अरुंधती देवस्थळे

मानवी अधिकारांसाठी, स्त्रियांच्या समतेसाठी, व्यक्तिस्वातंत्र्य जपणाऱ्या सामाजिक सुधारणांसाठी तीन दशकांहून अधिक काळ लढा देणाऱ्या नर्गीस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. तेहरानमधील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या नर्गीस यांच्या व्यक्तिमत्त्वासह खडतर आयुष्यावर एक दृष्टिक्षेप..

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारांसाठी नामांकित केली गेलेली वोलोदिमीर झेलेन्स्की, मेहबूबा सिराज, स्वीएतलाना त्सिखानोस्काया, अलेक्सी नवलनी यांसारखी आणखीही नावं आणि त्यांचं जबरदस्त कार्य लक्षात घेता वाटलं की, या पुरस्कारांची संख्या वाढायला हवी. कारण आज जगाला सगळय़ात जास्त गरज कशाची असेल, तर ती विश्वशांतीची. या नावांपैकी प्रत्येकाने अक्षरश: उभं अस्तित्व पणाला लावून देशबांधवांसाठी काम केलं आहे. मानवी अधिकार आणि विश्वशांतीकरिता सगळय़ा जगाचा आवाज बनलेलं नोबेल एकीकडे आणि आपापल्या देशांत तुरुंगवासात डांबले गेलेले मागल्या वर्षीचे आलेस बिआलीतस्की (बेलारूसचे या सन्मानासाठी निवडलेले विजेते) किंवा या वर्षीच्या नर्गीस मोहम्मदी दुसरीकडे. औपचारिक अभिनंदन सोडा, पुरस्कार स्वीकारण्यापुरतेदेखील त्यांच्या देशांची सरकारं त्यांना तुरुंगाबाहेर सोडायला तयार नाहीत. परदेशात आश्रय घेतलेल्या नर्गीसच्या कुटुंबीयांना या सन्मानामुळे आपल्या जिवाला धोका वाढेल अशी भीती वाटते आहे. मानवी अधिकारांसाठी, स्त्रियांच्या समतेसाठी, व्यक्तिस्वातंत्र्य जपणाऱ्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी बांधलेला लढा धर्मसत्तेला देशद्रोही वाटतो आहे. पण तरुण पिढीमध्ये दहशतवादापासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ५१ वर्षांच्या आयुष्यापैकी अर्धीअधिक वर्षे तुरुंगात पाशवी छळ स्वीकारून, चाबकाचे अमानुष फटके खात झगडणाऱ्या नर्गीस मोहम्मदी ‘रोल मॉडेल’ ठरल्या आहेत!! गेली आठ वर्ष भेट न झालेल्या आईचं या सन्मानासाठी अभिनंदनही त्यांच्या मुलांना करता आलेलं नाही. कारण राजकीय बंद्यांना तुरुंगात फोन करण्याची परवानगी नाही. जो बायडेन, मॅक्रोन, अल्बानीजसारख्या अनेक राष्ट्रप्रमुखांनी आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल, पेन आणि यू. एन.सारख्या अनेक बडय़ा संस्थांनी त्यांच्या ताबडतोब सुटकेसाठी केलेलं आवाहन व्यर्थ ठरणार आहे. कारण इराण सरकारला हा पुरस्कारच नोबेल कमिटीची आणि त्यांना साथ देणाऱ्या युरोपिअन संघटनांची त्यांच्या अंतर्गत मामल्यात पूर्वग्रहदूषित राजकीय ढवळाढवळ वाटते आहे, नर्गीस मोहम्मदींबद्दल काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

हेही वाचा >>> दूर चाललेले शिक्षण..

नर्गीसबद्दल प्रथम ऐकलं होतं २००३च्या नोबेल विजेत्या शिरीन एबादी यांच्या तोंडून! २००६ च्या फ्रँकफर्ट पुस्तक मेळय़ात रँडम हाऊसमधल्या संपादक मैत्रिणीने मला त्यांच्या ‘Iran Awakening’ या आत्मकथनाची एक प्रत भेट दिली होती. त्या पुस्तकाने आणि एकूणच शिरीन एबादींच्या १९८० च्या दशकात सुरू झालेल्या लढय़ामुळे इतकी प्रभावित झाले होते, की मी त्याचा हिंदीत अनुवाद केला. नंतर २-३ वर्षांनी दिल्लीत शिरीन आणि मी एका मैत्रिणीकडे भेटलो तेव्हा जेवण आणि औपचारिकतेच्या मर्यादा विसरून (त्यांना दुभाषा लागत असे म्हणून संवाद लांबत) रात्री उशिरापर्यंत बोलत होतो. अर्थात त्यात वैयक्तिक फार कमी, पुस्तकानंतरच्या स्थितीबद्दल जास्त होतं. दोन लेकींची आई असलेल्या शिरीननी नाइलाजाने कुटुंबासह परदेशात स्थायिक व्हायचं ठरवलं होतं, तेहरानला त्या जाऊन-येऊन राहणार होत्या. मग त्यांच्या ‘डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर’ या संस्थेचं कार्य कोण पुढे नेणार? असं विचारलं तेव्हा त्यांनी उभ्या केलेल्या दुसऱ्या फळीत जी नावं घेतली त्यात नर्गीसचं नाव खास आत्मीयतेनं घेतलं होतं. नर्गीस आता या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. निडर आवाजात स्पष्ट, तर्कशुद्ध वैचारिक मांडणी करणाऱ्या नर्गीसना मित्रमैत्रिणींत ‘सिंहीण’ म्हणतात असंही सांगितलं होतं. फ्रेंच राज्यक्रांतीच्या  Liberté, é galité,  fraternité  ची आठवण करून देणारं ‘जान- जिंदगी- आझादी’ (Woman-  Liberty-  Equalit) हे लढय़ाचं घोषवाक्य नर्गीसच्या बुलंद, पर्शिअन आवाजात ऐकलेल्यांना, हे उपनाव लगेच पटावं! पुढे २०१० मध्ये एबादींना मिळालेलं ‘ऑस्ट्रियन ह्यूमन राइट्स अवॉर्ड’ त्यांनी या प्रिय शिष्येला आणि तिच्या संघर्षांला अर्पित केलं होतं, ‘या पुरस्कारावर माझ्यापेक्षा तिचा अधिकार जास्त आहे,’ असं त्या समारोहात जाहीर करून.

बरोबर वीस वर्षांपूर्वी, याच कार्यासाठी शिरीन एबादींना हाच पुरस्कार मिळाला होता, पण आता परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे, हे सर्वश्रुत आहेच. लढय़ाने ज्या मागण्या मांडल्या आहेत, त्यात धर्मविरोधी, देशविरोधी काहीही नसूनही! धर्मसत्ता आल्यापासून देशाच्या नागरिकांशी, विशेषत: स्त्रियांशी ‘मॉरल पोलिसिंग’च्या हत्याराखाली अव्वल दर्जाचं क्रौर्य हासुद्धा एक प्रचंड विरोधाभासच! वेगवेगळय़ा देशांत भेटणाऱ्या मित्र-मैत्रिणींमुळे लढय़ाची खबरबात मिळत राहिली, किती मोठय़ा संख्येने बुद्धिवादी कुटुंबं वेगवेगळय़ा प्रगत देशांमध्ये अज्ञातवासात गेली आहेत, हे कानावर पडत राहिलं.

हेही वाचा >>> शाळा बुडवणारी ‘पानशेत योजना’

व्यवसायाने इंजिनीअर आणि संघर्षांसाठी पत्रकार झालेल्या, सामाजिक सुधारणा व मानवी हक्कांवर लिहिणाऱ्या नर्गीसची वर्तमानपत्रातली नोकरी २००९ च्या प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या निवडणुकांनंतर गेली. त्यांच्या ‘The Reforms,  the strategy and the Tactics’ लेखसंग्रहातून मांडलेले सामान्य जनतेचे प्रश्न सामाजिक चर्चाचे विषय बनले : हिजाब स्वैच्छिक असावा, लोकांना सूफ़ीझमचे अनुसरण करण्याचं/ आपला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य असावं, स्त्रियांना नोकरी आणि शिक्षणाच्या समान संधी असाव्यात, देहदंडाची अमानवी शिक्षा बंद व्हावी किंवा तुरुंगात एकांतवासाची शिक्षा नसावी कारण तो मानसिक आरोग्यासाठी घातक आहे, यासारख्या मागण्यांमध्ये देशविरोधी काय आहे? निदर्शनांतून, गुप्तपणे केलेल्या लिखाणांतून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून त्यांच्यासह हे मुद्दे पुन्हा पुन्हा कार्यकर्त्यांनी उभे केले, ते जबर किंमत मोजायची तयारी ठेवून! परिणामत: अनेक लोक गायब होत आहेत आणि त्यांचा मागमूसही लागत नाहीये. दडपशाहीच्या बुलडोझरखाली कोवळय़ा तरुणींवर क्षुल्लक गुन्हे दाखल करून त्यांना संपवलं जातंय, आंदोलनादरम्यान केवळ हिजाब माथ्यावरून सरकला या कारणासाठी कॉलेजकन्यका महशा अमीनीला झालेली अत्याचारी अटक आणि तुरुंगातील संशयास्पद मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शनांचं प्रमाण वाढलं. जनता बहुसंख्येने रस्त्यावर आली. यानिमित्ताने तुरुंगात होणाऱ्या शारीरिक छळाच्या, लैंगिक अत्याचारांच्या भयानक कहाण्यांना तोंड फुटलं. महशाच्या मृत्यूबद्दल जाहीर विरोध करणाऱ्या एका लेखक- अनुवादक तरुणाला चौकात फाशी देण्यात आलं. जाहीर फाशी हा एक नवा निर्घृण अंकुश! गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानंतर, वैद्यकीय उपचारांपुरती सुटका झालेल्या नर्गीसवर एक गंभीर शस्त्रक्रिया करावी लागली. बाहेर मिळालेल्या अल्पकाळात त्यांनी तुरुंगातील १२ राजकीय कैदी महिलांच्या मुलाखतींवर आधारित आणि इतरांच्या तोंडून ऐकलेल्या, तुकडय़ातुकडय़ांतून कळलेल्या असंख्य कहाण्या, डोळे फोडून टाकणे, जाळून चेहरा विद्रूप करून टाकणे, बलात्कार यांसारख्या भोगलेल्या छळाचे अनुभव एकत्रित करून देशाच्या तुरुंग व्यवस्थेचं भयाण रूप जगासमोर आणणारं ‘White Torture’ हे पुस्तक लिहिलं. ते २०२२ अखेरीस प्रकाशित झालं. औशवित्झच्या छळछावण्यांची दाहक आठवण करून देणारं हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या विश्रामानंतर, तुरुंगात परतताना बाकीच्या शिक्षेची वर्ष आणि उरलेले चाबकाचे फटकारे यात काही कमी होणार नाही, अशी समज नर्गीसना देण्यात आली होती.

संघर्षरत अनेक इराणी जोडप्यांसारखे, नर्गीस आणि तिच्यासारखेच पत्रकार कार्यकर्ता तैगी, दोघांपैकी एक घरी राहून जुळय़ा मुलांचे संगोपन करत. अशा कुटुंबांना सुरक्षित राहण्यासाठी परदेशी जाऊन स्थायिक व्हावं लागतं, पत्ता गुप्त ठेवावा लागतो. आईवेगळी वाढलेली जुळी मुलं आता १६ वर्षांची झाली आहेत. तैगी अत्यंत संयत, सुसंस्कृत स्वरात म्हणतात, ‘‘आमच्या मुलांना आईवडील एकत्र फारसे कधी मिळालेच नाहीयेत. कधी नर्गीस तुरुंगात, तर कधी मी!’’ पुरस्कार घोषणेनंतर तैगी आणि दोन्ही मुलं पॅरिसमध्ये प्रेस कॉन्फरन्सला हजर होती. ‘‘आपल्याला सर्वांना नर्गीस मुक्त व्हावी असं वाटतंय, पण नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरना आदर्श मानणारी नर्गीस आपल्यातला प्रत्येक जण मुक्त झाल्याशिवाय सुटणं नामंजूर करेल.’’ असंही ते म्हणाले. टीव्हीवर आईबद्दलचा अभिमान व्यक्त करताना अली सांगतो, ‘‘काहीही झालं तरी आई संघर्ष सोडणार नाही. अगदी पिस्तूल मानेवर ठेवून विचारलं तरी ती कधी खोटं बोलणार नाही.’’ या वर्षी त्यांना मिळालेल्या सन्मानात ‘आंद्रेई साखारोव्ह प्राईझ’, ‘ओलोफ पालंम फाऊंडेशन अवॉर्ड’, ‘यूनेस्को वल्र्ड फ्रीडम प्राइझ’चा समावेश आहे. असे अनेक सन्मान त्यांना तेहरानच्या कुप्रसिद्ध एवीन तुरुंगात शिक्षा भोगताना जाहीर झाले आहेत.

हेही वाचा >>> सुमारांच्या सद्दीमुळे साधारण कलाकारही इथे थोर..

जेलमधल्या नाझनीन झगारी रॅटक्लीफसारख्या पत्रकार मैत्रिणी आणि त्यांच्या अनेक सहप्रवासी स्त्रियांनी, तुरुंगातही आपल्या व्याधीग्रस्त तब्येतीची पर्वा न करता नर्गीस किती प्रयासाने स्त्रियांना बोलकं करतात, आपुलकीने त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि एकजूट बांधण्याचा प्रयत्न करतात यावर संधी मिळेल तसं आणि तेव्हा तुकडय़ा-तुकडय़ांत लिहिलं आहे. बी.बी.सी.ने या तुरुंगातील डायऱ्यांवर एक व्हिडीओ बनवलेला आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर  CNN ला दिलेल्या सटीक प्रतिक्रियेत नर्गीस म्हणाल्या, ‘‘माझं हे पत्र म्हणजे कोणा प्रगत, लोकतांत्रिक देशांतील स्त्रीवादी कार्यकर्तीचं वक्तव्य नाही, जिथे वेगवेगळय़ा समाजसंमत मार्गानी आम जनतेला सामाजिक विरोध नोंदवण्याची मुभा असते.. हे लिहिणारी बंदिवासातली मी, लाखो इराणी स्त्रियांपैकी एक आहे- जिने वयाच्या सहाव्या वर्षांपासून पितृसत्ता आणि जुलूमशाहीच्या तत्त्वांवर चालणाऱ्या मिलिटरी दहशतवादाखाली, सत्ताधीश आणि छळवादाशी झगडण्यात जन्म घालवलाय. आयुष्य, तारुण्य, स्त्रीत्व आणि मातृत्व यातलं एकही सुख मला भोगता आलेलं नाही.’’ नर्गीसपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच नामवंत वृत्तसंस्था प्रयत्न करत असणार, पण अजून कोणाला फारसं यश आलेलं दिसत नाही.

जगाने गौरवलेले किती तरी नोबेल विजेते हुकूमशहांच्या कृपेने किंवा तथाकथित लोकतंत्रात आपला देश सोडून दुसऱ्या देशांत जाऊन राहत आहेत. अमानुष शिक्षा भोगत आपला संघर्ष चालूच ठेवणाऱ्या, कर्मभूमी सोडून इतरत्र जायला नकार देणाऱ्या आलेस बिआलीतस्की वा नर्गीस मोहम्मदी यांचं भविष्यकाळात काय होईल याबद्दल अंदाज वर्तवणं निरर्थक आहे. कारण त्यांच्याबद्दल काहीही बातमी बाहेर पडू नये याची काळजी सत्ताधीश घेतच राहणार आहेत. तरीही आपण नर्गीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा लढा यशस्वी व्हावा आणि आयुष्यात आजवर दुर्मीळ असलेलं स्थैर्य आणि कौटुंबिक सुख त्यांना लाभावं अशीच आशा करू या.

 arundhati.deosthale@gmail.com