खूपशा चर्चा केल्या की समस्यांना हात नाही घातला तरी चालते. हृदय पिळवटून टाकणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या कहाण्या अलीकडे वर्तमानपत्रातही एकाच साच्यात बांधल्या जाणाऱ्या. अवेळी आणि अपुऱ्या पावसामुळे कृषी अर्थकारण बिघडलेले. यावर कोणीतरी यावे, सहानुभूती दाखवावी. त्या सहानुभूतीदारांना मिळणारी प्रसिद्धी आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना हेच शेती समस्येवरील एकमेव उत्तर आहे असे वाटावे. जो उठतो तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून निघून जातो. मग शेतीमध्ये चिकाटीने तग धरून राहणाऱ्यांच्या आत्मसन्मानाचे काय? मूळ समस्या सोडवायची ती कशी? परंतु उत्तरादाखल नुसतीच चर्चा. काम करणाऱ्या, शेतात राबणाऱ्या कष्टकरी माणसाला त्याचा आत्मसन्मान मिळवून द्यायचा तर काय करावे लागेल? या प्रश्नांची उत्तरे केवळ चर्चेच्या पातळीवर शोधणारी मंडळी पायलीला पन्नास. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी काय करायला हवे आणि स्वत: अर्थकारण कसे सुधारावे हे सांगणारे नाव म्हणजे भगवानराव कापसे. काय केले त्यांनी? तीन जिल्ह्यंतील २९ गावांतील तीन हजार शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले, ‘शेती काही एकटय़ाने करण्याचे काम नाही. गटशेती हा त्यावरचा उपाय.’ अमेरिकेत एका शेतकऱ्याच्या वाटय़ाला सरासरी सहा हजार एकर शेती असते. भारतात सरासरी पाच एकर. परिणामी तंत्रज्ञानाच्या वापराचे अर्थकारण तोटय़ाचे बनते. हा तोटा कमी करायचा असेल तर शेतीचा आकार वाढवायला हवा. म्हणजे ५० शेतकऱ्यांच्या गटाने जर एकत्रित शेती केली तरच नफा.

भगवानराव कापसे कृषी विभागात उच्चपदस्थ अधिकारी होते. पहिल्यांदा देशातून आंबा निर्यात व्हावा यासाठी झटणाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कृषी समस्या सुटण्याचे मार्ग केवळ हमीभावात दडले आहेत, असे न सांगता ‘परवडणारी शेती’ असा नवा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. जाफराबाद तालुक्यातील खामखेडा या गावी त्यांनी भोवतालच्या शेतकऱ्यांना जगाच्या शेतीचे अर्थकारण समजावून सांगायला सुरुवात केली. सर्वांनी एकत्रित बियाणे आणि खते विकत घेतली तर वाहतुकीचा खर्च कमी होतो. पाणी बचतीसाठी ड्रीप लावले तर आणखी पुढे जाता येते. अशा उपाययोजनांनी सुरुवात झाली. एकच पीक एकत्रितपणे घेतल्यास त्याची विक्री करणेही सोपे होते आणि किंमतही जास्त मिळते, हे त्यांनी दाखवून दिले. खामखेडा गावात गटशेतीचा प्रयोग करण्यापूर्वी तिथले दरडोई उत्पन्न होते ४१ हजार ८४२ रुपये. गटशेती सुरू झाली आणि याच गावातील २०१२-१३ मधील उत्पन्नाचा आकडा १ लाख ६४ हजार ४०६ रुपये, म्हणजे २.५४ टक्कय़ांनी अधिक. गटशेतीचे फायदे सुरू झाले आणि गावातला माणूस गटाने बांधला जाऊ लागला. आता तीन हजार शेतकरी दर द्वादशीला एकत्र भेटतात. सगळ्यांनी मिळून द्वादशी सोडायची. एकत्र जेवण करायचे. ज्या शेतकऱ्याने महिन्याभरात एखादा चांगला प्रयोग केला असेल, तो त्याने इतरांना सांगायचा. ज्याच्या प्रयोगाला यश मिळाले आहे, त्याचा सत्कार करायचा. सहानुभूतीपेक्षा अशा छोटय़ा सत्कारांची सध्या अधिक गरज आहे.
दुष्काळाच्या भोवतालात ऊस खलनायक ठरला. अर्थात ते योग्यच. पण उपाययोजनांमध्ये ‘जेसीबी’ हिरो झाली. शेतकरी मात्र अधिक दीन झाला. याचक बनला. हे चित्र भगवानराव कापसेंना अस्वस्थ करून सोडत होते. गेल्या चार वर्षांपासून ते शेतीचा आकार वाढवा आणि एकत्रित काम करा असा संदेश देत आहेत आणि यात त्यांना यशही मिळत आहे. एकच एक पीक १० ते १५ किलोमीटर परिसरात आणले तर त्याला चांगली बाजारपेठ मिळते आणि भावही चांगला मिळतो. जालना जिल्ह्यतील घनसावंगी तालुक्यात जिरडगाव येथे एक हजार एकरावर केसर आंब्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. दुसऱ्या टप्प्यात डाळिंब, मोसंबी, आवळा, चिकू, सीताफळ अशा फळ लागवडीचीही गटशेती सुरू केली. बियाणे घेण्यापासून ते लागवडीपर्यंत दुकानदार जे सांगेल तेच प्रमाण अशी आपल्या शेतीची पद्धत आहे. ती बदलली पाहिजे यासाठी दर द्वादशीच्या दिवशी होणाऱ्या या बैठकांमध्ये अगदी खडू-फळासुद्धा बरोबर असतो. कोणत्या पिकाला कोणती पोषक सूक्ष्म मूलद्रव्ये लागतात, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. त्याच्या किंमती सांगितल्या जातात. त्यामुळे दुकानदार फसवू शकत नाही. देळेगव्हाण येथील शेतकरी गटात काम करणाऱ्या भगवानराव बनकरांनी टँकरने पाणी विकत घेऊ न तीन एकर कपाशीची लागवड केली आणि एकरी ३५ क्विं टल कपाशीचे उत्पन्न घेतले. सरासरी ५ ते ७ क्विं टल उत्पन्न मिळते. लागवडीच्या वेळी दोन झाडांमधील आणि ओळींमधील अंतर किती असावे हे सांगण्यात आले. कापसाची लागवड अधिक दाट करण्यात आली आणि अनेक शेतकऱ्यांच्या पदरी यश आले. आता अनेक गावांमध्ये एकाच पिकाची लागवड करण्याची पद्धत हळूहळू रुजू लागली आहे. जाफराबाद तालुक्यात आले, कापूस, मोसंबी आणि इतर फळबागाही मोठय़ा प्रमाणात घेतल्या जात आहेत. जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांत आता शेतकऱ्यांचे संघटन उभे आहे. प्रत्येक जिल्ह्यचा एक वेगळा गट. मातीचा पोत वेगळा, तशी त्या त्या ठिकाणची मानसिकताही वेगळी. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काम करताना शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हे भगवान कापसे यांचे मुख्य काम.
बहुतांश शेती समस्यांवरील अहवालामध्ये योग्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या यंत्रणेला लकवा मारला असल्याचे नमूद केले होते. इंग्रजी भाषेतील बहुतांश अहवालांमध्ये ‘एक्स्टेन्शन मशिनरी डीफंग्ड’ असा शब्दप्रयोग होतच आला आहे. याला उत्तर देणारी माणसे तयार करण्याचे काम कापसे यांनी हाती घेतले आहे. आपल्याकडे समस्यांचे स्वरूप अधिक भयावह करून मांडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच कापसे यांचे काम उठून दिसते. समस्या संपल्या आहेत का? नाही! मात्र, समस्येवर उपाययोजना करणारा माणूस मात्र घडवायला हवा.
सेवानिवृत्तीनंतर काहीही न करता जगणारे अनेकजण असतात. मात्र कापसे यांनी शेती समस्येवरील उपाययोजना शोधत नवनवीन प्रयोग हाती घेतले. असे प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. अलिकडेच या कामाबद्दल कापसे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल वॉटसेव अवार्ड- २०१५’ देण्यात आला. एखादे गाव कापसाचे, एखादे तुरीचे, एखादे सोयाबीनचे, अशी गावेच्या गावे बदलू लागली आहेत. उत्पन्नात वाढ होत असल्याने आणि अधिक रक्कम पदरी पडत असल्याने कापसेंचा द्वादशीदिवशी एकत्रित होणारा परिवार मोठा होत आहे. गावागावांत ठिबक सिंचन वाढत आहे. समस्येची व्याप्ती एवढी मोठी आहे की, भगवानराव कापसेंसारखी माणसे प्रत्येक तालुक्यात उभी राहायला हवीत. कापसे हे काही बडय़ा शेतकऱ्यांचे सल्लागारही आहेत. त्यातून त्यांना पैसाही उपलब्ध होतो. मात्र, कळकळीने काम करणारी माणसे या क्षेत्रात वाढायला हवीत; अन्यथा पाऊस कितीही पडला तरी दुष्काळ पाचवीलाच राहू शकतो.
सुहास सरदेशमुख – suhas.sardeshmukh@expressindia.com
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बावनकशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwanrao kapase admirable work for farmers
First published on: 03-07-2016 at 01:43 IST