पूर्वीचे लोक भविष्यातल्या पिढय़ांनी आपल्याला काय आणि कसे म्हणून ओळखावे याबद्दल फारच जागरूक होते. पूर्वजांची चित्रे आठवून बघा. काय मस्त पोज द्यायचे ते! आजूबाजूला भुसा भरलेले वाघ-सिंह, किंवा मिशीला ताव देताना, किंवा उगा ‘चला पुढे..’ म्हणत हात उंचावताना, किंवा हातात काठी घेऊन काय मस्त दिसायचे आपले पूर्वज! स्त्रिया असतील तर त्या हातात हुंगायला एखादे फूल घेऊन किंवा स्वत:ला पंख्याने वारा घालताना वगैरे मस्त चित्र काढून घ्यायच्या. आपले पूर्वज किती महान वगैरे होते याची जाणीव येणाऱ्या पिढय़ांना त्यामुळे व्हायची. आपल्या येणाऱ्या पिढय़ा आपल्या पिढीला काय म्हणून ओळखणार आहेत याची मला सध्या फारच काळजी लागून राहिली आहे. आपल्या काळातील स्त्रिया या तोंडाचा चंबू करून वाकडय़ा मानेच्या जन्माला यायच्या असा समज भविष्यातल्या पिढय़ांचा होईल की काय अशी मला भीती वाटते आहे. पूर्वी कसे दोन स्त्रिया एकत्र आल्या की एकमेकींना कुंकू लावायच्या, तशा आता त्या एकत्र आल्या की तोंडाचा चंबू करतात, मान वाकडी करतात आणि सेल्फी काढतात. दोन पुरुष- दोन स्त्रिया, एक पुरुष- एक स्त्री, पाच-दहा पुरुष किंवा पाच-दहा स्त्रिया यापैकी कोणीही कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये एकत्र आले तर काय करतात, याचे उत्तर ‘ते सेल्फी काढतात’ असेच आहे. आपल्या मोबाइलवरचा डेटा उडाला नाही व तोपर्यंत टिकला तर पाचपन्नास वर्षांनी जेव्हा आपल्या भावी पिढय़ा आपले सेल्फी एकमेकांना दाखवत असतील तेव्हा ‘ते बघ- ती कॅमेऱ्यात बघून डोळा मारतेय ना, ती माझी आजी.. आईची आई! आणि घोडय़ावर बसल्याची नक्कल करतोय ना, ते माझे आजोबा. आणि पाठमोरे वाकून दोन्ही पायांतून कॅमेराकडे बघतायेत ते माझ्या आजोबांचे थोरले भाऊ . मागच्या वर्षी वारले ते..’ अशी ओळख करून देतील.

सगळ्या देशालाच आज सेल्फी काढायच्या वेडाने ग्रासले आहे. बघावं तो आज धावपळीत आहे. त्याला तो एसटीत बसला त्याचे फोटो काढायचेत. एसटी पंक्चर झाली त्याचे फोटो फेसबुकवर टाकायचेत. तिला तिने फोडणीचा भात केला, किंवा डोक्याला लावायची नवी पिन घेतली, तर ताबडतोब फेसबुकवर टाकायचे आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची सगळी दगदग कशासाठी? तर सेल्फी किंवा फोटो काढायला मिळावा यासाठीच! आमच्या शेजारचे एक आजोबा वारले. एक नातलग मुलगी वेळेवर पोहोचली नाही. आणि अंत्यसंस्कार होऊन गेलेत हे कळल्यावर तिने हंबरडाच फोडला. आजच्या काळात एखाद्याचे असे निव्र्याज प्रेम पाहायला मिळाले म्हणून मला भरून आले. नंतर कळले, की तो माणूस गेला म्हणून तिला फारसे दु:ख झाले नव्हते. तिची मृतदेहाबरोबर सेल्फी काढायची आणि फेसबुकवर टाकायची संधी हुकली म्हणून तिला भरून आले होते.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

मधल्या काळात सेल्फी काढण्यात तरबेज असणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने जेल प्रशासनासाठी एक फार क्रिएटिव्ह सूचना केली होती. नाही तरी एखादा गुंड पकडला तर त्याच्या गळ्यात त्याच्या नावाची पाटी अडकवून फोटो काढायची जुनी फॅशन आहेच. हे सगळे पकडलेले गुंड, मवाली, डॉन, दहशतवादी एकदा पकडल्यावर जेलमध्ये तसे रिकामटेकडेच असतात. त्यांना शनिवार, रविवार आणि इतर सुटय़ांच्या दिवशी सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. ठरवून दिलेल्या जागी ते बसून राहतील आणि लोक रांगा लावून त्यांच्याबरोबर सेल्फी काढतील. या सेवेसाठी जेल प्रशासनाने तिकीट लावले तरी लोक वाट्टेल तेवढे पैसे देऊन या गुंडांबरोबर फोटो काढून घेतील याची मला खात्री आहे. नाही तरी हे असले गुंड सरकारला फुकट पोसावे लागतात आणि ते फारसे उपयोगाचेही नसतात. यानिमित्ताने सरकारला त्यांचा उपयोग करून घेता येईल, वर उत्पन्नही मिळेल. आणि लोकांचीही ‘माय स्वीट हार्ट विथ सलीम लंगडा’ किंवा ‘माझी बायको आणि येडा याकूब एका निवांत क्षणी चर्चा करताना’ अशा फेसबुक पोस्ट टाकायची सोय होईल. नामचीन गुंड आणि त्यांच्या कडेवर छोटी छोटी मुलं या फोटोला फेसबुकवर काय भरमसाट लाइक मिळतील!

मागे एकदा एकजण प्राणिसंग्रहालयात वाघाकडे पाठ करून सेल्फी काढताना पडला आणि त्याला वाघाने खाऊन टाकले. लोक फोटो काढताहेत तर मस्त डरकाळी वगैरे फोडायची पोज द्यायची सोडून वाघाने त्या माणसाला खाऊन टाकले! उगाच नाही वाघांना लोक ‘जंगली जनावर’ म्हणत.

सेल्फी काढायचे प्रगत तंत्रज्ञान जेव्हा लोकांना माहीत नव्हते तेव्हा फोटो काढणे किती खडतर होते याची नुसती आठवण जरी आज झाली तरी थरकाप होतो. एकदा कॅमेऱ्यात रोल टाकला की त्यातून ३५-३६ फोटो निघायचे. त्यातले पाच-दहा तर कुठल्यातरी अतक्र्य कारणाने वायाच जायचे. सठीसहामाशी कधीतरी लोक रोल विकत घ्यायचे आणि त्यातला एक-एक फोटो पुरवून पुरवून वापरायचे. लग्नापासून बारशापर्यंतचे फोटो एकाच रोलमध्ये असायचे. लग्नातला शालू कसा दिसत होता याची उत्सुकता बारशानंतर रोल धुऊन आणला की मगच पुरी व्हायची. रोल जोपर्यंत धुऊन आणत नाही तोपर्यंत त्यात काय फोटो आहेत; आणि मुळात ते नीट आलेत का, याची कोणालाच कल्पना नसायची. रोल धुऊन आणला की अख्खी गल्ली फोटो पाहायला जमायची. ‘शी बाई! त्या फोटोत मी अगदीच काहीतरी दिसतेय..’ म्हणून गल्ली जमायच्या आत दोन-चार फोटो गायब केले जायचे. घरातले सगळे फिरायला गेले की कोणालातरी एकाला फोटो काढायला लागायचे. मग घरातल्या जोडप्यांचा वेगवेगळा फोटो निघायचा. छोटय़ा पोरांचा वेगवेगळा आणि एकत्र फोटो निघायचा. कोणीतरी जाणतेपणाने घरातल्या वयस्क वडीलधाऱ्यांचा एकेकटा फोटो काढून ठेवायचा. पण जेव्हा सगळ्या कुटुंबाचा फोटो काढायचा असायचा तेव्हा बा शक्तींची मदत घेणे अपरिहार्य होत असे. घरातल्या सगळ्यांचा फोटो काढायचा आणि त्यात फोटो काढणारा आपला एक माणूसच नसेल तर तो फोटो कसा दिसेल? या कल्पनेनेच घरातल्या बायाबापडय़ांच्या काळजात चर्र्र व्हायचे. आणि मग रस्त्यावरच्या कोणालातरी सांगितले जायचे की, ‘भाऊ , जरा आमचा फोटो काढा ना!’ आज कितीतरी जणांच्या घराच्या भिंतीवरचे दिवंगतांचे फोटो हे अशाच रस्त्यावरच्या अनामिकाने काढलेले आहेत. ‘कोण कुठला होता, काय माहिती बाई! पण बघ ना, भाऊंचा किती हसरा फोटो त्याने काढला होता..’ असे म्हणत कोण्या अनामिकाला घरादाराने दुवा दिलाय. ‘दादांचा/ ताईचा हा शेवटचा फोटो..’ अशा हळव्या आठवणी आज कितीतरी घरांच्या भिंतींवर विराजमान आहेत.

देशात-परदेशात आता कुठेही जा, हल्ली सगळे जण हे असे फोटो काढायला सेल्फी स्टिक वापरतात. मी एका मुलीला विचारले, ‘ही सेल्फी स्टिक उगाच घेऊन फिरायची काय गरज आहे?’ तर ती म्हणाली, ‘भाऊ , फोटो काढता का? अशी रिक्वेस्ट कोणाला कशाला करायची? उगाच एखाद्याचे उपकार कशाला घ्यायचे? आपण कोणावर अवलंबून कशाला राहायचे?’

‘उगाच एखाद्याचे उपकार कशाला घ्यायचे?’ या त्या बयेच्या विचाराने मला जरा त्रास झाला.

रस्त्यात गाडीतले पेट्रोल संपले किंवा ती पंक्चर झाली की जो दिसेल त्याला आपण धक्का मारायला लावायचो. रस्त्यात कोणत्याही मित्राच्या घरी फक्त पाणी प्यायला जायचो. घरी खूप पाहुणे आले तर शेजाऱ्यांकडून पांघरुणे आणायचो, किंवा दोघा- तिघांना तर झोपायलाच त्यांच्याकडे पाठवायचो. तेव्हा उगाच एखाद्याचे उपकार कशाला घ्यायचे, हे कधीच मनात आले नाही.

मी हल्लीच्या नवनवीन सोयी पाहतो. अजिबात तिसऱ्या माणसाची मदत घ्यायला लागू नये अशा पद्धतीची सगळी डिझाइन्स. आता कोणी कधी आपल्या मदतीला येणारच नाही, हे आपण स्वीकारून टाकले आहे का?

एका बिल्डरची अशीच एक जाहिरात पाहिली. म्हाताऱ्या एकाकी माणसांना राहण्यासाठी तो घरे विकत होता. काय पण वर्णन केले होते!

व्हीलचेअर घरात कुठेही फिरू शकेल अशी सोय. चक्कर येऊन म्हातारा माणूस कुठेही पडला तर जमिनीच्या जवळ अलार्म वाजवायची सोय. म्हातारा पडला तर उगाच कोणी शेजारीपाजारी कशाला मदतीला येईल? त्यापेक्षा त्यांनी एका प्रोफेशनल कंपनीला काम दिले आहे. अलार्म वाजला की ते धावत जातात आणि म्हाताऱ्याला उचलून दवाखान्यात किंवा स्मशानात नेतात. तुमचे काही बरेवाईट झाले तर नातलगांचा सगळा डेटा बिल्डरची कंपनी सांभाळणार आणि मग त्यांना वेळेवर कळवण्याची हमीही ते घेतात.

लोक एकत्र समाज म्हणून राहतात, ते एकमेकांना मदत करतात, आपण संकटात असू तर ते आपल्याला मदत करायला धावून येऊ  शकतात, आपण त्यांची मदत घेण्यात काहीच कमीपणाचे नाही, यावरचा सगळ्यांचा विश्वास उडत चाललाय का? कोणी कोणाचे नसते, हे आपण फायनली स्वीकारून टाकलेय का?

मला वाटते, ‘कोणी कोणाचे नसते रे बाबा!’ हे सुस्कारे टाकत म्हणणारा माणूस कधी कोणाचा झालेला नसतो. त्याच्या मदतीला कधीच कोणी येणार नाही अशी त्याला भीती वाटते, कारण तो कधीच कोणाच्या मदतीला गेलेला नसतो.

एक काका मला सांगत होते.. आपण आपल्या अंत्यसंस्काराचे पैसे घरात वेगळे काढून ठेवलेत. उगाच मुलांना तेवढी पण तोशीस नको.

पैशाने लाकडे आणता येतील, पण खांदे द्यायला चार माणसांची मदत घ्यायलाच लागेल, हे या काकांना कोण सांगणार?

भाऊ , जरा तुम्हीच काढता का आमचा फोटो? सेल्फी काढला की आमचा चेहरा तेवढा भेसूर दिसत नाही.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com