‘आर्जव आणि आक्रमकता’ या दोन टोकांच्या मधलं जग अर्पिता सिंग यांना पुरेपूर माहीत आहे, असं त्यांची चित्रं सांगतात. केवळ विषयातूनच नव्हे, केवळ प्रतीकांमधूनही नव्हे – रंगांमधून, आकारांतून आणि चित्रं साकारण्याच्या क्रियेतूनही हे जग त्या पादाक्रांत करतात…

चित्रकार परमजीत सिंग यांना अर्पिता दत्ता भेटल्या आणि दोघांचे सूर जुळले. त्या साधारण १९६० च्या दशकातल्या काळात परमजीतच्या व्यक्तिमत्त्वानं अर्पिता भारून गेल्या असाव्यात. हे भारलेपण त्यांच्या त्या वेळच्या चित्रांतून शोधता येतं. परमजीत त्याही वेळी निसर्गातल्या तपशिलांची जी आपोआप पुनरावृत्ती होत असते त्यावर भर देणारी चित्रं रंगवायचे आणि ही चित्रं ‘अॅबस्ट्रॅक्ट’सारखीच दिसायची. म्हणजे एकसारखा रंग आणि साधारण सारख्याच आकाराची गवताची पाती, पाणवनस्पती, वरून दिसणारी झाडं… हे सारं परमजीत यांच्या चित्रांमध्ये यायचं तेव्हा नैसर्गिक तपशिलांच्या पलीकडला, निव्वळ ‘असण्या’शी नातं सांगणारा अमूर्तभाव या चित्रांमधून प्रतीत व्हायचा. असण्याशीच असलेलं हे नातं केवळ दृश्यामधून नव्हे, तर चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेतूनही सिद्ध व्हायचं. ही प्रक्रिया पुनरावृत्तीवर भर देणारी, पण तसं करतेवेळी आपोआप काही बदल/ फरक झाले तर त्यांनाही वाव देणारी. ही अशी ‘बदलती पुनरावृत्ती’ अर्पिता सिंग यांच्याही १९७२ पासून प्रदर्शित झालेल्या चित्रांमध्ये भरपूर दिसते (त्याआधी त्यांनी काय केलं? कदाचित मुलगी- दिवंगत चित्रकार अंजुम सिंग (१९६७-२०२०)- तेव्हा लहान, म्हणून काहीच केलं नाही का?).

अमूर्तचित्रकार म्हणूनच अर्पिता सिंग यांनी चित्रं प्रदर्शित करायला सुरुवात केली. त्यांची त्या वेळची चित्रं बहुतेकदा कागदावरची. काळीपांढरी. बंगाली बायका ‘कान्था’ भरतकाम करताना धावदोऱ्यासारखा एकच साधासा टाका वापरतात; तसंच अर्पिताही त्या वेळी एखादाच स्ट्रोक वारंवार वापरायच्या. हा ‘स्ट्रोक’ कधी कधी ठशासारखाही असायचा. पण हळूहळू अर्पिता यांच्या त्या चित्रांमध्येही रंग येऊ लागले… नुसतेच रंग नाही, तर त्या रंगांमधून काही अस्फुट आकारही दिसू लागले! ही परमजीत यांच्या प्रभावातून बाहेर पडण्याची सुरुवातच म्हणावी लागेल.

दिल्लीच्या कला महाविद्यालयात (तेव्हाचं ‘दिल्ली पॉलिटेक्निक’) अर्पिता शिकल्या, तेव्हा मानवाकृतीप्रधान चित्रं रंगवणारे भरपूर चित्रकार तिथं होते. भाबेशचंद्र सन्याल, जया अप्पास्वामी हे तर फार महत्त्वाचे मानले जात. मानवदेहाचं यथातथ्य चित्रण न करता नवी धाटणी शोधून काढण्याची ईर्षा त्या १९५० नंतरच्या काळात दिल्लीतही (मुंबईच्या ‘प्रोग्रेसिव्हां’प्रमाणेच) अनेकांकडे होती. हे सारं पाहतच वाढलेल्या अर्पिता यांनी अखेर स्वत:च्या अमूर्तचित्रांमधली कृतीची वारंवारिता आणि मानवाकृतींतून मांडलं जाणारं ‘म्हणणं’ यांची सांगड घातली. चित्रातलं म्हणणं हे चित्राच्या- दृश्याच्या आणि प्रतीकांच्या भाषेतच हवं, हे पथ्य त्यांनीही पाळलं. आधुनिक काळातले चित्रकार आपापली प्रतीकं आपणच निर्माण करतात अशी तोवर गृहीत धरली जाणारी मुभा त्यांनाही मिळाली… पण हे सारं कधी केलं अर्पिता सिंग यांनी? वयाच्या पंचेचाळिशीनंतर, म्हणजे १९८४ पासून पुढे. याला अनेक कारणं असतील (काही कारणं परमजीत यांच्या लोभस, प्रभावी व्यक्तिमत्त्वाशीही निगडित असतील), पण आणखी एक तात्कालिक कारण घडलं ते म्हणजे, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर या ‘सिंग’ यांच्या घरावर जमाव चालून आला होता. जीव वाचवण्यासाठी लपावं लागलं होतं.

यानंतर अर्पिता सिंग यांच्या चित्रांमध्ये बंदूकधारी पुरुष हे प्रतीक येऊ लागलं. ते रक्षक आहेत की भक्षक, याबद्दल काहीही स्पष्टता नसणं हेच या चित्रांचं एक वैशिष्ट्य ठरलं. दुसरं प्रतीक म्हणजे वकिलासारखा पांढरा शर्ट- काळी पँट आणि काळाच कोट घातलेले पुरुष. आणखी एक प्रतीक अगदी कृश, वृद्ध, जेमतेम कपडे घातलेल्या पुरुषाचं. ही अशी, अर्पिता यांच्या अनेक चित्रांमध्ये विखुरलेली पुरुषांच्या आकृतीतली प्रतीकं मिळून एक ‘पुरुषी जग’ तयार होतं. ते अर्थातच बाहेरचं जग आहे. स्त्रीच्या आत्मबळाशी या बाह्य जगाचा संबंध असायलाच हवा असं नाही. पण आत्मबळाची कसोटी या बाह्य जगातच लागत असते. स्त्रीच्या आत्मबळाचं प्रतीक म्हणून अर्पिता सिंग यांच्या चित्रांमध्ये येते ती खुद्द त्यांच्या आईची आकृती. ही आई मोजक्याच चित्रांमध्ये आहे, पण अन्य चित्रांतही साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाच्या पुढल्या आणि खमकेपणानं जगाशी वागणाऱ्या स्त्रिया दिसतात.

ही चित्रं सरळ गोष्ट सांगणारी नाहीत. फुलं, मोटारी, खेळणं, बंदूक, धोतर ल्यालेला पुरुष… हे सारे एकाच मापाच्या- लहानलहान- आकारांत असतात. चित्राच्या मधोमध किंवा मोक्याच्या जागी स्त्रीची आकृती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बहुतेकदा करारी. ती हे सारं पाहते आहे, सहन करते आहे आणि कदाचित लढतेसुद्धा आहे, असे. पण लढतेच आहे, असं काही अर्पिता सिंग सुचवत नाहीत. त्यांची भरपूर चित्रं पाहिली तरच ते लढणं उमगतं. इतरेजन कसेही असले तरी त्यांना तसं असू देणं आणि तरीही त्यांचा कोणताही परिणाम घडवून न घेता आपण उरणं, हेही लढणंच. बंदूक आपल्या कानापाशी असूनही ताठ राहणं हे तर सरळच लढणं. त्या लढण्यात आक्रमक प्रतिकार नसेल, पण शरणागतीमध्ये अपेक्षित असलेल्या आर्जवाचा पूर्णपणे अभाव आहे. हेच ते आत्मबळ. ते अर्पिता सिंग यांच्या चित्रांमधून दिसत राहतं.

‘आर्जव आणि आक्रमकता’ ही दोन टोकं आहेत. इंग्रजीत ज्याला ‘बायनरी’ म्हणतात तशी, दुविधा आहे ती. पण या दोन टोकांच्यामध्ये बरंच काही असतं. त्या टोकांच्यामध्ये फक्त अर्पिता सिंग यांचीच नव्हे तर भूपेन खक्कर यांची किंवा अंजू दोडियांचीही चित्रं असू शकतात. यापैकी अंजू दोडिया यांच्या चित्रांमध्ये प्रतीकांचा पुरेपूर वापर आहे या (आणि तेवढ्याच) अर्थानं अंजू यांची चित्रं अर्पिता सिंग यांच्या चित्रांना जवळची. भूपेन आणि अर्पिता यांच्या चित्रांमध्ये तर विनोदबुद्धी हाही दुवा आहे- पण भूपेन यांची बिनोदबुद्धी थेट दिसते; तर अर्पिता यांची विनोदबुद्धी संयत आहे आणि ती ‘बंदूक देवी’ यासारख्या चित्रांतून दिसते तेव्हाही, चित्राची नायिकाच ठरणाऱ्या त्या स्त्रीच्या पायागती असलेला पुरुष सुखात पहुडल्यासारखा का दिसतोय असा प्रश्न पडतो इतकंच. ‘आर्जव आणि आक्रमकता’ यांच्या मधला प्रदेश फक्त दृश्यकलेतच असतो, असं नाही- तो चित्रांच्या विषयामुळे दिसतो, असंसुद्धा नाही. हा प्रदेश एखादी कलाकृती घडताना केलेल्या क्रियांमधून शोधलेलाही असू शकतो. हे संकल्पना म्हणून कितीही अमूर्त असलं तरी त्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे- आर्जवी तानेऐवजी आक्रमक तानासुद्धा घेण्याचा प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शास्त्रीय संगीतज्ञ नीला भागवत यांचं गाणंही फक्त आक्रमक नसतं- ते या दोन टोकांच्या मधेच असतं.

या अर्थानंसुद्धा, हे मधलं जग अर्पिता सिंग यांना पुरेपूर माहीत आहे, असं त्यांची चित्रं सांगतात. त्या जगाच्या आविष्करणासाठी अनेक रंग आणि या रंगांचे प्रतीकात्मक ‘अर्थ’ त्यांच्या दिमतीला आहेतच; शिवाय कोणत्याही आकाराला चित्राच्या निवेदकाइतकं महत्त्व न देता त्या आकारांना प्रतीकरूप करून टाकायचं- म्हणून त्यांना लहान तरी ठेवायचं किंवा सरळ अर्धंच ठेवायचं- अशी जिगरसुद्धा अर्पिता यांच्याकडे आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ‘अॅबस्ट्रॅक्ट’च्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरलेली वारंवारिता अर्पिता यांना आकृतीप्रधान चित्रांतही हवी तशी राबवून घेता येत आहे. अर्पिता यांच्या अनेक चित्रांमध्ये ‘पॅटर्न’ दिसतात. हे पॅटर्न कधी कपड्यावरलं डिझाइन म्हणून येतील आणि कधी अनेक बंदूकधारी म्हणून येतील, काही नेम नाही! शिवाय, अनेक अमूर्तचित्रकारांच्या चित्रांमध्ये रंगलेपनाच्या कृतीतून काहीएक असोशी दिसते (थोर चित्रकार गायतोंडे यांनी ही असोशीच नाकारली, तिथं ते जणू जितेन्द्रिय अमूर्ताचे वाग्गेयकार ठरले. असो. रंगलेपनाच्या वेगातून एरवीही असोशी दिसते हे मान्य केलं, तर) ती अर्पिता यांच्याही चित्रांत दिसते. त्याहीपल्याड काही अक्षरं, काही आकडे यांचा वापर अर्पिता यांच्या चित्रांमध्ये, त्या-त्या चित्राच्या विषयमांडणीबद्दल असलेल्या व्यक्तिगत विचारांचा भाग म्हणून झालेला दिसतो. ही सारी वैशिष्ट्यं, चित्रांचे विषय काहीही असते; किंवा चित्राला कारणीभूत ठरणारं वास्तव कोणतंही असतं तरी दृश्यानुभव समृद्ध करणारी आहेत. पण इथं तर, अर्पिता विषयालासुद्धा हात घालतात… आणि जर पाहाणाऱ्यांना विषय उमगलाच, तर पुढली मांडणी प्रेक्षकालाही करू देतात.

परमजीत सिंग यांचा- नुसता त्यांच्या चित्रांचाच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही- उल्लेख या मजकुराच्या सुरुवातीला झाला, तो अर्पिता सिंग यांच्यावरचे संभाव्य प्रभाव शोधण्यासाठीच्या प्रयत्नांतून. बाकी, जरी परमजीत सिंग हे सातत्यानं तशीच चित्रं करत राहिले असले तरी, या दोघांची तुलना करणं हा या मजकुराचा हेतू नव्हता, असूही शकत नाही. असतातच प्रत्येकाच्या वाटा निरनिराळ्या. काही काळ असेलही प्रभाव, पण पुढली वाटही असतेच.

abhijeet.tamhane@expressindia.com