News Flash

  मोकळे आकाश… : फिर जनम लेंगे हम…

नवजात अर्भकाच्या कपाळावर आठ्या चढतात, हे डिलीव्हरीच्या लेबर रूममधल्या सर्वांनाच सुपरिचित असतं.

|| डॉ. संजय ओक

आज दुपारी व्हॉट्सअ‍ॅपवर एक अतिशय गोड फोटो आणि मार्मिक कमेंट वाचनात आली. नुकतीच प्रसूत झालेली आंग्लदेशीय माता बॅकग्राऊंडमधून आपल्या बाळाचं कौतुक न्याहाळते आहे. ते बाळ त्रासिक मुद्रेनं कपाळावर आठ्या चढवून विचारतं आहे- ‘माझा पुनर्जन्म झाला तरी अजून कोविड आहेच का?’

नवजात अर्भकाच्या कपाळावर आठ्या चढतात, हे डिलीव्हरीच्या लेबर रूममधल्या सर्वांनाच सुपरिचित असतं. ‘काय राव, चांगलं नऊ महिने उबदार अंधारात पोहत होतो. आईचं प्रेमळ ठोक्यांचं संगीत होतं. अधूनमधून ‘बाबा’ नाव धारण करणाऱ्या अज्ञाताचा जाडाभरडा आवाज कानी पडायचा. पण आज कुठे आणलंत मला? एवढा उजेड, कोलाहल? थंडी?’ अशा भावनांनी तर आठ्या पडतातच. त्या नॉर्मल समजल्या जाव्यात. पण आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. सगळेजण तोंडाला फडकी बांधून आहेत. फारशी हस्तांदोलनं नाहीत. बरं आहे एका अर्थी. मला फार कोणी उचलून घेत नाही. आणि त्या भयंकर वास येणाऱ्या पाप्या आणि गालाला हात लावणं नाही. ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या…’ही लांबणीवर पडलंय म्हणे! म्हणजे गेल्या जन्मातून जेव्हा एक्झिट घेतली तेव्हाही फारसं कुणी नव्हतं. आणि या जन्मात एन्ट्री झाली तेव्हाही मोजून घरातले पाच जण! बाराव्यालाही बारा जण आणि बारशालाही तेवढेच. गेल्या वेळी गेलो करोनाने तेव्हा वाटलं, सुटलो धाप लागण्यातून. मोक्षाचा क्लेम काही पास झाला नाही. पण या वेळेला खंड बदलला. देश बदलला. गोरीपान आंग्ल आई लाभली. पण डोळे उघडून बघतो तो काय? तोच मास्क, तेच सोशल डिस्टन्सिंग आणि तोच ‘कोविड अप्रोप्रिएट बीहेविअर’चा पासपोर्ट. एक बरं आहे- मॉम लसीकृत झाल्यामुळे माझ्याही शरीरात थोड्या अँटीबॉडीज् आहेत. पण लवकरच मला नवी अँटी-करोना लस टोचली जाईल. बघा, अतिप्रगत देशात जन्मल्यामुळे बी. सी. जी. लसीपासून वाचलो; पण या नव्या लसीपासून सुटका नाही. एक आशा आहे की, नाकात दोन थेंब टाकून नवी लस कदाचित मला करोनापासून सुरक्षा देईल. म्हणजे गंमत बघा, गेल्या जन्मात एका भारदस्त आवाजात मी ‘दो बूँद जिंदगी के’ ऐकून तोंडात दोन तुरट थेंब टाकून घेतले होते… तर या जन्मात ‘kDrops for Survival and Sustainabilityl  असं ऐकून नाकात सोडून घेईन.

मला माझ्या गतजन्माच्या आठवणी मात्र येतच राहतील. काय झालं, की थोडासाच आजारी पडलो आणि तडकाफडकी गेलो. त्यामुळे अनेक महिने अंथरुणावर खिळून पडलोय वगैरे प्रकार नव्हता. त्यामुळे वेळेअभावी सगळा जुना डेटा डिलीट झालेला नाहीये. आणि तो लवकर होऊही नये. मला माझा भारत देश आवडायचाच. असेनात का लोक काळेसावळे… त्यांच्या मनात अपार माया होती. गर्दी आणि अघळपघळता हा ज्यांचा स्थायीभाव होता, त्यांना अचानक घरात बसणं कसं जमणार? नाक्यानाक्यावर उभे राहून ‘सभा लावण्यात’ काय मजा होती राव! पान खाऊन, मावा गालफडात ठेवून पिचकाऱ्या मारण्यात जन्म गेला होता. आता इवल्याशा चिंधीने मुस्कटदाबी केली. १४४, १२० वगैरे आकडे पानाशी जोडले होते; त्याची म्हणे रस्त्यात न जमण्याची कलमे लागू झाली.

काय असेल ते असो- या नव्या देशात जन्मल्यावरही मी माझा गतजन्मीचा देश ‘मिस’ करतो आहे. पण मला तो ठसठशीत बावन्नकशी सोन्यासारखा हवा आहे. एकसंध, एकदिलाने, विचारी वृत्तीने करोनाशी दोन हात करणारा. केवळ ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाच्या गप्पा न मारता खऱ्या अर्थाने समाजाला एकत्र रांधून, बांधून घेणारा. विश्वाच्या बाजारात आपलं नाणं खणखणीत वाजवणारा. ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि विश्वशांतीचे फुकाचे ढोल न वाजवता जैविक शत्रूंचा पायरव वेळीच ऐकून आपली पावलं योग्य त्या दिशेनं टाकणारा. सामाजिक आरोग्य, सामुदायिक अस्तित्व हे आपल्या ‘दहा बाय दहा’पलीकडे जपणारे नागरिक माझ्या त्या देशात निपजावेत अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो… आणि वचन देतो…

‘फिर जनम लेंगे हम

मेरा वतन, मेरा सनम…’

 

sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 12:04 am

Web Title: i will take birth again akp 94
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : जशास तसं?!
2 अनिर्वचनीय आनंदाची कविता
3 पडसाद : आज भाईंची गरज जाणवते
Just Now!
X