हिंदीतील ज्येष्ठ कवी विनोदकुमार शुक्ल यांच्या ‘अतिरिक्त नहीं’ या काव्यसंग्रहाचा ‘जास्तीचे नाही’ हा मराठी अनुवाद प्रफुल्ल शिलेदार यांनी केला आहे. त्याचे प्रकाशन  ४ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे. ‘पॉप्युलर’ प्रकाशित या संग्रहाला प्रसिद्ध कवी विष्णू खरे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना..
गेल्या चार दशकांपासून कवितालेखन करत असलेले आणि आयुष्याच्या ज्या टप्प्यावर इतर कवी-लेखक आपल्या पूर्वपुण्याईवर चरितार्थ करताना आढळतात, अशा टप्प्यावर आलेले विनोदकुमार शुक्ल त्यांच्या सर्जनशीलतेने आपल्याला या संग्रहातूनदेखील अवाक आणि चकित करतात. त्यांच्यावर भाषिक खेळ, चमत्कृती, वक्रोक्ती, उपरोध, काव्यशिल्पाचा अतिरेक किंवा कलावादी असण्याचा आरोप करणाऱ्या काही लोकांनी जरा या संग्रहातल्या ‘हताश होऊन एक माणूस बसला होता’ व ‘आणि’ या कविता पाहाव्यात. त्यात कवीचे सगळे आग्रह तर पूर्ण झालेले दिसतातच, शिवाय भारतीय समाज आणि मानवजातीबद्दलची त्यांची संपूर्ण सहानुभूती, करुणा आणि बांधीलकीदेखील नि:संदिग्धपणे दिसून येते. कोणता माणूस आहे हे कळणे महत्त्वाचे नसून त्याचे हताश होणे आणि त्याच्यासोबत चालणे या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे फक्त विनोदकुमारच म्हणू शकतात. हा कवी वास्तव कोमल करत जातो असे म्हणणाऱ्यांनी पाहावे की त्याचे कान रेशन घेण्याकरता रांगेत उभ्या असलेल्या लोकांना दुकानदाराने दिलेल्या आईबहिणीवरच्या शिव्या ऐकू शकतात. त्याच शिवीतून जन्मलेला आणि पुढे मोच्रेकऱ्यांना नेमकी तीच शिवी हासडणारा मुलगादेखील त्यांच्या दृष्टीस पडतो.
‘शिवाय’, ‘आणि’, ‘फक्त’, ‘जरी’, ‘की’, ‘जेणेकरून’, ‘तशी’, ‘त्यानुसार’, ‘व्यतिरिक्त’, ‘जास्तीचे’ यांसारख्या साध्या, गंभीर परंतु काव्यात्मक शब्दप्रयोगांनी विनोदकुमार आमच्या आयुष्यातील सगळ्या विसंगतींना, हास्यास्पद गोष्टींना, शुद्ध हसण्याला आणि मानवी जीवनातील मार्मिक प्रसंगांना रघुवीर सहाय यांच्या परंपरेत (जे ‘बाजारातून घेतलेले आहे’मध्ये दिसून येते) शोभणाऱ्या जटिल व्यूहात ठेवतात. विनोदकुमार हे शमशेर बहादूर सिंह यांच्यासोबतचे िहदीतील सर्वात मोठे प्रयोगशील कवी आहेत हे विसरता कामा नये, किंबहुना फक्त त्यांनीच प्रयोगशीलता आणि प्रतिबद्धता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत हे वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कुणी खालील ओळी लिहू शकेल काय?
सगळ्यांच्या वाटय़ाला येणारी हवा एकसारखी हवा नाही.
आपल्या हिश्शाच्या भुकेसोबत सगळ्यांना नाही मिळत
आपल्या हिश्शाचा सगळा भात
….
सगळ्यांच्या घडय़ाळात दिसणारी वेळ
सगळ्यांच्या हिश्शाची वेळ नव्हे
या वेळी किंवा थोडय़ाशा भविष्यकाळातून खूप सारे गतकाळ गोळा करतो तरीही खूप सारा भविष्यकाळ उरतोच तशातच ईश्वर आहे की नाही या साशंकतेने म्हणतो – मला भला माणूस बनव सगळ्यांना आनंदात ठेव.
जगण्यातील आणि कविकर्मातील प्रश्नांना आणि जबाबदाऱ्यांना स्वीकारून एकाच वेळी सूक्ष्म आणि विराट, व्यष्टिसन्मुख आणि समष्टिसन्मुख, स्थानिक आणि वैश्विक, भौतिक आणि अधिभौतिक असणारे विनोदकुमार हे िहदीतले कदाचित सर्वाधिक जागरूक, निर्भीड आणि धीट कवी असल्याचे दिसून येते. आपल्याबद्दल काय बोलले जाईल याची त्यांना काळजी नाही. मी अंतर्मुख होऊन कवितेत स्वत:ला एक वाक्य देतो चल नीघ. या वाक्यात बाहेर घालायचे विसरून जातो त्यामुळे स्वत:च्या आत दूरवर निघून जातो.
….
तयार होऊन बाहेर मात्र अंतर्मुखासोबत निघून येतो मोकळ्या हवेत त्यानेच श्वास घेतो. परंतु विनोदकुमार यांच्यातला कवी अंतर्मुख कुठे आहे? अर्थात, या संग्रहातील काही कवितांमध्ये ते ईश्वराच्या निराकार साकार रूपाचे आधिक्य, बुद्ध, कैलास, शिव, कृष्ण, मंदिर आणि चौऱ्याऐंशी लक्ष देवीदेवता असलेल्या एका अंतर्यात्रेला निघतात. या महायात्रेत गंगा, ब्रह्मपुत्रा, पूर्वज, आजोबा, हिमालय, मंत्र, अलख, दर्शन, भस्म, विभूती, शून्य किंवा सत्य यांचे टप्पेदेखील आहेत. भाजपप्रणीत वा मनुवादी िहदुत्वाशी काही देणेघेणे नसलेल्या प्रगाढ िहदुत्वाच्या या कविता तर आहेतच, शिवाय इथे िहदुत्व हा एका महान मानवतावादी, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कलात्मक परंपरेचा पर्याय होतो आणि सोबतच ज्याला कदाचित िहदुत्व हे नावदेखील देता येणार नाही असे एक नितांत खाजगीपणही जपले जाते. विनोदकुमार यांच्याकरिता या सगळ्या गोष्टी इतिहास, भविष्य, वर्तमान आणि गतकाळाच्या विस्मृत अडगळीचा भागदेखील आहेत. या कवितांमध्ये किडामुंगीच्या जगापासून अश्मीभूत झालेले उड्डाण असलेल्या पर्वतापर्यंत सारे काही आहे. यातील काही कवितांमध्ये भविष्यकाळाचे अशा तऱ्हेने स्मरण केले आहे, जणू काही तो भूतकाळच आहे. सारे काही पाहू आणि व्यक्त करू इच्छिणाऱ्या िहदी कविपरंपरेतल्या मोजक्या कवींपकी ते एक कवी आहेत.
‘िभतीत एक खिडकी असायची’ यासारखी कविता लिहून विनोदकुमार यांनी त्यांच्या अशा रचनांची सांगड त्यांच्या अद्वितीय कथात्म लेखनासोबत कशी घालावी असा प्रश्नदेखील उभा केला आहे. िहदीतील काही कवींनी प्रेम, सहवास आणि ऐंद्रियतेवर विशेष रियाज केला आहे. पण या विषयांवर अतिशय हळुवारपणे मार्मिकतेने कशा प्रकारे लिहिले जाऊ शकते हे फक्त या संग्रहातील काही कविता वाचूनच कळू शकते.
विनोदकुमार यांच्या सर्जनात्मक ऊर्जेत कमतरता येणे तर दूरच राहो त्याउलट त्यांच्यामधला कवी स्वत:ची अकल्पनीय अशी नित्यनूतन रूपे दाखवतो आहे ही गोष्ट या संग्रहातून आश्चर्यकारकरीत्या पुढे येते. त्यांचीच प्रतिमा वापरून सांगायचे झाल्यास त्यांची कविता सगळ्यांच्या आवाजाचा कोरस सामावून घेतलेला जलप्रपात आहे. ज्यांना अद्यापही विनोदकुमार हे िहदीतले आजच्या काळातले सर्वश्रेष्ठ कवी (त्याचप्रमाणे कादंबरीकारदेखील, पण तो वेगळा मुद्दा आहे) आहेत, हे मान्य करण्यात काही आध्यात्मिक अडचणी येत आहेत, त्यांना भूतदया दाखवत सोडून देत हे तर अभिमानाने म्हटले जाऊ शकते की ते नि:संशयपणे आजच्या आमच्या सर्वश्रेष्ठ कवींपकी एक आहेत.