scorecardresearch

कस्तुरीगंध : स्वार्थ आणि फसवणुकीची ‘पांघरलेली कातडी’

फ्रेंच भाषेतली दोन नाटकं त्यांनी भाषांतरीत केली. आणि कुणीतरी दिलेल्या आव्हानाचा  स्वीकार करून एक पाच अंकी स्वतंत्र संगीत नाटकही त्यांनी लिहिलं.

प्रा. विजय तापस vijaytapas@gmail.com

केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातली पदवी ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ने प्राप्त करणाऱ्या एका रँग्लरची मुलगी त्याच विद्यापीठात शिकते, गणितातच मास्टर्स पदवी मिळवते. मग पॅरीसला जाऊन फ्रेंच आणि जर्मन भाषांचा अभ्यास करते. गणितातली ट्रायपास पदवी संपादन करते. दहा वर्ष युरोपात राहून ‘जिनिव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिस’मध्ये नोकरी करते. तिथेच ओळख झालेल्या एका रशियन चित्रकाराबरोबर लग्न करते आणि एका मुलीला जन्म देऊन दीड वर्षांत घटस्फोट घेऊन मायदेशातल्या ‘संस्कृतीचा श्वासागणिक रास्त अभिमान’ बाळगणाऱ्या एका अर्कशहरात- म्हणजे पुण्यात परत येते, आणि इथे अतुलनीय कार्य करते.. याला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे त्या मुलीला तुम्ही काय म्हणाल? अशी एक मुलगी होऊन गेली, हे नक्की! ती मुलगी म्हणजे शकुंतला परांजपे! रॅंग्लर रघुनाथराव परांजपे यांची एकुलती एक मुलगी.

शकुंतला परांजपे म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व. आचार, विचार आणि विविध क्षेत्रांतला त्यांचा संचार पाहिला की आपण आजही अचंबित होतो. या बाई नाटककारही होत्या. फ्रेंच भाषेतली दोन नाटकं त्यांनी भाषांतरीत केली. आणि कुणीतरी दिलेल्या आव्हानाचा  स्वीकार करून एक पाच अंकी स्वतंत्र संगीत नाटकही त्यांनी लिहिलं. त्यांनी लिहिलेलं हे  नाटक आजच्या वाचक/ प्रेक्षकाला फारसं ग्रेट, फारसं मनोवेधकही वाटणार नाही, पण त्यांच्या काळात ते नाटक नक्कीच लक्षवेधी ठरलं असण्याची शक्यता आहे. कारण तेव्हाच्या ‘संस्कृतीबाज आणि शालीन’ पुण्यातला एक मोठ्ठाच चर्चाविषय स्वत: बाईच होत्या. शकुंतलाबाई म्हणजे अगदी ‘द हाय्येस्ट ऑर्डर ऑफ मेरीट’!

त्यांनी सकस मराठी-इंग्रजी लेखन केलं, नाटकं लिहिली, चित्रपटांतून लक्षणीय भूमिका केल्या, अण्णासाहेब कर्वे यांचं स्त्रीशिक्षणाचं आणि रघुनाथ धोंडो कर्वे यांचं संतती नियमनाचं कार्य त्यांनीच केलेल्या आग्रहानुसार बाईंनी जीव ओतून पुढे नेलं. स्त्रियांचं शिक्षण, त्यांचे हक्क आणि स्त्री-सुधारणा यांसाठी चाललेल्या चळवळींचा त्या अनेकदा आधारवड झाल्या. महाराष्ट्र विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभेच्या त्या सन्माननीय सदस्य झाल्या. आणि १९९१ मध्ये भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण’ सन्मान देऊन गौरवही केला.

‘वेगळेपणा’ हा त्यांच्या कोणत्याही कामाचा गुण. तो त्यांच्या नाटकातही आपल्याला हटकून दिसतोच. ‘चढाओढ’ आणि ‘सोयरीक’ ही त्यांची दोन नाटकं म्हणजे परदेशी नाटकांची रूपांतरं. तर अण्णासाहेब कर्वे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जे पुरुषपात्रविरहित नाटक लिहिलं, ते म्हणजे ‘प्रेमाची परीक्षा’! आज मी ज्या नाटकाचा उल्लेख करतो आहे ते नाटक म्हणजे ‘पांघरलेली कातडी’! हे नाटक साकारलं १९४२ सालात.  ‘पांघरलेली कातडी’ नाटकातल्या पाच अंकांतली प्रवेशांची संख्या विषम आहे. अंकानुसार प्रवेश पाहिले तर ते १, ३, २, २ आणि ३ असे दिसतात. नाटकात स्त्री-पात्रं आहेत चार. आणि त्यातली मंजिरी ही जणू नाटकाची नायिका आहे. तिची पालक, बॉडीगार्ड व नोकर आहे तुळसा. सौदामिनी ही तरुणी मंजिरीची मैत्रीण. आणि कथानकाच्या अखेरच्या पर्वात आपल्याला सामोरी येते ती कमलिनी. यात चार पुरुष-पात्रं आहेत. यातला नायक म्हणावा असा शरद, त्याचा मित्र मेघदूत, बाहेरख्याली आणि तद्दन व्यापारी वृत्तीचा चंदूलाल आणि कमलिनीचा भाऊ . हा भाऊ  नुसताच स्वार्थी नाही, तर ब्लॅकमेलरही आहे. हे नाटक ‘संगीत नाटक’ असून त्यात दहा गाणी आणि तीन कवितांचा समावेश आहे. ‘आव्हान स्वीकारायचं ते आरपार’ या न्यायाला धरून नाटय़पदं आणि कविता यांचं शिवधनुष्यही शकुंतलाबाईंनीच खांद्यावर घेतलं आहे.

१९४२ सालातल्या इतर मराठी नाटकांचे प्लॉट्स / कथानकांची वीण आपण लक्षात घेतली तर त्यात आपल्याला एक प्रकारची संभ्रमावस्था.. एक महत्त्वाची लाट ओसरल्यानंतरची ओकीबोकी अवस्था दिसते. गांधीयोग या काळात जोरावर होता हे खरं, पण त्यात टिळकवादी नाटकांसारखा जोम नव्हता. नाटकांचे विषय नाटकाला चटावलेल्या प्रेक्षकांच्या टेस्टबडस् शांतवणारे होते. मराठी नाटक ज्या वेगळ्या सामाजिकतेचा शोध घेत होतं आणि वेगळ्या वाटा धुंडाळत होतं, त्यातल्या एका वाटेवरचं (विवाह, प्रेमसंबंध, स्त्री-पुरुषसंबंध वगैरे) नाटक म्हणून ‘पांघरलेली कातडी’चा कदाचित आपण विचार करू शकू. हे नाटक अनेकांच्या दृष्टीने उत्तम नाटकही ठरणार नाही याची मला जाणीव आहे. मात्र, मला ते दखलपात्र वाटतं, याचं कारण त्यापुढचा मराठी नाटकांचा प्रवास- साधारण १९५५-६० पर्यंतचा- ज्या नाटय़सूत्रांचा ध्यास घेत झाला, त्याचा पायरव ‘पांघरलेली कातडी’मध्ये स्पष्टपणे कानावर येतो.

१९४२ साली जन्माला आलेल्या या नाटकाचा प्रारंभ होतो तोच मुळी रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यात. १९३२ ते १९४२ या दशकात तरी कोणत्याही नाटकाचं नेपथ्य रेल्वेचा डबा नव्हतं. शकुंतलाबाईंच्या वास्तवाशी असलेल्या घट्ट नात्याची तो रेल्वेचा डबा ही पहिली नाटकीय खूण म्हणावी लागेल. नाटकातल्या इतर स्थळांतही हा वेगळेपणा दिसेल. रेल्वे फलाटावरची ‘रिफ्रेशमेंट रूम’, बंडगार्डनचा परिसर, पाचव्या अंकात तर चिंतामण त्र्यंबक खानोलकरांच्या ‘अवध्य’ नाटकात जसा पार्टिशनचा नाटकीय खेळ आहे तसाच पार्टिशनचा (रंगमंचाचे दोन भाग करून दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पात्रांचं वावरणं, त्यांचे सीन्स घडवणं..) खेळ इथेही आहे. या नाटकात ज्या जोडीभोवती सर्व नाटय़ाची गुंफण झाली आहे ती जोडी म्हणजे शरद आणि मंजिरी. हा शरद विवाहित आहे ही गोष्ट आपल्याला दुसऱ्या अंकात कळते, तर तीच गोष्ट तुळसा- मंजिरी-सौदामिनी यांना पाचव्या अंकातल्या शेवटच्या प्रवेशात कळते. दुसरी जोडी आहे मेघदूत आणि सौदामिनीची. हा छाप अगदी संस्कृत नाटकांत शोभावा असा दिसतो. नायक-नायिकेची सखा-सखी असलेली ही जोडी म्हणजे नायक-नायिकेची प्रेमकथा पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सगळे व्याप पार पाडणारी इन्स्ट्रुमेंट्स!

या दोन जोडय़ांमध्ये आर्थिकदृष्टय़ा खरं तर धनाढय़ कुणीच नाही. पण शरद असो वा मंजिरी- तसा आव आणतात, तसा देखावा करतात. ‘आपण जसे नाही तसे दाखवण्याची अपरिहार्यता प्रेमात निर्माण होते’ या नियमानुसार शरद-मंजिरी एकमेकांना प्रभावित करण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार घेतात, त्या गोष्टी म्हणजे तो चित्रकार असल्याचा, तर मंजिरी कवयित्री-लेखिका असल्याचा बहाणा करत राहते. खरा चित्रकार मेघदूत आणि खरी लेखिका सौदामिनी आहे.   शरद विवाहित असून अविवाहित असण्याचा, संस्थानिकाचा मुलगा असल्याचं नाटक करत राहतो. मंजिरीसुद्धा कमी नाही. ती लेखिका असल्याचं तर भासवतेच; पण आपण एका नायकीणीची मुलगी आहोत हे सत्य ती शरदपासून लपवून ठेवते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल वा नसेलही, पण त्यांना एकमेकांची गरज आहे. या गरजेतूनच नाटकाच्या कथानकाचा विस्तार, विकास होताना दिसतो. पुढचे सगळे अंक या कथासूत्राभोवतीच फिरत राहतात. शरदचं वैवाहिक सत्य आणि बहिणीला वेड लागल्याचं भासवून शरदकडून पैसे उकळणारा कमलिनीचा भाऊ , मंजिरी ही नायकिणीची मुलगी असणं आणि तुळसा या कोळणीने या मुलीचं पालनपोषण करणं, मेघदूत-सौदामिनी यांना जगण्याचा आटापिटा करताना गरजांच्या तोंडमिळवणीसाठी मित्र-मैत्रिणीला साथ द्यायला भाग पडणं असे अनेक पैलू या नाटकाला आहेत. Every individualls life carries thousands of dramatic situations, surprises and lifelong pains’ असं व्हर्जिनिया वुल्फचं जे विधान आहे त्याची प्रचीती या वरवर ‘विनोदी’ भासणाऱ्या नाटकातून येते. तोंडाळ, तडकभडक असलेली तुळसा व्यावहारिक जाणतेपण आणि माणसांची सर्वोत्तम पारख करण्याची तिची क्षमता यामुळे नाटकात एक मध्यवर्ती स्थान प्राप्त करून घेते. तिचं नाटकातलं अस्तित्व वजा केलं तर नाटकाचा प्राणच काढून घेतल्याचं कारस्थान केल्याचा आरोप होईल. ही भूमिका तर शकुंतलाबाईंनी केलीच, (कोळी समाजातल्या स्त्रियांचा पेहराव, शैली, शारीरभाषा, टिपीकल शैलीतलं शब्दोच्चारण, त्यांची जगण्याबद्दलची समज समजून घेण्यासाठी शकुंतलाबाई माहिमच्या कोळीवाडय़ात येऊन राहिल्या होत्या, असं सई परांजपे यांनीच नोंदवलं आहे.) पण नाटकाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं. मी या नाटकाचा तीन कारणांसाठी या सदरात समावेश केला आहे. प्रेमविवाह- लग्नसंबंध- पहिली पत्नी हयात असताना केलेला विवाह यासंदर्भात समाजात चालणाऱ्या चर्चाना दिलेला हा अनाग्रही प्रतिसाद आहे, हे कारण क्रमांक एक. दुसरं कारण म्हणजे नाटकाची पूर्णपणे वास्तवमुखी, अनलंकृत भाषा. ही भाषा कसलाही क्लेम करत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची, विविध विषयांत गती-मती-मते असणारी, जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेली एक आधुनिक स्त्री नाटक लिहिते, ही मला दखलपात्र घटना वाटली. ‘ही नाटककार अधिक लिहिती राहिली असती तर बरं झालं असतं..’ असं वाटतं, हे नक्की! 

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about shakuntala paranjape daughter of wrangler raghunathrao paranjape zws

ताज्या बातम्या