‘स्त्रियांना सहनशीलतेची देणगी जन्मापासूनच मिळालेली असते’ किंवा ‘बाई म्हणजेच सहनशीलता’ (समाजाने बाईच्या मनावर कोरलेलं हे समीकरण) अशी समाजमनाला उगाचच सुखावून जाणारी विधाने आपल्या कानावर अनेकदा पडतात. ती ऐकायला वा म्हणायला फारच सोपी असली तरी प्रत्यक्ष ज्या स्त्रियांना या सहनशीलतेच्या दिव्यातून जावं लागतं, त्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन विषण्ण होऊन जातं. त्या बायकांना ‘बाई, हे तू का आणि कसं सहन केलंस?’ असा प्रश्न विचारावासा वाटतो. सुनीता शिंदे यांचं ‘पुस्तक उघडलं’ हे आत्मकथन वाचून त्यांनाही नेमका हाच प्रश्न विचारावासा वाटतो.
‘पुस्तक उघडलं’ हे पुस्तक म्हणजे श्िंादीणीची शिंदेबाई कशी झाली, याची कहाणी. कोकणातील कसाल या गावी सुनीता शिंदे यांचं घर. घरची परिस्थिती फारशी बरी नाही. त्यांच्या आईच्या वडिलांची शेती वाटय़ाला आलेली. त्यामुळे किमान खाण्यापिण्याचे तरी हाल नव्हते. वडील मुंंबईत नोकरीला. पण त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर घर चालेल अशी आशा करणंही फोलच. त्यामुळे आईच्या कष्टांवरच भिस्त.
शिंदेबाईंचं शिक्षण किती? तर फक्त सहावी! मनात शिक्षणाची आस; परंतु शिक्षण घ्यावं अशी आर्थिक परिस्थिती नाही. तथापि जेवढं शिक्षण घेतलं त्याच्या गोड आठवणी त्यांच्या मनात कायम वसलेल्या. कदाचित शिक्षण व शाळा यांच्याबद्दलचा त्यांच्या मनातला जिव्हाळाच त्यास कारण असावा. या पुस्तकात शाळा, शिक्षण यांच्या सुखद आठवणी येतात आणि त्यातून बाईंची शिक्षणाची ओढ लक्षात येते.  
या पुस्तकात सुनीताताईंच्या आयुष्यावर सखोल परिणाम करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात; ज्यांनी त्यांच्या आयुष्यावर बरा-वाईट असा खोलवर परिणाम केला. त्यातही ठळकपणे उभ्या राहतात त्या त्यांची आई आणि विपुला कादरी या दोन स्त्रिया. या दोघींनी कळत-नकळत सुनीताताईंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवलेला जाणवतो.
सुनीताताईंच्या आईचे वर्णन वाचताना ठळकपणे जाणवते की, त्यांच्यामध्ये जीवनातील समस्यांशी सतत झगडण्याची वृत्ती आली असावी ती त्यांच्या या आईकडूनच! हा अत्यंत मोलाचा वारसा त्यांना आईकडून मिळालेला. पुस्तकातील विविध प्रसंगांतून हा वारसा अधोरेखित होतो. सुनीताताईंच्या आईला वडिलांकडून मिळालेली शेती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आईच्या चुलतभावांकडून दिला गेलेला अतोनात त्रास, कोर्टकचेऱ्या या सगळ्याला त्यांच्या आईने समर्थपणे तोंड दिले. ती कधीही हातावर हात धरून बसली नाही. उलट, त्यांच्या हल्ल्यावरचा तिचा प्रतिहल्ला अधिक जोरकस असे. ही वर्णनं वाचताना त्यांच्या आईच्या जिद्दीला सलाम ठोकावासा वाटतो. आईचा खमकेपणा हा सुनीताताईंमध्ये पुरेपूर उतरला होता. म्हणूनच त्या आयुष्याच्या काटेरी रस्त्यावरून तितक्याच हिमतीने वाट काढू शकल्या. त्यांचा हा प्रवास क्लेशदायी असला तरीही आईची माया ही जमेची बाजू होती.
सुनीताताईंचं शिंदेंशी झालेलं लग्न म्हणजे आगीतून फुफाटय़ात अशीच स्थिती! शिंदेंचं दारू पिणं आणि मटका लावणं, सासूचा सासुरवास अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. संसार चालवताना नवऱ्याच्या पशाची आशा करणं चुकीचंच होतं. त्यातही शिंदेंच्या घराण्यात बायकांनी बाहेर नोकरी करण्यास मना होती. पदरी दोन मुलं. त्यात पुढे शिंदेंना झालेला कुष्ठरोग आणि सहन करावी लागणारी त्यांची मुजोरी.. अशा अनेक दिव्यांतून जाताना सुनीताताईंना करावी लागलेली तारेवरची कसरत, त्यातून त्यांनी काढलेले मार्ग आणि सारं बळ एकवटून उभ्या राहिलेल्या सुनीताताईंचा हा जीवनप्रवास मनाला हेलावून टाकणारा आहे. ‘शिंदीणी’च्या ‘शिंदेबाई’पर्यंतच्या प्रवासाला निमित्त ठरल्या त्या विपुला कादरी या सामाजिक कार्यकर्त्यां. त्यांचं ऋण सुनीताताई आत्मीयतेनं मान्य करतात. विपुल कादरी यांच्या ‘प्राइड इंडिया’ या सामाजिक संस्थेतून सुनीताताईंच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या संस्थेच्या अपंगांसाठीच्या विद्यालयात त्यांनी ‘शिकाऊ शिक्षिका’ म्हणून नोकरीस सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे मूकबधिर मुलांसाठीच्या शाळेत शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण.. बालवाडी शिक्षिका अशा पायऱ्या चढताना झोपडपट्टी हेच त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र राहिलं आणि ते त्यांनी आपल्या अदम्य कार्यकुशलतेनं चांगलंच विस्तारलं. गरिबीत पिचणाऱ्या स्त्रियांना आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी एका ओळखीच्या बाईंच्या मदतीने ‘सुसंगती’ नावाची संस्था सुरू केली. या संस्थेंतर्गत बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण देणं, पापड व उदबत्त्या बनवणं, कपडे शिवणं असे उद्योग सुरू केले. हे करतानाही त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी कोणतीही कुरकुर केली नाही. त्या आपलं काम करत राहिल्या. पुढे ‘प्राइड इंडिया’चाच विस्तार असलेल्या ‘सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया’ या संस्थेत त्यांनी आपलं सर्वस्व झोकून दिलं. या संस्थेच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच या संस्थेच्या महत्त्वाच्या अधिकारीपदापर्यंत त्या पोहोचल्या.
संस्थेतील साधी कार्यकर्ती ते अधिकारी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्या ज्या भागात राहत होत्या तेथील वातावरण त्यांच्या कार्यास पोषक नव्हतं. उलट, अनेकांनी पाय ओढण्याचाच प्रयत्न केला. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. परंतु  सुनीताताईंनी या सर्व संकटांना समर्थपणे तोंड दिलं. दुसरीकडे नवऱ्याचा छळ सुरू होताच. तो सहन करीत त्यांनी दोन मुलांचं समर्थपणे पालनपोषण केलं. सुनीताताईंच्या आयुष्यातील हा घटनाक्रम वाचताना त्यांच्यातली जिद्दी बाई प्रकर्षांने जाणवते. कटुतेनं भरलेलं आयुष्य पुढय़ात वाढून ठेवलं असतानाही चेहऱ्यावर सदैव हास्य ठेवून आपल्यासारख्याच पीडित बायकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं. मुळातलंच त्यांचं प्रेमळ आणि कनवाळू व्यक्तिमत्त्व त्यांच्या या कामांत आणि उद्योगांत पूरक ठरलं. दुसऱ्याला मदत करणं आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणं, ही त्यांची वृत्ती सामाजिक कार्यात उपयुक्त ठरली.
या पुस्तकात आक्का, विठ्ठल, दाजी अशा अनेक व्यक्ती डोकावतात. माहेरच्या घराशेजारच्या आक्काचं वर्णन म्हणजे तोंडाने फटकळ, शिवराळ; परंतु मन  मात्र मायेनं भरलेलं. आक्काच्या या प्रेमळ वृत्तीचे संस्कार कळत-नकळत सुनीताताईंवर झालेले दिसतात. त्यांचा भाचा विठ्ठल आणि दीर दाजी यांच्या भल्याबुऱ्या आठवणीही या पुस्तकात आहेत. सुनीताताईंना मदत करणाऱ्या माणसांविषयी लिहिताना त्या कधी कधी भावुकही होताना दिसतात. सामाजिक काम करताना त्यांच्या कामात अडथळा आणणारी माणसं, तसंच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती यांच्याबद्दलचं मनमोकळं विश्लेषणही यात आलंय. काहीही हातचं राखून न ठेवता प्रांजळपणे आपला जीवनानुभव त्यांनी मांडला आहे. ‘पुस्तक उघडलं’ हे पुस्तक म्हणजे सुनीताताईंच्या बुडण्याच्या नि तरण्याच्या अनुभवांची बांधलेली एक सुंदर मोट आहे.
पुस्तकात अधुनमधून सुनीताताईंची बोलीभाषा- मालवणी डोकावते. सुनीताताईंचं मनोगत अधिक प्रवाही आणि प्रभावी करण्यास ही भाषा मोलाची ठरलीय. त्याने प्रसंग अधिक जिवंत होण्यास मदत झालीय. सुमेध वडावाला यांचं ओघवतं शब्दांकन वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलं आहे.
‘पुस्तक उघडलं’ – सुनीता शिंदे, नवता प्रकाशन, मुंबई, पृष्ठे- ३३४, मूल्य- ३०० रुपये.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!