मेधा कुळकर्णी

भारतात जुलै २०२२ मध्ये ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या १४ कोटी व्यक्ती होत्या. २०५० पर्यंत ही संख्या दुप्पट होईल. जेव्हा देश तरुणांचा असतो, तेव्हाच दीर्घ पल्ल्याचा विचार करून ‘हेल्दी एजिंग’ला पूरक धोरणं आखायची असतात, अनेक देशांनी ती आखलीत. आपण मात्र अजूनही याबाबत अज्ञानीच आहोत. सिंगापूर, इटलीतलं सार्डिनिया, जपानमधलं ओकिनावा, मेक्सिकोमध्ये मॉन्टेरी आणि नुएवो लिऑन, कॅलिफोर्नियातलं लोमा लिंडा यांच्याकडून धडा घ्यायची वेळ आली आहे, कारण या ‘ब्लू झोन’ गावां-शहरांत कुठेही वृद्धाश्रम नाही, कारण त्याची गरजच नाही.

एका ग्रीक माणसाची ही कहाणी. तो शहरात राहात होता. फुप्फुसाच्या कॅन्सरनं गाठलं तेव्हा तो ६६ वर्षांचा होता. आयुष्याचे काही महिनेच शिल्लक अशी स्थिती. त्यानं विचार केला की, आपल्या मूळ गावी जाऊन मरू. शहरातला पसारा आवरून तो कायमसाठी गावी गेला. त्याचा भोवताल बदलला. त्यानं जीवनशैली बदलली. आता त्यानं वयाची शंभरी ओलांडलीये. तो धडधाकट आहे. काम करतो, चालतो, फिरतो आणि गमतीनं म्हणतो, ‘‘मी मरायचंच विसरलो जणू.’’
अशांच्या मुलाखती, काही कहाण्या पाहायला मिळतात ‘Live to 100 – Secrets of the Blue zones ’ या नेटफ्लिक्सवर २०२३ साली प्रदर्शित झालेल्या माहितीपट मालिकेत. आपण स्वत:च्या मृत्यूचा विचार करायला धजत नाही. मृत्यूला रोखणं शक्यच नाही. पण चांगलं जगायचा प्रयत्न करणं नक्की शक्य आहे. ते कसं, ते ही मालिका सांगते.

हेही वाचा : अस्तित्वाचा तपास..

आरोग्य मिळवण्याच्या धडपडीत माणसं जे काही करतात ते नेमकं उलटं, चुकीचं असू शकतं. जगभरात २/३ माणसं हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यांसारख्या आजारांनी अकाली मृत्युमुखी पडतात. ओबेसिटीचा विळखा आहे. स्मृतिभंश (डिमेंशिया) ही आरोग्यक्षेत्रातली जागतिक आणीबाणी आहे. अमेरिकेत जिम्स, डायट प्लॅन्स, तरुण दिसण्याची, वाढलेल्या वयात लैंगिक क्षमता टिकवण्याची औषधं, शस्त्रक्रिया यांवर लोक लाखो डॉलर्स खर्च करतात. तरी अनारोग्य हा जगाला भेडसावणारा मोठा प्रश्न आहेच. यावर उपाय? Anti- aging पेक्षा healthy- aging, , निरामय वार्धक्य हा दृष्टिकोन बाळगणं, हा!
डॅन बटनर यांनी निर्मिलेली ही मालिका. डॅन हे अमेरिकन नॅशनल जिओग्राफिक फेलो,
न्यू यॉर्क टाइम्सचे ‘बेस्ट सेलिंग’ लेखक. संशोधक, शिक्षक, निर्माता, कथाकार आणि वक्ता आहेत. ते स्वत: उत्तम व्यायामपटू आहेत. त्यांच्या नावावर endurance cycling साठी तीन गिनीज रेकॉर्डस आहेत. लोक त्यांच्या मोहिमांचं अनुसरण करतात, हे लक्षात आल्यावर त्यांना एक कल्पना सुचली. जगात दीर्घायुषी माणसं जिथे आहेत, त्या ठिकाणांचा आणि त्या कारणांचा शोध घ्यायचा. नॅशनल जिओग्राफिकनं ही कल्पना साकारण्याला पाठबळ दिलं. रॉबर्ट केन हे सेंटर ऑन एजिंग, मिनेसोटा विद्यापीठ इथले लोकसंख्याशास्त्रज्ञ. केन यांना आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑन एजिंग ( NIA)) वॉशिंग्टन, डीसी इथल्या शास्त्रज्ञांना डॅन भेटले. या शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे काही ‘हॉटस्पॉट’ शोधले होते.
२००३ पासून डॅन बटनरनं लोकसंख्याशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, आहारतज्ज्ञ आणि विविध तज्ज्ञांसह आणखी शोध घेत दीर्घ आयुर्मानाच्या हॉटस्पॉट्सना भेटी देणं सुरू केलं. सिंगापूर देश, इटलीतलं सार्डिनिया, जपानमधलं ओकिनावा, मेक्सिकोमध्ये मॉन्टेरी आणि नुएवो लिऑन, कॅलिफोर्नियातलं लोमा लिंडा ही ती ठिकाणं, म्हणजेच ब्ल्यू झोन्स. इथे निरोगी म्हातारपण भेटतं.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वास्तव नावाची जादू

या सहा ठिकाणांच्या भटकंतीत लोकांशी गप्पा, स्थानिक जीवनशैलीचं निरीक्षण करताना चांगलं जगण्यात योगदान असणारे पाच समान धागे डॅनच्या हाती लागले. भरपूर नैसर्गिक हालचाली, शारीरिक कामं, चालणं, फिरणं, हातकाम, बागकाम, दिवसभर सक्रिय राहणं. त्याचबरोबर आराम आणि विरंगुळादेखील. योग्य आहाराची निवड, मोजकं खाणं-पिणं, नियंत्रण ठेवून खानपान आस्वाद, वनस्पती-आधारित आहारावर भर.
जीवनविषयक उमदी दृष्टी, जगण्याला मूल्यांचं अधिष्ठान, काही निश्चित हेतू असणं, त्याबाबतची स्पष्टता, ताणतणावाची पातळी कमी ठेवणं, आपण कुणाला तरी हवेसे आहोत, ही भावना. कुटुंब, घरातली तरुण पिढी, नातवंडं, अन्य नातलग, मित्र-मैत्रिणी या सगळय़ांचा सहवास, या समुदायांशी विश्वासाचं, प्रेमाचं नातं असणं. फक्त स्वत:पुरता विचार न करता समाजाचा भाग म्हणून जगणं, समाजाशी देवाण-घेवाण आणि समाजकल्याणासाठी योगदान. या पाच घटकांमुळे त्याने भेट दिलेल्या ठिकाणच्या स्त्री-पुरुषांना दीर्घायुष्य लाभलं आहे. मुख्य म्हणजे ही सर्व शंभरीच्या अल्याड-पल्याडची माणसं सक्रिय आहेत, आनंदाने जगत आहेत, हे पाहायला मिळतं. काही कुंटुंबांसोबत राहतात. काही एकएकटे आहेत. त्यांची काळजी शेजारीपाजारी घेतात. या ‘ब्लू झोन’ गावां-शहरांत कुठेही वृद्धाश्रम नाही. कारण त्याची गरजच नाही.

सिंगापूर हा जगातला सर्वाधिक निरोगी आणि दीर्घ आयुर्मानाचा देश. सिंगापुरी नागरिकांच्या चांगल्या आरोग्याचं बरंचसं श्रेय सरकारच्या लोककेंद्रित धोरणांना आहे. सिंगापूरचं धोरण अन्य देशांच्या सरकारांसाठी प्रेरणादायी आहे. सगळय़ात महत्त्वाचं असं की, योग्य धोरणांमुळे एकूणच रोगराई, अनारोग्य नियंत्रणात राहतं. त्यामुळे आरोग्ययंत्रणांवरचा ताण आणि खर्च दोन्ही कमी होतं. निरोगी जीवन जगण्याचे प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना मदत करणं हे सिंगापूर सरकारचं धोरणसूत्र आहे. कारण निरोगी नागरिक हा तिथे देशाचा ठेवा समजला जातो.
आरोग्यदायी निवडींना सरकार प्रोत्साहन देतं. उदाहरणार्थ, तपकिरी तांदूळ नागरिकांना प्रिय होण्यासाठी अनुदान, साखरमिश्रित थंड पेयांऐवजी आरोग्यदायी खाण्यापिण्याचा पर्याय देणारी दुकानं, फेरीवाले यांना पाठबळ, शहररचनेत चारचाकी गाडय़ांपेक्षा स्वस्त सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, चारचाकी गाडय़ांवर भरपूर कर, प्रत्येक वसाहतीत जागोजागी मोकळय़ा जागा, नागरिकांना व्यायाम, गप्पागोष्टी करण्यासाठी भरपूर सोयीसुविधा, सामाजिक संपर्क होईल अशा संधी वगैरे.

हेही वाचा : आठवणींचा सराफा : मी मराठी.. माळव्याचा!

सिंगापूर सरकार सोयीसुविधा पुरवण्याच्या पलीकडे जाऊन नागरिकांची कुटुंबीयांशी जवळीक वाढावी यासाठी काम करतं. माणूस बेट नाही, या भूमिकेतून तिथे २०१५ पासून सुरू झालेली ‘प्रॉक्सिमिटी हाऊसिंग ग्रँट’. कुटुंबांना एकमेकांच्या जवळ राहायला मदत करणारी. वृद्ध पालक आणि त्यांची मुलं यांना एकमेकांजवळ घरं विकत घ्यायला सवलत देणारी. कुटुंबातले सदस्य जवळजवळ राहिले की ते एकमेकांची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीचं सरकारचं काम कमी होतं, हा विचार यामागे आहे. धोरण आणि अंमलबजावणी यात जराही अंतर नाही, हे तिथल्या व्यवस्थेचं वैशिष्टय़. नागरिकांच्या व्यवहारांवर अतिनियंत्रण ठेवणारा देश अशीही सिंगापूरची कुख्याती असली, तरी त्यांनी आखलेली धोरणं अनुकरणीय आहेत, हे नक्कीच.
Live to 100 – Secrets of the Blue zones या मालिकेवर अमेरिकेची बदनामी करणारी, शाकाहाराची भलामण करणारी म्हणून टीका झाली आहे. तरीही, ही मालिका आरोग्यपूर्ण जगण्याची एक दृष्टी देते. तसं जगणाऱ्यांना आपल्याला भेटवते. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी युक्तीच्या चार गोष्टी सांगते.

आता, या युक्तीच्या गोष्टी म्हणजे मालिकेच्या शीर्षकात म्हटलंय, तसं खरोखर ‘सिक्रेट्स’ आहेत का? या आपल्याला माहीत नव्हत्या का? नक्की माहीत आहेत. भारतीय परंपरेत त्या होत्याच. खुद्द गांधीजी श्रमावर आधारित जीवनशैलीचा आग्रह धरत असत. त्यांचे आहारप्रयोगदेखील जगणं निरोगी व्हायला मदत करणारे. पण आपण ते सारं विसरतो आणि चंगळवादी म्हणून वर्णन केलं जातं, तशी शैली पटकन अंगिकारतो. या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपल्याला दररोज जाणवतात. यंत्रांमुळे आपले शरीरश्रम कमी झाले. आपण पुन्हा मागे जाऊन यंत्रं नव्हती त्या काळातलं आयुष्य जगू शकणार नाहीच. पण आज आपण जे जगतोय त्यात वर दिलेल्या पाच घटकांचा कसा समावेश करू शकतो, ते बघायला हवं. आपल्याला अगदी शतायुषी वगैरे नाही व्हायचंय, पण वार्धक्याच्या प्रवासात जास्तीत जास्त निरोगी आणि आनंदी राहाण्याचा प्रयत्न तर करू शकतो. ही मालिका तेच सांगते.

हेही वाचा : रंजक बालकथा

सध्या भारत हा तरुणांचा देश आहे. कारण ६० कोटींहून अधिक भारतीय १८ ते ३५ वयोगटातले आहेत. यातही ६५% तरुण ३५ वर्षांहून लहान वयाचे आहेत. २०४१ च्या सुमारास भारतात २० ते ५९ या वयोगटातल्या लोकांचं प्रमाण सुमारे ५९% पर्यंत पोचणार आहे. या तरुणाईचा लाभ देशाला २०५५-५६ पर्यंत मिळत राहाणार आहे. त्यानंतर देश प्रौढत्वाकडे झुकू लागेल. भारतात जुलै २०२२ मध्ये ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या १४ कोटी व्यक्ती होत्या. म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या १०.५ टक्के. २०५० साली ही संख्या दुप्पट होणार आहे. आणि या शतकाच्या अखेरीस, देशातील एकूण लोकसंख्येच्या ३६% पेक्षा जास्त वृद्ध लोक असतील, असा अंदाज आहे.

जेव्हा देश तरुणांचा असतो, तेव्हाच दीर्घ पल्ल्याचा विचार करून ‘हेल्दी एजिंग’ला पूरक धोरणं आखायची असतात, हे सिंगापूरच्या धोरणकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. सध्या आपल्याकडे १४ कोटी वृद्धांसाठीही धड धोरण नाही. वृद्धाश्रम हे काही वृद्धांच्या समस्येवरचं उत्तर नाही. आत्ताच्या तरुणांचा प्रवास वृद्धत्वाकडे होईल तेव्हाच्या व्यवस्थेचा विचार आजपासूनच सुरू करायला लागेल. या तरुणांनी आत्तापासूनच आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न केला आणि तसा भोवताल त्यांना उपलब्ध करून दिला तर त्यांचं वार्धक्य आरोग्याचं होईल. तसंच ते व्हायला हवं. ‘ब्लू झोन’ मालिकेने त्याची जाणीव करून दिली आहे.
medha@sampark.net.in