पंकज त्रिपाठी

कठिणोत्तम हिंदीच्या आधारे पडद्यावर शिव्या आणि ओव्यादेखील अनोख्या अदाकारीने सादर करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी स्वत:मधल्या अनेक गोष्टी अद्याप चाचपडून पाहतो. भूमिका स्वीकारताना त्यांतील विचारधारा महत्त्वाची मानतो. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याच्यातील मध्यमवर्गीय मूल्ये शाबूत असून अर्धे आयुष्य गावात काढल्यानंतर शहरातही प्रादेशिकता जपणाऱ्या भागांत राहणे त्याला पसंत आहे. सिनेमा या माध्यमाच्या जादूसह त्याच्या आवडीच्या भूमिका आणि त्याचा आजवरचा इथला प्रवास याविषयी लोकसत्ता गप्पांमधून तो भरभरून व्यक्त झाला..

Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
karan johar mother admited mumbai hostpital
करण जोहरची आई हिरू जोहर रुग्णालयात दाखल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पोहोचला भेटीला
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”

मी पूर्णपणे खात्रीशीर सांगू शकत नाही, की मी कोण आहे. मी नक्की कसा आहे, याचा अजून माझा स्वत:चाच शोध सुरू आहे.

मी किती अभिनय करतो हेही जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आहे. मी खरेच निगर्वी-सरळसाधा आहे, की तसे असण्याचा अभिनय करतो हे मलाच उकललेले नाही. मी किती चतुर आहे, किती निरागस आहे आणि किती मूर्ख याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. आजदेखील मला माहिती नाही, की प्रेक्षकांच्या नजरेत मी मोठा कलाकार आहे, तो कसा? मी स्वत:ला रोज तपासून पाहतो की अभिनयात नक्की मी करतो काय, की लोकांना ते इतके आवडतेय. मला इतके माहिती आहे की मी प्रेक्षकाला काही काळ गुंतवू आणि खिळवून ठेवू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य पेरू शकतो. ती जादूगाराची हातोटी माझ्या पोतडीत आहे. पण मी थोर काही करतोय का, याचा अंदाज अजून मला नाही. भारतात सध्याच्या काळात माझ्यासारखे जे कलाकार आहेत, ते सगळे साधारण पातळीवरच काम करीत आहेत. पण आमच्या आजूबाजूला त्यापेक्षा खाली काम करणाऱ्यांची संख्याच इतकी अधिक आहे, की मग साधारण पातळीवरचे कलावंत थोर वाटायला लागतात. हे सत्य आहे. माझ्याबाबत तसेच काहीतरी झाले असावे.

मी जेव्हा तकलादू किंवा भ्रष्ट होईन तेव्हा माझ्या अभिनयावर परिणाम व्हायला लागेल. ते मला परवडणारे नाही. व्यक्तीची जडण-घडण जशी होते, त्यानुसार तो पुढे जातो. जसा आहे तसा, अस्सल राहण्यातच मी समाधानी आहे. मी जीवनात अभिनय नाही करू शकत, पण अभिनयामध्ये कुठल्याही व्यक्तीचं जीवन उत्तमरीत्या रेखाटू शकतो.

हेही वाचा >>> पुनर्वसनाच्या कळा

मला खूप शक्तिशाली भूमिका मिळतात आणि त्या मी जिवंत करतो, असा अनेकांचा समज आहे. पण अशी ‘शक्तिशाली’ भूमिका कुणी करूच शकत नाही. मला देखील अशा ‘पॉवरफुल’ म्हणून बजावलेल्या भूमिका मी कशा पार पाडीन असा प्रश्न पडतो. पण कॅमेऱ्यासमोर जेव्हा चार माणसे येऊन माझ्यासमोर झुकतात. कुर्निसात करीत बाजूला उभे राहतात, तेव्हा आपोआप मी त्या भूमिकेत साकार झालेला असतो. ती मी वठवत नसतो, तर इतरांमुळे मी पडद्यावर बलवान दिसू लागतो. शक्तिशाली माणसांची भूमिका कागदावर लिहिली जाऊ शकते. पण तिला पडद्यावर सादर करणे केवळ अवघड.

माझ्या आयुष्यातील तेवीस वर्षे मी अशा गावात काढली, जिथे वीज आणि रस्ता बनायला देखील २०१८ साल उजाडले. त्यानंतरची वीसेक वर्षे मी दिल्ली आणि मुंबईत राहिलो. माझे गाव हे प्रेमचंद्र यांच्या कादंबरीतल्यासारखे साधे-भोळे होते. वडिलांना लहानपणापासून शेतात काम करताना पाहिले. आजारी असो, पायांना जखमा असो, तरी ते शेतात कष्ट करायचे. मी स्वत: दहावीपर्यंत तिथे राबलो. आमच्या विभागातील तरुणांची परमोच्च महत्त्वाकांक्षा सरकारी नोकरी मिळविण्यापर्यंतच थांबायची. त्यासाठी धडपड प्रत्येक जण करी. अशी नोकरी मिळाली तर त्या सरकारी बाबूला हुंडा खूप मिळे आणि नंतर वरकमाईच्या संधी अमाप तयार होत. त्यामुळे मी जेव्हा ‘एनएसडी’मध्ये जाऊन शिकायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी विचारले- ‘तिकडे जाऊन काय बनशील?’ त्यावर मी उत्तरलो- ‘नाटकावरचा प्रोफेसर.’ त्यांना वाटले, प्राध्यापक बनल्यानंतर मला सरकारी नोकरीच मिळेल. मग त्यांनी मला तिथे जाण्याची परवानगी दिली. नंतर सिनेमात जाण्यापासून देखील रोखले नाही, कारण त्यांना सिनेमा काय असतो हेच माहिती नव्हते. लग्नसमारंभात वडील पंडित म्हणून जात. तेथे त्यांनी तिथे व्हीसीआरवर लागलेला श्रीदेवीचा ‘नगिना’ चित्रपट दहा मिनिटे पाहिला. मग घरी येऊन सांगितले की, ‘‘मी एक सिनेमा पाहिला, ज्यात एक महिला साप बनताना दाखविली जाते.’’ चित्रपट हा काय प्रकार आहे, येथे काय अन् कसे घडते, पैसे मिळतात की नाही, याबाबत त्यांना काहीएक कल्पना नव्हती. त्यामुळे घरात परंपरेनुसार पौरोहित्य आणि शेती केली जात असतानाही मला वेगळा पेशा निवडता आला.

बिहारच्या गोपाळगंजहून दिल्ली आणि दिल्लीतून मुंबई असा माझा भौगोलिक प्रवास. आठ वर्षे मी सिनेमाविना राहिलो. आता मागे वळून पाहताना असे वाटते, की ते अवघड दिवस मी कसे काढले असतील? माझी पत्नी शिक्षिका होती. तिच्या पगारात सारे जुळून जायचे. आमच्या गरजा फार नव्हत्या. खूपच साधारण जीवन जगत असलो, तरी आनंद प्रचंड होता. एक दुचाकी घेऊन मुंबईत वाटेल तिथे आम्ही भटकत असू. 

मुंबईला तुम्ही महानगर म्हणता, पण तिच्या आत शोधायला गेलात तर खूप खेडी सापडतील. एखाद्या भागात कोकण, दुसऱ्या भागात नागपूर तर आणखी तिसरीकडे सातारा. मी मुंबईत वांद्रे, जूहू या चमचमत्या भागात कधी राहिलो नाही, तर प्रादेशिकता जपणारी खेडी दिसणाऱ्या चारकोप आणि मढ गावात वास्तव्य केले. चारकोपमध्ये अर्धी रत्नागिरी किंवा कोकणच सामावल्याचे दिसेल. तिथल्या सेक्टर दोनच्या मैदानात गणपतीत दरवर्षी दशावतार सादर केले जातात. या परिसरातच माझा सुरुवातीपासून वावर असल्यामुळे मला कायम माझ्या खेडय़ातच राहिल्यासारखे वाटते.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..

मला पहिले काम मिळाले ते अजून आठवते. त्याचे सतराशे रुपये मानधन आले. मालाडच्या लिंक रोडजवळील झरना बारमध्ये चित्रीकरण होते. त्या काळात मुंबईत रात्रभर डान्स बार चालत, त्यातलाच तो एक असावा. सकाळी आठ वाजता मी पोहोचलो. रात्रीच्या आठ वाजेपर्यंत एका जागीच मला बसवले होते. कामासाठी मी इतका उतावीळ होतो, की प्रॉडक्शनमधील कुणीही समोर आले की मी उठून ‘माझा रोल आला आहे का?’ विचारत राहिलो. रात्री आठ वाजता माझ्या नावाचा पुकारा झाला. मला मोठय़ा माफियाच्या भूमिकेच्या ऑडिशनला बोलावले होते. मानवी तस्करी करणारा डॉन मला साकारायचा होता. पण कॅमेऱ्यासमोर पोहोचलो, तेव्हा मला कळाले की, मला दारासमोर उभे केले आहे. एक माणूस खुर्चीवर बसलेला आहे. मला देण्यात आलेले कपडे द्वारपालास शोभणारे असल्याने माझ्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले की, डॉन मी आहे की खुर्चीवर बसलेला माणूस? दिग्दर्शकाला विचारण्याची िहमत नव्हती. मी स्वत:लाच म्हटले, ‘आपले कपडे पाहून घ्या. म्हणजे कळेल डॉन कोण आहे ते.’ जो माणूस एनएसडीचे प्रशिक्षण संपवून आला आहे. दिवसभर डॉनची भूमिका वठवण्यासाठी आतूर आहे. त्याला द्वारपालाचे कपडे देऊन केवळ एका शब्दाचा संवाद म्हणायला लावले. तरीही ते मला अजिबात अपमानकारक वाटले नाही. कारण मी अपमानित होऊच शकत नाही. २००४ ते २०१२ पर्यंत मुंबईत काम न मिळूनदेखील मी दु:खात नव्हतो, याचे हेच कारण आहे. ही घटना ऐकताना आज हास्यास्पद वाटेल. पण त्या वेळीदेखील मी आतल्या आत हसतच होतो.

मी सिनेमामध्ये येण्याआधी लोककलाकार होतो. ताल आणि सूर दोन्हीचा समतोल साधता आला पाहिजे या जाणिवेतून लोककलांचे शिक्षण घेतले होते. छाऊ, कलरी, दशावतार या नृत्याभिनयाच्या कलांत निपुण होतो. एनएसडीमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा कळाले, अरे आता हे मला परत शिकवू पाहत आहेत. पारंपरिक शिक्षण सोडून ‘एनएसडी’त मला नाटक करायचे होते. पण तिथे गेल्यावर मला पुन्हा अभ्यासाला जुंपले गेले. एखाद्या विद्यार्थ्यांला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुझ्यासमोर प्रेरणा काय असेल, असे विचारले जाते. मात्र लोककलेतून आलेल्या कलाकाराला कोणत्याही प्रकारच्या प्रेरणेची गरज नसते. मला कायम वाटत आले की, माझ्या कामातला आवेग ‘एनएसडी’तील शिक्षणाने कमी केला. ‘एनएसडी’तून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रत्येक कलाकार स्वत:ची अभिनयाची शैली तयार करतो. ती तो जशी वापरतो त्यानुसार त्याची कलाकारी आणि पडद्यावरली अदाकारी वाखाणली जाते. मी तेथून बाहेर पडल्यावर माझ्या कामात आधी असलेली स्फोटकता किती प्रमाणात राखून ठेवता येईल, शिकलेल्या कलाबाज्यांचा त्यात कसा समावेश करता येईल यावर भर दिला. त्याचबरोबर माझ्यातला निरागस कलाकार राखून ठेवण्यासाठीही प्रयत्न केला. ती निरागसता कायम ठेवण्यासाठी आज देखील मला रोजचा सराव करावाच लागतो. माझ्या अभिनयात जराही खोटेपणा येऊ नये याबाबत मी स्वत:शी कठोर असतो.

मी कोणतीही व्यक्तिरेखा सादर करण्यापूर्वी तिचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न करतो. अभिनयाच्या शाळेत सांगितले जायचे की, इमारत दिसते, पण त्याचा पाया दिसत नाही. कोणत्याही कलाकाराला पडद्यावर पाहताना तुम्ही इमारत पाहता. तिचा पाया पाहत नाही. लेखक आणि अभिनेत्यालाच त्याबाबत माहिती असते. कधी कधी लेखक अभिनेत्याला सांगतो की ‘तू या व्यक्तिरेखेचा पाया शोध’ तेव्हा संशोधन करणे क्रमप्राप्त ठरते. त्यात एखादी व्यक्तिरेखा इतिहासातील असली तर ठीक. त्याबद्दलचे संदर्भ पडताळूून पाहणे शक्य असते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील सिनेमासाठी मी त्यांच्या लहानपणापासूनची माहिती मिळवू शकतो. कारण ते उपलब्ध आहेत. मात्र व्यक्तिरेखा जर कथात्मक असली, तर त्यात कल्पनाशक्ती जोरात पळवावी लागते. कित्येक दिग्दर्शकांना माझे सांगणे असते, की तो एखाद्या संवादात त्या व्यक्तिरेखेच्या गतस्मृतींच्या पडछाया उमटाव्यात असे बदल हवे आहेत काय? मी प्रत्येक काल्पनिक व्यक्तिरेखेच्या इतिहासात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो. माझी व्यक्तिरेखा कोणत्या आर्थिक स्तरातून आली आहे, व्यक्तिरेखेची सामाजिक पार्श्वभूमी काय असेल, कोणत्या भौगोलिक परिस्थितीतून ती आली असेल. या प्रक्रियेतून माणूस म्हणून मी समृद्ध होतो. मी माझ्या व्यक्तिमत्त्वावर अभिनेत्याला वरचढ होऊ देत नाही. पण अभिनेत्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वाची छाप पूर्णपणे पडू देतो. जीवनात जितके सहज राहता येईल, तेवढे राहण्याचाही प्रयत्न करतो.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : युवा बुद्धिबळपटूंचा दबदबा

मी प्रत्येक व्यक्तिरेखेकडे सर्वसामान्य माणूस म्हणून पाहतो. माझ्या व्यक्तिरेखांमध्ये लेखकाने कितीदेखील नकारात्मकता ठासून भरलेली असली, तरी मी त्यात माणूस कुठे आहे ते शोधतो. त्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांना मारताना, धमकावताना किंवा त्रास देताना दिसत असलो, तरी या दृष्टीमुळेच वेगळय़ा पद्धतीने मी समोर येतो. 

जे काम माझ्याकडून होऊ शकत नाही, किंवा मी वठवू शकत नाही, अशा भूमिकांना मी लांबूनच नमस्कार करतो. जे माझ्या वाटेला आलेच नाही, ते मी करायला हवे होते की नाही, याचा विचार करून काय फायदा? मला नेहमी विचारले जाते की, तुला कोणती भूमिका करायला आवडेल? तेव्हा माझे उत्तर असते की, माझी कोणत्याही अमुक एक व्यक्तिरेखा साकारायची महत्त्वाकांक्षा नाही. जी भूमिका मला मिळते, तिलाच ‘ड्रीम रोल’ असल्यासारखे बनविण्याचा आटापिटा मी करतो. एखादी भूमिका स्वीकारताना ती माझ्या विचारांत बसत असेल तरच मी स्वीकारतो. अनेक मोठय़ा रकमेच्या भूमिका मी त्यांत वैचारिक स्पष्टता नसल्याने सोडून दिल्या आहेत.

मी तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांमध्ये रुची ठेवतो. एकच आयुष्य माणसाला मिळते. जन्मानेच कुणी सगळय़ा गोष्टी शिकून येत नाही. आपले आयुष्य म्हणजे अज्ञानी अवस्थेपासून खूप काही बोध होण्यापर्यंत निरंतर चालणारी यात्रा आहे. हेच कारण आहे, मी कधी दु:खी होऊ शकत नाही. मी फार गर्विष्ठ बनू शकत नाही. मला कधी कधी राग येतो. पण त्याला थांबविण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी माझी अंतर्गत लढाई कायम सुरू राहते. अनेक ग्रंथगुरूंनी मला रागातून बाहेर काढण्यात मदत केली आहे.

मला कोणत्याही गोष्टीत नंबर एक नाही बनायचे. मी जिथे आहे, जसा आहे, ज्या नंबरवर आहे, तेथे सुखी आहे. मला आठ तासांची झोप हवी. सकाळी जागे झाल्यावर आनंदाचे हसू माझ्या चेहऱ्यावर हवे. फक्त एवढीच माझी गरज असल्याचे मला पक्के माहीत आहे.   

तिवारीचा त्रिपाठी कसा झालो?

तिवारी आणि त्रिपाठी एकच. बोर्डाचा फॉर्म भरताना मी जाणीवपूर्वक त्रिपाठी हे नाव अंगीकारले. आमचे संपूर्ण गाव आपले आडनाव तिवारी लिही, पण दोन व्यक्ती या शिरस्त्याला मोडून आपले आडनाव त्रिपाठी म्हणून गिरवीत. माझे काका काशिनाथ त्रिपाठी हे सरकारी अधिकारी होते. दुसरे प्रोफेसर रामनरेश त्रिपाठी हे हिंदीचे विद्वान व्यक्तिमत्त्व होते. नववीत असताना माझ्या डोक्यात आले, गावातील जी माणसे आडनाव तिवारी लिहितात ती फक्त पांडित्य आणि शेतीतच रमतात. पण जे त्रिपाठी लिहितात, ते गावातील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे दहावीच्या अर्जपत्रात माझे आडनाव त्रिपाठी केले. मी दुनियातील असा पहिला पुत्र असेन ज्याने स्वत:बरोबर आपल्या पित्याचे आडनावदेखील बदलून टाकले. 

प्रेक्षकांकडून माझे मार्केटिंग..

मी साधे व्हॉट्सअ‍ॅप देखील वापरत नाही. माझ्याकडे स्वत:ची पीआर शक्ती नाही. स्वत:च्या मार्केटिंगसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. ‘ओटीटी’ आणि ‘इंटरनेट’ व्यापल्यानंतर माझी मार्केटिंग ही सामान्य दर्शकांनी केली. स्वत:चे पैसे खर्च करून माझे व्हिडीओ- फोटो प्रसारित करण्याची क्षमता माझ्यात कधीच नव्हती. आता आसाम, बंगालच नाही, तर कराची, रावळिपडीत देखील माझ्या सिनेमांतील छोटे- छोटे तुकडे काढून यूटय़ूबवर प्रसारित केले जात आहेत. त्यातून लाखो प्रेक्षकांपर्यंत मी आपोआप पोहोचत आहे. 

सिनेमा सोमवारपासून सुरू होतो..

सिनेमा शुक्रवारी नाही तर खरोखरी सोमवारपासून सुरू होतो. शुक्रवार ते रविवार त्याची मार्केटिंग सुरू राहते. सिनेमा चांगला असेल, तर तो लोक पाहायला जातात. त्याची आपासात चर्चा करतात आणि सर्वतोमुखी होऊन तो चालतोय की नाही, हे खरे सोमवारपासून कळते.

माझ्यातील मध्यमवर्गीय मूल्ये अद्याप शिल्लक..

मी अजूनही कुठल्याही हॉटेलमध्ये जातो, तेव्हा आहारात अन्न वाया जाणे मला आवडत नाही. आता इतक्या लढाईनंतर मी यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात असलो, तरी माझ्यात असलेला मध्यमवर्गी माणूस अद्याप शिल्लक आहे. मी आता मध्यमवर्गात मोडत नसलो तरी, ती मूल्यं माझ्यात शिल्लक आहेत. हे एका अर्थी चांगलेही आहे.

दुसऱ्यांच्या वेदना समजून घेतो..

दुसऱ्यांची दु:खे, दुसऱ्यांच्या पीडा, त्यांची जीवनयात्रा आणि इतिहास समजून घेतला, की पंकज त्रिपाठी म्हणून मी समृद्ध होतो. त्यांना समजण्याची आणि जाणून घेण्याची क्षमता माझ्यात येते. मी आयुष्यात ज्या जखमा झेलल्या, जो अनुभव घेतला, तो माझ्या चित्रपटांतील व्यक्तिरेखांमध्ये उतरला आहे. हा अनुभवच मला वारंवार चांगला माणूस बनविण्यासाठी प्रेरित करतो. मी दुसऱ्यांच्या वेदनेला खूपच लवकर समजून घेतो.

संवाद उत्स्फूर्त वाटण्यासाठी धडपड..

थिएटरमध्ये काम करणारा अभिनेता कधी रिकामे डोके घेऊन वावरत नाही. माझी संवादफेक ही लिहिल्यानुसारच होते, तर कधी आपोआप डोक्यातून बाहेर येते. माझ्या लहानपणी मी अनेक अपराध्यांना पाहिले, जे अ‍ॅटोमॅटिक बंदुकींबाबत खूपच संवेदनशील होते. त्यामुळे वासेपूरमधील ‘देख अ‍ॅटोमॅटिक आया’ हा गमतीशीर संवाद त्या स्मृतींचा परिपाक बनून उत्स्फूर्तपणे आला. अभिनय ही अशी कला आहे, की ज्यात लिहिलेली गोष्ट आणि संवाद इतरांचे असतील आणि व्यक्तिरेखेने ते म्हणताना हजरजबाबी शैलीत त्या क्षणी तयार केलेत असा भास निर्माण होईल. माझा संवाद, माझी वाक्ये तशी उत्स्फूर्त वाटावीत, यासाठी मी प्रयत्नशील असतो.

अडेलतट्ट जेव्हा द्रष्टा होतो..

एका दिग्दर्शकाशी संवाद साधताना मी त्याला सांगितले, की एखादा अभिनेता काम करताना कुणाचेच ऐकत नसला आणि सतत आपल्या मनाचेच करीत असला, तर त्याला संपूर्ण इंडस्ट्रीत अडेलतट्ट म्हणून ओळखले जाते. पण जर त्यानेच एखादा हिट चित्रपट दिला, तर तोच अडेल अभिनेता किंवा दिग्दर्शक इंडस्ट्रीमध्ये द्रष्टा म्हणून संबोधला जातो.

प्रू्णत: नैसर्गिक काहीच नसते..

सिनेमामध्ये पूर्णत: नैसर्गिक कामाची अपेक्षा कधीच करता येत नाही. कारण आम्ही एखाद्या लिहिलेल्या दृश्याची पुन:निर्मिती करतो. त्यात कॅमेरा लागलेला असतो, अनेक कलाकार असतात. वातावरण देखावा उभारल्यासारखे खोटे असते. आमचा प्रयत्न असतो, की प्रेक्षकाला ते खरेखुरे आणि नैसर्गिक वाटावे. कुणी तरी लिहिलेला संवाद आम्ही म्हणत असतो. कॅमेरामन, प्रकाशयोजना करणारेदेखील आपल्या जागेवर स्थिर असतात. हा सगळा खेळ जादूचा आहे. जादुगाराला माहिती आहे की आपल्या पोतडीत कबुतर कुठे आहे आणि कोणत्या वेळी ते बाहेर काढायचे. इतर क्लृप्त्यादेखील कधी काढायच्या यादेखील त्याच्याच हातात आहे. त्यामुळे हा जादूूचा खेळ आहे. पाहणाऱ्याला ही जादू नैसर्गिक वाटली पाहिजे. पण प्रत्यक्षात जादुगाराला त्यातील कलाबाजी किती आणि नैसर्गिक किती ते पक्के ठाऊक असते.

व्यक्तिरेखा घरी येते तेव्हा..

एखादी व्यक्तिरेखा शूटिंग संपल्यानंतरही घरी परतल्यानंतरही कायम राहते, असे अनेकदा होते. कारण त्याबाबत सतत विचार सुरू असतो. उठता, बसता, चालता-फिरता ती भूमिका कशी वठवावी यावर डोक्यात खल सुरू असतो. त्यामुळे शूटिंग संपल्यानंतर व्यक्तिरेखा घरीदेखील जगू लागते. पूर्वी पत्नी त्यावरून मला काही बोलायची. सुरुवातीला तिला वाटायचे की, अरे हा तर तो माणूसच नाही, ज्याच्याबरोबर आपण लग्न केले होते. पण आता ती भूमिकेसंदर्भातील माझ्या डोक्यात निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचे तीही मान्य करते.

शास्त्रोक्त अभिनय शिक्षण महत्त्वाचे..

एनएसडीत असताना आम्हा सर्व विद्यार्थ्यांना रत्नागिरीजवळच्या वालावली भागात दशावतार शिकायला पाठविण्यात आले. तेथे स्त्रियांच्या भूमिकाही पुरुषच उत्तमरीत्या करतात. तो अभिनय त्यांनी कोणत्याही शाळेत जाऊन नाही, तर पिढय़ान्पिढय़ा पाहून शिकलेला आहे, हे लक्षात आले. लोककलांमध्ये कुठलाच अभिनेता त्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करू शकतो. पण त्याला आधुनिक नाटकात वा चित्रपटांत काम करायचे असेल, तर अभिनयाच्या शास्त्रोक्त शिक्षणाची खूपच आवश्यकता असते. 

सिनेमांनी मला समृद्ध केले.. 

‘न्यूटन’मधील आत्मा सिंग आणि ओ माय गॉडमधील कांतीशरण मुदगल या माझ्या काही आवडीच्या भूमिका आहेत. ‘ओ माय गॉड 2’ ही ज्यांच्यासाठी म्हणून बनविली गेली, त्याच युवावर्गाला पाहण्यासाठी तिच्यावर निर्बंध आणण्यात आले. चित्रपटातील कहाण्या आपल्याला समृद्ध करतात. ‘ओमाय गॉड’ आणि ‘अटल’ या सिनेमांतील भूमिकांनी मला कितीतरी भरभरून दिले. त्यांना मी किती दिले, याची कल्पना नसली, तरी त्या व्यक्तिरेखांनी मला सर्वार्थाने समृद्ध बनवले.

संवेदना वाचवणे आवश्यक..

विकासाच्या क्रमात विनाशाची शक्यता अधिक असते. गावात काय गोष्टी राहायला हव्यात? तर विकासाच्या नावाने मूल्यांचा, विचारांचा सर्वनाश व्हायला नको. आपल्याकडे मुख्य समस्या ही आहे की समाजात करुणेची कमतरता निर्माण झाली आहे. करुणाची मात्रा वाढली, तर हे कलियुगाऐवजी सत्ययुग बनेल. करुणा आणि संवेदना वाचवणे आवश्यक आहे.

सिनेमा पाहण्याचा माझा अनुभव कमी..

गुरगावमधील भूमिका पाहून एकाने मला सांगितले की तू ब्रॅण्डोची नक्कल करतोस. त्यावर मी त्याला उत्तरलो की ब्रॅण्डो काय करतो ते मला दाखव. आत्तापर्यंत हॉलीवूडच्या तीन किंवा चार सिनेमांना मी पाहिले आहे. हिंदीतले जेमतेम ३० किंवा ३५. मराठीतले ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘हायवे’ मी पाहिला आहे. मला मुख्य धारेतल्या सिनेमापेक्षा इंडिपेण्डण्ट सिनेमा पाहायला आवडतो. माझा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप कमी आहे. ‘गॉडफादर’ पंधरा मिनिटांसाठी पाहिल्यानंतर लक्षात आले की, ब्रॅण्डो आणि माझी भूमिका हा एक सुखद जुळून आलेला योग आहे.

अभिनय म्हणजे ध्यानधारणाच..

अभिनय हा एक असा पेशा आहे, ज्यात एकाच वेळी आम्ही तीन चार कामे करतो. हे खूपच ध्यानधारणा करण्यासारखे काम आहे. मी एकाच वेळी अभिनय, संवाद आणि माझ्या कॅमेरासमोर दिसणाऱ्या भावनांचादेखील विचार करायचा आहे. त्या त्या भूमिकेला साजेशा आणि अचूक अभिनयाची माझ्याकडून पूर्तता केली जावी, त्याचबरोबर माझ्या सहकलाकाराच्या भूमिकेबद्दल आणि तिच्या सादरीकरणाचीदेखील मला काळजी घ्यावी लागते. आम्ही व्यक्तिरेखेमध्ये स्वत:ला पूर्ण विरघळून टाकतो. आमची कलाकारांची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा फार वेगळी आहे. तांत्रिक आणि सर्वच बाबतीत. ‘अटल’ सिनेमाचे काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशी मी ‘स्त्री’ चित्रपटाच्या सेटवर पोहोचलो. काही तासांच्या कालावधीत शूटिंग सुरू झाले आणि दिग्दर्शक वारंवार मला थांबवून सांगू लागला की, यात अटलजी दिसतायत. वारंवार टेक होऊनही माझ्याकडून अपेक्षित असलेल्या भूमिकेऐवजी अटलजी यांचीच छबी उतरत होती. शेवटी दिग्दर्शकाने शूटिंग थांबवून दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रीकरणाची मुभा दिली. कधीकधी आपल्या हाती एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरणे अवघड होते. तीस- चाळीस दिवस एखाद्या व्यक्तिरेखेचे सारे गुणावगुण अंतरी वागवून काम केल्यानंतर ते आपल्यातून वजा होण्यासाठी आणखी काही दिवस द्यावे लागतात.

शब्दांकन : पंकज भोसले

Story img Loader