News Flash

नक्षत्रांचे देणे- पैल

‘नक्षत्रांचे देणे’ या प्रयोगातला सांगीतिक आविष्कार म्हणजे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्याच सांगीतिक प्रवासातला नव्हे, तर अवघ्या मराठी भावसंगीतातला मैलाचा दगड ठरावा.

| June 2, 2013 01:01 am

‘नक्षत्रांचे देणे’ या प्रयोगातला सांगीतिक आविष्कार म्हणजे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्याच सांगीतिक प्रवासातला नव्हे, तर अवघ्या मराठी भावसंगीतातला मैलाचा दगड ठरावा. आणि त्यांच्या अप्रतिम चालींचे सोने करायला रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, रंजना पेठे, लालन पळसुले, नरेंद्र पटवर्धन, अनुराधा गोडबोले, प्रभा लिमये, वैजयंती पटवर्धन, वर्षां भट, सुजाता जोशी, विजय जोगदंड, भगवंत कुलकर्णी, श्रीराम पेंडसे, देवेंद्र साठे, जयश्री गद्रे, भगत गद्रे, रोहित चंदावरकर अशी तरुण आणि प्रतिभावान गायक-गायिकांची मांदियाळी होती. सर्व कलाकार मंडळींनी (मुंबईकर पालेकर दाम्पत्य आणि रवींद्र साठे यांच्याशिवाय) सुमारे महिनाभर कर्वे रोडवरील विमलाबाई गरवारे हायस्कूलच्या सभागृहात या प्रयोगाच्या चोख तालमी केल्या. मुंबईकर मंडळींनी शेवटच्या तीन-चार तालमी केल्या.
‘..का असे येता नि जाता’ (लालन पळसुले), ‘मौनात पाखरांचे वनगीत शोधताना’ आणि ‘हारजितीच्या दुव्यांची मी फुले रे गुंफिते’ (माधुरी पुरंदरे), ‘मृत्यूत कोणी हासे’ (श्रीकांत पारगावकर), ‘तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा’ (अनुराधा गोडबोले), ‘जाहला सूर्यास्त राणी तो कुणी माझ्यातला’ आणि ‘संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण’ (रवींद्र साठे) अशी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी जशी चंदावरकरांनी रचली तशीच ‘थोर जोंधळ्याची पात’ (नरेंद्र पटवर्धन),
‘रावबाजीची चुकली गाय’ (भगवंत कुलकर्णी व प्रभा लिमये), ‘लव लव करी पातं’ (रंजना पेठे), ‘भुईवर आली सर’ (स्त्रीसमूह स्वर), ‘पुरावरील पडाव मध्येच बुडावा/ सेवेकरी मुद्रा असू नये बाशी’ (चंद्रकांत काळे) अशा गाण्यांतून विविध लोकसंगीताचाही अर्थपूर्ण प्रयोग केला.
मृत्यूत कोणी हासे.. मृत्यूस कोणी हसतो
कोणी हसून मरतो, मरत्यास कोणी हसतो
ही आरती प्रभूंची चंदावरकरांनी यमनमध्ये बांधलेली गझल सादर करताना श्रीकांत पारगावकरांच्या उपशास्त्रीय गानशैलीतलीच जादू रसिकांना मंत्रमुग्ध करी; तसेच अगदी खास खानदानी गणिकेच्या अंदाजानं बांधलेलं ‘का असे येता नि जाता’ हे ठुमरीबाजातलं गाणं लालन पळसुलेच्या आवाजातल्या बाईजी करिष्म्यानं कवितेतला माहौल जिवंत करी. या दोन्ही गाण्यांतली लतीफ अहमद साहेबांची सारंगीची संगत गाण्याला चार चाँद लावी.
बाराही स्वरांचा वापर करून ‘कंच तळे नेत्र त्यांची दाट पाती हुन्नरी’ (श्रीकांत पारगावकर) हे त्यांनी केलेलं हटके गाणं, तर  ‘सर्सर सर्सर वाजे.. पत्ताच पत्ताच नाही’ (श्रीकांत पारगावकर आणि सुजाता जोशी) आणि ‘लव लव करी पातं’ (रंजना पेठे) ही नाचरी गाणी तर प्रयोगातल्या मर्मबंधातल्या ठेवी.
या प्रयोगात रवींद्र साठेनं गायलेली तिन्ही गाणी हा विलक्षण अनुभव होता. उत्कृष्ट शब्द, अप्रतिम चाल आणि भावोत्कट गायन याचा सुंदर संगम झालेला. शेवटच्या- ‘संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावर जळून..’ या भैरवीतून आणि त्यातून त्याच्याच संवादी सुरावटींतून गायकवृंदासह गायलेली शीर्षकधून- ‘गेले द्यायचे राहून.. तुझे नक्षत्रांचे देणे’ हे सगळं केवळ प्रेक्षागृहातच नव्हे, तर रसिकांच्या मनात धरून राही. एका नीरव सन्नाटय़ात रसिक बाहेर पडत.
पण या सगळ्याहून विलक्षण वेगळा, अर्थवाही आणि पूर्वी कधीही न झालेला प्रयोग म्हणजे आरती प्रभूंच्या कवितेला वीस गायक/गायिकांच्या वृंदगानातून आणि एकलगायनातून तसेच मोहन गोखले, अमोल पालेकर यांच्या नादमय आणि नाटय़पूर्ण गद्य प्रस्तुतीतून अर्थभावांचं नवं परिमाण लाभलं.
उदा. ‘कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर। रेटा याचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर’ या धृ्रवपदाच्या ओळी चर्मवाद्ये, गिटारवृंद आणि वीसजणांचा गायक वृंद अत्यंत झपाटून टाकणाऱ्या द्रुतगतीत पाश्चात्त्य वृंदगान शैलीत गाऊ लागे; तेव्हा त्यातल्या आवेग आणि जोशानं प्रेक्षक थरारून जात. पाठोपाठ अनपेक्षितपणे निम्म्या लयीत ‘गाणे सुरू झाले तेव्हा..’ अशा ओळी एकल स्त्रीकंठातून अत्यंत मधुर स्वरावलीतून येताना अनेक प्रश्न उभे राहत. आणि शेवटी मोहन गोखलेच्या संमोहित स्वरातून ‘प्रश्न नव्हे पतंग.. अन् खेचू नये त्याची दोरी..आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?’ अशा प्रश्नातच विरत.. शेवटी उत्तर काय तर-
कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर। ऐसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर..
किंवा स्लो वाल्ट्झमधल्या-
देवे दिलेल्या जमिनीत आम्ही सरणार्थ आलो, शरीरेहि त्याची
दरसाल येतो मग पावसाळा.. चिंता कशाला मग लाकडाची
या गाण्याची सुंदर आणि संवादी स्वरावलींतून आणि अमोल पालेकरच्या गद्य आरोह-अवरोहातून उलगडत सारा अवकाश व्यापून टाकणारी पेशकारी ही केवळ अनुभवण्याचीच गोष्ट..
अशाच प्रकारे ‘तम कोठे.. कोठे पैल’ अगर ‘पल्याड कोठे पल्याड कोठे’ आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या ‘घडय़ाळाचा काटा मिनिटावरून फिरत जाय’ या गाण्यात प्रत्येकी एकाच धूनेचं वृंदगानातून होणारं विस्तृत स्वराकाश त्याच्या आधी आणि नंतर येणाऱ्या गद्य ओळींना अधोरेखित करत राही. हे अद्भुत होतं. पूर्वी कधीही न अनुभवलेलं..
याखेरीज ‘ऐलथडी आले रंग’ (कामोद), ‘सेवेकरी मुद्रा असू नये बाशी’ (अभंगगायनातले टाळकरी), ‘आमच्या गोवऱ्या आम्हीच थापाव्या’ (ओवीतल्या अंतिम चरण ‘मरणापर्यंत’ एवढाच सहभाग), ‘सर्सर सर्सर वाजे’ (या युगुलगीतातल्या ‘झनझन झनझन झाले’ या ओळीपुरता समूहस्वर) आणि प्रयोगाच्या अंती ‘गेले द्यायचे राहून’ची भैरवीतली सुरावट.. असा वृंदगानाचा अतिशय सघन आणि अप्रतिम प्रयोग हे संगीतकार भास्कर चंदावरकरांचं एकमेवाद्वितीय अतिशय श्रेष्ठ योगदान मराठी भावसंगीताला लाभलं. दुर्दैवानं वृंदगान गाणं अजूनही केवळ प्रस्थापितच नव्हे, तर नव्या उभरत्या गायक-कलावंतांनासुद्धा कमीपणाचं, दुय्यम दर्जाचं वाटतं. त्यामुळे वृंदगान हा प्रकार म्हणावा तसा मराठी भावसंगीतात रुजला नाही. नाटय़संगीतात मराठी रंगभूमीवर आलेल्या ‘तीन पैशाचा तमाशा’ (१९७८), ‘पडघम’ (१९८५), ‘अफलातून’ (१९८५) आणि ‘अलिबाबाची हीच गुहा’ (१९८९) या नव्या संगीत नाटकात वृंदगानाचा उचित प्रयोग झाला. (आणि या सर्व नाटकांचा संगीतकार मीच होतो.)
या संगीताविष्काराला अशोक गायकवाड (ढोलकी), विवेक भट (ढोलक), वसंतराव होर्णेकर/ भारत जंगम (तबला), श्याम पोरे (विविध तालवाद्ये), श्यामकांत परांजपे (स्पॅनिश गिटार), रेमंड मार्टिन (बेस गिटार), तेरेसा मार्टिन (इलेक्ट्रिक गिटार), फैयाज हुसेन/ रमाकांत परांजपे (व्हायोलिन), लतीफ अहमद (सारंगी), राम किंकर (क्लॅरिओनेट), दिनकर दिवेकर (बासरी), सतीश गदगकर (संतूर), रवींद्र पाटणकर (हार्मोनियम) आणि विवेक परांजपे (इलेक्ट्रिक ऑर्गन) या सोळा कुशल वादकांच्या वृंदानं सोनिया सुगंधु आला.. एरवी मराठी भावसंगीताच्या कार्यक्रमात तेव्हा अभावानं दिसणाऱ्या इलेक्ट्रिक गिटार, बेस गिटार, स्पॅनिश गिटार, क्लॅरिओनेट, सारंगी या वाद्यांच्या सहभागानं त्या त्या संगीतशैलीचे रंग गाण्यात भरून राहिले.
यातला दुर्दैवाचा भाग म्हणजे, या प्रयोगाचं दृक्श्राव्य रूपात कुठल्याही पद्धतीनं ध्वनिचित्रमुद्रण झालं नाही. ‘नक्षत्रांचे देणे’चे मोजून सहा-सात प्रयोग मुंबई-पुण्यात झाले. ४०-४५ जणांचा ताफा घेऊन गावोगावी प्रयोग करणं हे तसं अवघडच.. या अशा अभूतपूर्व कलाकृतीचा मी अगदी सुरुवातीपासूनचा केवळ साक्षीदारच नव्हतो, तर त्याच्या संगीतात चंदावरकरसरांना प्रमुख सहायक दिग्दर्शक म्हणून प्रत्यक्ष सहभागीही होतो. ‘नक्षत्रांचे देणे’च्या पहिल्या प्रयोगाला रंगभूमी, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि दाद मिळाली.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे प्रयोग संपल्यावर गायक रवींद्र साठेला भेटले आणि ‘‘तुम्हा लोकांमुळे माझा आरती प्रभू मला आज पुन्हा नव्यानं भेटला..’’ अशी कौतुकाची दाद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:01 am

Web Title: nakshatranche dene
टॅग : Music,Song
Next Stories
1 क्रिकेट कसे पाहावे
2 आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!
3 दुष्काळ आणि हिरवा कोंभ
Just Now!
X