सारिका चाटुफळे कुलकर्णी
आजूबाजूचे सगळेच उन्हाळी सहलीसाठी दूरदूरवर जात आहेत हे बघून आम्हालाही जावंसं वाटू लागलं. आता इतक्या ऐनवेळी कसं काय बुकिंग मिळणार असं शेजारच्या मंजिरी वहिनींना विचारल्यावर त्यांनी एका प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीचा नंबर दिला आणि सांगितलं, ‘‘अगं, माझी ओळख आहे तिथे. मी बोलले आहे त्यांच्याशी. जाता येईल तुम्हाला. तू आजच्या आज त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून ये.’’
खासदारकीचं तिकीट मिळाल्यावरही उमेदवाराला जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला हे ऐकल्यावर झाला होता. जीव अगदी भांड्यात पडला होता. फोन करून ट्रॅव्हल कंपनीत भेटायला जाण्याची संध्याकाळची वेळ ठरवली. आता आपल्यालाही ऑफिसमधील सगळ्या सहकाऱ्यांसारखे सहलीला जाता येईल या आनंदात दुपारी जेवणात एक वाटी आमरस जास्तच खाल्ला आणि गाढ झोप लागली, इतकी मधुर स्वप्नं पडली. स्वप्नात मला वेगवेगळी सहलीची ठिकाणे दिसू लागली. केरळ, शिमला, कुलू, मनाली, लडाख, उत्तराखंड असं सगळं दिसू लागलं. स्वप्नांना पैसे पडत नाहीत आणि त्यांना बंधनं नसतात त्यामुळे त्यात अगदी बाहेरच्या देशांच्या एक-दोन सहलीदेखील उरकून घेतल्या.
आनंदात संध्याकाळी आम्ही दोघं नवरा- बायको ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसात गेलो. मनोमन मंजिरी वहिनींना धन्यवाद देतच होते. त्या ऑफिसात पाऊल ठेवताच आपण अगदी योग्य ठिकाणी आलेलो आहोत याची खातरी झाली. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण होतं. ‘प्रवास’ हा विषय घेऊन कित्येक स्लोगन्स भिंतीवर लावलेली होती. आम्ही आत गेल्या गेल्या एक तरुण समोर आला. आम्हाला काय हवं आहे याची चौकशी केली आणि आम्हाला एका आरामदायी कोचावर बसायला सांगितलं. अत्यंत नम्रतेनं एक फॉर्म भरायला दिला. ‘पाच मिनिटंच लागतील हा’ असा विश्वास देऊन तो गेला. बरोबर साडेचौथ्या मिनिटाला तो आला आणि आम्हाला एका केबिनकडे घेऊन गेला. केबिनमध्ये हसऱ्या चेहऱ्याची एक तरुण सुंदर ललना बसलेली होती. नमस्कार वगैरे औपचारिकता पार पाडल्यावर तिने आमचा भरलेला फॉर्म हाती घेतला. यावर्षीच्या अप्रेझलमध्ये किती रेटिंग आले हे कानावर पडण्याआधी जी अवस्था होते तसं मला झालं. आम्हाला जायला मिळणार की नाही याची काळजी वाटू लागलेली होती. ललनेच्या चेहऱ्यावरदेखील चिंता दिसत होती. ती म्हणाली, ‘‘तुम्हाला कल्पना आहे ना, तुम्हाला बुकिंग करायला खूप उशीर झाला आहे. पण मंजिरीताई ओळखीच्या आहेत तर काम करूया.’’
आणखी वाचा-डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
मला पुन्हा हुश्श झालं. आता तिनं उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय आम्हाला सांगायला सुरुवात केली. अधेमधे आमच्या चेहऱ्यांकडे बघत होती. आम्हाला नक्की कशात स्वारस्य आहे हे ती तपासत असावी. ती म्हणाली, ‘‘तुम्ही पर्याय कुठलाही घेतला तरी धमालच असणार.’’
आम्ही मख्खपणे विचारलं, ‘‘ते कसं काय?’’
‘‘अहो, आमचे ते तर स्लोगन आहे. धमाल गॅरंटी. मला एक सांगा, तुम्हाला रिल्स बनवता येतात का?’’
‘‘रिल्सचा काय संबंध?’’
‘‘अहो म्हणजे काय? हल्ली सहल त्याशिवाय पूर्णच होत नाही.’’
‘‘पण आम्हाला असले काही जमत नाही हो.’’
‘‘काही काळजी करू नका. आमचे वेगळे पॅकेजेस आहेत. त्यात कपल रिल्स, सिंगल रिल्स, ग्रुप रिल्स असं सगळं काही आहे. आम्ही अगदी माफक शुल्क घेऊन आधी त्या रिल्सचं ट्रेनिंग देतो.’’
‘‘हे बरं झालं. म्हणजे धमाल गॅरंटी.’’
‘‘एकदम बरोबर.’’
अहोंच्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली, ‘‘सरांना रिल्सचं टेन्शन आलेलं दिसत आहे. सर, काही काळजी करू नका. आम्ही ट्रेनिंगमध्ये सगळं कव्हर करू. आम्ही काही व्हिडिओ बघायला देऊ, घरी जाऊन फक्त त्यांचा नीट अभ्यास करा. त्यात विशेष काही नाही. आता सध्या ट्रेंडमध्ये असलेली काही रिल्सची गाणी आहेत. जसं की ‘जमाल कुडू’, ‘गुलाबी साडी’ वगैरे वगैरे. कोणाला हवं असल्यास अजूनही मधुमाससारखी गाणीसुद्धा देऊ. थंड प्रदेशासाठी ‘ये हसी वादिया’ कायम डिमांडमध्ये असतं. पण त्यासाठी लागणारी प्लेन साडी, स्लिव्हलेस ब्लाउज असं तुम्हाला बरोबर घ्यावं लागेल. सरांचं काही नाही, त्यांना फक्त स्वेटर महत्त्वाचं आहे.’’
मी घाबरत विचारलं, ‘‘अहो, एवढ्या थंडीत स्लिव्हलेस ब्लाउज आणि पातळ शिफॉन साडी कशी नेसणार?’’
तिनं झटक्यात उत्तर दिलं, ‘‘मॅडम, काही काळजीच करू नका. धमाल गॅरंटी. रिल्स बनवलं की लगेच तुम्ही अंगात स्वेटर्स आणि स्कार्फ घाला. आयुष्यभराच्या आठवणी असतात मॅडम. एवढं तर करावंच लागेल.’’
मला माझा स्वत:चाच राग येत होता. एवढ्या मोठ्या आनंदाचा ठेवा ती आमच्यासमोर ठेवत होती आणि मला थंडीची काळजी वाटत होती. कूपमंडूक म्हणतात ते हेच. मी साडी नेसण्याची तयारी दाखवल्यावर ती खूश झाली.
आता तिनं पुढचा प्रश्न समोर ठेवला, ‘‘तुम्हाला नाचता येतं का?’’
आम्ही दोघं पुन्हा गोंधळलो. सहलीला जाण्याचा आणि नाचाचा काय संबंध आहे? शिवाय, जे काय नाचायचं आहे ते रिल्समध्ये करणार ना.
आणखी वाचा-शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
पुन्हा तिला स्पष्टीकरण द्यावं लागलं, ‘‘नाही हो मॅडम, रिल्समध्ये फक्त विशिष्ट हावभाव करायचे असतात. नाचाचे रिल्स वेगळे असतात. जसं ‘ये हसी वादिया’ गाणं करताना रोजामधील मधू सारखं फक्त साडीवालीनं येऊन स्वेटरवाल्याला एकदोनदा मिठी मारायची. पण आपल्याकडे धमाल गॅरंटी असल्यानं आपण तिथं संध्याकाळी हॉटेलवर सगळ्यांचा नाच घेतो. एकदम तुफान धमाल येते. तुम्हाला येत नसेल तर काहीही काळजी करू नका. त्याचंदेखील ट्रेनिंग पॅकेज आपल्याकडे उपलब्ध आहे.’’
‘‘एवढंच असणार आहे का सहलीत?’’
‘‘छे छे. अजून खूप काही आहे. जसं की खरेदी. प्रत्येक ठिकाणची खरेदी काय करायची, वस्तू कशा निवडायच्या यासाठी एक ओरिएन्टेशन सेशन आपण आधी घेऊया. आधी तुमचं डेस्टिनेशन ठरू दे. मग त्याबद्दल आपण बोलूया. काय होतं माहितीये का, लोक खरेदी करताना फसवले जातात. पण आम्ही त्यांना तिथे नेलं आहे म्हणजे ती आमची जबाबदारी आहे.’’
‘‘कशाची, फसवण्याची?’’ इतक्या वेळात पहिल्यांदा यांच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं होतं.
ललना हसली, ‘‘काय गंमत करता हो सर. अहो खरेदी करून देण्याची जबाबदारी आमची ना. म्हणून त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू. शिवाय अशातच आम्ही नव्यानं एक पॅकेज अॅड केलं आहे. आतापर्यंत प्रत्येक पर्यटनस्थळी तिथले स्थानिक पारंपरिक कपडे घालून लोक फोटो काढतात. आजवर आम्ही असे कपडेसुद्धा द्यायचो. पण आता निवडणुकीचा काळ आहे ना. मग तिथल्या स्थानिक नेत्याचे विशिष्ट प्रसिद्ध कपडे घालून आम्ही फोटोसेशन करतो. जसं की केरळ, तामिळनाडूमध्ये विशिष्ट लुंगी घालायला मिळेल. गुजरातमध्ये जॅकेट. कोलकात्याला गेलो तर तिकडे पांढरी साडी आणि स्लीपर्स घालून फोटो काढण्याची योजना आहे.’’
अहोंना आता एकदम चेव चढला होता. त्यांनी विचारलं, ‘‘कुठल्या भागात आदिमानवाच्या गुहा वगैरे नाहीत ना? नाहीतर तुम्ही आम्हाला झाडाची पाने घालून फोटो काढायचीपण स्कीम द्याल.’’
आता तर ललना जोरजोरात हसली. माझ्याकडे बघून म्हणाली, ‘‘मॅडम, तुम्हाला घरी चांगली करमणूक आहे हो. सर किती फनी आहेत नाही?’’
सरांचा फणा तिला फनी वाटला होता.
आता ती स्वत:शीच म्हणाली, ‘‘रिल्स झाली, नाच झाला, कपडे झाले, खरेदी झाली. हा सर. तुमची जेवणाची आवडनिवड सांगा.’’
मी विचारलं, ‘‘जेवणाची आवडनिवड कशाला हवी? म्हणजे सामिष, निरामिष वगैरे का?’’
‘‘ते तर आहेच मॅडम, पण तुम्हाला कुठल्या प्रकारचे जेवण आवडेल? म्हणजे दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी? अगदी हवे असल्यास बाहेरच्या देशातील पदार्थसुद्धा आपण करायला सांगू शकतो.’’
‘‘अहो, पण जिथे जाऊ तिथले पदार्थ नाही का चाखायचे?’’
आणखी वाचा-निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
‘‘तसंही करू शकता. पण लोकांना हल्ली तसं आवडतंच असं नाही. म्हणून मग आम्ही हे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. काय हवे ते खा. अगदी आमरस पुरी जरी मागितली तरी देऊ. तुम्हाला सांगू का, अगदी आयफेल टॉवरपाशीसुद्धा आम्ही वडापाव खायला घालू शकतो आमच्या ग्राहकांना. म्हटलं ना धमाल गॅरंटी.’’
‘‘विष आवडत असेल तर तेदेखील द्याल का?’’ इति अहो.
‘‘तेच म्हटलं, सरांचा विनोद कसा आला नाही अजून?’’ असं जोरजोरात हसत ललना म्हणाली.
एवढी चर्चा झाल्यावर महत्त्वाचं सगळं सांगून झालं आहे असं तिनं घोषित केलं. न राहवून मी विचारलं, ‘‘अहो मॅडम, पण अजून तर आपण ठिकाण ठरवलं नाही. आणि त्या त्या ठिकाणी काय काय बघायचं आहे हे समजल्याशिवाय कसं नक्की करायचं?’’
ती आता गोंधळली होती. तिनं विचारलं, ‘‘म्हणजे तुम्हाला नक्की काय बघायचे आहे?’’
मी सांगितलं, ‘‘आता हे बघा, जसं हिमाचल प्रदेशात गेलो तर निसर्ग, बर्फ, काही मंदिरं असं सगळं आहे की नाही? लडाखला गेलो तर तिथला कारगिल इतिहास, निसर्ग असं सगळं आहे ना?’’
ती म्हणाली, ‘‘एवढंच ना? अहो तुम्ही फोटो काढाल, रिल्स बनवाल, गाडीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाल तेव्हा निसर्ग बघायला मिळेलच ना. लोकांना हल्ली ते करायचे नसते हो. त्यांना हल्ली निसर्ग न बघता त्या निसर्गाचे स्वत:बरोबर फोटो काढायचे असतात. प्रसिद्ध गाण्यांवर प्रसिद्ध ठिकाणी रिल्स बनवायचे असतात आणि लगेच एन्जॉयिंग अ लॉट असं म्हणत स्टेटस्ला लावायचे असतात. खूपशी खरेदी करायची असते. भरपूर खायचं-प्यायचं असतं. निसर्ग तर काय घरी आल्यावर त्याच फोटोत आणि रिल्समध्ये दिसतोच म्हणतात. आणि प्रश्न राहिला इतिहासाचा तर तो काय गूगल क्लिकवर आहे. त्यासाठी इतका खर्च करायचा का असा त्यांचा प्रश्न असतो. मी इतके देश बघितले, इतकी ठिकाणे बघितली अशी यादीत फक्त टिकमार्क करत पुढं जायचं असतं. लोक यातच आनंद शोधतात हल्ली.’’
तिनं बरीच वर्षे या व्यवसायात घालवलेली होती. तिचा अभ्यास पक्का होता. गोंधळून तिच्याकडे बघत बसण्याशिवाय आमच्या हातात आता काहीही राहिलेलं नव्हतं.
sarika@exponentialearning.in