निखिल चोप्रा हे परफॉर्मन्स आर्टिस्ट आहेत. ‘परफॉर्मन्स आर्टिस्ट’साठी मराठीत प्रतिशब्दच वापरायचे, तर ‘सादरीकरण कलावंत’ असं काहीतरी म्हणावं लागेल आणि तसं म्हणण्यात अर्थ नाही. ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही दृश्यकलेच्या इतिहासात १९६० च्या दशकापासून रुळलेली आणि विकसित होत गेलेली संज्ञा आहे; तिचे अर्थ रंगमंचावरल्या (किंवा पथनाटय़ांसारख्या) ‘परफॉर्मन्स’पेक्षा नक्कीच निराळे आहेत. साधा आणि मूलभूत फरक असा की, रंगमंचावरला ‘परफॉर्मन्स’ (प्रयोग, सादरीकरण) हा तालमी करून मग सादर झालेला असतो; तर दृश्यकलेत ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही स्वतला पणाला लावून, प्रेक्षक किती वा कोण आहेत याचा विचार न करता काही (क्षण / मिनिटं / तास / दिवस अशा) कालावधीपुरतं त्या प्रयोगातच जगण्यासाठी केला जातो. यीव क्लां (यीव्हज क्लाइन) किंवा जोसेफ बॉइस या युरोपीय दृश्यकलावंतांनी १९६२-६५ मध्ये जेव्हा त्यांचे गाजलेले परफॉर्मन्स केले, तेव्हा त्यांना ‘अ‍ॅक्शन’ म्हणून ओळखलं जात होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हापासून आजतागायत, परफॉर्मन्स आर्टकडे नेहमीच थोडं संशयानं पाहिलं जातं.. ‘ही कला म्हणावी काय?’ (इज इट आर्ट) हा आक्षेपवजा संशय तर आजकालच्या किंवा समकालीन ठरणाऱ्या कलाकृतींच्या संदर्भात नेहमीचाच. पण इथे परफॉर्मन्स आर्टबद्दल, मुद्दामच बाष्कळपणाला किंवा निर्थकपणाला ‘कला’ म्हणून आपल्या माथी मारलं जातंय का, असाही एक संशय प्रेक्षकांमध्ये अध्याहृत असतो. वास्तविक तो असू नये, कारण जोसेफ बॉइसनं बोलण्याचा किंवा मरीना अब्रामोविच यांनी गाण्याचा वापर करून आपापले परफॉर्मन्स आशयगर्भ केल्याचा इतिहास आहेच. स्त्रीजन्माबद्दल (दिवंगत) रुमाना हुसेन यांनी मुंबईत १९९५ साली केलेल्या परफॉर्मन्समध्ये, त्यांनी प्रेक्षकांतील स्त्रियांनाही सहभागी करून घेतलं होतं. स्त्री म्हणून केलेल्या, केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या कृतींचा अर्थ आपण साऱ्याच जणी शोधू, असं आवाहन त्या परफॉर्मन्समध्ये होतं. पण हे परफॉर्मन्स (बॉइस ते रुमाना हुसेन आणि नंतरही) काही प्रमाणात कथात्मतेकडे झुकू लागलं होतं. यीव क्लांच्या निव्वळ दृश्य ‘अ‍ॅक्शन’सारखी कृतिप्रधानता त्यात नव्हती. तालीम नसली, तरी या परफॉर्मन्सची ‘रंगावृत्ती’ कलावंताच्या डोक्यात तयारच असणार, असं भासायचं. ते कदाचित आवश्यकही असेल, असं समाधान करून घ्यावं लागायचं. याचा अर्थ असा की, ‘परफॉर्मन्स आर्ट’ ही पूर्णत बंडखोर ‘अ‍ॅक्शन’ उरली नसून आता ‘क्षण जगणं’ शाबूत ठेवूनही ती थोडीफार सुघटित झाली आहे.

मराठीतील सर्व आजकालच्या कलाकृती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting experiment
First published on: 06-11-2016 at 01:05 IST