News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘बनके पंछी गाये प्यार का तराना..’

१९५९ साली आलेला हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित, राज कपूर, नूतन, मोतीलाल, शुभा खोटे आणि ललिता पवार यांच्या लखलखत्या अभिनयानं उजळून निघालेला ‘अनाडी’!

अफसाना लिख रही हूँ.. : ‘बनके पंछी गाये प्यार का तराना..’
राज कपूर आणि नूतन

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

या जगात शहाणे कोण? मूर्ख कोण? व्यवहारी नसणाऱ्या माणसाची या जगानं कायम ‘अडाणी’ म्हणूनच संभावना केलीय. पण अतिव्यवहारी, प्रत्येक गोष्टीत फायदा-नुकसान बघणारा माणूस पायाखाली येणाऱ्या कीटकाला बघून थबकेल का? हळूच त्याला पानावर अलगद घेऊन नवीन आयुष्य बहाल करेल का? त्या निष्पाप जीवाच्याही निरागस भावना जपणारा, त्या चुरगळू न देणारा, स्वत: निष्कांचन असताना पैशाचं भरलेलं पाकीट मालकाला परत नेऊन देण्यासाठी आटापिटा करणारा माणूस जगाच्या दृष्टीने ‘अनाडी’च! अशा ‘अनाडी’ व्यक्तीचं प्रेम, संघर्ष, कोरडय़ा धंदेवाईक दुनियेत होणारी फरफट.. आणि त्याच दुनियेत मिळणारे निरपेक्ष प्रेमाचे झरे व भावनिक उलथापालथ यांचं प्रत्ययकारी चित्रण करणारा, १९५९ साली आलेला हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित, राज कपूर, नूतन, मोतीलाल, शुभा खोटे आणि ललिता पवार यांच्या लखलखत्या अभिनयानं उजळून निघालेला ‘अनाडी’! शंकर-जयकिशन यांच्या सर्वोत्कृष्ट संगीतापैकी एक मानावं असं याचं संगीत होतं. ‘एसजे’ आपल्या सर्व ताकदीनिशी चित्रपटाच्या कथेत गुंतलेले दिसतात. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांच्या गाण्यांची संवादांशी असलेली सांगड, सबेस्टियन-दत्ताराम यांनी अतिशय विचारपूर्वक केलेलं वाद्यमेळ संयोजन यामुळे ही गाणी इतकी जबरदस्त प्रभावी ठरली की ‘अनाडी’चा विचारच काय, त्याचा उल्लेखसुद्धा त्या गाण्यांशिवाय आपण करू शकत नाही. या सिनेमात संगीत विरघळूनच आलं. ही गाणी त्या व्यक्तिरेखांच्या मनाचा प्रत्येक कल्लोळ आपल्याला दाखवून गेली. या कवींनी संवेदनशीलतेची कमाल करत, लेखणी त्या अलवार भावनेत भिजवूनच ही गाणी लिहिली. अत्यंत वेगळं म्हणावं असं त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे ही गाणी चित्रपटात ‘अचानक’ सुरू होत नाहीत. त्याला एक संगती आहे. संवादांची पाश्र्वभूमी व विचारांची सुसंगत साखळी आपल्याला अलगद गाण्यांमध्ये घेऊन जाते. याला कारण हृषिदांचं दिग्दर्शन आणि गाणी यांच्यात जगण्यातल्या साधेपणाचा एक नैसर्गिक धागा आहे.

‘राजकुमार’ हे राजस नाव धारण करणारा, परंतु कफल्लक अवस्थेत राहणारा जीव (राज कपूर), त्याच्यावर पोटच्या पोरागत वेडी माया करणारी मिसेस डिसा (ललिता पवार) आणि श्रीमंत घरातली, पण या वेडय़ाच्या नितळ मनाच्या प्रेमात पडलेली आरती (नूतन), आरतीची सखी आशा (शुभा खोटे), ‘धंदे में फायदा’ बघणारे पक्के  व्यावसायिक चाचाजी (मोतीलाल) यांच्यात घडणारी ही कथा म्हटलं तर एक प्रेमक हाणी, म्हटलं तर मूल्यांचा कस बघणारी एक कसोटी! सदसद्विवेकबुद्धी आणि रूक्ष व्यवहार यांचा झगडा.. अन् धर्माच्या पलीकडे जाणारं गहिरं नातं सांगणारी गोष्ट! किती कोनांतून पाहावा ‘अनाडी’? प्रत्येक कोनातून सोनं हे झळाळतानाच दिसतं. आणि मानवी प्रवृत्ती बदलत नाहीत. ‘अनाडी’मध्ये दाखवलेली ‘फ्लू’च्या साथीचा धंद्यासाठी उपयोग करतानाची प्रवृत्ती आजच्या कोविडकाळातही दिसते. काही संदर्भ असे कालातीतच असतात!

मिसेस डिसाकडे भाडेकरू म्हणून राहणारा, हौस म्हणून पेंटिंगही करणारा बेकार तरुण राजकुमार नोकरीच्या शोधात आहे. अति प्रामाणिक आणि छक्के पंजे माहीत नसलेला! योगायोगानं त्याची गाठ आरतीशी पडते. श्रीमंताच्या पोरीबाळींना ग्रूमिंग करणाऱ्या क्लासमधून पळून जाणारी आरती- आपणसुद्धा श्रीमंत मुलीची ‘मैत्रीण कम् नोकर’आहोत अशी बतावणी करते. दरम्यान, नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवल्याचं बक्षीस म्हणून राजकुमारला हाकलून देण्यात येतं. निराश राजकुमार सगळं सोडून निघून जायचा प्रयत्न करतो, पण जिवाचा आटापिटा करून मिसेस डिसा त्याला थांबवते. वरकरणी भाडय़ाचा तगादा लावताना एकीकडे त्याची पेंटिंग्ज विकल्याचं खोटं सांगत त्याला पैसे देते. कुठंतरी तिला स्वत:चा दिवंगत पुत्र डेव्हिड त्याच्यात दिसत असतो. पेंटिंगसाठी सायकल घेऊन निसर्गसौंदर्य न्याहाळत जाणारा राजकुमार आणि मैत्रिणींचा घोळका घेऊन सायकलवरून पिकनिकला जाणारी आरती यांची भेट ‘अपघातानं’च होते.

‘बनके पंछी गाये प्यार का तराना’

(हसरत जयपुरी, लता, कोरस)

मस्त मोकळी हवा. सायकलवरून निघालेलं ते यौवन. हसरे, टवटवीत चेहरे. डोळ्यांत कमालीची चमक. दोन्ही हात पसरून आयुष्याला ‘ये’ म्हणत कवेत घेण्याचा हा विलक्षण उत्फुल्ल आविष्कार.. अशा सफरीत एक मस्ताना ‘साथी’ हवा फक्त. मग काय, सगळं जग आमच्याबरोबर आमच्या धुंदीत डोलायला लागेल. ‘सिच्युएशनल गाणं’ बनवण्यात ‘एस. जे.’ हे ‘बाप’ का होते हे अनेक गाण्यांत सिद्ध झालंय. त्यातलंच हे एक गाणं. या गाण्याचा सगळा वेग, आवेग, मस्ती, रोमान्स त्या सुरावटीत तर आहेच, पण वाद्यमेळातही ठासून भरलाय. उंच स्वरातला मुखडा आधी पकड घेतो. ‘मिल जाये अगर आज कोई’ म्हणताना ‘जाये’ आणि ‘आज’वर लताबाई किंचित जोर देतात. काय मस्त वजन आहे त्यात. आणि तो जोर कोरसनेसुद्धा सही सही उचललाय. कमाल आहे या टय़ुनिंगची! गाण्यात सायकलच्या घंटीसारख्या साऊंडलासुद्धा स्थान आहे. आणि कहर डौलदार वाजलेला ढोलकचा ठेका. उंच आवाजातला तो चर्च कॉयर.. अकॉर्डियन. किती सजवावं ते गाणं! नूतनच्या चेहऱ्यावर गाण्याची लय दिसते. तिचे डोळे काय, पापण्यासुद्धा लयीत आहेत. किती गोड हसावं तिनं डोळ्यांतून! आणि हे तारुण्य मस्त स्वच्छंदी वाटतं, पण ‘स्वैर’ वाटत नाही. ही किमया या चेहऱ्याची.. या गाण्याची!

या निष्कांचन मनुष्याबद्दल काहीतरी तिच्या मनात दाटून येतं. त्याला काम मिळावं, पैसे मिळावेत म्हणून ‘मालकिणी’चं पोट्र्रेट काढायला त्याला आरती घरी बोलावते काय, तो येतो काय आणि त्या सुप्रभाती चेहऱ्यावर निरागस, कोवळा ताजेपणा आणि जुईच्या पाकळीची मुलायम नजाकत घेऊन आरती त्याच्या समोर उभी राहते काय! अवाक् होऊन राजकुमार या शिल्पाकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहतो. खूप र्वष अशीच होती मनात एक मूर्ती. एक तस्वीर. लांबसडक केस. त्यात पाण्याचे थेंब दंवबिंदू बनून अडकलेले. डोळ्यांत सागराची अथांगता. जिच्या हास्यात जीवन आणि मृत्यू- दोन्हीचा सत्कार आहे, सार्थक आहे! या क्षणी नूतनमध्ये सौंदर्य आणि मांगल्य या दोन्हीचं एक दिव्य अस्तित्व दिसतं. काहीतरी झंकारून जातं दोघांमध्ये! नंतर एक कलाटणी देणारा क्षण येतो. आयुष्यात प्रथमच हजाराची नोट बघणारा राजकुमार- तीच नोट तिच्या ‘आईच्या उपचारासाठी’ तिलाच परत देऊन जातो तेव्हा आरतीला एक ‘दर्शन’ घडतं.. लखलखीत सोन्यासारख्या हृदयाचं दर्शन! अतोनात कारुण्याचं, एका सहअनुभूतीचं दर्शन असतं ते. ती अंतर्बाह्य़ थरारते. राजला झालेलं दिव्य, पवित्र लावण्याचं दर्शन आणि आरतीला झालेलं हे माणुसकीचं दर्शन. ‘अहसान तो अमीर आदमी करते है। हम गरीब तो सिर्फ एक दूसरे की मदद कर सकते है।’ असं म्हणणारा राजकुमार आणि थक्क होऊन त्याच्याकडे पाहणारी आरती! आर्थिक गरिबी माणसाला आतून श्रीमंत बनवते का? तिच्या त्या झगमगत्या दुनियेत असा माणूसच तिला दिसलेला नाही. त्याक्षणी आत काहीतरी कल्लोळ उठतो.. हा माणूस वेगळा आहे. कुणाच्या तरी दु:खाचं ओझं स्वत:च्या खांद्यावर घेणारा आहे. कुणाच्या तरी हास्यावर जीव ओवाळून टाकणारा, जीव तोडून प्रेम करणारा आहे. यालाच समजलाय आयुष्याचा अर्थ!

‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’

(शैलेंद्र, मुकेश)

हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण.. तो कल्लोळ त्या उसळून येणाऱ्या व्हायोलिन्सनी नेमका झेललाय. या दाटून आलेल्या ऊर्मी, एक अनिर्वचनीय आनंद राजकुमारच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. ‘देण्या’तला, त्यागातला आनंद आहे हा! हा आनंद त्या प्राजक्तफुलाला भेटल्याचाही आहे. त्याग आणि अनुराग यांचा मिलाफ आहे हा आनंद म्हणजे! याची किंमतच करता येणार नाही.

का एवढा मोठा इंट्रो पीस बनवला असावा ‘एस. जे.’नी? केवढी कथा त्यात साकार झाली.. रस्त्यावरची दृश्यं त्यात सामावली! हे इतकं अद्वैत क्वचितच बघायला मिळतं. अशा वेळी संगीतकार, अरेंजर, चित्रपट दिग्दर्शक हे वेगळे कलाकार उरत नाहीत. कॅमेरामन नावाचा कलाकार दृश्याच्या ‘बाहेर’चा नसतो. हे सगळे घटक असे समरसून जातात, एकमेकांना पूरक ठरतात! अशा जबरदस्त फ्रेजेसचे ताणेबाणे विणत हा इंट्रो एका पॉइंटला येऊन थबकतो. या पॉजनं काय नेमकं साध्य झालं? आपल्या वेगवान, भरगच्च सुखानं ओसंडून वाहणाऱ्या आयुष्यात तुम्हाला एखादा दुर्दैवी जीव आढळला तर स्वत:च्या नादात त्याला लाथाडून पुढं जाऊ नका.. हे सांगण्यासाठी तो पॉज आहे. त्या वादळी व्हायोलिन्सनंतर शांतपणे येणारा मेंडोलीनचा पीस जणू ‘सबूर!’ असं म्हणत येतो. आपल्याच आनंदात बागडत जाताना अचानक राजकुमार पायाखाली आलेल्या एक जीवाला त्याचा जगण्याचा अधिकार मान्य करत आदरपूर्वक हलकेच पानावर घेऊन गवतावर सोडतो. शंभर संवाद देऊन झालं नसतं असं काम हे एक दृश्य करतं. मुकेशचा आवाज किती साधा, कसलंही कृत्रिम मॉडय़ुलेशन नसणारा आहे. ‘रिश्ता दिल से दिल के इतबार का’मध्ये ‘का’ अक्षरावर किंचित आवाज फाटतो, पण तोच कानाला निरागस वाटतो. ‘किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार’मधला ‘प्यार’वरचा कोमल धैवत डोळ्यांत पाणी आणतो आणि ‘जिना इसी का नाम है..’ ही cromatic म्हणजे कोमल, शुद्ध धैवत आणि कोमल निषाद यांची किमया.

शैलेंद्र किती सहज लिहून गेलाय.. ‘मिटे जो प्यार के लिये वो जिंदगी!’ आपल्या मृत्यूनंतर आपली कुणाला तरी हळवी सय येईल, काळीज दुखेल, डोळ्यापुढं धुकं धुकं होईल. मग त्याच्या आसवांमध्ये आपण हसरा आनंद घेऊन येऊ. यालाच ‘जगणं’ म्हणावं! नाहीतर जन्माला आल्यापासून श्वास घेत राहिलेले, मेले नाहीत म्हणून जिवंत असलेलेच कितीतरी महाभाग असतातच की!

‘आपत्काली अन् दीनांवर घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो!’ हेच सांगितलं की जीव तोडून बोरकरांनीही!

दरम्यान, एका प्रसंगी आरतीच्या चाचाजींचं पैशानं भरलेलं पाकीट राजकुमारला सापडतं. गुंडांशी सामना करत ते तो चाचाजींना परत करतो. बहुतांश वेळा लबाडीनं पैसा कमावलेल्या सभोवतालच्या जनतेच्या तुलनेत राजकुमारचा प्रामाणिकपणा बघून चाचाजी स्तिमित होतात. असा माणूस गमावता कामा नये या हेतूनं त्याला आपल्या कंपनीत कामाला ठेवतात. धूर्त मंडळींना प्रामाणिक माणसं पदरी ठेवावी लागावीत, हाही नियतीचा एक अजब न्यायच!

पेंटिंग करण्यासाठी राजकुमार रोज आरतीच्या घरी जातोय; पण आपले मालक हेच चाचाजी- हे त्याला आरती कळू देत नाही. दोघांच्या मनात ‘काहीतरी’ आहे. आरती त्याला त्या रोमॅंटिक वातावरणात नेण्याचा प्रयत्न करतेय; पण या भोळ्या मनुष्याच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही. ‘मुझे बालों में फूल लगाना पसंद है’ असं सुचवूनही हा मात्र सभ्यतेचा पुतळाच! मग त्याला ‘अनाडी’ नाही तर आणखी काय म्हणावं? आणि ते इतकं गोड, की त्यानं तिच्याकडून ते पुन:पुन्हा म्हणवून घ्यावं?

‘वो चांद खिला वो तारें हसीं..’

(हसरत जयपुरी, लता मंगेशकर )

ती रात्र मंतरलेली. सुखद गारवा. आसपास फुलांचा दरवळ. चंद्र, तारे सगळे एकच गोष्ट सुचवतायत. पण याला नेमकी तीच समजू नये!

‘समझनेवाले समझ गये है, ना समझे वो अनाडी है!’ असं म्हणावंच लागतं मग!

या गाण्यात चंद्र, तारे, रात्र, प्रेम याभोवतीच शब्द फिरतात, पण त्याला काय विलक्षण नाद आहे.. प्रास आहे.

‘बाजे दिल के तार, गाये ये बहार, उभरे है प्यार’  किंवा ‘तारों का जाल, ले ले दिल निकाल.. पूछो न हाल!’

हसरतजी भाषेला अक्षरश: डोलवतात.. ढोलकचा दत्ताराम ठेका आणि जबरदस्त नाचरी बासरी. गाण्याला एक कमालीचा आकर्षकपणा आणि चुस्तपणा बहाल करणारं ते अकॉर्डियन. आणि सगळ्यातून उठून येणारा लताबाईंचा टिपेचा स्वर! ‘चुनरिया तानी’ म्हणताना सफेद चारचा निषाद.. किती सूक्ष्म श्रुती लागलीय ती. नूतनच्या चेहऱ्यावर एक अनिर्वचनीय आनंद ओसंडून वाहतोय. संपूच नये ही चांदणी रात्र! या गाण्यात रातराणीच स्वर शिंपीत येते की काय असं वाटून जातं मला नेहमी. स्वर-स्पर्श-गंधजाणिवा एक होतात इथं! ‘तारों का जाल’पासून एका श्वासात लताबाई संपूर्ण ओळ गातात. ‘मेरे दिल का’ म्हणताना आवाजाला दिलेला हेलकावा, त्याच वेळी नूतनचा मुद्राभिनय लाजवाब. आणि ढोलकसुद्धा ती आस न सोडणारा.. काय केमिस्ट्री म्हणावी ही! ‘तारों का जाल’पासून खाली येताना ढोलकच्या अतिसूक्ष्म लयीत लताबाईंचा आवाज विरघळतो. डोळे बंद करून या सूरतालाचं अद्वैत अनुभवता आलं तर स्वत:च्या भाग्याचा हेवा करावा. अंतऱ्याच्या शेवटच्या ओळीनंतर ब्रेक घेऊन फक्त अकॉर्डियनचा झकास पीस टाकण्याची ‘एसजे शैली’ इथे दिसते. (आठवा : ‘प्यार हुआ इकरार हुआ’) राज कपूरच्या निळ्या डोळ्यांतली निरागसता, त्याचा भोळेपणा, देहबोली हे अद्भुत रसायन आहे. प्रणयाची ही जातकुळीच वेगळी. या प्रसंगाचा पोतच निराळा!

राजकुमार आणि आरती यांच्या प्रेमाची परीक्षा बघणारे प्रसंग, ‘दिल की नजर से’, ‘सब कुछ सिखा हमने’ आणि मुकुटमणी असलेलं ‘तेरा जाना’ या गाण्यांबद्दल उत्तरार्धात.. (पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 4:37 am

Web Title: anari movie songs music shankar jaikishan staring raj kapoor nutan afsana likh rahi hun dd70
Next Stories
1 इतिहास संशोधनात बुडालेला विद्वान
2 हिंदू’ ही संकल्पना संकुचित करू पाहणारे चुकतायत..
3 हास्य आणि भाष्य : (व्यंग)चित्रपट दिग्दर्शक
Just Now!
X