जाणकारांच्या मते या शतकातील सर्वात जास्त वाचला गेलेला बंगाली लेखक म्हणून शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याबरोबर हुमायून अहमेद यांचं नाव घेता येईल. त्यांचं लेखन सकारात्मक तसंच विधायक विचार आणि प्रवृत्ती दाखवतं. त्यांच्या कथारेषेत वास्तवाबरोबरच अतिनैसर्गिक, काहीसं जादुई तत्त्वही दिसतं. राजकारणाने भारलेल्या तत्कालीन तरुणाईला त्यांनी आपल्या रचनांद्वारे कलेचं रसग्रहण करायला आणि पुस्तकं वाचायलाही शिकवलं. अशा अहमेद यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांच्या साहित्यिक कामगिरीची ओळख…
१९ जुलै २०१२. बांगलादेशी अस्मितेसाठी शोकाकुल दिवस. कॅन्सरग्रस्त असलेले बांगलादेशाचे ‘स्वत:चे’ बंगाली साहित्यकार हुमायून अहमेद यांचं अमेरिकेत निधन झालं आणि जवळजवळ चार दशकांच्या संपन्न बंगाली साहित्यनिर्मितीच्या एका पर्वावर पडदा पडला.
हुमायून अहमेद. १९७१ सालच्या बांगलादेशी स्वातंत्र्ययुद्धानंतर बांगलादेशाचं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणाऱ्यांपैकी घेतलं जाणारं एक महत्त्वाचं नाव! पश्चिम पाकिस्तानच्या उर्दू दडपशाहीतून होरपळून बाहेर पडलेल्या पूर्व पाकिस्तानच्या म्हणजेच नवनिर्मित बांगलादेशाच्या स्वत:च्या बंगाली संस्कृतीला फोफावायला आता कसलंच बंधन राहिलं नव्हतं. याच वातावरणात एका मेधावी आणि बहुआयामी साहित्यकाराचा उदय झाला. हुमायून अहमेद त्यांचं नाव आणि तेच ठरले बांगलादेशाचे आद्य साहित्यकार! आतापर्यंत फक्त पश्चिम बंगालच्या शरत्चंद्र, रवींद्रनाथ इत्यादींसारख्या बंगाली लेखक-कवींची महती गाणाऱ्या बांगलादेशवासीयांना आता स्वत:चा आणि त्याच तोडीचा लेखक मिळाला होता.
ही व्यक्ती बांगलादेशी सांस्कृतिक क्षेत्रात इतकी महत्त्वाची होती की, त्यांच्या मृत्यूने सर्व देश हळहळला. फेसबुकसारख्या ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’वर लाखो लोकांच्या प्रतिक्रियांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बांगलादेशच्या राष्ट्रपती झिल्लूर रहमान, पंतप्रधान शेख हसिना आणि विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांनीही शोकसंदेश पाठविले. इतकंच नव्हे तर नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले बांगलादेशी प्रो. मुहम्मद युनूस यांनीही ‘दु:खाचा धक्का’ बसल्याचं सांगून हुमायून अहमेद यांनी आपल्या राष्ट्राला स्वनिर्मिती क्षमतेच्या क्षेत्रात आत्मविश्वास दिला असे गौरवोद्गार काढले. त्यांच्याच मताप्रमाणे ‘टागोर आणि नझरूल यांच्यानंतर तेवढीच गंभीर आणि कळकळीची साहित्यनिर्मिती (बंगाली) वाङ्मयाने हुमायूनच्या निर्मितीतच बघितली’. तसंच ‘बंगाली साहित्याचं सुवर्णयुग टागोर आणि नझरूल यांबरोबर संपलं आणि नवीन सुवर्णयुग हुमायूनबरोबर सुरू झालं. असंही म्हणून हुमायून अहमेदांच्या मोठेपणाची पावती दिली.
बांगलादेशी बंगाली साहित्याचा शेक्सपीयर असंही काहीजणांकडून समजल्या जाणाऱ्या हुमायून अहमेद यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९४८ रोजी ईशान्य बांगलादेशातील (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) सिल्हेट डिव्हिजनमधील नेत्रकोणा या जिल्ह्य़ात मोहनगंज या गावी झाला. पाकिस्तानी पोलीस सेवेत त्यांचे वडील अधिकारी असल्यामुळे वडिलांबरोबर त्यांनी बऱ्याच ठिकाणी वास्तव्य केलं. त्यांच्या वडिलांची १९७१ साली पाकिस्तानी सैनिकांनी हत्या केली. ढाका विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण संपादन करून त्यांनी तिथेच शिकवायलाही सुरुवात केली. पुढे अमेरिकेतील ‘नॉर्थ डाकोटा स्टेट युनिव्हर्सिटी’तून पीएच.डी. मिळवून ते बांगलादेशात परत आले आणि पुन्हा ढाका विद्यापीठात रुजू झाले. ढाका विद्यापीठातून १९९० साली निवृत्त झाल्यावर त्यांनी स्वत:ला पूर्णपणे लेखन आणि चित्रपटनिर्मिती या क्षेत्रांना वाहून घेतलं. त्यांचं कर्तृत्व, देशासाठी असलेलं त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन १३ जानेवारी २०१२ रोजी त्यांना युनायटेड नेशन्समधील बांगलादेशाच्या ‘पर्मनंट मिशन’मध्ये वरिष्ठ विशेष सल्लागार म्हणून नेमण्यात आलं. हा त्यांचा एक महान गौरव होता.
अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचे धाकटे बंधू मुहम्मद जाफर इक्बाल हेही एक प्रथितयश लेखक असून ते सिल्हेट विद्यापीठात अध्यापनाचं काम करतात. त्यांच्या अनेक रचनांपैकी ‘गल्प समग्र’ हा कथासंग्रह बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामावर आधारित असून या कथांद्वारे बांगलादेशातील जनसामान्यांचा मुक्तीयुद्धातील सहभाग, त्यांची ससेहोलपट, अल्पसंख्याकांचं देशातून जबरदस्तीचं पलायन, पाकिस्तानी सेनेचे अत्याचार अशा अनेक पैलूंचं वास्तव समोर येतं.
हुमायून अहमेद प्रसिद्धीच्या झोतात आले त्यांच्या पहिल्याच कादंबरीच्या प्रकाशनानंतर. १९७२ साली ‘नंदित नरके’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वाचकांनी या कादंबरीला तसंच या कादंबरीकाराला डोक्यावर घेतलं. विशेष म्हणजे तेव्हा ते ढाका विद्यापीठात विद्यार्थीच होते. त्यांची दुसरी कादंबरी ‘शंखनील कारागारे’ हीसुद्धा तेवढीच गाजली आणि त्यानंतर त्यांची साहित्य क्षेत्रातली वाटचाल सतत प्रसिद्धीच्या झोतात चाललेल्या उत्कृष्ट आणि प्रचुरनिर्मितीची घोडदौड ठरली. जाणकारांच्या मते या शतकातील सर्वात जास्त वाचला गेलेला बंगाली लेखक म्हणून शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याबरोबर हुमायून अहमेद यांचं नाव घेता येईल. बांगलादेशच्या ‘बांगला अकॅडमीच्या पुस्तक मेळ्यांमध्ये ते नेहमीच ‘बेस्ट सेलर’ यादीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिले आहेत.
त्यांच्या रचनांमध्ये मुख्य विषय किंवा मध्यवर्ती कल्पना म्हणून खूप वेळा मध्यमवर्गीयांची दशा आणि त्याहूनही जास्त बांगलादेशचं मुक्तीयुद्ध दिसतं. मुक्तीयुद्धादरम्यान पाकिस्तानी ‘मिलिटरी’कडून त्यांच्या वडिलांची झालेली हत्या त्यांच्या मनावर कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवून गेली होती. त्यांच्या लेखनाचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या कथानकांतून अदृश्य रूपात वाहणारा विनोदी तसंच तुटक, अस्फुट; परंतु अर्थपूर्णतेचा प्रवाह. त्यांनी साधी सरळ भाषाशैली वापरली आणि ती लवकरच खूपच लोकप्रिय झाली. त्यांच्या रचनांत निवेदन तसंच वर्णनांवर कमी भर दिसतो आणि त्याची जागा संभाषणाला दिलेली असते त्यामुळे वाचकाला कंटाळा येत नाही. त्यांची पात्रं ‘त्यांची’ आहेत असं लगेच ओळखू येतं. त्या पात्रांच्या स्वभावात, वागण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत एक साम्य दिसून येतं. त्यांच्या व्यक्तिरेखा वाचकाच्या इतक्या परिचयाच्या झालेल्या असतात की, आता या परिस्थितीत किंवा इथून पुढे त्या कशा वागणार, काय करणार याचा अंदाजही वाचकाला खूप वेळा आधीच आलेला असतो. त्यांच्या रचनांमधल्या अशा व्यक्तिरेखांमध्ये हिमू, मिसिर अली आणि बाकेरभाई या प्रसिद्ध पात्रांचा समावेश होतो. ही पात्रं इतकी गाजली आहेत की, खूप वाचक या काल्पनिक व्यक्तींचे ‘फॅन्स’ झाले आहेत.
त्यांच्या कथा, कादंबऱ्या, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यातून त्यांनी निरीक्षण केलेलं ग्रामीण तसंच शहरी जीवन तेवढय़ाच प्रकर्षांने दिसतं. समकालीन विषयांना वेगळेपणाने मांडतानाही त्यांचं कौशल्य दिसतं. त्यांच्या लेखनात गुंड, मवाली, वेश्या यांचंही चित्रण पूर्वग्रहदूषित नसतं. त्यांचं लेखन सकारात्मक तसंच विधायक विचार आणि प्रवृत्ती दाखवतं. त्यांच्या कथारेषेत वास्तवाबरोबरच अतिनैसर्गिक, काहीसं जादुई तत्त्वही दिसतं. राजकारणाने भारलेल्या तत्कालीन तरुणाईला त्यांनी आपल्या रचनांद्वारे कलेचं रसग्रहण करायला आणि पुस्तकं वाचायलाही शिकवलं.
फिल्म्स अथवा सिनेमा याला कलासक्त फ्रेंच रसिकांनी ‘सातवी कला’ असं संबोधून तुलनात्मकदृष्टय़ा अलीकडे जन्मलेल्या या क्षेत्राला योग्य तो सन्मान दिला. लेखन कलेबरोबरच नवनिर्मित बांगलादेशी रजतपटावरील अभिव्यक्तीच्या या माध्यमालाही हुमायून अहमेद यांनी समृद्ध केलं. दूरचित्रवाणीवर त्यांचं पहिलं नाटक ‘प्रथम प्रहर’ हे १९८३ साली सादर झालं. ‘एई सब दिन रात्री’ या त्यांच्या पहिल्या नाटय़मालिकेने बांगलादेशीयांना छोटय़ा पडद्यावर खिळवून ठेवलं. या प्रचंड लोकप्रिय मालिकेनंतर विनोदी मालिका ‘बहुब्रीही’ आणि नंतर शहरी जीवनावर आधारित ‘कोथाओ केऊ नेई’ (कुठेही कोणीच नाही) या मालिकेने हुमायून अहमेद यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ‘कोथाओ केऊ नेई’ यातील एका गँगचा मुख्य परंतु आदर्शवादीही असलेली ‘बाकेरभाई’ ही व्यक्तिरेखा. या बाकेरभाईला शेवटी फाशीची शिक्षा होते, पण ती शिक्षा चुकीची असते. बाकेरभाईचं हे पात्रं काल्पनिक असूनसुद्धा इतकं लोकप्रिय झालेलं होतं की, त्याचा या चुकीच्या शिक्षेविरुद्ध काही ठिकाणी मोर्चे निघाले, प्रार्थना आयोजित केल्या गेल्या. ‘नक्षत्रेर रात’ ही आणि अशा अनेक मालिकांनी जनसामान्य प्रेक्षकांच्या मनात हुमायून अहमेद यांना मानाचं स्थान दिलं.
दूरचित्रवाणीबरोबरच मोठय़ा पडद्यावरचीही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. सिनेमा क्षेत्रात त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांतून आपली क्षमता लोकांपुढे मांडली. ‘आगुनेर परसमणी’ (अग्नी परीस) हा त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट बांगलादेश मुक्तीयुद्धावर आधारित आहे. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला सर्वच्या सर्व म्हणजे आठही क्षेत्रांत प्रथम पुरस्कार मिळाले. १९७१ सालच्या मुक्तीयुद्धावरच आधारित असलेल्या ‘श्यामल छाया’ या चित्रपटाचं ‘ऑस्कर’साठी बांगलादेशातर्फे नामांकन केलं गेलं होतं. त्यांनी स्वत:च्या चित्रपटांसाठी काही गाणीही रचली. त्यातील ‘आमी आज भेजाबो चोख समुद्रेर जले’ (मी आज भिजीन नयन समुद्राच्या पाण्यात), ‘आमार आछे जल’ (माझं आहे पाणी) इत्यादी गीतांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
त्यांच्या प्रगाढय़ निर्मितीक्षमतेचा आढावा घ्यायचा म्हटला तर आधी उल्लेख न केलेल्यांपैकी काही नावं अशी घेता येतील- कादंबरी आणि कथा- आमादेर शादा बाडी (आमचं पांढरं घर), आमी एबं आमरा (मी आणि आम्ही), बादल दिनेर द्वितीय कदमफूल (पावसाळ्याचं दुसरं कदंबफूल), हिमुर बाबार कथामाला (हिमूच्या बाबांची कथामाला), जोछना ओ जननीर गल्प (चांदणं आणि आईची गोष्ट), जलपद्म, नीलमानुष (निळा माणूस) इत्यादी. इंग्रजीतही त्यांनी तीन पुस्तकं लिहिली. 1971 A Novel, In Blissfull Hell आणि Gouripur Junction.
दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके- ‘एकदिन हठात’ (एके दिवशी अचानक), आंगटी (आंगठी), बँक ड्राफ्ट, दूरत्व, पाप, अनुशोधन, आमरा तीन जन (आम्ही तिघे), जिंदा कबर इत्यादी. चित्रपट- श्राबण मेघेर दिन, चंद्रकथा, निरंतर, घेटूपुत्र कमला (त्यांचा शेवटचा चित्रपट) इ. त्यांच्या नावावर २०० पेक्षा जास्त कथासंग्रह आणि कादंबऱ्या (त्यातील काहींचा अनुवाद इंग्रजी, जपानी, रशियन यांसारख्या भाषांतही झाला आहे. ) जवळजवळ १५० दूरचित्रवाणी मालिका तसंच नाटकं आणि १२ चित्रपट (यातील आठ चित्रपटांचं कथालेखन आणि दिग्दर्शन असं दोन्हीही त्यांनीच केलं आहे तर उरलेल्या चार चित्रपटांचं दिग्दर्शन दुसऱ्यांनी केलं आहे.)
या अशा साहित्यकाराला बांगलादेश सरकार आणि इतर संस्थांनी सन्मानित केलं नसतं तरच नवल! लेखक शिबीर पुरस्कार (१९७३), बांगला अकॅडमी पुरस्कार (१९८१), शिशू अकॅडमी पुरस्कार, जैनुल आबेदिन सुवर्णपदक, मायकेल मधुसूदन पदक (१९८७), बाकसास पुरस्कार (१९८८), हुमायून कादीर मेमोरिअल पुरस्कार (१९९०), नॅशनल फिल्म पुरस्कार (१९७३, १९९४, १९९४), एकुशे पदक (१९९४) आणि शेलटेक पुरस्कार (२००७). त्यांच्या रचना इतक्या उच्चकोटीच्या आहेत की त्या नुसत्या वाचून किंवा बघूनच बांग्लादेशी वाचक अथवा प्रेक्षकाला, त्या हुमायून अहमेद यांच्याच असणार याची कल्पना येते. हुमायून अहमेद यांच्या या अद्वितीय कथा-कादंबऱ्या दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट नसत्या तर बांग्लादेशी आणि संपूर्ण बंगाली साहित्यविश्व नक्कीच अपूर्ण राहिलं असतं, असं कोणी म्हटलं तर ते चुकीचं ठरलं नसतं.
बांगलादेशी आद्य साहित्यकार
जाणकारांच्या मते या शतकातील सर्वात जास्त वाचला गेलेला बंगाली लेखक म्हणून शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याबरोबर हुमायून अहमेद यांचं नाव घेता येईल. त्यांचं लेखन सकारात्मक तसंच विधायक विचार आणि प्रवृत्ती दाखवतं.
First published on: 11-11-2012 at 11:15 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladeshi literature