23 January 2020

News Flash

बिनपायांचे!

दोनदा बेल वाजली तरी मी दरवाजा उघडला नाही. शेवटी बायको म्हणाली, ‘‘कोण आलंय बघा तरी.’’ पण घरमालकिणीनं बजावून सांगितलं होतं, ‘‘या एरियामध्ये थेफ्ट आणि डॅकॉयटीज् वाढल्या

| June 9, 2013 01:01 am

दोनदा बेल वाजली तरी मी दरवाजा उघडला नाही. शेवटी बायको म्हणाली, ‘‘कोण आलंय बघा तरी.’’
पण घरमालकिणीनं बजावून सांगितलं होतं, ‘‘या एरियामध्ये थेफ्ट आणि डॅकॉयटीज् वाढल्या आहेत. डोअर ओपन करूच नका.’’
तिसऱ्यांदा बेल वाजली तेव्हा मी कीहोलमधून पाहिलं. धडपणे काहीच दिसलं नाही. बायको करवादली, ‘‘चश्मा तर लावा.’’
मी चश्मा लावून बघितलं. ओ-एम-जी अशी अक्षरं दिसली. ती हलल्यावर समजलं की त्यामागे टीशर्ट होता. टीशर्टच्या आतल्या माणसाचा चेहरा कीहोलच्या वर गेला होता. तो चोर की दरोडेखोर हे समजेना. घरमालकीण म्हणाली होती, ‘‘टू-थ्री टाइम्स बेल िरग झाली तर आतून शाऊट करून ‘हूज धिस’ असं विचारा. थीफ असला तर हाउसमध्ये कोणीतरी आहे असं रिअलाइझ झालं की तो बॅकआउट होईल.’’
दरोडेखोर असला तर काय होतं या शंकेचं समाधान करून घेण्याचं धाडस झालं नाही. मी धीर करून विचारलं, ‘‘हूज धिस?’’   
 बायको गरजली,‘‘पुटपुटताय कशाला? जोरात ओरडून विचारा.’’
पण पुन्हा विचारायची गरजच पडली नाही. बायकोचा गगनभेदी आवाज तोवर दरवाजाबाहेर पडला होता. पलीकडून उत्तर आलं, ‘‘ओपन द डोअर. धिस इज टाऽऽम!’’
मी दरवाजा उघडला. समोर त्र्यंबक धांदरफळे उभा होता. तीस वर्षांपूर्वी तो भारत छोडो आंदोलनात सामील होऊन अमेरिकेत स्थायिक झाला होता. टॉम डॅडफॉल्स हे त्याचं अमेरिकन नाव. समोरच्याच बंगल्यात राहत होता. अमेरिकेत मराठी शेजार मिळणं म्हणजे कपिलाशष्ठीचा योग! पण कॅलिफोíनयातल्या सॅन होजेमध्ये तो हल्ली संकष्टी-एकादशीच्या आसपास असतो.
टॉम आत येत म्हणाला, ‘‘चहाची वेळ झाली.’’
 बायको सावधपणे म्हणाली, ‘‘आमचा मघाशीच झाला.’’
‘‘परत एकदा माझ्याबरोबर घ्या. कोपऱ्यावर स्टारबक्स आहे. चला.’’
चकटफू चहा प्यायला आम्ही बूट चढवून बाहेर पडलो. टॉमनं बायकोसाठी गाडीचा दरवाजा उघडून धरला. मी म्हटलं, ‘‘कोपऱ्यापर्यंतच जायचंय तर गाडी कशाला? चालत जाऊया की.’’
मी थेट चंद्रावर पायी पायी जाण्याची मोहीम काढल्यासारखं टॉम दचकला. आम्ही मुकाटय़ानं त्याच्या गाडीत बसून पोटातलं पाणी न हलवता कॉफी पिऊन आलो. रस्त्यात अनेक चारचाक्या दिसल्या. पण दोन पायांवर चालत जाणारा एकही माणूस दिसला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडवॉक नावाचे स्वच्छ फूटपाथ होते. फूटपाथवर फेरीवाले नव्हते. त्यामुळे त्यांचा वापर एकही अमेरिकन नागरिक करत नव्हता.
आपण अमेरिकेतल्या कोणत्याही उपनगरातल्या रस्त्यावर प्रकट झाल्यापासून चुकल्याचुकल्यासारखं वाटत राहतं. त्याची प्रमुख कारणं म्हणजे तीनपायी झुरळासारख्या इतस्तत: पळणाऱ्या ऑटोरिक्षा, आपल्याला बहिरं करण्याच्या ईष्रेनं लावलेले लाउडस्पीकर, निष्कारण भुंकणारे भटके कुत्रे आणि रस्त्यातून स्वत:च्या पायांवर चालणारा माणूस यांचा अभाव. न्यूयॉर्क आणि तत्सम महानगरांचा अपवाद सोडला तर चोवीस तासांचा कर्फ्यू लागल्यासारखे फूटपाथ रात्रंदिवस मोकळे असतात. जन्मजात आणि कर्मजात अमेरिकन उपनगरी रहिवासी मुख्य दरवाजातून घराबाहेर पडतच नाहीत. कीचनमधून थेट गॅरेजमध्ये उतरतात आणि गाडीत बसून रिमोट कंट्रोलनं गॅरेजचा दरवाजा उघडून रस्ता पकडतात.
इथल्या घरासमोरचा रस्ता उच्चवर्णीय असल्यामुळे पलीकडच्या दुकानात जायचं असलं तरी आधी दोन मल पुढे जाऊन एन्ट्री घ्यावी लागते आणि मग ईप्सितस्थानाच्या दोन मल पलीकडे नेमस्त केलेल्या एक्झिटवरून बाहेर पडावं लागतं. पण पाय नावाच्या कमरेखालच्या अवयवाचा वापर करून पाच मिनिटात रस्ता ओलांडण्याचा ऑप्शन उपलब्ध नसतो. हायवे काय, आपल्याही शहरात असतात की. पण आपण त्यांचे असे फाजील लाड नाही करत. आमच्यासोबत आमच्याकडची कुत्री-मांजरं आणि गायी-म्हशीसुद्धा आपला अमूल्य वेळ वाया न दवडता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे बिनधास्त ओलांडतात. पण इथं अमेरिकेत सरकार चालण्यावर बंदी घालतंय तर आपण बापडे काय करणार?
घरी बसून बसून माझं लोणचं व्हायला लागलं. पचनसंस्था बेमुदत संपावर जाण्याची धमकी द्यायला लागली. आता तासभर तरी रपेट मारलीच पाहिजे, हे जेव्हा जाणवलं तेव्हा मी तिरीमिरीत घराबाहेर पडलो. चार पावलं टाकल्यावर तितक्याच तातडीनं परतलो. बाहेर माझ्या दृष्टीनं मरणाची थंडी आणि झोंबरा वारा यांचं संयुक्त धुमशान रंगात आलं होतं. मी शर्टावर जाड स्वेटर चढवला. त्यावर गुबगुबीत पायघोळ ओव्हरकोट, डोक्यावर माकडटोपी, हातात ग्लोव्ह्ज्, गळ्याभोवती मफलर, ऊन पडलंच तर त्रास नको म्हणून डोळ्यांवर काळा चष्मा आणि पाऊस पडलाच तर जवळ असावी म्हणून फुल साइझची दणकट छत्री असा जामानिमा केला आणि फिरून येतो असं बायकोला सांगायला गेलो. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि ती भीतीनं पांढरीफटक पडली. ततपप करायला लागली. तोंडातून शब्द फुटेना. काय झालं ते मला कळेना. मी नजर वर केली तर समोरच्या आरशात माझं प्रतििबब पाहून माझ्याही काळजाचा ठोका चुकला. त्या अवतारात मी चोर, डाकू, डिटेक्टिव्ह, करुणानिधी आणि गंगाधर टिपरे यांपकी कोणत्याही भूमिकेत खपून गेलो असतो. मी वस्तुत: मीच आहे ही बायकोची खात्री पटल्यावर बाहेर पडलो.
फुटपाथवर अर्थातच चिटपाखरूही नव्हतं. काही वेळानं अमेरिकन ट्रिपल एक्स एल साइझचा गलेलठ्ठ श्वानराज दिसला. सवयीनुसार मी घाबरलो. श्वानराजांच्या मागे साखळी दिसली. मी हुश्श केलं. साखळीमागे एक महिला दिसली. कुत्र्यासारखीच तिलाही थंडी वाजत नसावी. कारण जीन्स आणि टीशर्ट या कपडय़ांवर ती सुखी दिसत होती. तिनं विचारलं, ‘‘सìचग फाऽर युवर डाऽग? लाऽस्ट हिम?’’
तात्पर्य, कुत्र्याला फिरवून आणायचं नसेल तर हे शहाण्या गृहस्था, तू पायी का फिरतोयस?
तितक्यात कुत्र्यानं माझ्याकडे पाहिलं. मी चरकलो. इतकी केविलवाणी नजर कुत्र्याच्या जातीला शोभत नाही. माणसंच का, जनावरंही नजरेची भाषा बोलतात की. श्वानराज कैफियत सांगत होता, ‘‘कहर झालाय. रस्त्यावर भुंकायला बंदी आहे. इतके खांब आहेत, पण पाय वर करण्याची परवानगी नाही. कालपासून पोटात गुरगुरतंय, पण मालकिणीनं पिशवी धरल्याशिवाय पोट साफ करता येत नाही. कारमध्ये बसून मलोन् मल फिरवून आणतात. पण स्वत: चालत नाहीत आणि मलाही चालायला घेऊन जात नाहीत. आता मीसुद्धा तुमच्या कुत्र्यासारखा पळून जाणार एक दिवस.’’
डार्वनिच्या सिद्धांतानुसार पिढय़ान् पिढय़ा वापर न केलेले अवयव लुप्त होतात. माणसाची शेपटी अशीच कधीतरी गळली. ‘‘हॅलो अमेरिका, आता पाळी कोणत्या अवयवाची? ’’ 

First Published on June 9, 2013 1:01 am

Web Title: americans travel by car
Next Stories
1 वानप्रस्थ
2 मेरा भारत..
3 भ्रमगाथा
Just Now!
X