष्ट अशा ठिकाणी थांबवायचे की उत्कंठा शिगेला पोचलेली असायची! इतक्या अप्रतिम, आकर्षक पद्धतीने गोष्ट सांगणारी दुसरी व्यक्ती नंतर कधी भेटली नाही! त्यांच्यामुळे वाचनाचा नाद लागला. साने गुरुजी, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, य. गो. जोशी, नाथमाधव, वि. वा. हडप, ह. ना. आपटे यांच्या कथा-कादंबऱ्यांची ओळख अन्यथा त्या वयात झालीच नसती.’ शन्ना पुढे सांगतात, ‘सत्यकथाचे अंक वाचक आवर्जून जपून ठेवत. आवडलेल्या कथांची पुन्हापुन्हा पारायणं करत. ‘भावे, गाडगीळ, गोखले, माडगूळकर’ यांच्या कथा हे प्रमुख कारण होतं. वाचकांची ती पिढी याबद्दल आज स्वत:ला भाग्यवान समजत आहे..ती पिढीदेखील आता काळाच्या पडद्याआड जात चालली आहे. चौघांच्या कथांचे पिंड भिन्न, रूपे विविध. नव्या वाटा वेगवेगळ्या होत्या.. या बहुसंख्य वाचकात मी एक होतो!’

शन्नांच्या आईलादेखील वाचनाचा खूप नाद होता.. ‘कथा-कादंबऱ्या तिला विशेष आवडायच्या. तिला धार्मिक-अध्यात्मिक पुस्तकं वाचताना कधीच पहिले नाही. कधी जुनी पुस्तकं आणून द्यायचो तेंव्हा ती खूश व्हायची. कधी वर्तमानपत्रातील जाहिराती वाचून पुस्तकं विकत घेऊन यायला सांगायची.. श्रीमान योगी, आनंदी-गोपाळ, गारंबीचा बापू, व्यंकटेश माडगूळकरांचे ‘कोवळे दिवस’, ‘करुणाष्टक’, गंगाधर गाडगीळांचे ‘एका मुंगीचं महाभारत’, ‘दुर्दम्य’ वगैरे नंतरची काही पुस्तकं वाचताना मला तिची हटकून आठवण यायची.  आई असती तर तिने मला ही पुस्तकं विकत घायला लावली असती. आईला वाचता यायचं पण लिहायला यायचं नाही. विचारल्यावर ती म्हणायची, ‘सासरी आल्यावर हातात पेन्सिल आलीच नाही कधी.. मी विसरले लिहायला!’ माझं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या हाती देऊन पाया पडलो. तिनं पुस्तकं उघडलं, चाळलं, मिटलं अन म्हणाली, ‘हे सगळं पुस्तकं तू लिहिलं आहे?’

प्रकाशक केशवराव कोठावळे यांच्या जुन्या ‘मॅजेस्टिक’ दिवसांविषयीदेखील शन्ना सांगतात. सुरुवातीला गिरगावातल्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमाच्या बाहेरच्या बाजूला मेन रोडवर त्यांचं ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ तिथं जेमतेम एक जण उभं राहील, एवढंच दुकान होतं. शन्ना ती आठवण कोठावळे यांच्याच शब्दांत सांगतात, ‘बाजूच्या सेन्ट्रल सिनेमात ती तिकिटं काळ्या बाजारात विकत होतो. तेव्हाची कंपनीही तसलीच.. खिशात चाकू बाळगणारी.. इथं रस्त्यावर मी जुनी पुस्तकं घेऊन उभा असायचो. कुठून कुठून लॉटमध्ये पुस्तकं विकत घ्यायची. दोन-चार आण्यांचा फायदा घेऊन विकायची.. मला हात दिला सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाने. ऐंशी पैशाला एक पुस्तक या भावाने गठ्ठेच्या गठ्ठे विकत घेतले. कशीबशी पैशांची जमवाजमव केली आणि धाडस केलं. संपली पुस्तकं तर पैसा मिळेल नाहीतर कर्जात बुडून जायचं!.. नंतर ‘मॅजेस्टिक इंग्लिश टीचर’ या पुस्तकाची कल्पना सुचली. प्रोफेसर सं. ग. मालशे यांना विनंती केली. त्यांनी वेळेवर पुस्तकं लिहून दिलं. म्हणाले, ‘लेखक म्हणून माझं नाव नको. माझ्या इनिशियल्स एस. जी. आणि नाव गुप्त ठेवायचं म्हणून गुप्ते.. ‘एस. जी. गुप्ते!’ पुस्तकाचा प्रचंड खप झाला!’ लेखकाच्या ‘टोपण नावाचा’ हा एक अजब किस्सा.

शन्ना त्या काळच्या साहित्यिक सहली विषयी लिहितात.. ‘श्री. ज. जोशी मुंबईला बदलून आले. त्यांचं ऑफिस सुटलं की ते माझ्याकडे सचिवालयात येत. मग आम्ही रमतगमत गप्पा मारत बोरीबंदपर्यंत यायचो. कधी गिरगावात जायचो. गिरगाव म्हटलं की ‘मॅजेस्टिक’ आलंच. श्री. ज.ही केशवरावांच्याकडे यायला लागले. नंतर आम्हा साहित्यिकांच्या सहली निघायच्या. वसंत सरवटे, जयवंत दळवी, वसंत सबनीस, मधु मंगेश कर्णिक, गो. नी. दांडेकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, वि. आ. बुवा.. वगैरे. ‘ललित’ची कल्पना याच सहलीतली. प्रत्येकाने निदान दीड हजाराची पुस्तकं दरवर्षी विकत घ्यायची कल्पना याच सहलीतली! श्री. जं.नी पुढे पुणेरी पुस्ती जोडली, ‘आपली सोडून इतरांची पुस्तकं!’

लेखक-कलावंतांची ‘आत्मचरित्र’ ही वाचकांच्या दृष्टीने पर्वणीच असते. मात्र लेखकाचा त्याबाबतीतला दृष्टिकोन किती वेगळा असतो! सुनीता देशपांडे त्यांच्या ‘आहे मनोहर तरी..’च्या सुरवातीलाच म्हणतात, ‘हे आत्मचरित्र नाही. आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती. पाखरांसारखी. क्षणांत या फांदीवरून त्या फांदीवर. कुठून कुठेही. दिशाहीन. पण स्वत:च्या जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.’ तर  ‘मला आत्मचरित्र हा लेखन प्रकार नेहमी दीड दांडीनं चोरटं माप देणारा तराजू वाटतो.’ म्हणणाऱ्या नाटय़-चित्रयात्री सई परांजपे त्यांच्या ‘सय’ पुस्तकाला ‘माझा कलाप्रवास’ म्हणतात. नाटय़यात्री ‘लखोबा’ अर्थात प्रभाकर पणशीकरांचा परिचय ‘लेखक’ म्हणून कधी नव्हताच. त्यांच्या ‘तोच मी!’ या आत्मचरित्राच्या ‘नांदी’त ते लिहितात, ‘कुणी आत्मचरित्राविषयी  विचारलंच तर मी उत्तर देई, ‘किती खोटं लिहायचं ते माझं अद्याप ठरलं नाही, म्हणून मी लिहीत नाही’.. दोन-चार लहानमोठय़ा शस्त्रक्रिया झाल्यानं, माझा लिहिता हात थरथरू लागला होता. माझ्या मनात लिहिण्याची ऊर्मी होती, लिहिण्यासारखंही खूप होतं. पण आता हातही जायबंदी झाला होता. ‘स्वयमपि लिखितं, स्वयमपि न वाचयति’ अशी माझ्या हस्ताक्षराची दुर्दशा उडाली होती. आपला लेखनावतार जन्मापूर्वीच जायबंदी होणार याची टोचणी मात्र मनाला लागली.’ पुढे अप्पा कुलकर्णी पंतांचा ‘लिहिता हात’ झाले! पणशीकर एकदा फोनवर म्हणाले होते, ‘माझ्या मनात ‘इदं न मम!’ हे आत्मचरित्राचं नांव होतं. प्रकाशकांचा विचार वेगळा होता.. चालायचंच!’

माणसांच्या काय, पुस्तकाच्या बाबतीतदेखील, ‘नावात काय आहे?’ हा प्रश्न तसा निर्थक. ‘नावात पुष्कळ काही आहे’ अशा हेतूनं, कधीकधी एखाद्या महत्त्वाच्या पुस्तकाच्या ‘नावासाठी’ प्रकाशक वाचक स्पर्धा आयोजित करता. बरेचदा त्या वादग्रस्त ठरतात तो भाग वेगळा. मुळांत लहान-मोठं कसंही असो, पुस्तक लिहिल्यावर प्रकाशक मिळून ते छापून तयार होणं, हा लेखकासाठी ‘एव्हरेस्ट’ गाठल्याचा आनंद. त्याचं प्रकाशन होऊन ते वाचकासमोर येणं, हा नंतरचा उतरणीचा भाग. नंतरचा पुस्तक प्रकाशन हा देखील ‘अक्षरसोहळा’च असतो. हल्लीच्या ‘मार्केटिंग’च्या दिवसात ज्याचा मोठं सभागृह घेऊन ‘इव्हेंट’देखील होतो. तीनेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या ‘राजहंस’ प्रकाशनच्या वसंत वसंत लिमये लिखित ‘विश्वस्त’चा असाच ‘स्लाइड-शो-म्युझिक’सह दणकेबाज ‘इव्हेंट’ मोठय़ा ‘एसी’ सभागृहात झाला. पुस्तकं प्रकाशनाच्या दिवशी लेखकाच्या स्वाक्षरीसह पुस्तकाची प्रत मिळणं हे वाचकासाठी वेगळं आकर्षण. कधी हा सोहळा छोटेखानी आटोपशीरपणे साजरा होतो अन अशा प्रकाशन-सोहळ्याचेसुद्धा किस्से होतात. असाच एक ‘भावे प्रयोगाचा’  किस्सा २०१० सालच्या पुण्यातल्या साहित्य संमेलनातला..

‘पॉप्युलर प्रकाशना’च्या स्टॉलवर कवयित्री ‘नीरजा’ यांच्या ‘निर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष द. भि.कुलकर्णी यांच्या हस्ते होणार होतं. कांही कारणाने त्यांच्या अनुपस्थितीमुळे तिथेच तेंव्हा उपस्थित असलेल्या प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते तो संग्रह प्रकाशित झाला. पुष्पाताई आणि नीरजा या दोघींच्या ध्यानीमनी नसताना हे घडून गेलं. कालांतराने ‘द. भि.’ आल्यानंतर पुन्हा त्या पुस्तकाचं ‘प्रकाशन’ झालं! प्रा. अनंत भावे तिथं हजर होतेच. त्यांच्याशी पूर्वी फोन-पत्राद्वारे माझा संवाद होता पण प्रत्यक्ष भेट तिथेच झाली. (ध्यानीमनी नसताना पलीकडच्याच ‘स्पर्श प्रकाशन’च्या स्टॉलवर भावेंनी माझ्या ‘ठिपके’ आणि ‘मुक्तरेषा’ या ‘ललित’पुस्तकांचं देखील अनौपचारिक प्रकाशन केलं!) नंतर कांही कारणाने त्यांच्या मुंबईतल्या रुईया कॉलेजच्या बाजूला असलेल्या घरी गेलो. बैठकीच्या खोलीतली एक पूर्ण भिंत पुस्तकांच्या मांडणीनं भरलेली. काही पुस्तकं इतस्तत: विखुरलेली. निघताना बाजूलाच काढून ठेवलेलं छोटंसं पुस्तकं माझ्या हाती ठेवत म्हणाले, ‘हे तुमच्यासाठी. आऊट-ऑफ-प्रिंट आहे. कुठं मिळणार नाही. सुरुवातीच्या काळात केलेलं हे तेंडुलकरांचं सदर लेखन आहे.’ ते पुस्तकं पुन्हा ‘लॉकडाऊन’ वाचनात समोर आलं. संपूर्ण काळ्या मुखपृष्ठावर छोटीशी केशरी- पांढरी अक्षरं, ‘फुगे साबणाचे.’ १९७४ सालचं ‘नीलकंठ प्रकाशन’. वीस रुपये किमतीचं स्टिकर. मूळ किंमत अजून कमी असणार, म्हणून स्टीकर. त्यात विजय तेंडुलकरांचा एका ‘पुस्तक-जत्रे’ विषयीचा पन्नास वर्षांपूर्वीचा ‘नॉस्ताल्जिया’देखील होता..

साधारण १९७०च्या सुमारास  मुंबईच्या ‘कांपाच्या मैदानावर’ (ही ब्रिटिशकालीन ओळख) म्हणजे आताच्या ‘क्रॉस’ मैदानावर  दिल्लीच्या ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ तर्फे भरलेल्या पुस्तकांच्या ‘जत्रे’विषयी विजय तेंडुलकर लिहितात, ‘दोनदोनशे रुपयांची श्रीमंतांची तसेच दोनचार रुपयांची तुमच्याआमच्या खिशाला परवडणारी पुस्तके येथे आहेत. बालवाङ्मयातील अध्र्या चड्डीतील पुस्तके आहेत तसे रुळत्या शुभ्र दाढीचे धार्मिक ग्रंथदेखील आहेत. पुस्तकातले राजबिंडे आर्य आहेत, आडदांड हाडापेराचे द्रविड आहेत, मत्स्यविषयक पुस्तकांचे सारस्वत आहेत, मद्यविषयक पुस्तकांचे परभू आहेत, उलटीकडून सुरू होणारे यवन आहेत, आकाशातल्या बापाचे स्तवन करणारे ख्रिश्चन आहेत, पाकक्रिया पारंगत सुगरिणी आहेत, विषप्रयोग-खून-दरोडय़ाचे महाभयंकर कट रचणारे कुटिल कारस्थानी आहेत, सर्वोदयी प्रवचन देणारे गांधीवादी आहेत, मॉस्कोप्रशस्ती करणारे कॉम्रेड्स आहेत.. थोडक्यांत पुस्तकांचे हे प्रचंड जगच आहे म्हणानात!.. मंगळावरची माणसं पृथ्वीवर उतरतील तसं आपण या जगात जायचं आणि डोळे आणि पाय दुखेस्तोवर इथली आश्चर्ये, सुरस चमत्कारिक गोष्टी आणि गमतीजमती पाहून  पुन्हा आपल्या जगात परतायचं. परतताना आपलं जग क्षणभर आपल्याला मंगळासारखं भासतं.. निदान मला तरी भासलं.. या मोठय़ा जत्रेत पुस्तकं पहावीत, पण ती पुढेमागे चार-आठ आण्याला विकत घ्यावीत छोटय़ा ‘फूटपाथ पुस्तक जत्रेत’! अगदी थोरामोठय़ा विद्वानांनीदेखील व्यासंग केले त्यात या बिनशोभेच्या साध्या-बागडय़ा सेकंडहॅण्ड फूटपाथ ग्रंथभांडाराचा वाटा फार मोठा असल्याचं ते सांगतात. त्या जत्रा आपल्या उपयोगाच्या. कांपाच्या मैदानावरची जत्रा पाहण्याची.. निदान एकदा तरी पाहावी अशी!’

‘डिजिटल-ई-पुस्तकां’च्या युगात, हे सारंच हळूहळू कालबा होत जाईल. मात्र माध्यम बदललं तरी ‘क्षर’ नसलेलं ‘अ-क्षर’ कायम सोबतीला असेल! अशा ‘अक्षरजत्रे’तून लेखक-वाचक संवाद चालूच राहील!