13 November 2019

News Flash

मपलं गाठुडं : निर्थक

‘ए क’. जन्माला आला, रांगू लागला. बोलू लागला. खेळून खेळ शिकू लागला. झाडं, पक्षी, घर-अंगण पाहत, ऐकत बागडू लागला. आई-वडील, आजी-आजोबा, मित्र, नातलग होतेच आसपास.

| September 10, 2012 04:14 am

‘ए क’. जन्माला आला, रांगू लागला. बोलू लागला. खेळून खेळ शिकू लागला. झाडं, पक्षी, घर-अंगण पाहत, ऐकत बागडू लागला. आई-वडील, आजी-आजोबा, मित्र, नातलग होतेच आसपास. त्यांच्या सावलीत संस्काराचे धडे गिरवत वाढू लागला. मैत्रीण भेटली. पाऊस अनुभवला, प्रेमात पडला, वयात आला आणि मग त्या उत्सवाला सामोरा गेला. चिंब झाला, न्हाऊन निघाला.‘एक’. गाडी शिकला गाण्यांसाठी, गाणी ऐकत गुणगुणत प्रवास करण्यासाठी, गाणी आवडत होतीच, प्रवासही आवडू लागला. प्रवासात अनेकजण भेटले. विविध भाषा बोलणारे, चवी शिकवणारे, मंत्र देणारे, काही नुसतेच सहप्रवासी निर्थकांशी जोडून नातं अव्याहत पसरलेल्या रस्त्याशी इमान राखत, दिशा धुंडाळणारे. निर्थकाच्या प्रथम स्पर्शाने, अनुभवाने ‘एक’ जरा बिचकला. मग प्रश्न पडलेले पुस्तक घेऊन कितीतरी उंबरठय़ांवर जाऊन थडकला. प्रत्येक उत्तरागणिक प्रश्न वाढत गेले आणि अर्थ शोधण्याच्या भानगडीत ‘एक’ अधिकाधिक गुंतत गेला. त्याच्या या बिनव्याजी गुंतवणुकीचं कुणाला महत्त्व असणार होतं? चार-दोन मित्रांनी सहानुभूती दाखवत निर्थकांत आणखी भर घातली ‘एक’. प्रवासाला चटावला, घरादारावर रुसला आणि भटकू लागला. अनेक शहरं, गाव-खेडी पालथी घातली. वेगवेगळी वेष-वेषांतरे केली. नात्यांपासून दूरदूर जात स्वत:शी नातं जोडत राहिला. भांडत राहिला आणि एक दिवस एका देशाच्या एका शहरात एका शिल्पाशी येऊन थांबला. मायकेल एंजेलोच्या ‘पिएत्झा’समोर मदर मेरीच्या कुशीत पहुडलेल्या निष्प्राण येशूला पाहून गलबलून गेला. एकाच शुभ्र दगडातून घडवलेलं शिल्प! आपल्याच मुलाच्या निर्जीव देहाकडे निर्विकारपणे पाहणारी वेदनामयी आई..
‘एक’ला मृत्यू जाणवला, माया जाणवली, वेदना जाणवली. समजण्या न समजण्याच्या आसपासचं काहीतरी जाणवलं आणि मग ‘एक’ स्वत:च्या आत, खोल-खोल आत जाऊन बसला. रडला, आणखी रडला, रडत राहिला आणि मग शांत झाला. शांत होऊन मग पुन्हा चालू लागला, प्रवास सुरू झाला. आता मात्र ‘एक’ वेगवेगळे दगड शोधत फिरत राहतो. पिएत्झाच्या दगडाशी साधम्र्य साधणारा दगड! त्याला काहीही निर्माण करायचं नाहीये. फक्त शोध घ्यायच्याय निर्जीवात एकरूप होऊन न दिसणाऱ्या सजीवतेचा. निर्थकाच्या पोकळीत सतत घुमणाऱ्या हाकेला प्रतिसाद देत तो निघालाय एक बारीकसा ठिपका होऊन. ‘एक’ भेटायला येईल तुम्हाला! तुमच्या आत ‘एक’ होऊन राहायला.

First Published on September 10, 2012 4:14 am

Web Title: mapla gathuda useless jitendra joshi actor jitendra joshi lokrang loksatta lokrang