|| अतुल देऊळगावकर 

अरण्यामधील वयोवृद्ध व विशाल वृक्षास ‘मातृवृक्ष’ अशी संज्ञा देण्यात आली आहे. मातृवृक्ष हे अरण्यातील साहचर्य जपण्यात मुख्य भूमिका पार पाडतात. प्रकाश संश्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले मातृवृक्ष मातीमधील कर्ब धरून ठेवणे, नत्रपुरवठा करणे, पाण्यास प्रवाही ठेवणे अशी महत्त्वपूर्ण कार्ये करतात. अरण्यांना अनेक कठीण प्रसंगांतून सावरण्याची भूमिका पार पाडणाऱ्या मातृवृक्षांना जिवापाड जपणं, हे मानवजातीचं आद्य कर्तव्य आहे.

‘‘आदिवासी कला ही सजावटीसाठी, रसिकतेचं वा माणुसकीचं प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त बाब आहे. पण ती कला जपणाऱ्या हाडामांसाच्या माणसांचं काय? आम्हाला कधीतरी बोलू द्या. आमची कैफियत ऐकून घ्या…’’ असं पंचवीस वर्षांची अभिनेत्री के. सारा बोलत होती. व्हिएन्ना येथील विनर फेस्टोचे आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचं ऑनलाइन उद्घाटन ब्राझीलमधील आदिवासी साराच्या हस्ते झालं. ती गीत, लेखन व  नाटकांतून सदाहरित अ‍ॅमेझॉन अरण्याच्या विनाशामुळे तिथल्या आदिवासींची होत असलेली दैना व्यक्त करत असते. आदिवासींच्या हक्कांसाठी निर्भयपणे लढणारी ही तरुणी संपूर्ण जगाला सांगत होती- ‘‘अ‍ॅमेझॉनच्या अरण्यावर आणि रहिवाशांवर अनन्वित अत्याचार चालू आहेत. करोनाच्या काळात वैद्यकीय उपचार देतानासुद्धा भेदभाव होतोय. असं का होत आहे, याचे परिणाम काय होणार आहेत, हे आम्ही जाणून आहोत. हा वेडाचार तत्काळ थांबला पाहिजे…’’ असा घणाघात करून पुढे ती म्हणाली, ‘‘अ‍ॅमेझॉन = सोन्याची खाण = संपत्तीची निर्मिती… म्हणजे ‘जीडीपी’त भरघोस वाढ. ‘विन-विन’… ‘सर्वांना लाभच लाभ!’ अशीच कथनं जगभर पसरवलेली व जगाने स्वीकारलेली आहेत. जंगलांच्या कत्तलींमुळे येणाऱ्या आपत्ती, त्यामुळे होणारी बेसुमार हानी यांचं कधीही मोजमाप होत नाही. ते सोयीचं नाही. अनमोल वनसंपदा खरवडून  शतकानुशतके इथे राहणाऱ्या आदिवासींना हुसकावण्याचा कार्यक्रम अविरत चालू आहे. जंगल व तिथले स्थानिक ही आधी परकीय व नंतर भूमिपुत्रांची वसाहतच राहिली आहे. परंतु याविषयी कुठेही संताप दिसत नाही. सर्वदूर जीवघेणी शांतता पसरली आहे.’’

ब्राझील व युरोप यांच्या सहकार्यातून सोफोक्लिस यांच्या ‘अँटिगनी’ (इ. स. पूर्व ४४१) या अभिजात नाटकाची निर्मिती होत असून त्यात सारा सहभागी आहे. या ग्रीक नाट्यात राजा इडिपसच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पॉलिनायसिस राज्यावर येतो. दुसरा मुलगा इटोक्लिस बंडाळी घडवतो व त्यात दोघेही मारले जातात आणि त्यांचा काका क्रिऑन सत्ता काबीज करतो. क्रिऑन इटोक्लिसला देशभक्त ठरवतो आणि ‘पॉलिनायसिस हा देशद्रोही असून त्याच्या मृतदेहावर अंत्यक्रिया करायच्या नाहीत,’ असा आदेश देतो. पॉलिनायसिसची बहीण अँटिगनी सत्तेच्या विरोधात जाऊन अंत्यसंस्कार करते. या नाटकात अँटिगनीची भूमिका स्वत: सारा करणार होती.

गेले वर्षभर करोना प्रचंड वेगाने पसरल्यामुळे २१ कोटींच्या ब्राझीलमध्ये सुमारे ४.५ लाख लोक बळी गेले आहेत. वैद्यकीय सुविधा व उपचार यांच्या अभावी अ‍ॅमेझॉनमधील रहिवाशांचे झपाट्याने मृत्यू होत आहेत. त्यांच्या अंत्यक्रियेसाठीही सवड मिळत नसल्याने मृतांचं सामूहिक दफन करावं लागत आहे. अनेकदा कित्येक शव रस्त्यामध्ये पडून असतात. या ‘सुसंधी’चा फायदा घेत अनेक उद्योग जंगलात घुसून सुरक्षित ठेवलेल्या जागा बळकावत आहेत. २०१९ मध्ये सत्ताग्रहण केल्यापासून अ‍ॅमेझॉनच्या जंगलात सर्व उद्योगांना मोकाट रान देणारे ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सॅनेरो या आपत्तीमध्ये मृतांची कुचेष्टा व टवाळी करत आहेत. ते करोना- बळींविषयी विचारणा झाल्यास ‘एवढं काय त्यात?’ असा उन्मत्त सवाल करू शकतात. मूळ विषय दुसरीकडेच नेताना ‘ब्राझीलला परकीयांची वसाहत करण्याचा डाव हाणून पाडू,’ अशी गर्जना ते करतात. या पार्श्वभूमीवर सारानं हे नाटक अ‍ॅमेझॉनच्या अरण्यात सादर करण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु करोनामुळे ते शक्य झालं नाही. २०२० च्या ऑक्टोबरमधील साराच्या व्याख्यानात असे अनेक संदर्भ दडले आहेत.

अमेरिकेतील किरकोळ विक्री करणाऱ्या ‘वॉलमार्ट’, ‘कॉस्टको’ व ‘क्रोगर’ या बलदंड साखळी कंपन्यांची एकत्रित विक्री ५०,००० कोटी डॉलर्स एवढी आहे. या कंपन्या सातत्यानं ब्राझीलमधून प्रचंड मांस आयात करतात. ब्राझीलचे उद्योगपती जोसले बॅटिस्टा सोब्रिन्हो  यांची ‘जे. बी. एस.’ ही सर्व प्रकारच्या मांसाचं उत्पादन करणारी जगातील अजस्र कंपनी आहे. त्यांची जगात १५० ठिकाणी उत्पादन केंद्रं आहेत. ‘जे. बी. एस.’ कंपनीला कोंबड्या, वराह व इतर मांसनिर्मितीसाठी दरवर्षी ३०० चौ. कि. मी.वरील अरण्य साफ करावं लागतं. ते अ‍ॅमेझॉनमध्ये सहज उपलब्ध असतं.

कोंबड्या व वराह यांचे प्रमुख खाद्य प्रथिनयुक्त सोयाबीन असल्यामुळे ब्राझील, अर्जेंटिना व अमेरिकेत त्याची मागणी वाढतेच आहे. २००६ मध्ये अमेरिकेतील ‘कारगिल’, ‘बुंगे’ व ‘कॉफ्को’ या धान्यविक्रीतील मक्तेदारी असणाऱ्या कंपन्यांनी अ‍ॅमेझॉनचं जंगल वाचविण्यासाठी ‘बेकायदेशीररीत्या जंगलतोड करून लागवड केलेल्या सोयाबीनची खरेदी करायची नाही’ असा ‘सोयाबीन अधिस्थगन करार’ केला होता. या कराराचं तंतोतंत पालन करताना या तीन कंपन्या ‘फिआग्रिल’ या चिनी कंपनीकडून सोयाबीन खरेदी करतात. आणि त्या चिनी कंपनीला ब्राझीलमधून सोयाबीन पुरवठा होतो. सर्व प्रकारचे मतभेद बाजूला सारून व्यापारास लाभणारं हे असं ‘बहुराष्ट्रीय’ सहकार्य वाखाणण्याजोगं व थक्क करणारं असतं!

२०१३ ते २०१९ या सहा वर्षांत लॅटिन अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया व आफ्रिकेत दरवर्षी ४५ लाख हेक्टर अरण्याचा विनाश झाला. २०१९-२० साली ऑस्ट्रेलियातील एक कोटी हेक्टर, अ‍ॅमेझॉनमधील नऊ लाख हेक्टर, तर इंडोनेशिया, सायबेरिया व कॅलिर्फोनियामधील दोन लाख हेक्टरवरील जंगल जळून खाक झालं होतं. कुठे लागलेली आग ही नैर्सिगक होती. मात्र, अनेक ठिकाणी जागा रिकामी करण्यासाठीच आगी लावल्या होत्या. थोडक्यात, मागील दहा वर्षांत जगभरातील ग्राहकांच्या मांस, सोयाबीन, पाम तेल व कोको यावरील उड्या वाढत गेल्या, त्या प्रमाणात जगातील जंगल नष्ट होत गेलं. ‘तुमच्या ताटात मिष्टान्न पोहोचवण्यासाठी आमचा भूभाग व आमचं जीवन उद्ध्वस्त केलं जात आहे…’ हा साराच्या कहाणीचा मथितार्थ आहे. म्हणून सारा हा जगातील मूक आदिवासींचा खणखणीत हाकारा ठरत आहे. (पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केव्हाच सांगून ठेवलं आहे की, ‘सर्वभक्षक ही एक निरंकुश आघाडी आहे. निसर्ग लुटणाऱ्या उद्योगांना बेसुमार लाभ देण्यासाठी राज्यकर्ते तत्पर असतात आणि हे लाभ पोहोचवण्यासाठी नोकरशाही सज्ज असते. साधनसंपदा गेल्यामुळे भूमिहीन, अल्पभूधारक, ग्रामीण कारागीर, पशुपालक, छोटे कोळी, भटके व आदिवासी यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. सध्या भारतातील ५/६ जनता ही दारिद्य्राच्या महासागरात असून, त्यात १/६ सर्वभक्षकांची ऐश्वर्याची बेटे आनंदाच्या तरंगात आहेत.’)

२०१३ साली एका वैज्ञानिक परिषदेत वाढतं कर्बउत्सर्जन व हवामानबदलाचे परिणाम अभ्यासणारे हिमनदी तज्ज्ञ जेसॉन बॉक्स यांच्या शोधनिबंधाचं शीर्षक होतं- ‘पृथ्वीवर बलात्कार होत आहे’! असभ्य वाटणाऱ्या या वास्तवदर्शी  प्रतिपादनाशी अनेक वैज्ञानिक आता सहमत होत आहेत. ‘जीवसृष्टीतील दहा लाख प्रजाती लुप्त होण्याच्या बेतात आहेत. मानवजातीला याचे महाभयंकर परिणाम भोगावे लागतील…’ असं  २०१९ च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जीवविविधता अहवालात म्हटलं होतं. ‘जगाची उलथापालथ करणारा करोना ही निसर्गविनाशामुळेच ओढवून घेतलेली आपत्ती आहे. सध्याची मानवी वाटचाल निसर्गाच्या अंताकडे आहे…’ असं आता अनेक वैज्ञानिक वारंवार बजावताहेत. या पार्श्वभूमीवर ‘संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण प्रकल्पा’ने यंदाच्या पर्यावरणदिनी ‘पर्यावरण यंत्रणा संवर्धन दशका’चा आरंभ करण्याचं ठरवलं आहे. चालू दशकात या संकल्पनेला किती प्रमाणात वास्तवात आणता येतं यावर या शतकाचं आणि पृथ्वीचं भवितव्य अवलंबून आहे.

अशा विनाशपर्वात निसर्गातील अनेक रहस्यांचा शोध घेण्यासाठी कित्येक शास्त्रज्ञ आयुष्यभर आटापिटा करत आहेत. अरण्य पर्यावरणशास्त्रज्ञ प्रो. डॉ. सुझान सिमर्ड या ४० वर्षांपासून वृक्षांच्या सहजीवनाचा अभ्यास करत आहेत. पीटर वोल्हेबेन यांची ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज्’ व रिचर्ड पॉवेर्स यांची कादंबरी ‘द ओव्हरस्टोरी’ (पुलित्झर पुरस्कारविजेती ) यातील मध्यवर्ती कल्पना सिमर्ड यांच्या संशोधनातूनच साकारली आहे. या मांडणीतूनच जेम्स कॅमेरॉन यांना ‘अवतार’ चित्रपटाची प्रेरणा मिळाली होती.

प्रो. सिमर्ड यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या  ‘फार्इंडग द मदर ट्री : डिस्कव्र्हंरग द विस्डम ऑफ द फॉरेस्ट’ या पुस्तकात त्या म्हणतात, ‘‘अरण्य म्हणजे एकलकोंड्या, एकेकट्या वृक्षांचा समूह नसून ते असंख्य प्रकारच्या जिवांचं जाळं आहे. ती आंतरसंबंध उत्क्रांत होत जाणारी जीवसंपदा आहे. अरण्यातील वृक्ष व वनसंपदा यांच्यामध्ये स्पर्धा वा चढाओढ नसून त्यांच्यात कमालीचं सहकार्य असतं. वृक्षांकडे मेंदू नसतो, परंतु मातीत पसरलेली रसायनं हेच त्यांच्यासाठी मज्जातंतूंचं जाळं (नेटवर्क) असतं. तर वृक्षांच्या मुळांवर कवकांचं जे जाळं असतं, त्यातून माहितीची देवाणघेवाण होत असते. या काष्ठजालाच्या साहाय्याने (वुड वाइड वेब) वृक्ष एकमेकांशी संपर्क साधून वसाहतीने नांदत असतात. वृक्षांना आपल्या पिलांच्या अवस्थेची जाणीव असल्यामुळे बाल्यावस्थेत अन्नपुरवठा करून ते त्यांना जपत असतात. वृक्ष एकमेकांना जीवनसत्त्व पुरवतात. कीड वा पर्यावरणीय संकटाची जाणीव करून देतात. परस्परावलंबन, साहचर्य व सहजीवन हे अरण्यांचं असामान्य वैशिष्ट्य आहे. ’’

(निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांनी निसर्गावर अनेक बंदिशी रचल्या. चैत्रातील कर्डुंनबाचा बहर व घमघमाट पाहून त्यांनी ‘निमोरी का मौरा है रे’ असं सुंदर वर्णन केलं होतं. ते म्हणत, ‘‘झाडांना पाहावं ते एकत्रच! वनराई, आमराईतील झाडं समूहात असल्यामुळे मजेत असतात. त्यामुळे ते मस्त बहरतात. एकटे असले की ते केविलवाणे वाटतात.’’ सूक्ष्म निरीक्षण असणाऱ्या कवी व तत्त्वज्ञांचं संपूर्ण निसर्गावर प्रेम होतं. त्यांना निसर्गात परस्परसंवाद असल्याची जाणीव होती. आता विज्ञान त्याचे पुरावे देत आहे.)

संपन्न जीवविविधता ही अरण्यांची शक्ती असून, त्यामुळे अरण्यांना स्थैर्य येते आणि संकटांचा सामना करून पूर्वपदावर येण्याची त्यांची क्षमता वाढते. अरण्यात विविध प्रजाती कमालीच्या समन्वयाने राहत असतात. त्यातून त्यांची सामूहिक शक्ती (सिनर्जी) देणारी यंत्रणा निर्माण होते. नत्र स्थिर करून इतरांना अन्न देणाऱ्या वनस्पतीला पाण्याची निकड असते. खोलवर मुळे गेलेले वृक्ष त्यांना पाणी उपलब्ध करून देतात. अशा परस्परावलंबनातून पर्यावरणीय यंत्रणा उन्नत होत जाते.

सर जगदीशचंद्र बसू यांचा वारसा पुढे नेणाऱ्या सिमर्ड यांनी कार्बनच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करून मातीमधील माहिती व संपर्कांचा अभ्यास केला. त्यांच्या सत्यशोधन यात्रेतून आपल्या आकलनशक्तीपलीकडील अनेक वृक्षरहस्ये उलगडली जात आहेत. अरण्यामधील वयोवृद्ध व विशाल वृक्षास सिमर्ड यांनी ‘मातृवृक्ष’अशी संज्ञा दिली आहे. ‘‘मातृवृक्ष हे अरण्यातील साहचर्य जपण्यात मुख्य भूमिका पार पाडत असतात. प्रकाश संश्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले मातृवृक्ष मातीमधील कर्ब धरून ठेवणे, नत्रपुरवठा करणे, पाण्यास प्रवाही ठेवणे अशी महत्त्वपूर्ण कार्ये करत असतात. अरण्यांना अनेक कठीण प्रसंगांतून सावरण्याची भूमिका पार पाडणाऱ्या मातृवृक्षांना जिवापाड जपणं, हे मानवजातीचं आद्य कर्तव्य आहे. मातृवृक्षांची अरण्यामधील कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी सिमर्ड यांनी अमेरिका-कॅनडातील ९०० कि. मी. परिसरावर असलेल्या अरण्यांतून ‘मातृवृक्षांची शोध मोहीम’ हा प्रकल्प सुरू केला आहे.

याच काळात शतकानुशतकांपासून चालत आलेल्या अरण्यांतील जैविक जाळ्यांना संपवून टाकण्याच्या उद्योगांचा वेगही वाढतच चालला आहे.  हवामानबदल व जंगलविनाशाच्या धोक्यांपासून स्वत:चा बचाव करणं वृक्षांना अशक्य होत आहे. जंगलांमधील भुंग्यांसारख्या कीटकांच्या अनेक प्रजाती नामशेष होत असल्यामुळे जंगलातील कीड वाढून वृक्ष दगावत आहेत. जंगल हे बाष्पोत्सर्जन करून पावसाला हातभार लावतं. तसंच ते कार्बन वायू शोषून आपत्तीरोधक संरक्षक कवचसुद्धा होत असतं. मानवजातीला अनेक आपत्तींपासून वाचवणाऱ्या अरण्यांना वाचवण्यासाठी आता जनतेनंच सरसावणं आवश्यक आहे.

‘निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र’ समजावून सांगणारे डॉ. पवन सुखदेव म्हणतात,‘‘जगातील १२०कोटी लोकांचं अन्न, औषध, जळण व रोजगार- म्हणजेच संपूर्ण जीवन पर्यावरणीय व्यवस्थेवर अवलंबून आहे. समाज व निसर्ग यांचं आदिकालापासून घट्ट व जिवाभावाचं (सेंद्रिय) नातं आहे. देवराईला स्पर्शसुद्धा न करण्याचं शहाणपण हे त्यातूनच आलेलं आहे. लाभ-हानी, आनंद-दु:ख यांच्या बाजारपेठेतील अत्यंत चुकीच्या संकल्पनांचा प्रसार करणारं शिक्षण हा निसर्गाचे मोल समजून घेण्यातील मोठा अडथळा आहे. बेजबाबदार दूरचित्रवाणी वाहिन्या व उथळ सामाजिक माध्यमवीर यांमुळे नको त्या शिक्षणाचाच प्रसार होत आहे.’’  शाश्वत विकासाचे भाष्यकार प्रो. सर पार्थसारथी दासगुप्ता यांनी, ‘‘सदाहरित अरण्ये व महासागरांसारख्या जागतिक संपदांचं नियमन आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावं. पर्यावरण यंत्रणांचं संरक्षण करण्यासाठी गरीब देशांना निधी दिला पाहिजे,’’ असं सांगितलं आहे. शाश्वततेचे तत्त्वज्ञ प्रो. ग्लेन अलब्रेख्त यांना जगाच्या नवीन रचनेसाठी नवी दृष्टी देणारी ‘सहजीवनशास्त्र (सिम्बायॉलॉजी)’ ही ज्ञानशाखा विकसित करण्याची निकड वाटते. ‘‘स्थानिक ते जागतिक पातळीवरील मनुष्य व पर्यावरणीय यंत्रणा यांमधील खोलवर परस्परसंबंध समजून घ्यावेत, निसर्गाला हानी पोहोचविणाऱ्या सर्व प्रदूषक घटकांचा अंत घडवावा आणि विश्वनाश रोखण्यासाठी जागतिक यंत्रणा व  प्रशासन आणावं,’’ असं ते सुचवतात.

मनुष्यप्राणी हा निसर्गातील एक चिमुकला घटक आहे. माती व जीवसंपदा यांच्या कित्येक गूढांचं आकलन आपल्याला अजूनही झालेलं नाही. हे समजून न घेता चालवलेला निसर्गाचा विध्वंस मानवजातीच्या मुळावर उठत आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं वस्तुकरण करत सुटलो आहोत. मानवी नातं, भाषा, कला या सर्वांकडे पाहताना सर्वत्र उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. या विखंडित वृत्तीतून हे ऱ्हासपर्व आलेलं आहे. कलावंत, तत्त्वज्ञ व विविध ज्ञानशाखांमधील वैज्ञानिक सर्जन पावत जाणाऱ्या निसर्गास उमजून घेण्यासाठी माणूस आणि निसर्ग यांच्यात झालेली फारकत नाहीशी करणं अनिवार्य आहे याचं भान वारंवार आणून देत आहेत. हा समग्र विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तशा प्रकारचं बालशिक्षण आवश्यक आहे. या दिशेने स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, जर्मनी, ऑस्ट्रिया, इतर युरोपीय देश, सिंगापूर, जपान अशा अनेक देशांत बालशिक्षणाला अतिशय प्राधान्य दिलं जात आहे. २००६ साली स्वीडनने बालकांच्या हक्कांना विशेष मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली. ‘स्वीडिश समाजाचा पाया असलेल्या मानवी हक्क आणि लोकशाहीच्या मूल्यांविषयी आदर निर्माण व्हावा, प्रत्येक व्यक्तीमधील गुणांविषयी आणि आपणा सर्वांना सामावून घेणाऱ्या पर्यावरणाविषयी आदरभाव निर्माण व्हावा, मानवी आयुष्य हे अमूल्य आहे, प्रत्येकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य व प्रतिष्ठा यांची जपणूक व्हावी, सर्व व्यक्तींना समान वागणूक मिळावी, लिंगभेद न मानता समानता आणि दुबळ्या व अक्षम व्यक्तींविषयी समभाव ही मूल्यं बालवाडीतच रुजावीत…’’ हा स्वीडिश शिक्षणाचा उद्देश आहे.  तिथं प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे हे सातत्याने कृतीतून दाखवलं जातं. त्यामुळे मुलं चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य यांतील फरक व प्रत्येक गोष्टीमागील कारणांचा विचार करतात. मुलं स्वत:हून चांगल्या सवयींचा स्वीकार करतात. चॉकलेट, फास्ट फूड, शीतपेयं हे सारं आरोग्यास कसं घातक आहे, रस्त्यावरचा सिग्नल तोडणं कसं घातक आहे, कचरा फेकणं, पाणी व अन्नाची नासाडी करणं यामुळे किती प्रकारचे त्रास होतात याची जाणीव मुलांना  शिक्षणातून होते. सभ्यता व असभ्यपणा कशात आहे? विवेकी विचार कसा असतो? मतभेद व नाराजी कशी व्यक्त करावी, यामागील तारतम्य त्यांच्या लक्षात येतं. स्वीडनमध्ये  माणूस व निसर्ग या दोघांनाही महत्त्व आहे. निसर्ग आपल्याला काय देतो? तो का जपला पाहिजे? निसर्गाच्या विनाशामुळे आपत्ती कशा येत आहेत? कर्ब उत्सर्जनामुळे जगाच्या उष्णतेमध्ये कशी वाढ होत आहे? प्रत्येक कृतीमधून कार्बनची पदचिन्हे मोजता येतात… या बाबी त्यांना लहान वयातच समजतात. कमीत कमी कर्ब उत्सर्जन व्हावं अशी कृती आवश्यक आहे, हे मुलांच्या मनावर आपसूक बिंबवलं जातं, आणि ते स्वत:हून आवड-निवड ठरवू लागतात.

जीवसृष्टीशी थेट नातं असल्यामुळे ही मुलं अरण्याच्या होळीत जळणारी झाडं व प्राणी-पक्षी पाहून कासावीस होतात. ते निसर्ग वाचवण्यासाठी पराकाष्ठा करण्याचा निर्धार करतात. स्वत:च्या देशाला जाब विचारत न्यायालयाकडे धाव घेतात. अशी शिकवण असलेली पिढी साराचा उद्वेग समजून घेऊ शकेल. झाडांना मिठी मारावीशी वाटणं ही आतून आलेली भावना आहे. तसं नातं असेल तरच तशी कृती होऊ शकते आणि इतिहास घडतो, याची जाण या पिढीला येईल. यंदाचा पर्यावरण दिनाचा संकल्प या पिढीसाठी महत्त्वाचा आहे.

विनोबांनी पृथ्वीचा महिमा संस्कृत भाषेतून समर्थपणे व्यक्त कसा होतो, हे समजावून सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘‘ गुणसंपन्न पृथ्वीच्या एकेका गुणांसाठी एकेक शब्दयोजना आहे. पृथ्वी म्हणजे पसरलेली, धरा म्हणजे धारण करणारी, ऊर्वी म्हणजे विशाल, गुर्वी- वजनदार, क्षमा- सहन करणारी! ’’ कोणे एकेकाळी अशी शब्दरचना करणारं मन, तसं नातं व तशी संस्कृती आपल्याकडे होती. पृथ्वीचा योग हा दुर्मीळ हे समजून तसं वर्तन होतं. ‘पृथ्वी = भोगवस्तू’ हे समीकरण खोडून पुन्हा सुसंस्कृत व्हायचं असेल तर शिक्षणाचा उद्देश तसा असावा लागेल. परंतु ‘निसर्गास क:पदार्थ लेखत लाखो कोटींची अर्थव्यवस्था करणं’ हाच मुळात शिक्षणाचा हेतू असेल तर…?

atul.deulgaonkar@gmail.com