वसीमबारी मणेर
लक्षद्वीपच्या बेटांवरील मच्छीमार समुदायाने आपल्या लहानशा, पण सौंदर्याने नटलेल्या प्रदेशाच्या जतन आणि संवर्धनाचे काम मनावर घेतले. प्रवाळांचे महत्त्व, मोठ्या शिंपल्यांचे संरक्षण यासाठी प्रबोधन केले. समुदायाला काही कठोर नियम घालून दिले. भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रयत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पावर केलेल्या ‘अवर आयलंड’ या माहितीपटाविषयी…
स्थानिक समाजाने केलेल्या निसर्गसंवर्धनाच्या घटना पुष्कळ असतात; परंतु त्याविषयीच्या फिल्म्स फारशा पाहायला मिळत नाहीत. फिल्म मेकर म्हणून अशी व्यावसायिक संधी मिळणे तर त्याहून दुरापास्त. लक्षद्वीपच्या बेटांवरील मच्छीमार समुदायाने आपल्या भविष्याचा विचार करून, प्रसंगी पोटाला चिमटा काढून निसर्गसंवर्धन केले. त्यांच्या या उपक्रमाची यशोगाथा चित्रित करण्याची संधी मला २००७ साली ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’,‘लीड इंटरनॅशनल’ आणि ‘डार्विन इनिशिटीव्ह’ यांच्या संयुक्त विद्यामाने मिळाली. ‘अवर आयलंड’ नावाची डॉक्युमेण्ट्री यातून तयार झाली.
लक्षद्वीप बेटांवर काम करायला मिळणार या केवळ विचारांनीच मी खूश होतो, पण असा विषय मांडायचा कसा, हा प्रश्न होता. त्यातील घटक गुंतगुतीचे होते. या बेटावरील कामाची माहिती घेऊन इतर बेटांवरही अशा प्रकारचे प्रयत्न व्हावेत असा मानस त्या संस्थांचा होता. ‘बीएनएचएस’चे प्रकल्प समन्वयक दीपक आपटे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून आम्ही काही मुद्द्यांची आखणी केली. पण समाधानकारक काही मिळत नव्हतं. आम्ही ठरवलं की बेटांवर जावे, शूटिंग करावे आणि ते करता करता फिल्मचा आराखडा ठरवावा. ‘डॉक्युमेण्ट्री’ फिल्म करताना असे बरेचदा करावे लागते. कारण अनेक पैलू आपण जोवर जमिनीवर उतरत नाही तोवर लक्षात येत नाहीत.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आत्मशोधाचा प्रवास…
लक्षद्वीपच्या बेटांवर जायचे तर एकमेव सोयीचा मार्ग म्हणजे केरळ- कोचीवरून जहाज. तशी लक्षद्वीपमधील आगात्ती नावच्या बेटावर एक जुजबी धावपट्टी आहे आणि तिथून एअर इंडियाचे एक जुनाट १६ आसनी विमान वाहतूक करीत असे. किंगफिशरनेही एक नव्याने मार्ग तिथे उभारला. त्यांचे एक छोटे विमान तिथून मोजकी उड्डाणे करीत असे. इतका लांब समुद्र. महागडे विमान तिकीट आणि समुद्रात विमाने कोसळण्याच्या गोष्टी ऐकून आम्ही आपले जहाज धरायचे ठरवले आणि ते आमच्या पथ्यावर पडले.
कोची शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर ‘विलिंगडन’ नावाचे बेट आहे. हा लक्षद्वीपला जाणाऱ्या जहाजांचा धक्का. आम्ही कोचीला पोहोचून तिथे गेल्यावर कळाले की आजचे जहाज बुकिंग फुल आहे. पुढचे जहाज दोन दिवसांनातर. एम.व्ही. अमिनिदिवी याच जहाजाने जायचे असे ठरले होते. त्यामुळे कोचीमध्ये दोन दिवस मुक्काम करणे आले. कंटाळत दोन दिवस घालवल्यानंतर शेवटी तो दिवस उगवला. लक्षद्वीपवर जाण्यासाठी स्पेशल परवाना लागतो. तो परवाना आमच्या अख्ख्या फिल्म युनिटसाठी त्या संस्थांनी आधीच काढून ठेवला होता. एमव्ही अमिनिदिवी धक्क्याला लागले. आम्ही आमचे सामान चढवले आणि डेक गाठला.
सगळा प्रवासीवर्ग डेकवर जमा झाला होता. जहाज निघाले तसे लोकांचे वेगवेगळे गट झाले आणि गप्पा सुरू झाल्या. आम्हीही गप्पांत रंगलो आणि लक्षद्वीपच्या भेटीस आतुर असलेले आम्ही इथूनच लक्षद्वीपच्या स्थानिक माणसांशी गप्पा करून अधिक माहिती घेऊ लागलो. बोलता बोलता लक्षात आले, ही माणसे बेटांबद्दल बोलताना खूप आत्मियतेने, पोटतिडकीने बोलतात. कारण ही बेटे हे त्यांचे सर्वस्व आहे. आणि इथूनच फिल्मच्या संहितेसाठी बीजं मिळू लागली.
हेही वाचा : बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास
लक्षद्वीपची बेटे ही कोरल आयलंड म्हणजे ज्वालामुखीच्या डोंगर मध्यावर प्रवळांची वाढ होऊन बनलेली आहेत. समुद्रसपाटीवरून जेमेतेम दोन मीटर उंची असलेली ही बेटे वातावरणातील बदलाच्या धोक्यात सगळ्यात आधी प्रभावित होणाऱ्यी गटात मोडतात. बेटांना जोडून खाऱ्या पाण्याची सरोवरे (लगून) असतात. त्यामुळे या बेटांवर मोठाल्या लाटा बीचवर नाही तर समुद्रात त्या तलावाच्या कडांवर दूरवर फुटताना दिसतात. ही सरोवरे जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असतात. लक्षद्वीपची बेटे हवेतून पाहिली तर हे तलाव पाचूच्या हिरव्या गर्द रंगाचे दिसतात, तर समुद्र मरीन ब्ल्यू या गडद निळ्या रंगाचा. भारतीय किनारपट्टीवर उभं राहून असे रंग आपल्याला कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे लक्षद्वीपला जाऊन आल्यावर इतर कोणताही बीच सुंदर दिसणे शक्य नाही.
या बेटांवर माती नाही. आहे ती फक्त रेती आणि प्रवळांचा खडक, त्यामुळे नारळाचे झाड वगळता दुसरी वनस्पती तिथे दिसणे जवळपास दुरापास्त. त्यामुळे अन्न मुख्यत: मासे. यासोबत जुजबी स्वरूपाचे बकरी आणि कुक्कुटपालन करून मटन आणि चिकन आणि मंगलोरहून येणाऱ्या (त्या काळी) मंजू या एकमेव मालवाहू जहाजातून येणारा भाजीपाला, बीफ आणि इतर किराणा. जर काही समुद्रातील हवामान बदलले आणि मंजू जहाजास येण्यास विलंब झाला अथवा आलीच नाही तर लक्षद्वीपवर लगेच आणीबाणी होत असे. सामान पटकन संपून जात असे आणि जेवण डाळ-भातावर येत असे. आमचे शूटिंग चालू असताना एकदा मंजू येऊन लगूनच्या बाहेर लागली आणि हवा खराब झाली. बेटावरून मंजू दिसत होती, पण तिथे जाऊन भाजीपाला इतर सामान आणणे काही शक्य नव्हते. यात दोन दिवस गेले. काही न करता आम्ही हातावर हात ठेवून बसलो.
हवामान बदलाइतके संवेदनशील असणारे हे बेट पूर्णत: त्याच्या समुद्रावर अवलंबून आहे. या लोकांच्या उपजीविकेचे आणि अन्नाचे साधन हे समुद्र आणि त्यातून मिळणारी मच्छी हेच आहे. लक्षद्वीपच्या बेटांवर टूना जातीचा मासा मिळतो. हे त्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन, बाकी मिळणारी मच्छी हे अन्न, याचा शोध माहितीपटादरम्यान लागला.
हेही वाचा : शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
टूना वाळवून डबाबंद करून निर्यात केला जातो. टूना हा घोळक्याने राहणारा शिकारी मासा, त्याला पकडण्यासाठी बेटफिश म्हणजे जे सुकटीच्या आकाराचे छोटे मासे लागतात. हे मासे पकडून मच्छीमार बोटींवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये जिवंत ठेवतात. मग या बोटी मासेमारीस निघतात. दूर आत समुद्रात टूना समूह आढळला की या बेटफिशना फवाऱ्याद्वारे पाण्यात सोडले जाते. ही बेटफिश खाण्यासाठी टूना येतात आणि मग त्यांची मच्छीमारी केली जाते. त्यामुळे बेटफिश हे अत्यंत महत्त्वाचे साधन राहते. आता हे बेटफिश केवळ लगूनमधील निरोगी प्रवाळांच्या सान्निध्यात सापडते. उत्तम आणि समृद्ध प्रवळांची गर्दी असलेल्या लगूनमध्ये बेटफिश सापडतात. उत्तम प्रवाळ आणि समृद्ध लगून आहे हे कसे कळावे तर त्याचे इंडिकेटर स्पेशिज हे ‘जायंट क्लाम’ म्हणजे मोठा शिंपला. मोठ्या बशीच्या आकारापासून ते छोट्या घमेल्याच्या आकारांपर्यंत हे जायंट क्लाम वाढतात. हे फक्त समृद्ध प्रवळांवर वाढतात. म्हणून या संस्थांनी मोठा शिंपला संवर्धन प्रकल्प आखला. जेणेकरून मोठा शिंपला शाबूत राहिला तर आपल्याला मोठा शिंपल्याच्या माध्यमातून लगूनचे आरोग्य समजते आणि आणि प्रवाळ वाढीस मदत होते, पर्यायाने बेटफिश वाढते. ज्यामुळे टूना फिश मिळण्यास मदत होते.
या प्रकल्पांतर्गत महिलांना सोबत घेतले. त्यांना सजग करून त्यांच्या समुदायात जाऊन याविषयीचे समाजप्रबोधन करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रवाळांचे महत्त्व, मोठ्या शिंपल्याचे संरक्षण आणि संवर्धन पर्यायाने बेटफिशमध्ये वृद्धी आणि तत्सम बाबी प्रशिक्षणात शिकवल्या.
प्रकल्पाचा भाग म्हणून लगूनमधील अधिक प्रवाळांची खडके असलेला भाग संरक्षित घोषित करून बेटफिशचा प्रजनन काळ असताना तिथे मासेमारीस आडकाठी, तिथले प्रवाळ खडक खणण्यास विरोध, त्या भागाला वर्षभर संरक्षित घोषित करून तिथे बहुतांश वेळा मासेमारीला आळा असे नियम बेटवासीयांनी स्वत:वर लावून घेतले. तसा ग्रामपंचायत ठराव करून तो परिसर ‘कम्युनिटी प्रोटेक्टेड एरिया’ म्हणून घोषित केला. भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रयत्न म्हणूनही त्याकडे पहिले जाते.
हेही वाचा : गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे
शूटिंग करताना धमाल आली. भाषा हा मोठा अडसर. जेसरी ही त्या बेटांवरील भाषा. कोंकणी आणि मराठी जसे आहे तसे जेसरी आणि मल्याळम् इवलेसे बेट. फिरून संपून जाई. शूटिंग झाल्यावर भारी कंटाळा येई. निसर्गसौंदर्य तरी किती पाहणार आणि फिरायला तरी किती जाणार. अर्ध्यापाऊण तासात पायी चालून बेट संपून जाई. जहाजात एक बिहारी सैनिक भेटला ज्याचे पोस्टिंग लक्षद्वीपला झाले होते.
‘‘यहा सासुरा कूच होता ही नाही… करे क्या दिन भर बैठ कर, सजाये काला पानी से भी ये बत्तर है.’’ भारी वैतागलेला तो. देशातील सर्वांत कमी गुन्हेगारी दर असलेला हा भूभाग आहे. आम्ही गमतीने म्हणायचो, ‘कोण लेकाचा गुन्हा करेल. कुठे पळून जायची सोय नाही. वीस मिनिटांत सगळे बेट चालून फिरून होते. जाऊन जाऊन जाईल कुठे. समुद्रात?’
आगत्ती बेटावर आमचे काम चालू होते. आम्ही सगळ्या बेटावर चालतच फिरत असू. मी, कॅमेरामन, डायरेक्टर, एक असिस्टंट, एक साऊंड रेकॉर्ड करणारा टेक्निशियन आणि एक लोकल कोओर्डिनेटर… असं आमचं चार लोकांचं युनिट होतं. आम्ही लक्षद्वीपचं सौंदर्य मनसोक्त शूट केलं. या प्रकल्पात सामील असलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. समुद्रातील जैवविविधता चित्रित केली. ‘आपली बेटे’ आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, आपले जीवन याच्याशिवाय काहीच नाही. असे प्रथम पुरुषी निवेदन तयार केले. आणि त्यात मुलाखती, आकडेवारी वापरून माहितीपटाची संहिता तयार झाली आणि फिल्मचे बेटांवरील काम संपले.
हेही वाचा : पडसाद : चिपकोसारख्या आंदोलनाची गरज
आगत्ती विमानतळ अगदी लुटुपुटुचा प्रकार. तेव्हा होते तीन-चार खोल्यांचे. अगदीच कामचलाऊ. बॅग स्कॅनिंग मशीन वाळूतच ठेवलेली. इवल्याशा त्या धावपट्टीवरून विमान उडणार का हीच आम्हाला भीती. किंगफिशरचे ते विमान जिवाच्या आकांताने एकाच जागी इंजिनवर जोर देत बराच वेळ उभे होते. पुरेशी शक्ती आल्यावर एकदम निघाले आणि आम्ही जीव मुठीत धरून बसलो. पण विमानाने ती तुटपुंजी धावपट्टी संपताच हवेत झेप घेतली. उड्डाण यशस्वी झाले. आयुष्यभर पुरतील इतक्या या परिसराच्या आणि येथे चित्रीत केलेल्या माहितीपटाच्या आठवणी घेऊन परत निघालो!
mwaseem1@gmail.com