03 June 2020

News Flash

महामंदी.. दोनशे वर्षांपूर्वीची!

करोनामुळे जशी आज जागतिक महामंदी येऊ घातली आहे, तशीच मुघल साम्राज्याच्या पतनाच्या काळात  आग्रा शहरात महामंदी आली होती.

मंदी म्हणजे एखाद्या देशातील बऱ्याच भागांवर आलेले बेरोजगारीचे संकट.

नंदा खरे – nandakhare46@gmail.com

करोनामुळे जशी आज जागतिक महामंदी येऊ घातली आहे, तशीच मुघल साम्राज्याच्या पतनाच्या काळात  आग्रा शहरात महामंदी आली होती. त्यावेळचा कवी नजीर अकबराबादी याने त्या काळाचे जे वर्णन केलं आहे, त्यावर आधारित लेख.

करोनाची साथ संपेल. त्याआधी तिच्यावर थेट आणि अप्रत्यक्ष असा बराच खर्च होईल, जो पुढे अनुत्पादक समजला जाईल. हा रोग सार्स, मर्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू वगैरेंपेक्षा जास्त माणसे मारेल. पण तरीही ही साथ संपेलच. कोणतीही प्राणिजात आणि तिच्यावर जगणारा रोग हे लवकरच एक मांडवली करून समतोल साधतात. तसे झाले नाही तर प्राणी आणि रोगाणू दोन्ही मरून जातात! समतोलानंतर मात्र रोग ‘हात्तिच्या!’ म्हणून सोडून देण्याच्या दर्जाला पोहोचतो. जसा १९१०-२० मध्ये इन्फ्लूएन्झा फार मारक ठरला, विशेषत: भारतात. पण १९५० च्या सुमाराला तो परत आला तेव्हा तो सौम्य होता. तरीही आठवणींतून त्याच्याबद्दलची काळजी केली जाईच. एक कवन आठवते- (‘प्यासा’मधल्या ‘सर जो तेरा चकराए’च्या चालीवर)

‘डोके दुखते आधी / मग ताप अंगावरती

चढला ज्याला, समजा त्याला इन्फ्लूएन्झा झाला, इंन्फ्लूएन्झा झाला

या या या, सारे या / एपीसीच्या गोळ्या घ्या..’ वगैरे.

आज तर ‘जरा दोन दिवस फ्लूसारखे वाटत होतं’ म्हणणाऱ्या व्यक्तीवर ती अंगचोर असण्याचाच संशय घेतला जातो!

पण करोनाच्या साथीमुळे आणखी एका ‘साथी’दाराचा आपल्याला विसर पडतो आहे.. मंदीचा! मंदी, रिसेशन, डिप्रेशन, आर्थिक मरगळ वगैरे नावांनी ओळखला जाणारा हा प्रकारही माणसांसोबत फार वर्षे आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी अर्थमंत्री रेटून ‘मंदी? कुठे आहे मंदी?’ असे म्हणू शकल्या. आता तो मानसिक नकार देणं त्यांना जमणार नाही. आजची मंदी भारतापुरतीच सीमित नाही. ती करोनापेक्षाही अधिक वैश्विक आहे. पण ती भारत व तसल्या गरीब देशांना जास्तच जाणवेल.

मंदी म्हणजे..

मंदी म्हणजे एखाद्या देशातील बऱ्याच भागांवर आलेले बेरोजगारीचे संकट. इथे मुद्दाम सकल राष्ट्रीय उत्पादन ऊर्फ जीडीपी वगैरेशी संबंध जोडणे टाळले आहे, कारण माझ्या मते तरी तो प्रकार प्रश्न समजावून घेण्यात अडचणच उत्पन्न करतो. माझा एक तरुण मित्र त्याच्या ई-पत्रांच्या शेवटी सुरेश भटांच्या कवितेतल्या दोन ओळी लिहितो-

‘लाभू दे लाचार छाया मोठमोठय़ांना परंतु

तापल्या मातीत माझ्या घाम मानाने गळू दे’

माणसांना श्रमाचे, कामाचे वावडे नसते.. अगदी विदर्भ-मराठवाडय़ाच्या उन्हाळ्यातही. इतरांना कमी श्रमांत जास्त मिळते याचेही दु:ख तीव्र नसते. फक्त आपल्या श्रमांतून सन्मानाने उदरनिर्वाह व्हावा, हीच त्यांची इच्छा असते. बेरोजगारी म्हणजे उपयुक्त कामाचा तुटवडा, उपयुक्त काम शोधायला करावी लागणारी वणवण, त्यामुळे  होणारी भलीबुरी स्पर्धा आणि तिच्यातली लसलस.. वगैरे वगैरे. आणि समाजाचा मोठा भाग याने ग्रस्त झाला तर तो समाज आजारीच मानायला हवा.

महामंदी आणि मुघल साम्राज्याचा ऱ्हास

अर्थशास्त्राने बारकाईने तपासलेली मंदीची घटना म्हणजे  १९२९ साली अमेरिकेत सुरू होऊन जगभर पसरलेली ‘महामंदी’ किंवा ‘द ग्रेट डिप्रेशन’! त्यावेळी अमेरिका, युरोप आणि जपान या आर्थिक महासत्ता होत्या, तर इतर बहुतेक जग या लोकांच्या वसाहतींच्या रूपात होते. ही महामंदी हटवायला अनेक प्रकारचे, प्रचंड खर्चाचे प्रयत्न केले गेले. पण मंदी हे नाठाळ जनावर आहे. ते सहज नियंत्रणात येत नाही. मग आले दुसरे महायुद्ध. युद्धाचे काळ मात्र मंदीचे नसतात! एक तर लढायला आणि युद्धसामग्री उत्पन्न करायला खूप माणसे लागतात. दुसऱ्या महायुद्धात तर पुरुष पुरेनासे झाल्याने स्त्रियांनाही नोकऱ्या करू देणे सवयीचे झाले. अर्थातच मंदी हटली. बरे, युद्धकाळात थेट अस्तित्वाचा प्रश्न असल्याने सर्व समाज एकजुटीने वागतो. अशा अनेक कारणांमुळे १९२९ साली सुरू झालेली महामंदी १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाने संपवली.

पण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. युद्ध संपताना पृथ्वीवर सव्वादोन- अडीच अब्ज माणसे होती. आज सात अब्ज ऐंशी कोटी माणसे आहेत; म्हणजे तेव्हाच्या तिपटीहून जास्त. भारतापुरता विचार करायचा तर स्वातंत्र्य मिळताना बत्तीस कोटी असलेले भारतीय आज एक अब्ज अडतीस कोटीवर पोचले आहेत. तब्बल सव्वाचार पट. पृथ्वीची एकूण प्रजा नैसर्गिक साधनांच्या मर्यादा तोडू लागली आहे. अशा स्थितीत मंदी हटवणे अत्यंत अवघड होणार आहे. दुसरे म्हणजे युद्धे, संहारक साथी हे काही आर्थिक समस्यांवरचे ‘उपाय’ नाहीत. लोकांना रोजगार मिळावा म्हणून सैन्य वाढवणे कोणत्याही अर्थी शहाणपणाचे नाही.

गंमत म्हणजे भरपूर हाणामारीच्या युद्धकाळातही एक मंदीची घटना घडल्याचे उल्लेख आहेत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य मोडकळीला आले. आधी नादिरशहा आणि मग अहमदशहा अब्दाली या वायव्येकडून येणाऱ्या आक्रमकांनी हे साम्राज्य लुटले. पुढेही वेगवेगळे मांडलिक, मराठे वगैरे लोकांनी मुघल साम्राज्याचा ‘फुटबॉल’ केला. अखेर इंग्रजांनी त्याची जागा घेतली व त्याविरुद्ध एक मोठे स्वातंत्र्ययुद्ध होऊनही नव्वदेक वर्षांसाठी भारतात शांतता अवतरली, ती पारतंत्र्य सोबत घेऊन. या ऱ्हासकाळाची दखल घेणारा एक हिंदी-उर्दू कवी आहे नजीर अकबराबादी नावाचा. अकबराबाद म्हणजे आग्रा.

त्याचा काळ साधारण १७३५ ते १८३० समजला जातो. तो लोककवी किंवा शाहीर होता. सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यांवर तो काव्य करायचा. त्याच्या काही कविता तर माल खपवायला म्हटल्या जाणाऱ्या जिंगल्ससारख्याच आहेत. तिळाचे लाडू, काकडय़ा, मडकी, अस्वलाची पिल्ले घेऊन खेळ करणारा दरवेशी असल्या विषयांवरही नजीरच्या कविता आहेत. बाल्य, तारुण्य आणि म्हातारपण, बाळकृष्णाच्या लीला अशा विषयांवरही तो लिहीत असे. मृत्यू काय काय लुटून नेतो यावर एक ‘बंजारानामा‘ नावाची प्रसिद्ध कविताही नजीरच्या खात्यात आहे. ‘मुफ्लिस’ आणि ‘मुफ्लिसी’ हे शब्द त्याच्या कवनांत फारदा येतात. त्यांचे अर्थ आहेत- ‘दरिद्री व्यक्ती’ आणि ‘दारिद्रय़’! एकूण नारायण सुर्वे, शाहीर अमर शेख, ‘वासुनाका’कार भाऊ पाध्ये, ‘तोर्तिया फ्लाट’कार जॉन स्टाईनबेक वगैरेंशी नाते सांगणारा हा कवी होता. त्याची एक कविता थेट मंदीच्या विळख्यात सापडलेल्या आग्रा शहराबद्दल आहे. या सर्व काव्यांचा आधार घेत लोककलाकारांचे एक मोठे प्रेरणास्थान असलेल्या हबीब तन्वीर यांनी ‘आगरा बाजार’ नावाचे एक नाटक रचले होते; जे भारतभर भ्रमंती करून पुढे दूरदर्शनवरही दाखवले गेले होते.

बंद.. बंद.. बंद..

कवितेचे नाव आहे- ‘शहरे आशोब’! आशोब म्हणजे आरडाओरड, गोंधळ, दंगा, बंड. आणि यासोबत एक असंबद्ध वाटणारा अर्थही आहे.. डोळ्यांची सूज किंवा लालसरपणा! आपल्या शहरातल्या गोंधळाने क्रुद्ध-रुद्ध झालेल्या कवीचे रडून रडून डोळे सुजले असावेत.. किंवा मग निखाऱ्यासारख्या लाल डोळ्यांनी तो गोंधळ घालणाऱ्यांना भस्म करू पाहत असेल!

कविता शहराचा कारभार, शहराचे अर्थचक्र बंद पडण्याबद्दलची आहे. चांगली ३९ कडव्यांची.. प्रत्येक कडवे पाच ओळींचे.. अशी ऐसपैस कविता आहे ही. पहिल्या चार ओळींना एक यमक बांधते, तर पाचवी ओळ सगळ्या कडव्यांत ‘बंद’ने संपते. मुळात १८०० सालच्या आसपासची कविता- त्यातही लेखक उर्दूभाषी, पण आवर्जून स्थानिक हिंदी सामावून घेणारा, त्यामुळे हिंदी ‘कविता कोश’ आवर्जून नोंदतो की, काही शब्दांचे अर्थ शोधणे सुरू आहे! तेव्हा शब्दकोशाची फार गरज न पडता मराठी वाचकांना या कवितेची चव द्यायचा एक प्रयत्न करून पाहतो..

काही चमत्कारिक पेशे-बंदी नजीरच्या नजरेला पडते.. जसे विष उतरवणारे मांत्रिक.

‘मंतर तो जब चले कि हो पेट को आधार

जब मुफ्लिसी का सांप हो उनके गले का हार’

इतरांसाठी अन्न भाजणारे, नान-रोटय़ा शेकणारे बेकरीवाले आणि चणे-मुरमुरे भाजणारे पॉपकॉर्नवाले स्वत:लाच भाजू लागतात.

‘जलते है नानबाई तो भडभून्जे भूनते है’ असे आत्मघातकी प्रकार!

सोनेनाणे, धनदौलत संपल्याने ज्यांचे धंदे बसले अशांमध्ये चोरही होते. ‘जर’ म्हणजे सोने- ज्यावरून मराठी ‘जरीकाम’ येते.

‘कपडा न गठडी बीच ना थैले में जर रहा

खतरा न चोर का, न उचक्को का डर रहा

रहने को बिन किवाड का फूटा खंडहर रहा

आने से जो भी हो गए चोरो-चकार बंद’

ज्ञानदान, धर्म आणि श्रद्धा यांबाबतही त्याने म्हटलंय..

‘बाम्हन भी सर पटकते सब मंदिरों के बीच

आजिज है इल्मवाले भी अब मदरसों के बीच’

‘आजिज’ म्हणजे अजिजी करणारा. कारण माल घ्यायलाच कोणी नाही!

फार कशाला, ‘देवाच्या नावाने काही वाढा हो’ म्हणत भीक मागणारेही ‘नंतर ये’ असे ऐकून शरमिंदे होताहेत.

‘भूखे है कुछ भिजाईयो बाबा खुदा की राह

वां से सदा ये आती है ‘फिर मांगो’ जब तो आह

करते है अपने होट वो हो शर्मसार बंद’

बरे, काम नाही ही स्थिती सर्वच पेशांची आहे. आपण ‘डझनावारी’ म्हणतो तसे नजीर ‘छत्तीसो’ म्हणतो.

‘कूटे है तन लोहार तो पीटे है सर सुनार

छत्तीसो पेशेवालों का है कारोबार बंद’

आता छत्तीस पेशे जायबंदी झाले असतील तर ‘रेड लाइट एरिया’चे काय? तिथले लोक कसे मागे राहणार?

‘रोटी न पेट में हो तो शहवत कहां से हो

यां तक तो मुफ्लिसी है कि कसबी का रात को

दो- दो महिनों तक नहीं खुलता इजार बंद’

पोटात अन्न नाही, तेव्हा कामेच्छा (शहवत) कुठून होणार? आणि परिणाम म्हणून ‘कसबीं’चे विजारीचे बंद दोन- दोन महिने ‘सुटत’ नाहीत!

मग कवी तरी कवने कसा रचतो आहे?

प्रवाह तर मंदावलाच आहे. सुखन ऊर्फ कवनांचा कारभार बंद आहे, कारण तब्येत (स्वभाव) दिवस-रात्र विचारांत असते. तोंडात जीभ वारंवार अडखळते, कारण आग्य््रााच्या सृष्टीचा, खल्कचा रोजगारच बंद पडला आहे!

‘है अब तो कुछ सुखन का मेरे कारोबार बंद

रहती है तबअ सोच में लैलो-निहार बंद

हो किस तरह न मुंह में जुबां बार बार बंद

जब आगरे की खल्क का हो रोजगार बंद’

भावंडभाव मात्र शाबूत

पण नजीर आग्रावासीय लोकांत भेद करत नाही. अगदी वैऱ्यावर येऊ नये असा प्रसंग आहे याची त्याला जाण आहे.

‘मेहेनत से हाथ पांव के कौडी न हाथ आए

बेकार कब तलक कोई कजरे उधार खाये

देखू जिसे वो करता है रो-रो के हाय! हाय!

आता है ऐसे हाल पे रोना हमे तो हाय

दुश्मन का भी खुदा न करे कारोबार बंद’

पण त्याची सहानुभूती जागते आहे, कारण ज्यांच्यावर प्रसंग गुदरला आहे ते सारे आग्रेकर आहेत, कवीचे गाववाले आहेत, देशवासीय आहेत. (शब्दार्थ तुम्हीच शोधा.)

‘आशिक कहो, असीर कहो, आगरे का है

मुल्ला कहो, दबीर कहो, आगरे का है

मुफ्लिस कहो, फकीर कहो, आगरे का है

शायर कहो, नजीर कहो, आगरे का है

इस वास्ते यह उसने लिखे पांच चार बंद’

तर.. करोना हटल्यानंतर मंदी येईल. सरकार बरेचसे दरिद्री झालेले असेल. उद्योजक नवे प्रकल्प सुचूनही ते करायला धजणार नाहीत. नवतेच्या आकर्षणातून कृत्रिम प्रज्ञा व तत्सम नवी तंत्रज्ञाने स्वीकारली जातील. ती रोजगारांच्या मुळावर उठतील. सुशिक्षण- सर्वाना आग्रहाने दिले जाणारे सुशिक्षण हाच दीर्घकाळ लाभ देणारा मार्ग आहे, हे विसरले जाईल. सर्वाना शिक्षण द्यायला समता लागते; जे मूल्य आपण आजच विसरलो आहोत. स्वातंत्र्य- तेही मनमानी दर्जाचे- हे फार मोहक ठरू लागले आहे. पण स्वातंत्र्य, समता यांच्यात भावंडभाव असावा लागतो. धर्म, जात, प्रांत, वर्ग यांच्या सीमारेषा पुसणारा भावंडभाव आणि त्याची एक-शहरी आवृत्ती नजीर अकबराबादी दोनेकशे वर्षांपूर्वी सुचवून, ठसवून गेला. कृपया ऐका त्याचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 1:20 am

Web Title: two hundred years back recession dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : ..आणि मुंबईकर!
2 विश्वाचे अंगण : स्वप्नातच राहील का राणीची बाग?
3 सांगतो ऐका : मोझार्ट इफेक्ट सत्य आणि मिथक
Just Now!
X