scorecardresearch

अफसाना लिख रही हूँ.. : ‘ओ पंछी प्यारे..’

१९६३ साली प्रदर्शित झालेला, बिमल रॉय दिग्दर्शित, नूतन, अशोककुमार आणि धर्मेद्र यांच्या उत्तम अभिनयानं नटलेला चित्रपट : ‘बंदिनी’! यातला नूतनचा अभिनय तर शब्दातीतच आहे. 

अफसाना लिख रही हूँ.. : ‘ओ पंछी प्यारे..’
नूतन

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

स्त्री खरंच कोण आहे नेमकी? संस्कृतीने मखरात बसवलेली सखी, गृहिणी, सचिव, प्रिया, रंभा, माता..? ही नाती तिला भूषवतात, आणि एका अदृश्य गजाआडही ठेवतात! मनात आलं तसं न बोलण्याची, न वागण्याची, मनातल्या मनात झगडण्याची आणि मनातच ऊर्मी जिरवण्याची सक्तमजुरी असलेली एका अफाट बंदिशालेतली ती एक बंदिनी? ‘स्त्रीचा प्रवास एका बंदिशालेकडून दुसऱ्या बंदिशालेकडे असतो,’ असं पुलं म्हणून गेलेत. असं त्यांना विसाव्या शतकातही म्हणावं लागावं? ‘स्त्रीशक्ती’ म्हणून जिला गौरवलं जातं, ती शक्ती अनेकदा स्वत:ला सिद्ध करत राहण्यातच खर्ची पडते. काही बंधनं ती स्वत: घालून घेते. त्या बंधनांत तिला अपार सौख्य लाभतं. आणि काही तिच्यावर अर्थातच लादलेली असतात. स्त्रीमनाचा थांग कुणाला लागलाय का? खरंच तिला ‘बंदिनी’ राहायचं असतं का? ..असे अनेक प्रश्न मनात उभे करणारा, स्त्रीमनाचा गूढ व्यापार, सामाजिक दबावाखाली घुसमटलेल्या तिच्या मनाचा तळ दाखवणारा, १९६३ साली प्रदर्शित झालेला, बिमल रॉय दिग्दर्शित, नूतन, अशोककुमार आणि धर्मेद्र यांच्या उत्तम अभिनयानं नटलेला चित्रपट : ‘बंदिनी’! यातला नूतनचा अभिनय तर शब्दातीतच आहे.

ही कथा घडते तो काळ आहे १९३४ सालचा. स्वातंत्र्यलढा ऐन भरात असतानाचा. त्यामुळे यातल्या स्त्रीजीवनाचा विचार त्यासंदर्भातच करावा लागतो. यातील शैलेन्द्र आणि गुलजार यांच्या काव्याला सचिन देव बर्मन यांनी मातीशी घट्ट नातं सांगणारं संगीत दिलंय. प्रत्येक गाणं अतिशय खोल, कितीतरी व्यापक अर्थ सांगणारं! दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीमधले हजारो बारकावे टिपले तरीही दशांगुळे उरणारा हा चित्रपट आहे. खरं तर तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण इथे आपण त्यातल्या सहा प्रमुख गाण्यांचा तेवढा आस्वाद घेऊ या.

प्रेमळ कन्या, भावासाठी जीव टाकणारी बहीण, नाजूक.. लाजरी प्रेयसी, एका स्त्रीला जिवानिशी मारणारी खुनी, कारागृहातील  गजाआडच्या आयुष्यातही दुसऱ्यांसाठी झिजणारी कैदी.. आणि पूर्वायुष्यात ज्याला मनाने वरलं त्या पतीसाठी स्वत:ला बंधनात पुन्हा अडकवून घेणारी अनंतकाळची बंदिनी.. हा प्रवास आहे एकाच जिवाचा! ही सगळी रूपं एकाच स्त्रीची! वाळलेल्या पाचोळ्यावरसुद्धा पाय न देणारी स्त्री खून करू शकते? आणि आपल्या भावनांची ज्याच्याकडून हत्या झाली त्याला मात्र माफ करू शकते! हे सगळंच गूढ अन् अतक्र्य..

कल्याणी चित्रपटात आपल्याला प्रथम भेटते ती एक कैदी म्हणून. महिलांच्या वॉर्डमध्ये अनेक कैदी महिलांच्या गर्दीत असूनही लक्ष वेधून घेणारा तिचा चेहरा.. डोळ्यांत अपार वेदना, चेहऱ्यावर सोसलेल्या दु:खाची गडद छाया!  टी. बी. झालेल्या एका स्त्रीची शुश्रूषा करायला कल्याणी तयार होते. तेही- ‘माझं या जगात कुणीच नाही, मला काहीही झालं तरी चालेल..’ या भावनेनं. म्हणूनच जेलरसाहेबांच्या आणि डॉक्टरांच्या नजरेत तिची प्रतिमा उंचावते. उमद्या स्वभावाचा डॉ. देवेंद्र तिच्या साधेपणामुळे आणि एकूणात अतिशय ऋजू वागण्यामुळे तिच्यात गुंतत जातो. कारागृहाच्या खडकाळ जमिनीवर हा प्रेमांकुर फुलतोय. पण अजून हे प्रेम मुग्धच आहे.

आजूबाजूला निसर्ग, हिरवळ,आनंदी चेहरे, रसरसतं चैतन्य असं काहीही नसताना कुठल्या उमेदीनं तुरुंगातल्या स्त्रिया जगत असतील? तुरुंगात दिलेली कामं करत असताना एका कैदी स्त्रीच्या ओठातून ही कैफियत बाहेर पडते..

‘ओ पंछी प्यारे, सांझ सकारे

बोले तू कौनसी बोली?’          (कवी शैलेन्द्र)

एकुलत्या एक.. जवळजवळ निष्पर्ण झाडावरचा चिमुकला पक्षी.. बाहेरच्या सृष्टीचं एकमेव प्रतीक.. तो स्वतंत्र.. मी मात्र बंदिवान! अनेक ‘कैदी’ स्त्रियांच्या मनातली वेदनाच जणू!  खरंच, कुठली ही भाषा? स्वातंत्र्याची? आता ती भाषा विसरलोय आम्ही.. तुझे हे बोलही कळेनासे झालेत आम्हाला! बेडय़ा पडलेल्या हातांना पंखांची झेप आता आठवतसुद्धा  नाही..

‘मैं तो पंछी पिंजडे की मैना, पंख मेरे बेकार!

बीच हमारे सात रे सागर कैसे चलूं उस पार?’

मला पंख असून नसल्यागत. ‘त्या’ दुनियेत आणि माझ्यात जणू सात समुद्र. कसे पार करणार मी? आता या तुरुंगातून कधी बाहेरच्या जगात गेलेच, तर ते जग पूर्वीचं नसेल.. त्या विखारी नजरा जगू देणार आहेत मला? ‘उस पार’ पोचायच्या आधी अनंत अडचणींचे सात समुद्र ओलांडावे लागतील मला.. कदाचित त्यातच दमून जाईन.. आणि मग पंखांत त्राणही नसेल..

‘फागुन महिना फूली बगिया आम झडे आमराई!

मैं खिडकी से चुप चूप देखू

ऋत बसंत की आयी!’

चैत्रपालवी मला या गजांच्या आडूनच बघावी लागणार.. किती  सुंदर ताटवा फुललेला असेल! आमराईत आंब्यांचा सडा पडलेला असेल. मी मात्र इथे कैद! आसुसलेल्या डोळ्यांनी हा वसंत ऋतू निसटून जाताना बघत बसण्यापलीकडे माझ्या हातात काहीही नाही. बाहेरच्या जगात अनेक ऋतू येतील आणि जातील; पण माझं आयुष्य मात्र एकाच जागी अडकलेलं. आयुष्यातला वसंत तर केव्हाच कोमेजलाय. मनाला पालवी फुटेल असं पुढेही आयुष्यात काही घडण्याची सुतराम शक्यता नाही.

..फ्रेममध्ये दिसणारं एकुलतं एक झाड अक्षरश: गलबलून टाकतं.. ही निसर्गाची एकमेव खूण! या उंच, भिववणाऱ्या भिंती आणि हे लोखंडी गज! डोळ्यांनी हेच बघायचं असतं रोज. कसला फागुन? कुठला वसंत? आणि ‘चुप चुप देखू’ हे तर स्त्रीच्या निरंतर मुस्कटदाबीचंच वर्णन! बाहेर वसंत फुलला काय किंवा मनात भावनांची होळी झाली काय; सगळं मुकाटच बघायचंय! शैलेन्द्रच्या लेखणीतून अक्षरं नव्हे, या स्त्रियांचे अश्रूच झरतात. कुठल्यातरी एका गुन्ह्यची शिक्षा- तिनं संपूर्ण आयुष्यालाच काळ्या छायेत ढकललंय. शरीराची कधीतरी तुरुंगातून सुटका होईलही, पण मनावर पडलेले वळ जातील?

आशाताईंच्या आवाजात काही निराळीच झार आहे.. पक्ष्यांशी बोलताना आवाजात जे लाडीकपण हवं ते आहेच, पण मध्येच स्वत:च्या काळजातली जखमसुद्धा तिला झाकता येत नाहीये. तिथे तो आवाज कातर होतो. ‘पंख मेरे बेकार’ म्हणताना ‘बेकार’ या शब्दाचा उच्चार इतका हताश.. असहाय.. ‘कैसे चलू उस पार?’मध्ये त्या बाहेरच्या जगात जाण्याची, मुक्त विहरण्याची तडफड प्रचंड उत्कटपणे व्यक्त झालीय. क्षणभर आयुष्यातले सगळ्या प्रकारचे तुरुंग स्वत:भोवती उभे करणाऱ्या असंख्य स्त्रिया आणि त्यांची दु:खं डोळ्यापुढे येतात. आकाशाच्या चौकोनी तुकडय़ाकडे- खरं तर खिडकीच्या गजांमध्ये विभागलेल्या आकाशाकडे पाहणाऱ्या लाखो विमनस्क नजरा मनाला घायाळ करतात. ‘आमझरी आमराई’मध्ये तर एक उसासा स्पष्ट ऐकू येतो. विलक्षण सोसल्यावर येणारा उसासा. तंत्राच्या पुढे जाऊन आवाजातून किती अर्थछटा व्यक्त करता येतात, हे सिद्ध करणारी ही आशाताईंची गायकी आहे.

सचिनदांनी या गाण्याला एका पारंपरिक स्त्रीगीताचा रंग तर दिलेला आहेच; शिवाय या गाण्याचा ठेका ढोलकीनं सुरू होतो आणि धान्य पाखडणारी सुपं, कांडणारं उखळ यांतून तो पुढे नेला जातो. सगळ्या हालचाली विलक्षण लयीत आहेत. आणि अगदी हलकेच त्या स्त्रीला साथ करणारी, कळत नकळत बोलणारी ती बासरी.. तिचा टोन असा, की अस्तित्व असूनही ते ठळक नाही. तिच्यासारखी दुसरी मैत्रीणच बोलतेय अशी ती बासरी. क्वचित त्या पक्ष्याचा आवाज बनूनही ती वावरते. जिथे कडवं संपतं तिथे तर फक्त एक ‘निसा’ एवढाच पीस आहे. पण गोष्ट ऐकताना मधेच हुंकार द्यावा तसा वाटतो तो मला.

डॉ. देवेंद्र एकदा कल्याणीजवळ आपल्या भावना व्यक्त करतो. तिच्याही मनात काहीतरी झंकारलंय हे तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसतं. पण हा अंकुर ती स्वत:च चिरडण्याचा प्रयत्न करते. कारण देवेंद्रच्या शुभ्र अस्तित्वासमोर स्वत:चा काळाकुट्ट खुनी भूतकाळ तिला डाचतोय. देवेंद्रला फक्त वर्तमानकाळ हवाय. तिच्यासाठी तो समाजाची बंधनं झुगारायलाही तयार आहे. पण ती स्पष्ट नकार देते. खरं तर आजवर तिनं ज्यांना जीव लावला, त्या व्यक्ती नियतीनं हिरावून घेतल्यात. देवेंद्रला हिरावून घेण्याआधी स्वत:च नकार देऊन ती नियतीलाच फसवू पाहतेय. देवेंद्र राजीनामा देऊन निघून जातो. मनात किती वादळं आली, किती घडामोडी झाल्या.. पण जगाच्या दृष्टीनं ‘सारं ठीकच.’ विचित्र मानसिकतेची शिकार झालेल्या कैदी स्त्रियांचं भांडण, स्वातंत्र्य सैनिकाचं फासावर जाणं या सगळ्या घटनांवर ‘सब ठीक है’चा वरवंटा फिरत राहतो. समाजावर एकही सुरकुती पडलेली नसते..

देवेंद्रला नकार देऊन विमनस्कपणे बसलेल्या कल्याणीच्या कानावर गाण्याचे स्वर येतात. तिची मैत्रीण गातेय..

‘अब के बरस भेज भैया को बाबुल..’

(कवी शैलेन्द्र, गायिका- आशा भोसले)

कैदेतल्या व्यक्तींची मानसिकता काय असेल? विशेषत: कुटुंब, घर हे जिचं हक्काचं सौख्यस्थान असतं अशा स्त्रियांचा तुरुंगवास, त्यांची कुतरओढ आणि मनोव्यापार किती व्यामिश्र असतील. चित्रपटात दोन गाणी या सिच्युएशनची ठेवण्यात बिमलदांचा याविषयीचा व्यापक दृष्टिकोन दिसतो. ही कैद संपू नये, कारण मग जाणार कुठे? हा प्रश्न पडणं किती भयानक आहे!

माहेरची आठवण या विषयाभोवती स्त्रीची अनेक गाणी गुंफली गेली आहेत. जात्यावरच्या ओव्या याच विषयाभोवती फिरतात. स्वत:चं घर उभारण्यासाठी एका सुरक्षित चौकटीतून निघून जाणारी स्त्री.. नेमक्या कुठल्या क्षणी तिच्यातली अल्लड बालिका पोक्त होते? काय मिळतं तिला मोठं झाल्यावर? हे वरकरणी स्त्रीगीत वाटणारं गाणं हळव्या जखमा उघड करतं.. तुरुंगात राहून निबर झालेल्या स्त्रियांनाही आपापले संदर्भ आठवून रडायला लावणारं.. खरं तर त्यांच्यातलं मानवीपण, बाईपण जिवंत करणारं हे गाणं..

‘बैरन जवानी ने छिने खिलौने

और मेरी गुडिया चुरायी

बाबुल, थी मैं तेरे नाजों की पाली

फिर क्यूं हुई मैं पराई?’

गुडिया.. बालपणाचं प्रतीक असलेली बाहुली. तारुण्य आलं, पण त्याने बालपण हिरावून घेतलं.. कुठे गेले ते निरागस दिवस.. कुठे येऊन पडले मी! कल्याणीला तिचं खेडय़ातलं घर, तिचे बाबूजी, त्या मैत्रिणी.. सगळं आठवतंय. का मला पारखं व्हावं लागलं माझ्या या सुखाला? लाडकी होते ना तुमची मी? का मग मला मोठं केलंत.. दूर लोटलंत?

पिलू रागाचं गांभीर्य, एकेका स्वरावरचा ठहराव.. कमीत कमी वाद्यं वापरत बर्मनदांनी प्रत्येक स्त्रीच्या काळजातली जखमच उघडी केलीय. ‘सावन’ शब्दावरचा कोमल गंधार किती आर्त लागावा? आशाताईंचा आवाज कारुण्यात भिजून येतो. खरोखर त्या ऊर फुटून गायल्या आहेत असं वाटत राहतं. हा अभिनय असू शकत नाही. त्यांचे शब्द गदगदून येतात. त्यातल्या प्रत्येक अक्षरात हुंदका आहे. आपल्याला फक्त तो ऐकता आला पाहिजे. ‘कसके रे जियरा..’ या शब्दांत त्यांचा आवाज अक्षरश: कापतो. ‘गुडिया चुरायी ऽऽऽ’चा इकार ज्या पद्धतीनी बारीकशी हरकत घेऊन त्या खाली आणतात, ते तर केवळ दैवी आहे. ‘सावन में लीजो बुलाय’ म्हणताना त्या ‘लीजो’मध्ये कमालीचं आर्जव आहे.

कारागृहाची उंच भिंत.. हताश डोळ्यांनी भूतकाळ आठवणारी, भविष्याला स्वत:च्या हातानं दूर लोटणारी कल्याणी! सुखाचा प्याला ओठाशी येऊन हिरावला जाण्याची भीती वाटली म्हणून स्वत:च तिनं तो दूर सारला.. देवेंद्र निघून गेला. एक मोठ्ठं शून्य हातात राहिलं..

जेलरसाहेबांना सांगण्यासाठी कल्याणी आपली कहाणी लिहून काढते. ते खेडं.. पोस्टमास्तर वडील.. अकाली गेलेला उमदा भाऊ.. आणि गावात स्थानबद्ध झालेला इन्कलाबी विकास घोष! एकदाच बघितलं त्याला.. पण त्याचं ते खळखळून हसणं मनातून जात नाही. कधी प्रेमात पडलो आपण- हेही कळलं नाही. पण डोळे बोलून गेले. त्यालाही हे समजलं.. आता मन थाऱ्यावर नाही..

‘जोगी जबसे तू आया मेरे द्वारे..

मेरे रंग गये सांझ सकारे..’

(कवी शैलेन्द्र, गायिका लता मंगेशकर)

त्याला ‘जोगी’ म्हणावं असाच तो. नि:संग! देशापुढे कशाचीच पर्वा न करणारा. आणि मी एक अशी लाजरीबुजरी.. तू लगेच ओळखलंस माझ्या मनातलं..

‘मीठी मीठी अगन ये सह न सकूंगी

मैं तो ‘छुईमुई’ अबला रे

मेरे और निकट मत आ रे..!’

किती नाजूक आहे रे मी.. प्रणयाची किंचितशी धगही सहन होणार नाही मला.

कल्याणीची पाश्र्वभूमी शैलेन्द्रचे हे शब्द किती छान दाखवतात. वैष्णव कवितेवर प्रेम करणाऱ्या वडिलांच्या संस्कारात वाढलेली कल्याणी ‘निकट’ म्हणेल, ‘करीब’ म्हणणार नाही.. तसंच- ‘जा के पनघट पे बैठू मैं राधा दीवानी, बिन ‘जल’ लिये चली आऊ..’ हे किती सहज येतं. ‘पानी’ म्हणत नाही ती.. ‘जल’ म्हणते.

‘सह ना सकूंगी’ म्हणताना लतादीदींचा आवाज थरारतो. आणि ‘छुईमुई’ शब्दाचा नाजूक, नादमय उच्चार त्याच करू जाणे. गाणं संपलं तरी त्या छुईमुईची गुणगुण काना-मनातून जात नाही. या गाण्यात एखाद्या बंगाली लोकगीताचा भास आहे. आणि ‘जुलूम भया रेऽऽऽ’ लांबवणं हा खास ‘बर्मनदा शिक्का’आहे चालीवर. यात तो ग्रामीण ठसका आहे. लतादीदींच्या दमसासाचीही कमाल आहे इथे. ‘मेरे और निकट’पासून ‘मेरे द्वारे’पर्यंत एका श्वासात आणि तेही- ‘ओ जोगी ऽऽऽ’ अशी उमाळ्याची साद त्यात मिसळून..? हे अतक्र्य आहे, एवढंच म्हणू इथं. ‘मोरा गोरा अंग’, ‘ओ जाने वाले’ आणि ‘ओ रे मांझी’ या नितांतसुंदर गाण्यांबद्दल बोलू या उत्तरार्धात!

(पूर्वार्ध)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2020 at 01:08 IST

संबंधित बातम्या