दि. ११ एप्रिलचा ‘लोकप्रभा’ तरुणाईसाठी सर्वार्थाने वेगळा होता. या अंकातील ‘कव्हर स्टोरी’ ही निवडणुकीच्या धामधुमीत तरुणाईकडे लक्ष वेधणारी होती. संपूर्ण स्टोरी वाचली आणि अर्थातच तरुण मतदार असल्याने अनेक विचार मनात येत गेले. एक तरुण मतदार म्हणून मी स्वत:ला कुठे पाहतोय या लोकशाहीच्या उत्सवात? माझ्यासाठी म्हणून असं काय असणार आहे या निवडणुकीत जे माझ्या आज आणि उद्यावर परिणाम करेल, असे असंख्य प्रश्न या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक तरुणांना पडले असतील; पण आपल्या देशातील निवडणुकीचा अविभाज्य भाग असलेले राजकीय पक्ष देशाच्या एकूण मतदाराच्या अध्र्याहून अधिक असलेल्या आम्हा तरुण मतदारांबद्दल नक्की काय विचार करता आहेत, हे समजायला या कव्हर स्टोरीने खूप मदत केली आहे. सर्वच राजकीय पक्ष जरी, ‘आमचा पक्ष सर्वाधिक तरुणांचा पक्ष’ अशा काही वल्गना करत असले तरी त्यात फार तथ्य नाही. याचे कारण उघड आहे. प्रत्येक पक्षाला एक साधा प्रश्न यात विचारला की, ‘तरुणाची व्याख्या काय?’ तर यावर सगळ्याच पक्षांनी सोईचे उत्तर दिले आहे. यात नवीन ते काही नाहीच, कारण सगळ्याच राजकीय पक्षांचे धोरण हे तरुणांच्या दृष्टीने केवळ एक ‘उपयोगिता मूल्य’ म्हणून आहे. राजकीय पक्षांना सातत्याने तरुण कार्यकर्ते हवे असतात- आहेत, तरुण मतदार हवा आहे- असतो; पण ‘तरुण नेता’ द्यायचे म्हटले की, प्रत्येकच पक्ष आपापल्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत. अगदी या निवडणुकीचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर देशातील भाजप आणि काँग्रेस या दोनही प्रमुख पक्षांनी ४० वयाखालील अनुक्रमे फक्त ३८ आणि ३२ तरुण उमेदवारांना तिकिटे दिली आहेत, त्यातही बरीचशी राजकीय वारसा असलेल्या तरुणांना! म्हणजे तरुण मतदार म्हणून आकडय़ांमध्ये तर आपण आहोत पुढे, पण प्रत्यक्ष राजकारणात मात्र मागेच आहोत. मग हे चित्र पाहता खरेच राजकीय पक्षांना तरुणाई राजकारणात यावी असे वाटते का, या प्रश्नाचे उत्तर राजकीय पक्षांच्या सोईने यावी असेच मिळते.
राजकारणाविषयी तरुणाईचा दृष्टिकोन उदासीन आहे असा साधारणत: सर्वच राजकीय पक्षांचा सूर या स्टोरीत आहे; पण राजकारणाकडे उदासीन नजरेने पाहण्याची वेळ या तरुणावर याच प्रस्थापित राजकारण्यांनी आणली आहे, हे मात्र ते सोईस्करपणे विसरता आहेत. उलट, गेल्या काही वर्षांतील वेगवेगळी आंदोलने, उपोषण या सगळ्यांत तरुणाईचा सक्रिय सहभाग आणि व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी असलेली संघर्षांची तयारी पाहता या देशातील तरुण खरे तर राजकारणात सक्रिय होऊ पाहतो आहे. त्याची इच्छा आहे या देशाला राजकारणात एक सक्षम पर्याय देण्याची; पण सध्याच्या साटेलोटेच्या संस्कृतीत असलेल्या राजकीय पक्षांना हे मान्यच नाही. तसे असते तर घोषित उमेदवारांमध्ये तरुणांचा टक्का वाढला असता. अशा वेळी जर एखादा तरुण स्वतंत्रपणे या व्यवस्थेविरोधात उभा राहिलाच (जसे आज देशात आणि राज्यात निवडणुकीत राजकीय पक्षांकडून नाकारले गेलेले व कुठलाही राजकीय वारसा नसलेले अनेक तरुण स्वत:चा व्यवसाय, घर सोडून ‘अपक्ष’ म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.) तरी त्याला संपवण्यासाठी, विकत घेण्यासाठी प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतात हे उघड आहे. मतदारसुद्धा त्याच्या बाजूने उभे राहतील की नाही अशी शंका असते. या निवडणुकीतसुद्धा पक्षांतर करणाऱ्यांना ऊत आला आणि ऐन वेळी दाखल झालेल्यांना तिकिटे देण्यात आलीत, तेव्हा वर्षांनुवर्षे राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असणाऱ्या तरुण मतदाराचा, कार्यकर्त्यांचा विचार कुठल्या पक्षाने केला? मग तरुणांनी सक्रिय राजकारणात यायचे तरी कसे?
देशातील सगळ्याच नेत्यांकडून जोरात भाषणबाजी झाली, पण ज्या देशातील निवडणुकीत अध्र्याहून अधिक मतदार तरुण आहेत, त्या देशातील नेत्यांच्या भाषणाचे मुद्दे तरी काय आहेत, तर चिकन-सूप, वडापाव, लडके है गलती हो जाती है, बनाएंगे मंदिर, गरिबी हटाएंगे.. या सगळ्या मुद्दय़ांमध्ये देशातील तरुण मतदाराचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दृष्टीने खरेच किती मुद्दे आहेत? मग देशातील तरुणांनी राजकारणाकडे चांगल्या नजरेने पाहण्याची अपेक्षा तरी का बाळगावी या नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी? तरुणांचा देश अशी आपली ओळख असतांना तरुणांच्या शिक्षण, रोजगार, नोकरी या प्रश्नांवर आजवर एकाही वेळी संसदेचे कामकाज बंद पडले नाही. ते बंद पडते विभाजन, आरक्षण, अनुदान अशा मतचलाऊ मुद्दय़ांसाठी, कारण सगळ्याच राजकीय पक्षांनी या बहुसंख्येने असलेल्या तुम्हा आम्हा तरुण मतदारांना गृहीत धरले आहे.
या निवडणुकीचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल की, ही निवडणूक प्रत्यक्ष मैदानात कमी आणि प्रसारमाध्यमे व सोशल साइट्सवर जास्त लढवली गेली. देशात प्रस्थापित राजकीय व्यवस्थेबद्दलची घुसमट या देशातील तरुणाईला सोशल साइट्सच्या माध्यमातून बिनधास्त व्यक्त करता येते आहे. तेव्हा या राजकीय पक्षांनी आता आपला मोर्चा तिकडे वळवला आहे आणि नाही म्हटले तरी या साइट्सवर ज्याचे वारे जास्त त्याच्याकडे आपण तरुण मतदार प्रभावित होण्याचा धोका जास्त आहे, पण या माध्यमातून जे आपल्या समोर येते आहे, जे सारखे आपल्यावर आदळले जाते आहे ते खरेच सत्य आहे का? त्याची शहानिशा करूनच आपण आपली मते बनवणे गरजेचे आहे, कारण या साइट्सवरील माहितीमुळे प्रभावित होऊन मत देणे हे आपल्या मताचे आणि आपलेसुद्धा ‘अवमूल्यन’च.
१६ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना सर्वच राजकीय पक्षांकडून ‘लाट आमचीच’ असे भासवण्याचे प्रयत्न झाले, पण सध्या एका जाहिरातीत ‘नो उल्लू बनाविंग’ असा मेसेज दिला गेला. मला वाटतं, तो जसा राजकीय नेत्यांसाठी तसाच आपल्यासाठी आहे ‘नो उल्लू बनिंग’!
आपल्या देशातील तरुणांसाठी या निवडणुकीतील अत्यंत आशादायी बाब म्हणजे या वेळी आपण देशातील एकूण मतदारांच्या अध्र्याहून अधिक आहोत. म्हणूनच हीच ती वेळ आहे. ‘अब की बार अपनी बारी’ प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला तरुणांची ताकद दाखवण्याची.. कारण.. ‘देशातील आकडेवारी सांगतेय मतदानाला उतरले तर.. तरुणच किंगमेकर!!!’ (साप्ताहिक ‘लोकप्रभा’च्या अत्यंत सूचक आणि बोलके मुखपृष्ठावरील हे शीर्षक).