१५ जुलै १९२७. र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचा प्रारंभदिन. स्त्री-पुरुषांच्या ‘कामवासनेचा शास्त्रीय दृष्टीने विचार’ हे या मासिकाचे मुख्य उद्दिष्ट होते. गेल्या शतकात अत्यंत सनातनी असलेल्या भारतीय समाजात संततिनियमन व लैंगिक शिक्षणाचे कार्य र. धों.नी या मासिकाद्वारे हाती घेतले आणि एका ‘अस्पृश्य’ विषयाला हात घालण्याचे धाडस केले. त्यांच्या बंडखोर व बुद्धिप्रामाण्यवादाची पुरेपूर किंमतही त्यांनी मोजली. तरीही आपल्या कार्यापासून ते जराही ढळले नाहीत. आज एक द्रष्टे विचारवंत म्हणून र. धों.कडे पाहिले जात असले तरीही समाजात त्यांना अपेक्षित असलेले बदल अजूनही झालेले नाहीत.  
‘समाजस्वास्थ्य’ हे केवळ लैंगिकतेसंबंधात जागृती करणारे मासिक नव्हते, तर समाजाच्या समग्र स्वास्थ्याचा विचार त्यात अंतर्भूत होता. ‘१५ जुलै’च्या ‘समाजस्वास्थ्य’च्या प्रारंभदिनानिमित्ते आजही या विषयाची असलेली सामाजिक निकड जाणून आम्ही या विषयाची पुनश्च रुजवात करीत आहोत.

‘समाजस्वास्थ्य’ मासिकामागील  भूमिका विशद करणारा र. धों. कर्वे यांचा लेख..

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?

प्रथम ’समाजस्वास्थ्य’ हे मासिक मी कोणत्या परिस्थितीत सुरू केले हे थोडक्यात सांगणे अस्थानी होणार नाही. १९२१ साली मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यापासून संततिनियमनाचा प्रचार करू लागलो होतो आणि त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाचा म्हणून गुप्तरोगांचा प्रतिबंध हाही विषय हाती घेतला होता. आणखी एका वर्षांने विल्सन कॉलेजातील प्रोफेसरची जागा घेतानाच मी स्पष्ट सांगितले होते, की ‘मी फक्त कॉलेजच्या कामापुरता बांधलेला राहीन आणि इतर वेळेत मी पाहिजे ते करीन.’ पुढे मी तेथे कायम झाल्यावर १९२५ साली तेथील अधिकाऱ्यांना एका सद्गृहस्थांनी सवाल केला, की ‘संततिनियमनाचा व विशेषत: गुप्तरोग प्रतिबंधाचा पुरस्कार करणारा मनुष्य तुमच्या कॉलेजात कसा चालतो?’ यावरून मॅकेन्झीसाहेबांनी मला बोलावून विचारले, ‘हा भयंकर आरोप खरा आहे काय?’ मी अर्थातच ‘होय’ म्हटले. तेव्हा त्यांनी मला हा प्रचार बंद करण्यास सांगितले. परंतु त्याला माझी तयारी नसल्यामुळे मी कॉलेज सोडले. त्यांनी मला सहा महिन्यांचा जादा पगार आणि प्रॉव्हिडंट फंड झाला होता तितका दिला.
नंतर नऊ महिने कोठेही पोटाची सोय झाली नाही व ते प्रचारापेक्षाही अधिक महत्त्वाचे होते. यावेळी माझे बंधू डॉ. शं. धों. कर्वे आफ्रिकेत नैरोबी येथे होते; त्यांनी तेथे नोकरी मिळण्याचा संभव आहे असे लिहिल्यामुळे तिकडे निघून गेलो; परंतु तेथे पाच महिने राहूनही काही जुळले नाही, यामुळे परत आलो.
 या सुमाराला सुदैवाने मी ज्यांच्याजवळ फ्रेंच शिकलो त्या प्रो. पेल्तिये यांचा मुलगा मुंबईच्या एका फ्रेंच व्यापारी कंपनीत नोकर होता. त्याने माझी भेट घेऊन त्या कंपनीत मला वरिष्ठांच्या सेक्रेटरीचे काम देवविले. अशा रीतीने सव्वा वर्ष बेकार राहिल्यावर डिसेंबर १९२६ मध्ये ही नोकरी मिळाली. येथे काम भरपूर, रविवारीदेखील पुरी रजा नाही आणि पगार विल्सन कॉलेजपेक्षाही कमी- म्हणजे दोनशे रुपये होता. तथापि तो लवकरच वाढेल अशी आशा होती. ती कधीच पुरी झाली नाही आणि काम वाढल्यामुळे प्रकृती बिघडली आणि हीही नोकरी सोडावी लागली, ही गोष्ट वेगळी! पण निदान त्यावेळी तरी असे वाटले, की आता आपला जम बसला. तेव्हा केवळ संततिनियमनाच्या प्रचारावर न थांबता एकंदर बुद्धिप्रामाण्याची विचारसरणी लोकांपुढे मांडावी, या हेतूने १९२७ च्या जुलैमध्ये हे मासिक सुरू केले.
यावेळी एका विद्वान स्नेहय़ाने असेही सुचविले, की हे मासिक केवळ बुद्धिप्रामाण्याला वाहिलेले असावे आणि त्याला याचे निदर्शक असे काहीतरी नाव द्यावे. इंग्लंडात ’रॅशनलिस्ट प्रेस अ‍ॅसोसिएशन’ नावाची जी बुद्धिवादी संस्था आहे, तिचे मुखपत्र ‘लिटररी गाईड’ नावाचे आहे. तशाच प्रकारचे हे मासिक असावे असे त्याचे म्हणणे होते. परंतु ते मासिक केवळ ख्रिस्ती धर्मावर टीका करण्याकरिता काढलेले आहे. त्या धर्तीवर हिंदुस्थानातल्या सर्व धर्मावर टीका करूनही माझे समाधान झाले नसते. मला यापेक्षा व्यापक स्वरूप पाहिजे होते.
लेखक म्हणून कीर्ती मिळवण्याची कल्पना माझ्या मनात कधीच आली नव्हती आणि यावेळीही ती आली नाही. नाटककार होण्याच्या इच्छेने यापूर्वी एक नाटक मी लिहिले होते (ते १९२३ च्या सुमारास ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झालेले आहे.) आणि शाळा-कॉलेजाकरिता भूमितीवर दोन पुस्तके लिहिली होती. पण आता केवळ शिक्षणोपयोगी किंवा रंजनप्रधान वाङ्मयाच्या नादी न लागता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत आणि कसेही करून त्या सांगितल्याच पाहिजेत, असे वाटून हे मासिक काढायचे ठरविले. पण त्यात केवळ बुद्धिप्रामाण्याची तत्त्वेच सांगून मला थांबायचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य ही एक मन:प्रवृत्ती आहे. सत्य समजण्याचे तेवढेच साधन आपल्याजवळ असल्यामुळे ती हरघडी आणि प्रत्येक विषयात शक्य तितक्या विषयांना लावून त्यादृष्टीने मतप्रचार करण्याचा माझा उद्देश होता. तेव्हा ‘बुद्धिवादी’ किंवा अशाच प्रकारच्या एखाद्या नावाने माझे समाधान होणे शक्य नव्हते. बुद्धिप्रामाण्याने किंवा तर्कशास्त्राने सत्यशोधन तर करता येतेच; पण ते व्यवहारात कसे लावता येईल, हा मुख्य प्रश्न होता. प्रो. वामनराव जोशींच्या दृष्टिकोनात आणि यात मोठा फरक आहे तो असा, की ‘ज्याने समाजाचे कल्याण होत नाही, जे नीतीला पोषक नाही असे सत्यच आम्हाला नको,’ असे ते म्हणत असत. मी तसे न म्हणता ‘कोणत्याही सत्याचा सदुपयोग किंवा दुरुपयोगही करता येतो; तेव्हा समंजस माणसाने त्याचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हे पाहिले पाहिजे आणि नीती जर सत्याशी जुळत नसेल तर नीती बदलली पाहिजे. कारण सत्य बदलणे शक्य नाही,’ असे मी म्हणतो.
तेव्हा आपले अंतिम ध्येय काय, याचा विचार मासिकाचे नाव ठरवताना करावा लागला; आणि समाजाचे कल्याण हेच ध्येय ठरवून त्याला ’समाजस्वास्थ्य’ असे नाव दिले. पण समाजाचे कल्याण साधताना सत्याकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. कारण निसर्गाचे  नियम कोणालाही बाधत नाहीत; तेव्हा त्यांना धाब्यावर बसविण्याचा फोल प्रयत्न न करता त्यांचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हेच पाहणे जरूर आहे.
या मासिकाच्या सुरुवातीच्या अंकात त्याचा उद्देश पुढीलप्रमाणे दिला आहे :
‘‘व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे.’’ पण तरीदेखील या मासिकाबद्दल गैरसमज पसरलेला  आहे. ते कामविषयक बाबींनाच वाहिलेले आहे, अशा कल्पनेने कित्येक लोक वर्गणी भरतात आणि ती कल्पना चुकीची ठरल्यामुळे नंतर बंद करतात. कित्येक तर अशी तक्रार करतात, की ‘‘कामशास्त्र हा तुमचा विषय आहे. इतर विषयांत तुम्ही लुडबुड का करता?’’ पण वर दिलेला उद्देश पाहता समाजाच्या सुखाचा ज्यात संबंध येतो, असा कोणताही विषय वज्र्य समजता येत नाही हे उघड आहे. आणि प्रथमपासूनच हे धोरण ठेवलेले आहे. अगदी पहिल्या वर्षांचे अंक चाळले तरी त्यात सर्वच लेख कामविषयक नाहीत.
तथापि या मासिकाने कामविषयक लेखांस प्राधान्य दिलेले आहे, हे नाकबूल करता येणार नाही. हे प्राधान्य देण्याचे कारण एक तर शेकडा नव्वद लोकांना हा विषय वैयक्तिकदृष्टय़ा महत्त्वाचा वाटतो; मग ते तसे कबूल करोत वा न करोत! आणि दुसरे कारण असे, की बुद्धिप्रामाण्यवादी म्हणविणारे लोकसुद्धा या विषयात तर्कशुद्ध विचार करायला तयार नसतात; ते पारंपरिक कल्पनांनीच पछाडलेले असतात. कित्येक बुद्धिवादी मित्रांनी मला असे स्पष्ट सांगितले आहे, की ‘‘तुम्ही म्हणता ते सर्व खरे; पण माझी मुलगी अशा तऱ्हेने वागलेली मला खपणार नाही!’’ कित्येक तर असेही म्हणतात, की ‘‘तुम्हाला काय करायचे असेल ते खुशाल करा; पण असे बोलणे किंवा लिहिणे बरे नव्हे!’’
मुलांना कामविषयक शिक्षण द्यावे हे आज सर्वच शिक्षणतज्ज्ञ कबूल करतात. पण ‘‘माझी मुले आता मोठी होत आहेत, त्यांनी हे मासिक वाचावे हे मला बरे वाटत नाही,’’ म्हणून मासिक बंद करणारे अनेक वर्गणीदार मला भेटलेले आहेत. याचा परिणाम मात्र नक्की असा होतो, की ज्या मुलांनी ते वाचू नये म्हणून बाप बंद करतो, ती मुले कसेही करून ते वाचतातच! अमुक वाचू नये असे मुलांना सांगितले की त्याचा हा ठरलेला परिणाम आहे, हे आई-बापांना अजून कळत नाही! वस्तुत: मुलांना कामविषयक लिखाण वाचू देण्यात कोणताही धोका नसतो. एका विशिष्ट वयापूर्वी ते त्यांना वाचावेसेच वाटते; तेव्हा त्यांना बंदी करण्यापासून कोणताच फायदा नसतो. याकरिता मुलांना कोणत्याही वाचनाची बंदी करू नये, असे मत बरट्रँड रसेलसारख्या विचारवंतांनी दिलेले आहे.
ही मुलांची गोष्ट झाली. पण कित्येक नवीन पिढीतील लोकदेखील आपल्या बायकांना अशाच तऱ्हेने वागवतात, हे कदाचित कोणाला खरेदेखील वाटणार  नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. एका सुशिक्षित विवाहित स्त्रीने मासिकाची वर्गणी भरली. परंतु दोन महिन्यांनी तिचे पत्र आले, की ‘‘मासिक यापुढे पाठवू नये. कारण यजमानांनी ते पाहिले की फाडून टाकतात, वाचू देत नाहीत. माझी वर्गणी फुकट गेली तरी चालेल; पण आपले अंक फुकट जाऊ नयेत अशी इच्छा आहे. हे असे असतील हे लग्नापूर्वी मला माहीत नव्हते.’’ असे विवाह सुखी होणे अशक्यप्राय आहे. हल्लीच्या तरुण पिढीतदेखील स्वत: वेश्यांकडे जाणारे नवरे बायकांना वाचता येत असले तरी वाचू देत नाहीत, कोणालाही पत्र लिहू देत नाहीत, घराबाहेर एकटीला जाऊ देत नाहीत. तितकेच काय, पण खिडकीशीदेखील बसू देत नाहीत. कारण खिडकीशी बसणे म्हणजे वेश्यांचे अनुकरण आहे! हे नवरे अडाणी नसतात; पण अधिकार गाजविण्यातच त्यांना मोठेपणा वाटतो! कारण मनाचा मोठेपणा त्यांच्या अंगी नसतो. अशा वागणुकीचे परिणाम मात्र विपरीत होतात, हे त्यांना दिसत नाही. अशा बायका पळून गेल्या तर त्यांना कोणीही दोष देणार नाही.
ही स्थिती जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत या मासिकाचे काम अजून संपलेले नाही हे उघड आहे. हे मासिक पैशाच्या दृष्टीने कधीच यशस्वी झालेले नाही. तथापि मध्ये चार-पाच वर्षे निदान त्याचा खर्च तरी निघत होता; पण तोदेखील मी एकटा मासिकाचे सर्व काम करीत असल्यामुऴे  बुरसट, सनातनी लोकांचा या मासिकावर प्रथमपासूनच राग आहे. आणि त्यांच्याच चिथावणीने मासिकावर आजपर्यंत तीन खटले झाले. पहिला खटला १९३१ मध्ये ’शुक्ल यजुशाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मणसभा, पुणे’ या संस्थेने विनंती केल्यावरून केला होता. सुमारे सत्तर वर्षांमागे ब्रॅडलॉ व अ‍ॅनी बेझंट यांजवर इंग्लंडात जो खटला झाला होता, त्याच स्वरूपाचे मजवरचे सर्व खटले होते. म्हणजे माझी मते पसंत नसल्यामुळे ते खटले केलेले होते. पण मत हा गुन्हा होत नसल्यामुळे कोणत्या कायद्याखाली खटला करावा ही अडचण होती; आणि लेखात एकही ‘अश्लील’ शब्द नसताना हे खटले अश्लीलतेच्या कायद्याखाली झाले! कारण तो कायदाच असा आहे, की त्याला कोणताही पुरावा लागत नाही. मॅजिस्ट्रेटाने म्हटले की, कोणताही लेख अश्लील ठरतो आणि शिक्षा करता येते. पहिल्या खटल्यात सरकारी वकिलांची इतकी तिरपीट उडाली, की लेखात काहीतरी अश्लील आहे असे दाखवण्याकरिता त्याला ’वेश्या’ हा शब्द अश्लील आहे असे म्हणावे लागले! विद्वान मॅजिस्ट्रेटांचीही अशीच तिरपीट उडाल्यामुळे ते म्हणाले, की ‘‘श्रीकृष्णाची चेष्टा करणे हे माझ्या मते अश्लील आहे.’’ आणि त्यांनी शंभर रुपये दंड केला. ही युक्ती चांगलीच सापडल्यामुळे दुसरा खटला १९३३ साली मासिकाच्या गुजराती आवृत्तीवर झाला. यात या मॅजिस्ट्रेटाने दोनशे रुपये दंड केला; आणि ‘‘त्यावर अपील करता यावे म्हणून दंड रु. २०१ करावा,’’ अशी विनंती केली असता मॅजिस्ट्रेटाने ते मान्य केले नाही. यावरून मॅजिस्ट्रेटांना न्यायाची किती काळजी असते हे सहज दिसते. दोनशे रुपये दंड त्यांच्या अधिकारातला होता. जास्त केल्यास वरिष्ठ कोर्टात अपील चालून कदाचित आपला निकाल फिरेल, ही त्यांना भीती होती. तेव्हा हा धोका का पत्करा, असा पोक्त विचार मॅजिस्ट्रेटाने केला. अर्थात तरीदेखील मी फेरतपासणीचा अर्ज केलाच. परंतु मॅजिस्ट्रेटांच्या अधिकारातला दंड केलेला असता त्यात ढवळाढवळ करू नये, असे चीफ जस्टिस बोमंट यांचे म्हणणे पडल्यामुळे तो विचारातच घेतला नाही आणि डॉ. आंबेडकरांसारख्या वकिलाचेही तेथे काही चालले नाही. तिसऱ्या खटल्यात मात्र मॅजिस्ट्रेट वेगळे असल्यामुळे मी दोषमुक्त झालो. मागील अनुभवावरून यावेळी मी वकील दिलाच नव्हता.
दुसऱ्या खटल्याच्या वेळी मी व्यापारी कंपनीतील नोकरी सोडली होती आणि मासिकात तर नुकसानच येत होते. आणि दुसऱ्या खटल्याचा खर्चही फार झाला. मला यावेळी पैशाची मदतही काही मित्रांनी केली; पण मुख्य भार अर्थात मलाच सोसावा लागला. मदत करणाऱ्यांपैकी एक गृहस्थ आय. सी. एस. असून पहिल्या खटल्याच्या वेळी ते स्वत: सेशन जज्जांचे काम करीत होते. खटला झाला असे ऐकल्याबरोबर त्यांनी पंचवीस रुपयांचा चेक पाठवला. ते प्रथमपासून मासिक वाचीत होते आणि खटल्यात काही अर्थ नाही, हे त्यांना माहीत होते.
आणखीही अनेकांनी वेळोवेळी मदत केली आहे. तथापि मदतीची मागणी कधीही करायची नाही, असा नियम मी आजपर्यंत पाळला आहे. होईल ते नुकसान सोसण्याची आणि मासिकाचे काम करण्याची ताकद आहे तोपर्यंत ते चालू ठेवण्याचा बेत आहे. कोणी काहीही म्हटले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे- मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत! ‘सर्वे२पि सुखिन: संतु। सर्वे संतु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तु नकश्चिद् दु:खभाग् भवेत।’ या ध्येयाकरिता माझ्या अकलेप्रमाणे मी काम करीत राहणार. मग लोक काहीही म्हणोत!
(मनोहर, जानेवारी १९४६)
‘असंग्रहित र. धों. कर्वे’मधून साभार