नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

आज २४ मे. आनंद मोडक यांना जाऊन आज बरोबर सहा वर्षे झाली. बाबूजी, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या जुन्या पिढीतील संगीतकारांना आणि माझ्यासारख्या नव्या पिढीतील संगीतकारांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून आनंद मोडक कायम ओळखले जातील. सत्तरीच्या उत्तरार्धापासून ते एकविसाव्या शतकातील पहिले तप हा मोडकांचा कालखंड मराठी रसिकांनी जवळून पाहिलेला आहे. मराठी चित्रपट, मराठी नाटके, मराठी भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आणि मराठी जाहिरात क्षेत्र या सर्वच क्षेत्रांत एकाच वेळेस खूप मोलाची कामगिरी करून दाखवणारे दोनच संगीतकार आहेत असं मला तरी वाटतं. त्यापैकी commercial approach जास्त ठेवणारे अशोकजी पत्की आणि प्रायोगिकतेचा कायम पाठपुरावा करणारे आनंद मोडक.

Godrej Family split
१२७ वर्षांपूर्वीच्या गोदरेज ग्रुपचे अखेर विभाजन; भावांमध्ये अशी झाली वाटणी
ahmednagar lok sabha election 2024 marathi news
नगरमध्ये पवार-विखे पारंपारिक संघर्ष वेगळ्या वळणावर!
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

आनंद मोडक यांचा जन्म १९५१ साली अकोल्यामध्ये झाला. अकोला हे विदर्भातलं त्याकाळचं एक छोटंसं गाव. परंपरेने चालत आलेलं लोकसंगीताचं थोडंसं वातावरण आणि गावामध्ये शास्त्रीय संगीताचे माफक काही वर्ग यापलीकडे सांगीतिक वातावरण तसं बघायला गेलं तर काहीच नाही. पण मोडकांच्या पिढीने एक अत्यंत जवळचा मित्र जोडला होता आणि त्या मित्राने संगीताचं injection त्या पिढीला वेळोवेळी देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. तो मित्रसखा म्हणजे आकाशवाणी. त्या आकाशवाणीचा छंद मोडक सरांना लागला आणि त्याचे पुढे त्यांच्या संगीतकार होण्यामध्ये परिवर्तन झाले, हे आपले नशीब. पुढे मोडक पुण्यामध्ये आले आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाले आणि त्याच सुमारास त्यांच्या आयुष्यात अत्यंत बदल घडवणारी माणसे आणि एक संस्था आली- ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’! ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात पडद्याच्या स्वरूपातील मानवी भिंतीमधील एक ब्राह्मण अशा साध्या भूमिकेत मोडकांनी पुण्या-मुंबईतील कला क्षेत्रामध्ये पहिले पाऊल ठेवले. प्रायोगिक नाटकाच्या झालेल्या संस्कारांनी संगीतकार म्हणून आनंद मोडक यांना एक नवीन ओळख प्राप्त करून दिली, हे मात्र निर्विवादपणे मान्य करावे लागेल. सतत काहीतरी नवीनच करायला हवं.. जुन्या वाटा चोखाळल्या तर आपल्या हातून काहीतरी गंभीर गुन्हा घडला आहे अशी सल कायम मनाला बोचत राहावी, हा एक स्वभावच मोडकांमधील संगीतकाराचा तयार झाला तो याच कालखंडात! एकीकडे आकाशवाणीवरच्या त्यामानाने पारंपरिक नाटय़-भाव-भक्तीसंगीताचा जबरदस्त पगडा आणि दुसरीकडे डॉ. जब्बार पटेल, भास्कर चंदावरकर, सतीश आळेकर अशा एका अर्थाने चक्रम माणसांचा सहवास यातून मोडक नावाचे अजब रसायन घडत गेले.

आनंद मोडक या संगीतकाराचं एक वैशिष्टय़ होतं. म्हटलं तर बलस्थान, म्हटली तर कमतरता! ते असं की, कुठलंही गाणं करताना त्याला काही ना काहीतरी अधिष्ठान असले पाहिजे अशी मुळात त्यांनी स्वत:ला अटच घातली होती. म्हणजे त्या चाली कुठून घेतल्या होत्या असं नाही. असं अजिबातच नाही! मोडकांच्या सर्व चाली या पूर्णत: नवीन होत्या आणि त्यात एक ‘मोडक’ छाप होती. पण तरीही त्याचं बीज कुठंतरी घट्ट रुजलेलं होतं. त्यामुळे चित्रपटात ज्या गाण्यांमध्ये काहीच घडत नाही अशा पद्धतीची निर्विकार आणि ‘ना नफा, ना तोटा’ योजनेतील गाणी करायला त्यांना फार त्रास होत असे. उदाहरणार्थ- एका पार्टीमध्ये काही लोक जमले आहेत आणि त्यातली एक स्त्री फार सबळ कारणाशिवाय उगाचच एक गाणे म्हणत आहे असा प्रसंग आला की मोडक त्या गाण्याकरिता उगीचच Hungarian, Mexican किंवा आखाती पद्धतीचं लोकसंगीत धुंडाळायचे आणि त्यातून काही  germ मिळतोय का, ते पाहायचे. आता अशा पद्धतीचं गाण्याला गाणं हवं म्हणून त्याची योजना करणारे दिग्दर्शक, निर्माते आणि मोडक हे मुळात एका प्रतलावर कधी आलेच नाहीत. या पद्धतीची मोडकांची गाणी पूर्णपणे फसलेली दिसतात. फसलेली अशा अर्थी की ती गाणी म्हणून छानच असतात, परंतु त्या चित्रपटाचा आणि त्या कथेचा ते गाणं सामावून घेण्याचा आवाकाच नसतो. म्हटलं तर हा मोडक सरांचा खूप मोठा गुण; परंतु तोच त्यांच्या व्यावसायिक यशाच्या आड आला.

परंतु मोडकांच्या या गुणाची कदर असणारे जे दिग्दर्शक व निर्माते होते त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते डॉ. जब्बार पटेल, स्मिता तळवलकर, संजय सूरकर, परेश मोकाशी आणि गजेंद्र अहिरे यांचे. स्मिताताईंच्या ‘चौकट राजा’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन अप्रतिम चित्रपटांचं संगीत मोडक सरांनी केलं. त्यातही ‘चौकट राजा’ हा चित्रपट सर्व दृष्टीने चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा चित्रपट होता असे निश्चित म्हणता येईल. त्यातही ‘एक झोका’ हे पूर्णपणे त्या काळातील मराठी संगीताची चौकट मोडणार गाणं होतं हे निश्चितपणे जाणवतं. त्याचप्रमाणे ‘कळत नकळत’ या चित्रपटातील ‘मना तुझे मनोगत’ या आशाजींनी गायलेल्या गाण्याचाही उल्लेख करावा लागेल. चित्रपटातील गाणी जेवढी भरलेली असतील आणि त्याच्यात वाद्यवृंद तेवढा जास्त असेल, तेवढी ती परिणामकारक असा समज निदान मराठी चित्रपटांमध्ये खूप दृढ होत चालला होता. तेव्हा एक पियानो आणि एक बासरी या जोरावर तयार झालेलं हे गाणं म्हणजे मोडक सरांच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा टप्पाच आहे. तसेच या गाण्यामध्ये केलेला कोरसचा वापर हा त्याआधीच्या संगीतकारांनी फारसा केलेला दिसत नाही. हार्मनीचं अवकाश भरून काढण्याकरिता समूहस्वरांची योजना हा खरं तर वेस्टर्न choir group मधला आविष्कार; पण तो मोडकांनी या गाण्यात आणला आणि यासारख्या अनेक गाण्यांमध्ये तो पुढे वापरला. आकाशवाणीवर विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्या आवाजातील एक शास्त्रीय रचना आणि त्याच्या मागे  choir चा भरणा असा एक अप्रतिम प्रयोग ज्येष्ठ संगीत संयोजक विवेक परांजपे यांच्या मदतीने मोडकांनी केला आणि आणि तो खूप यशस्वीसुद्धा झाला.

पण ‘एक झोका’ या गाण्यामध्ये मोडकांबरोबरच ज्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे ते म्हणजे अतिशय ज्ञानसमृद्ध आणि प्रयोगशील संगीत संयोजक आणि तेवढेच उत्तम व्हायोलिनवादक अमर हळदीपूर यांचा! अमरजींबरोबर मोडक सरांनी खूप अचाट काम केले. अमरजी पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे उत्तम जाणकार होते व त्याचबरोबर मराठी, पंजाबी आणि इतर भारतीय भाषांतील अभिजात आणि लोकसंगीताचाही उत्तम व्यासंग त्यांच्याकडे होता. तसेच जगभरात लोकसंगीतात वापरली जाणारी तालवाद्ये आणि विविध मानवी आवाजांचा केलेला वापर यांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. आणि ते सर्व मुबलक प्रमाणात वापरण्याची मुभा संगीतकार म्हणून मोडकांनी त्यांना दिली होती. या संगीत संयोजनामुळे त्या दहा-बारा वर्षांमधील मोडक सरांची गाणी ही वेगळी उठून दिसतात.

Marimba, Kalimba सारखी वाद्ये ‘लाहे लाहे लाह’सारख्या शब्दांमध्ये बांधलेला कोरस, विशेषत: गायिकांनी विविध आणि खासकरून लोकसंगीतावर आधारित गाण्यांमध्ये काढलेला पूर्णपणे वेगळा आवाज हे खास प्रयोग मोडकांनी खूप प्रमाणावर केले.

जब्बार पटेल यांच्याबरोबर मोडक सरांनी जे काम केलं ते खासच म्हणायला हवं आणि त्यामागे तसं कारणही होतं. स्वत: डॉ. पटेल हे संगीताचे अत्यंत उत्तम अभ्यासक, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलेले आणि त्या सगळ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह धरणारे दिग्दर्शक. तसेच थिएटर अ‍ॅकॅडमीच्या काळापासून डॉक्टर आणि मोडक यांच्यात एक टय़ुनिंग जमलेलं होतंच. ‘एक होता विदूषक’च्या निमित्ताने डॉक्टर आधी रामभाऊ कदमांकडे संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवणार होते, परंतु डॉक्टर, पु. ल. देशपांडे, ना. धों. महानोर यांसारख्या एका वेगळ्या पद्धतीच्या प्रतिभावंतांमध्ये आपण कदाचित रमू शकणार नाही असं वाटल्यामुळे रामभाऊ कदमांनी डॉक्टरांना आनंद मोडक यांचे नाव सुचवले आणि मोडक सरांनी कमालच केली! ‘भरलं आभाळ’, ‘लाल पैठणी’, ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’, ‘शब्दांचा हा खेळ मांडला’सारख्या गाण्यांमुळे मराठी चित्रपटातील लावण्यांना आलेली एक प्रकारची मरगळ पूर्णपणे धुऊन निघाली. त्याचप्रमाणे ‘मुक्ता’ या चित्रपटातसुद्धा मोडकांनी ‘वळणवाटातल्या’, ‘जाईजुईचा गंध मातीला’ आणि ‘त्या माझिया देशातले’सारखी  Organic गाणी दिली. त्यात त्यांचा प्रयोगशील स्वभाव अजून जास्तच उठून दिसतो.

चित्रपटांबरोबरच ‘महानिर्वाण’, ‘बदकांचे गुपित’, ‘अलिबाबाची हीच गुहा’ आणि ‘तीन पैशाचा तमाशा’मधील काही गाणी असं मोडक सरांचं नाटकातील कामसुद्धा खूप उल्लेखनीय आहे. या नाटकांच्या ग्रुपमध्ये मोडकांना खूप जवळचे मित्र मिळाले. त्यातील प्रमुख नाव रवींद्र साठे ऊर्फ बुवा! बुवा हे उत्तम रेकॉर्डिग इंजिनीयर तर होतेच, परंतु त्यांच्याइतका धीरगंभीर आवाजाचा आणि आणि उत्तम सूर असलेला गायक मराठीत दुसरा झाला नाही. बुवांच्या आवाजातली मजा जेवढी मोडकांना समजली तेवढी ती इतर कोणालाही कळली नाही, हे मात्र खेदाने म्हणावे लागेल. उंच पट्टी इतकाच खर्जाचा वापरसुद्धा परिणामकारक पद्धतीने चित्रपटात केला जाऊ शकतो हे मोडकांनी जेवढं जाणलं तेवढं कोणीही नाही! बुवांच्या आवाजातील ‘यशवंतराव चव्हाण’ चित्रपटातील ‘उभाविला मळा’ या गाण्यात ‘बुवा पांढरी एक’ या स्वराचा खणखणीत खर्ज लावतात आणि जो परिणाम साध्य होतो तो केवळ अवर्णनीय आहे. बुवा हे गाऊ शकत होते आणि ते गायल्यामुळे काय मजा येईल हे मोडकांना कळत होतं, हे आपलं भाग्य!

मोडक सरांनी संगीत प्रचंड ऐकलं. जणू त्यांना संगीताचा भस्म्या रोगच झाला होता! ९६-९७ नंतर ते पुण्यामध्ये अधिकाधिक काम करू लागले आणि त्यांच्याबरोबर संगीत संयोजन करण्याचा मान मला मिळाला. सलग सोळा र्वष मी अव्याहतपणे त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांच्याकडे कधीही गेलं तरीही ते काही ना काही तरी ऐकतच असायचे. कुमार गंधर्व, इक्बाल बानो, Harry Belafonte, Nat King Cole, मेहदी हसन, शंकर-शंभो कव्वाल, जितेंद्र अभिषेकी, पंचमदा, जयदेव, रोशन हे त्यांचे खास आवडीचे. कुमार गंधर्व हे तर त्यांचं दैवतच! परंतु या सगळ्या व्यासंगाला खऱ्या अर्थाने कुठे न्याय मिळाला असेल तर त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या विविध रंगमंचीय प्रयोगांमध्ये! चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे यांच्याबरोबर ‘शब्दवेध’ ही सांस्कृतिक चळवळ मोडकांनी उभी केली! त्यामध्ये अर्थार्जन कितपत झालं असेल कल्पना नाही.. किंबहुना नसेलच; पण तरीही ‘अमृतगाथा’, ‘साजनवेळा’, ‘शेवंतीचं बन’सारख्या प्रयोगांतून मोडक सरांनी जे संगीत निर्माण केलं त्याचं मराठीतील स्थान हे आजवर अबाधित आहे आणि तसंच राहील.

बँकेतल्या त्यामानाने रुक्ष वातावरणात मोडकांच्यातला कलाकार फार रमला नाही आणि त्यांची तिथे फार कदरही केली गेली नाही असं मला वाटतं. परंतु एक मात्र खरं, की त्या जोरावर मोडकांनी वरील अप्रतिम संगीतशिल्पे आपल्यापुढे चितारली. मी मागे एका लेखात म्हणालो होतो त्याप्रमाणे कुठलीही कला ही एका दुचाकी रथासारखी असते. लोकाभिमुखतेचं एक चाक आणि प्रयोगशीलतेचं एक. ही दोन्ही चाकं चालली तर कला पुढे जाते, नाहीतर एकाच चाकाच्या जोरावर तो रथ तिथल्या तिथे फिरत राहतो. बाकी सर्व जण लोकाभिमुखतेचं चाक जोरात पळवत असताना प्रयोगशीलतेचं चाक पळवण्यात मात्र मोडक सरांचा सिंहाचा वाटा होता. आज मराठी संगीताचा डेरेदार वृक्ष आपल्याला दिसत आहे, त्यामध्ये मोडकांसारख्या सर्जनशील कलाकारांनी घातलेल्या खतपाण्याचं अमूल्य योगदान आहे, हे आमच्यासारख्या संगीतकर्मीनी कधीही विसरता कामा नये.

आज सहा वर्षांनंतर मोडक मला जसेच्या तसे आठवतात. असं वाटतच नाही, की सहा र्वष झाली असतील. संगीतात आणि त्यातील आठवणींमध्ये रमलेल्या माणसांचं घडय़ाळ वेगळं असतं, हेच खरं!