गेली ३०-३५ वर्षे नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर डोळसपणे मुलुखगिरी केलेल्या एका भटक्याची मनोज्ञ निरीक्षणं.. देशविदेशातील माणसांबद्दलची, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींची.. अन् त्यांच्या जीवनजाणिवासंबंधीचीही!
राजेशला कामानिमित्त मध्य प्रदेशात एक आठवडा जायचं आहे हे कळल्यावर त्याची अर्धागी म्हणाली, ‘‘मी नसणार म्हणून हॉटेलवर दररोज दारू पीत बसू नकोस. ते पसे वाचवून तिथली सोनेरी भरतकामाची झरदोसी साडी घेऊन ये.’’
मित्रानं विचारलं, ‘‘एमपीमध्ये म्हणजे नक्की कोणत्या ठिकाणी जाणार आहेस?’’
‘‘झाशी आणि सटणा. प्रत्येक फॅक्टरीत दोन-तीन दिवस.’’
मित्रानं सेलफोनवर गुगल सर्च केलं आणि ही दोन शहरं नक्की कुठं आहेत, ते पाहिलं. नकाशा बघता बघता एकाएकी शॉक लागल्यासारखा तो किंचाळला, ‘‘लकी आहेस राजा. दोघांच्या मध्ये खजुराहो आहे.’’
‘‘असेल. पण तिथं कस्टमर नाही आमच्या कंपनीचा.’’
‘‘मॅडच आहेस. लोक दूरदूरच्या देशांमधून मुद्दाम जातात तिथं. खजुराहोची ती धमाल शिल्पं बघण्याचा चान्स मिळतोय तुला. तोही फुकट. कंपनीच्या खर्चानं.’’
‘‘छे रे. असं कसं? कामाकरता जातोय मी.’’
पण हो ना करता करता शेवटी एका दिवसाचं खजुराहो पर्यटन करण्याचं ठरलं. कंपनीच्या खर्चानं ते कसं पार पाडायचं यावर अनुभवी सहकाऱ्यानं सल्ला दिला, ‘‘ऐन वेळेला बस कॅन्सल झाली म्हणून टॅक्सी करावी लागली असं सांग. अडाणी टॅक्सी ड्रायव्हर छापील बिल कसं देणार?’’
दुसरा म्हणाला, ‘‘आणखी इकडचे तिकडचे खर्च लावून टाक. फॉर एक्झाम्पल, कस्टमरच्या इंजिनीअरनं रेकमेंड केलं तर आणखी चार मशीन्सची ऑर्डर मिळणार आहे. म्हणून त्याला इंपोर्टेड गिफ्ट द्यावं लागलं, असा रिपोर्ट दे.’’
‘‘म्हणजे खोटी बिलं करायची? अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आपण टोप्या घालून गेलो होतो एक दिवस. विसरलात?’’
‘‘मॅडच आहेस. सरकारी कर्मचारी आणि राजकारणी करतात त्याला भ्रष्टाचार म्हणतात. आपण प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. आपण कुठं जनतेच्या पशावर डल्ला मारतो?’’
पण राजेशच्या सद्सदविवेकबुद्धीला ते पटेना. त्यानं थेट साहेबांचीच ऑफिशिअल परमिशन घेण्याचं ठरवलं. पण अखिल दुनियेतल्या समस्त साहेबमंडळींप्रमाणे इथले साहेबही खडूसच असल्यामुळे ते मुळीच परवानगी देणार नाहीत, असं सगळ्यांचं मत पडलं. तिढा सुटेना, तसा एका स्मार्ट सहकाऱ्यानं विडा उचलला. चेव येऊन तो गरजला, ‘‘ओके गाइज! मी जातो राजेशबरोबर साहेबांकडे. परमिशन घेऊनच आम्ही परत येऊ. कितीची बेट लावता बोला.’’
प्रत्येकी शंभर रुपये टेबलावर पडले. हजाराची पज लागली. लंच टाइम संपल्यावर दोघे साहेबांच्या केबिनमध्ये गेले.
साहेब गुरगुरले, ‘‘काय पाहिजे?’’
राजेशनं प्रामाणिकपणे सांगितलं, ‘‘सर, मध्ये एक दिवस खजुराहो बघायचं ठरवतोय.’’
साहेब इंग्रजीत गरजले, ‘‘व्हाय?’’
राजेशला पटकन उत्तर सुचेना. विचार करून शेवटी तो उत्तरला, ‘‘जस्ट फॉर फन, सर.’’
‘‘नहीं. काम पर ध्यान रख्खो. सिर्फ काम करो और वापस आ जाओ. समझे?’’
साहेब दर वाक्यागणिक मीडियम बदलत होते आणि त्याच भाषेत उत्तर देताना राजेशची तारांबळ उडत होती. त्यानं धीर एकवटून विचारलं, ‘‘लेकिन ऐसा मौका फिर कब मिलेगा?’’
साहेबांनी संगणकाच्या उंदराला गोंजारत उत्तर दिलं, ‘‘रजा घ्या आणि स्वत:च्या खर्चानं जा हवं तिथं.’’
राजेश मान खाली घालून वळला. पण स्मार्ट सहकारी त्याला थांबवून साहेबांना धीटपणे म्हणाला, ‘‘राजेशच्या खजुराहो व्हिजिटमध्ये कंपनीचा एक पसाही खर्च होणार नाही सर.’’
साहेबांनी उंदराच्या पाठीवरचा हात काढला आणि दोन्ही हातांची जुडी डोक्यामागे टेकवून खुर्चीत रेलून अंतिम निर्णय जाहीर केला, ‘‘नो मीन्स नो. मॅटर ऑफ प्रिन्सिपल! डोंट मिक्स बिझिनेस विथ प्लेझर.’’
‘‘हू सेज दॅट, सर?’’
साहेबांना सुभाषितकर्त्यांचं नाव ठाऊक नव्हतं. म्हणून उत्तर न देता ते मानभावीपणे डाफरले, ‘‘सुप्रसिद्ध इंग्रजी वाक्प्रचार आहे. तुम्हा मराठी मीडियमवाल्यांना कसा माहीत असणार? हा! हा!’’
त्या अपमानामुळे किंचितही विचलित न होता सहकारी म्हणाला, ‘‘तेच तर म्हणतो मी. हे तत्त्व सातासमुद्रापलीकडच्या फिरंगी लोकांसाठी बनवलंय सर.’’
‘‘मतलब?’’
‘‘हम िहदुस्तानी लोगों को ये लागू नहीं पडता.’’
‘‘का लागू नाही पडत?’’
बेरकी सहकारी एका क्षणाचा पॉज घेऊन उत्तरला, ‘‘कारण इथं कामात सुख असतं आणि सुखात काम असतं.’’
साहेब गोंधळले. हात खाली घेऊन ते टेबलावर ठेवत त्यांनी विचारलं, ‘‘हाउज दॅट?’’
‘‘तुम्हाला माहीत नाही ते साहजिकच आहे सर. मराठी मीडियमच्या सगळ्या पोरांना ठाऊक असतं.’’
‘‘मीही मराठी फॅमिलीतलाच आहे. मराठीमध्ये परफेक्टली कम्युनिकेट करू शकतो.’’
‘‘व्हेरी गुड, सर. मग मला सांगा, मराठीत शृंगाराला काय म्हणतात?’’
‘‘इतकं हाय लेव्हल मराठी बोलत नाही आम्ही. इंग्लिशमध्ये लव्ह मेकिंग म्हणतात.’’
‘‘मराठीत कामक्रीडा म्हणतात.’’
‘‘आय सी!’’
‘‘आता सांगा, शृंगाराचा देव कोण?’’
‘‘ओ माय गॉड! थर्टी थ्री क्रोअर गॉड्स आहेत म्हणे. आपल्या ऑफिसातल्या टू हंड्रेड ऑड स्टाफची नावं माहीत नाहीत मला. सगळ्या देवांची कशी ठाऊक असतील?’’
‘‘मी सांगतो. त्याचं नाव कामदेव.’’
‘‘इंग्लिशमध्ये क्युपिड!’’
सहकारी ठसक्यात म्हणाला, ‘‘असेल. पण प्लेझरसन वगरे नाही, हे नक्की.’’
‘‘ऑफ कोर्स नॉट!’’
‘‘करेक्ट! म्हणूनच त्या लोकांमध्ये वर्क आणि प्लेझर एकत्र नसतात. पण आपल्यात असतात.’’
साहेबांनी आ वासला. भानावर येऊन ते पुटपुटले, ‘‘असं कसं? आय डोंट गेट इट!’’
शाळेमधल्या ‘ढ’तल्या ‘ढ’ पोराला समजावून सांगावं तसं एकेक शब्द सुटा सुटा उच्चारत सहकारी म्हणाला, ‘‘प्लेझर म्हणजे काम आणि काम म्हणजे वर्क.’’
हे तर्कशास्त्र ऐकून साहेब अवाक झाले. सहकाऱ्यानं हळूच साहेबांसमोरचा एक कोरा कागद उचलला आणि त्यावर ठळक अक्षरात लिहिलं, ‘‘प्लेझर इक्वल टू काम. काम इक्वल टू वर्क. देअरफोर, प्लेझर इक्वल टू वर्क.’’
साहेबांनी कागद खेचून घेतला आणि ते अफलातून गणिती प्रमेय डोळे फाडफाडून पुन्हा पुन्हा वाचतच राहिले. चूक काढताच येत नव्हती. अविश्वासानं ते पुन्हा पुन्हा चष्म्यावरून डोळे चोळत राहिले.
‘‘म्हणूनच सर, बिझिनेस आणि प्लेझर एकत्र करण्याची आपली थोर परंपराच आहे. राजेशसारखा पापभीरू माणूस ती कशी तोडेल? त्यात खजुराहोसारखं ठिकाण म्हणजे हाइट ऑफ प्लेझर. इतक्या जवळ जाऊन ते पाहिलं नाही तर कामचुकारपणा केल्यासारखंच होणार की नाही?’’
साहेबांचा पुतळा झाला. राजेशनं खजुराहो वारी केली. येताना खजुराहो िपट्रची झरदोसी साडी आणली. ती नेसून लग्नकार्याला जाण्याची िहमत त्याच्या अर्धागीला अजून होत नाहीय.