डॉ. केशव सखाराम देशमुख
विस्कटलेल्या गावांचा भेदक चेहरा आणि हरवत चाललेल्या मातीचे आक्रंदन टिपणारी ऐश्वर्य पाटेकरांची ‘कासरा’ काव्यसंग्रहातील एकूणच कविता ‘ग्रामीणत्व’ नव्या रूपांत मांडते. नव्हे, तर ‘ग्रामीण’ असा एवढा चौकोन ओलांडून पुढे जाणारी ही कविता आजचा जागतिक अस्वस्थनामाच सादर करते. प्रथमदर्शनी कवीचे आत्मचरित्र वाटावे, अशी ही कविता त्याचवेळी महाराष्ट्राच्या शेतीमातींचे, गाववंशाचेही चरित्रच होऊन जाते.
‘कासरा’ या एकाच शब्दांत वेदनाभोग, घाम, श्रमसंस्कृती, तेथील अवघे जीवजगत आणि मानवी जगण्याचे दशावतारही ध्वनीत झाले आहेत.
‘‘जागीच जखडून धरणारा
वर्तमान वास्तवाचा कासरा
त्याचा पीळ सैल होण्याऐवजी दिवसेंदिवस
आवळतच चाललाय
व्यवस्थेच्या तुरुंगात जागच्या जागी
खुरमुंडी…’’

अशा शब्दांत गच्च धरून ठेवलेली मातीची / माणसांची / गावांची तगमग अस्वस्थ करून सोडणारी.
‘कासरा’तील माईंची, बाईंची वेदनेची अस्वस्थ करणारी ‘गाथा’ आमच्या संतांच्या प्रतिभेचे स्मरण करून देणारीच. ‘नजरेआड कलंडलं गेलेलं गाव’, ‘बाया’, ‘मातीच्या लेकी’, ‘आई, सूर्य आणि चूल’, ‘फक्त ‘आवडाई आणि कवितेची मुळाक्षरे’, या आणि इतर काही कवितांमधून स्त्रीवेदनेची बहुविध रूपे विलक्षण सामर्थ्यांसह कवीनं उलगडून दाखविलेली आहेत.
कवितेचा प्राण कवीच्या संवेदनधर्माचा सार म्हणून ‘कासरा’मधून भेटणारी ‘आई’ ही लढा, संघर्ष, घाम, तत्त्वज्ञान, निष्ठा, श्रम, वेदना, मानवता ममता: अशा सर्वच मूल्यांची अर्कशाळा होऊनच कवितांमधून वाचकांना भेटते.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आत्मशोधाचा प्रवास…

‘रात्री आई झोपल्यावर तिला पांघरूण घालताना
मी तिच्या डोळ्यांत हुडकीत असतो गाव…’
‘ग्लोबल’ म्हणवल्या जाणाऱ्या बदलांची विराटचिन्हेही या कवितेत पाहावयास मिळतात. ‘निकाली निघालेला प्रश्न’, ‘ढुंमकं’, ‘एव्हाना पृथ्वीच्या उकीरड्यावर’, ‘झाडांची कत्तल किंवा शोकसंदेश’, बंदूक , ‘नांगर’, ‘विठ्ठलाची कवटी’,‘पृथ्वीएवढी भाकर’, ‘आजीबाई, जग आणि कावळे’ या कविता पाषाणकठीण असं वास्तव; शिवाय जळजळीत दीर्घ सत्य सांगत वाचणाऱ्यांच्या मनातही कालवाकालव उत्पन्न करतात. या संग्रहातील तीन कविता जगण्यातली पडझड तसेच बदलांच्या नावांखाली संवेदनांचे वजाबाकीत जाणे सांगू पाहतात. ‘जीएसटी’ हा विषय पोटांत घेऊन आलेली ‘घरभर झालेला धूर’ ही कविता अ-काव्यात्म आणि पसरट झालेली वाचताक्षणीच जाणवतेच; मर्यादेची जागा म्हणून एवढी एक नोंद इतकच.

हेही वाचा : बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कासरा’ काव्यसंग्रहातील कविता अभिव्यक्तीच्या नावीन्यासह खोल अशा आशयाला धरूनच जन्म घेते. प्रतिमासंभाराच्या पातळीवर ओळी, शब्द, शब्दशाृंखला यांची ‘कासरा’मधील घडण आत्यंतिक गुणवत्ता स्पष्ट करणारी म्हणता येईल. ‘ग्रामीण’ असं संबोधन लक्षात घेणाऱ्या वाचकांना ‘आपण काहीएक नवं, निराळं, पक्कं वाचतो आहोत’; असा प्रत्यय देणाऱ्या अवघ्या क्षमता या संग्रहामध्ये उपस्थित आहेत
‘कासरा’, -ऐश्वर्य पाटेकर, पॉप्युलर प्रकाशन, पाने-१२८, किंमत-२५० रुपये.
keshavdeshmukh74@gmail.com