प्रा. मं. गो. राजाध्यक्ष vijaytapas@gmail.com

जे. जे. उपयोजित कला संस्थेत शिकत व पुढे शिकवत असताना आम्हाला मोठा लाभ झाला तो निष्णात शिक्षक आणि त्यांच्याशी जवळीक असलेल्या त्यांच्या मित्रमंडळाचा. विशेषकरून प्रा. दामू केंकरे आणि प्रा. षांताराम पवार यांच्याकडे सतत राबता असलेले विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा. त्यांत चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू आणि अशोकजी परांजपे हे कविवर्य हमखास असत. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या होणाऱ्या गप्पांतून जे विचारधन प्रकट होत असे, त्यातील काही कण का असेनात, माझ्या वाटय़ाला आले हे मी माझे भाग्य समजतो. आरती प्रभू थोडेसे मितभाषी वाटत; पण अशोकजी परांजपे मात्र एकदम दिलखुलास माणूस. आत येताच त्यांची एक जबरदस्त थाप पाठीवर पडली की समजावे- आज गडी काहीतरी नवीन ऐकवणार आहे. त्यामुळे अशोकजी कधी येतात अन् त्यांच्याकडून त्यांच्या नव्या कविता आणि त्यांची शब्दश्रीमंती कधी ऐकायला मिळेल याची मी वाट पाहत असे.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

अशोकजी परांजपे हा कविमनाचा माणूस भेटत असे तोच मुळी हसतमुख चेहऱ्याने. मनाने कोमल, मृदू असलेल्या परांजप्यांचे काव्यही तितक्याच हळुवारपणे बाहेर पडत असे. अशोक गणेश परांजपे हे आपले नाव ‘अशोक जी. परांजपे’ असे लिहीत. पण पुढे त्यांच्या वडिलांच्या नावातील आद्याक्षर त्यांच्या नावापुढे आदरार्थी विशेषण म्हणून लागून ते नावाजले गेले ते ‘अशोकजी परांजपे’ या नावाने. मूळचे सांगलीकडील हरिपूर गावच्या अशोकजींनी पुढे मुंबईला येऊन कर्तृत्व गाजवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे रांगडे होते. त्यांच्या बोलीवरही सांगली-कोल्हापूरकडचा प्रभाव जाणवत असे.

‘वाह, क्या बात है!’ अशी एखादी काव्यपंक्ती आवडली तर त्यांची उत्स्फूर्त दाद मिळत असे. मूळातच त्यांना लोककलांबद्दल आदर होता. भक्तिरसाने ओथंबलेली भक्तिगीते त्यांनी लिहिली, तसेच गण-गवळण, नाटय़गीतेही लिहिली. अशोकजी ‘इंडियन नॅशनल थिएटर रिसर्च सेंटर’चे काम करीत असताना खेडोपाडी जाऊन त्यांनी तेथील आदिवासींच्या लोककला अभ्यासल्या. १९८६ मध्ये आनंदवनात महाराष्ट्र आदिवासी कलामहोत्सव आणि पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव त्यांनी आयोजित केले. त्यांच्या या कामाची फोर्ड फाऊंडेशनने नोंद घेऊन त्यांना ऑस्ट्रियामधील इन्स्टिटय़ूट ऑफ व्हिडीओग्राफी या आंतराष्ट्रीय लोककला संस्थेने सभासदत्व दिले. त्यानंतर अशोकजींनी अनेक मराठी लोककलावंतांना फ्रान्स, आर्यलड, जपान आदी देशांत नेऊन तिथे आपली कला सादर करण्याची संधी दिली. अनेक कलाकारांना त्यांनी प्रकाशात आणले. विठ्ठल उमप हे त्यातलेच एक. त्यांना परदेशात कला सादर करण्याची संधी देणारे अशोकजीच होते. याशिवाय गोंधळी राजारामबापू कदम, शाहीर बापूराव विभुते, चित्रकथाकार गणपत म्हसे, वारली चित्रकार जिव्या सोमा, दशावतारी कलावंत बाबी नालंग असे अस्सल हिरे त्यांनी पैलू पाडून उजेडात आणले. लोककलेचा अभ्यास आणि व्यासंगामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालया’चे संचालक म्हणून नियुक्त करून लोककलांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याची संधी दिली.

एखादी नवी रचना त्यांच्या लेखणीतून उतरली की ती दुसऱ्यांना ऐकवल्याशिवाय त्यांना राहवत नसे. अशीच कधीमधी त्यांची पावले जे. जे.मध्ये वळत ती सरळ षांताराम पवारांच्या केबिनमध्ये. ते आलेले समजताच मीही तेथे हजर होई. मला त्यांच्या चर्चेतील काही विशेष कळत नसतानाही केवळ त्यांचे अभ्यासू बोलणेच खूप काही शिकवून जात असे. मात्र, त्यांची कविता सुलभ व मनाला भुरळ घालणारी असे. आपल्या अंत:करणाला थेट जाऊन भिडेल अशी. ते नेहमी येतानाच एक चैतन्य घेऊन येत असत. एकदा ते असेच आले आणि म्हणाले, ‘नुकतेच आशाताईंसोबत एका गाण्याचे रेकॉर्डिग संपवून आलो आहे. मस्त जमले आहे. क्या बात है!’ असे म्हणून त्यांनी आपल्या गीताविषयी सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या एका काव्यसंग्रहाला प्रकाशकांना त्यांच्याकडून प्रस्तावना लिहून हवी होती. रात्री बसून त्यांनी ती लिहिली व सकाळी आम्हाला ऐकवली. त्यात एक वाक्य त्यांनी लिहिले होते- ‘या पापणीवर पापणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता जाणवत होती.’ यापेक्षा आणखी कोणती उपमा निरव शांततेला असू शकेल? 

अशोकजींनी अनेक गीते लिहिली. आपल्या  गीतांमधून रसिकांना ते भक्तिरसात चिंब भिजवून टाकत. ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’, ‘पांखरा जा दूर देशी’, ‘समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव’, ‘कुणी निंदावें कुणी वंदावे’.. अशी एक ना अनेक अवीट गीते त्यांच्याकडून निर्मिली गेली. ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या गाण्याच्या वेळची एक मधुर आठवण त्यांनी स्वत:च नमूद करून ठेवली आहे.. ‘त्यावेळी मी ‘गोरा कुंभार’ नाटक लिहीत होतो. लोणावळ्यातील पं. जितेंद्र अभिषेकींच्या बंगल्यावर आमची गप्पांची बैठक जमली होती. त्यावेळी अभिषेकी म्हणाले, ‘नाटकाचा शेवट अशा अभंगाने व्हावा, की श्रोते शब्दांत आणि सुरात भारावून बाहेर पडले पाहिजेत.’ माझ्या डोक्यात त्यावेळी आलं की, गोरा कुंभाराला सगळं ऐहिक प्राप्त झालं होतं आणि त्याच्यासारख्या मुळातच विरक्त असलेल्या माणसाला देवाकडे काय मागायचं असेल, तर फक्त मोक्ष आणि कैवल्य. आणि हे कैवल्याचं चांदणं देणारा चंद्र हा प्रत्यक्ष पांडुरंग असला पाहिजे. मग मनात पक्के झाले की जीव म्हणजे चकोर- जो चांदण्यासाठी भुकेला आहे. इथं तर कैवल्याचं चांदणं अपेक्षित आहे आणि मुखडा तयार झाला..

‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर 

 चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर..’ 

पं. जितेंद्र अभिषेकींनी या गीताला अमर केले.

‘नाविका रे वारा वाहे रे, डौलानं हाक जरा आज नाव रे’ या गाण्यात तर अशोकजींचे शब्द, अशोक पत्कींचे भावमधुर संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा गोड आवाज यांचा असा काही मेळ जुळून आला आहे की हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले. या गाण्याला पार्श्वभूमी आहे ती त्यांच्या हरीपूर गावची. तेथील शांत अशा वातावरणात नदीतून पैलतीरावर रोज ये-जा करणारी नाव त्यांच्या मनात कोरली गेली होती. मुळातच या कवीला निसर्गाची भारी ओढ. त्यामुळेच त्यांच्या गीतांमधून निसर्ग विविध रूपे घेऊन येत असे. त्यांची गीते पं. जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके, प्रकाश घांग्रेकर, सुमन कल्याणपूर, रामदास कामत, सुलोचना चव्हाण, अजित कडकडे, अरुण दाते अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ गायकांनी गायली.

अभिजात वाङ्मय तसेच लोकवाङ्मय अशोकजींना प्रिय होते. त्यांच्या जीवनातील वाटचालीत त्यांना पं. जितेंद्र अभिषेकी, रवींद्र पिंगे, शोभा गुर्टू, प्रभा अत्रे, वसंतराव देशपांडे, कुसुमाग्रज अशा दिग्गजांचा सहवास लाभला. संस्कृतच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना शंकराचार्याचे श्लोक मोहित करीत. तर पठ्ठे बापूरावांच्या लावण्या ते ओठावर बाळगत. विशेषत: साहित्य संघाच्या कट्टय़ावर या मंडळींच्या गप्पा विशेष रंगत. अशोकजी गप्पांच्या फडात रंगणारे असल्याने अनेक मान्यवरांचा सहवास त्यांना लाभला. अशोकजींनी ‘दार उघड बया’, ‘आतून कीर्तन, वरून तमाशा’, ‘अभग दुभग तिभक’ ही लोकनाटय़ं लिहिली. ‘आतून कीर्तन, वरून तमाशा’ हे त्यांचे लोकनाटय़ खूपच गाजले. शंकर घाणेकर व प्रकाश इनामदार या जोडीने ते लोकप्रिय केले. त्यांनी ‘कळीदार कपूरी पान’सारख्या लावण्याही लिहिल्या.

पुढे अशोकजी औरंगाबादला स्थायिक झाले. त्यांच्या अफाट ज्ञानाने आणि संभाषण कौशल्याने तेथेही त्यांचा भक्तगण निर्माण झाला. अशोकजी नेहमी लोककलेतील सौंदर्यस्थळे व बलस्थाने शोधत. तमाशा, गोंधळ, वाघ्या-मुरळी अशा अनेक लोककला त्यांनी शोधल्या व वर्तमानावर त्यांच्या असलेल्या ठशांचाही मागोवा घेतला. लोकपरंपरेतील आख्याने त्यांनी नाटय़रूपात आणली. ‘जांभूळ आख्यान’, ‘खंडोबाचे लगीन’, ‘दशावतारी राजा’, ‘वासुदेव सांगाती’ अशा काही कलाकृती आजही त्यांची आठवण करून देतात. अशोकजींनी गीतांप्रमाणेच नाटकेही लिहिली तीदेखील भक्ती संप्रदायावर. ‘संत कान्होपात्रा’, ‘संगीत संत गोरा कुंभार’ आणि ‘बुद्ध इथे हरला आहे.’ त्यांच्या ‘बुद्ध इथे हरला आहे’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी अचानक काहींच्या भावना दुखावल्या. ‘आमचा बुद्ध हरतोच कसा?’ म्हणत बुद्धावर हक्क सांगणाऱ्यांनी त्यांचे नाटक बंद पाडायचे ठरवले. येथे बुद्ध हा गौतम बुद्ध नसून, ती एक बुद्धिवाद्यांची प्रतिमा होती. ते एक रूपक होते. पण ते कोणाला समजणार? शेवटी अशोकजींनी ‘बुद्धिजीवी इथे हरला आहे’ असे नामकरण करून त्यावर पडदा टाकला. आपल्या देशात बुद्धिजीवी जातीय झुंडशाहीपुढे नेहमीच नमत आले आहेत.

अशोकजींच्या औरंगाबादला जाण्याने त्यांच्या भेटी कमी होत गेल्या. पवार सरही जे. जे.मधून सोडून गेले. पाठोपाठ दामू केंकरे सरांना जे. जे.तून सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक म्हणून शासनाने नियुक्त केले. परिणामी जे. जे.मधील या कलाकारांचा व साहित्यिकांच्या गप्पांचा अड्डा तेथे सरकला. अधूनमधून क्वचित परांजपे तिथे दिसत. एक दिवस जहांगीर आर्ट गॅलरीत एका प्रदर्शनाला गेलो असता तेथे अचानक ओळखीचा आवाज ऐकला आणि समोर पाहिले तर अशोकजी उभे! खूप आनंद झाला त्यावेळी. मी अधिष्ठाता झाल्यावरची त्यांची ही पहिलीच भेट होती. मला भेटले तेव्हा ते गडबडीतच होते. तरीही थोडा वेळ आम्ही समोवारमध्ये बसलो. त्यावेळी आचार्य अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रातील एका प्रकरणाच्या शीर्षकाचा अर्थ मला समजत नव्हता. ते प्रकरण होते ‘अत्रे-फडके वादा’वरचे. त्याचा समारोप करताना आचार्य अत्रे यांनी म्हटले होते- ‘शेवटी गच्छ सुकर भद्रम ते!’ अशी मी फडक्यांना शेवटची शिवी दिली व त्या प्रकरणावर पडदा पाडला. मला केवळ त्याचा अर्थच परांजपे यांनी सांगितला नाही, तर तो संपूर्ण श्लोक सांगून त्याचे विश्लेषणही केले. ती त्यांची आणि माझी झालेली शेवटची भेट!

आणि ९ एप्रिल २००९ ला ती काळीज चिरत जाणारी बातमी कानावर येऊन आदळली. अशोकजींनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एक मृदू आणि तरल स्वभावाच्या कवीने आपल्या हातातील नाजूक फूल कुस्करून टाकावे तसे आपले जीवन त्यांनी संपवले. अशी कोणती घटना घडली होती, की हा टोकाचा निर्णय त्यांनी घ्यावा? तसे पाहिले तर त्यांच्या अभ्यासाच्या, कलाविष्काराच्या तुलनेने पात्रता असूनही त्यांना फार काही मिळाले नाही. आणि ते मिळावे म्हणून त्यांनीही कधी जीव पाखडला नाही. आज लोककलांचे पुनरुज्जीवन झाले आहे त्यामागील प्रेरणा अशोकजींचीच आहे. अजूनही अशोकजींची आठवण आली की एक बारीकशी कळ उरात उठते. वाटते की, त्यांची ती भक्कम थाप पाठीवर पडेल आणि त्यांच्या खास आवाजात ते म्हणतील, ‘वाह, क्या बात है!’