तलावात सगळीकडे पाणी असतं, पण सगळीकडे पक्षी नसतात. का? तलावाच्या बांधापाशी पक्षी फारसे दिसत नाहीत. का? तलावाच्या काठावर अथवा उथळ पाण्यात सर्वाधिक पक्षी असतात. का?.. अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय, तरीही रंजक माहिती किरण पुरंदरे यांनी त्यांच्या ‘पक्षी पाणथळीतले’ या पुस्तकात दिली आहे. यात पाणपक्ष्यांच्या अधिवासाविषयी आपल्याला अधिक जाणून घेता येतं. त्यासोबतच पक्ष्यांची शारीरिक वैशिष्टय़ं आणि त्यांच्या खाद्यसवयी यानुसार पक्षी आपल्या अधिवासाची कशी निवड करतात, त्यांची अन्न गोळा करण्याची पद्धत, परस्परांमधील स्पर्धा टाळण्याच्या त्यांच्या क्लृप्त्या याविषयीच्या माहितीचा खजिना या पुस्तकात आहे.
बऱ्यापैकी सहज दिसणाऱ्या आणि काही जराशा शोधाव्या लागणाऱ्या ५० पक्ष्यांची ओळख या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. यात कमलपक्षी : सावळा कमलपक्षी, करकोचा : कांडेसर, करकोचा : चित्रबलाक, करकोचा : मुग्धबलाक, क्रौंच, खंडय़ा, खंडय़ा : कवडय़ा, चमच्या, चिलखा, तुतारी : कवडय़ा तुतारी, तुतारी : तिमळी, तुतारी : हिरवा तुतारी, परीट : करडा परीट, परीट : पांढरा परीट, परीट : पाणपीलक, परीट : पिवळा परीट, परीट : रानपरीट, पाणकावळा : लहान पाणकावळा, पाणकोंबडी, पाणकोंबडी : जांभळी पाणकोंबडी, पाणकोंबडी : तपकिरी पाणकोंबडी, पाणकोंबडी : लाजरी पाणकोंबडी, पाणडुबी, पापाकोळी, बगळा : गायबगळा, बगळा : पाणकाडय़ा बगळा, बगळा :  भुरा बगळा, बगळा :  राखी बगळा, बगळा : रातबगळा, बगळा : लहान बगळा, बदक : अडई, बदक : गढवाल, बदक : चक्रवाक, बदक : चक्रांग, बदक : तलवार बदक, बदक : थापटय़ा, बदक : नंदीमुख, बदक : प्लवा बदक, बदक : भिवई, बदक : लालसरी, बदक : वैष्णव, रोहित, शराटी : काळा शराटी, शराटी : पांढरा शराटी, शराटी : मोरशराटी, शेकाटय़ा, सुरय : नदीसुरय, सुरय : हिवाळी सुरय या पक्ष्यांचा या पुस्तकात समावेश आहे.
पाणपक्षी हे पाणथळींचे सूचक, निदर्शक कसे असतात, हे सांगताना लेखकाने ओढे, नद्या, तलाव, पावसाळ्यात साचणारी डबकी या ठिकाणी दिसणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. या नोंदींवरून पक्ष्यांचा, स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करता येतो आणि त्यांच्या येण्या- न येण्यातून आपल्या शहराच्या वा गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीची प्रकृती जाणून घेता येते, हेही स्पष्ट केलं आहे.
पक्षी बघताना सूर्य पाठीकडे असावा, ज्या ठिकाणी हातांनी वल्हवण्याच्या होडीची सोय असते, तिचा वापर करावा, तिथल्या स्थानिकांशी संपर्क साधावा, पक्षी बघताना हालचाल न करता बसून राहावं आणि झुडूप वा शेताचा आसरा घ्यावा.. या लेखकाने दिलेल्या टिप्स पाणपक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पुस्तकात पक्ष्यांची माहिती सांगताना त्यांच्या आकाराचा अंदाज यावा म्हणून ओळखीच्या पक्ष्यांच्या आकाराशी त्यांची तुलना केली आहे.
पक्ष्यांची शारीरिक वैशिष्टय़ं, त्यांच्या चालण्याच्या, धावण्याच्या खुबी, खाद्यसवयी, तो पक्षी आढळण्याची ठिकाणं, विणीच्या हंगामात त्यांचं बदलणारं रंगरूप व वर्तन, त्यांची शीळ किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी साद घालण्याची वेगवेगळी पद्धत, त्यांचं घरटं बांधणं, अंड कसं दिसतं, अंडी उबवण्याच्या पद्धती, त्यांचं पिल्लांना वाढवणं, स्वसंरक्षणाची युक्ती, शिकारीची पद्धत यासंदर्भातील मोलाची आणि रंजक पद्धतीनं दिलेली माहिती वाचणं हा अनुभव पक्षी- निरीक्षणाइतकाच आनंद देणारा ठरतो. संबंधित पक्ष्याचं वर्णन करताना तो सहसा कुठे दिसतो, हे सांगून तो विशिष्ट पक्षी पाहिल्याच्या संदर्भातील स्वानुभवही लेखकाने सांगितले आहेत. सहजसुंदर पद्धतीनं लिहिलेली पक्षीवैशिष्टय़ांची ही लालित्यपूर्ण वर्णनं जिवंत भासतात आणि एखाद्या चलत्चित्राप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.
पक्ष्याचे घरटे, त्यांचे शारीरिक वैशिष्टय़ वा त्याच्या उडण्याच्या लकबी यावरून ओळख पटण्याच्या अनेक खुणाही लेखकाने जागोजागी दिल्या आहेत. मादी आणि नर यांची शरीरवैशिष्टय़ं, त्यांचं सहजीवन याबाबतही प्रकाशझोत टाकला आहे. त्या- त्या पक्ष्याची माहिती देताना प्रदूषण तसेच इतर पर्यावरणीय हानीमुळे पक्ष्यांच्या खाद्यावर आणि परिणामी त्यांच्या संख्येवर कसा विपरीत परिणाम होत आहे, हेही पुस्तकात स्पष्ट केलं आहे.
पुस्तकाच्या अखेरीस महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या पाणथळींच्या जागांची आणि त्या ठिकाणी आढळणाऱ्या प्रमुख पक्ष्यांची जंत्री दिलेली आहे. पाणथळींचं सुशोभीकरण नियोजनबद्धरीत्या कसं करता येईल आणि त्यात होणाऱ्या ढोबळ चुका कशा टाळता येतील, याचं मार्गदर्शनही लेखकानं केलं आहे. पर्यटकांचा विचार वा विकासाच्या चुकीच्या कल्पना अनुसरण्यापेक्षा पक्ष्यांच्या अधिवासाचं जतन आणि संरक्षण कसं करता येईल, याचा विचार होण्याची गरज लेखक व्यक्त करतो. पक्षिमित्रांनी काढलेल्या पक्ष्यांच्या देखण्या छायाचित्रांनी आणि उत्तम छपाईनं पुस्तकाच्या गुणवत्तेत भर घातली आहे.
एखादा पक्षी दिसल्यानंतर तो ओळखता येणं यात केवढा आनंद असतो! पक्षी ओळखण्याची गुरुकिल्ली हे पुस्तकवाचकांना
देऊ करतं.
‘पक्षी पाणथळीतले’- किरण पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे,  पृष्ठे- १७५, मूल्य- २५० रुपये.