आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यावर एखाद्या किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा प्रभाव असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या या व्यक्तींनी आपले आयुष्य समृद्ध केलेले असते. त्यांच्यापासून काही ना काही प्रेरणा मिळालेली असतेच, पण आपण त्यांच्याकडून काही शिकलेले असतो. मृदुला प्रभुराम जोशी यांनी लिहिलेले ‘अभिजन प्रियजन’ हे पुस्तक अशाच प्रकारचे व्यक्तिपरिचयात्मक लेखांचे आहे.
पॉप्युलर प्रकाशन संस्थेत त्यांनी अनेक वर्षे मराठी पुस्तकाच्या संपादनाचे काम केले आहे. पुस्तकाच्या हस्तलिखितावर संपादकीय संस्कार करण्यापासून ते पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कामाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर लेखकांचा जवळून परिचय झाला. त्यांच्याशी संबंध आला व परिचयाचे रूपांतर गाढ स्नेहात झाले. त्यांना भावलेल्या अशा काही मंडळींवर त्यांनी काही ना काही निमित्ताने लेख लिहिले. या साहित्यिक मंडळींबरोबरच त्यांचे काही नातेवाईक, शिक्षक आणि प्राध्यापक यांच्यावरही जोशी यांनी लेखन केले. त्याचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
पुस्तकातील बहुसंख्य व्यक्ती गुणांनी खूप श्रेष्ठ असल्या तरी प्रसिद्धिविन्मुख असल्याने त्यांच्याविषयी लोकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे या सर्व लेखांना एक संदर्भ मूल्यही प्राप्त झाले आहे. मान्यवर लेखकांसह जोशी यांनी त्यांची शाळा व तेथील त्यांच्या मैत्रिणी, रुईया महाविद्यालय आणि पॉप्युलर प्रकाशन संस्थेतील दिवस याविषयीही लिहिले आहे. या सर्व आठवणीवजा परिचय लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. ही सर्व मंडळी लेखिकेसाठी ‘अभिजन’ तर आहेतच, पण त्याचबरोबर ‘प्रियजन’ही आहेत. त्याचे प्रत्यंतर पुस्तकातील लेख वाचताना येते.
पुस्तकाच्या प्रारंभी ‘माझी ‘सात्त्विक’ आई’ आणि ‘माझे पितामह’ हे दोन लेख आहेत. ‘आपण आज आहोत, पण उद्या असू की नाही याची खात्री नाही. तेव्हा आपले या धरतीवरचे जे काही इतिकर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करावे, तेच श्रेयस आहे. आई आयुष्यभर तशीच वागली, असे लेखिका यात सांगतात. ‘माझे पितामह’ हा लेख लेखिकेचे आजोबा (वडिलांचे वडील) प्रा. भगवंतराव आगासकर यांच्यावर आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम जोशी हे लेखिकेचे दीर. त्यांच्याविषयीचा लेख ‘आमचे कुलगुरू’ म्हणून आहे. प्रा. वि. ह. कुलकर्णी, डॉ. शं. गो. तुळपुळे, स. मा. गर्गे, डॉ. वा. म. कुलकर्णी, रामकृष्ण बजाज, प्राचार्य मधुसूदन कौंडिण्य, डॉ. इंदूमती पारिख,
आचार्य पार्वतीकुमार, स्नेहप्रभा प्रधान, कवी ग्रेस, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, प्रा. रं. रा. देशपांडे यांच्यावरील लेखही वाचनीय आहेत. त्याशिवाय कलापथकाच्या रंगमंचावर, इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा या आपल्या शाळेबद्दल, शाळेतल्या मैत्रिणी आणि अन्य विषयांवरील आठवणींचा पटही विविध लेखातून त्यांनी उलगडला आहे.
लेखिकेने काही वर्षांपूर्वी आकाशवाणी मुंबई केंद्रावरील ‘चिंतन’ या कार्यक्रमासाठी लेखन केले होते. त्यात मांडलेले काही विचारही या पुस्तकात देण्यात आले आहेत. छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून किंवा दैनंदिन जीवनात खटकणाऱ्या काही गोष्टींतून लेखिकेने आपले हे चिंतन व्यक्त केले आहे.
सर्वच लेखांची भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. प्रत्येक प्रकरण हे एकेका व्यक्तीवर असल्याने कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात केली तरी कोणतीही अडचण येत नाही. समाजातील गुणी आणि झाकलेल्या माणकांचा परिचय यानिमित्ताने वाचकांना झाला आहे. त्यांचे कार्य समाजापुढे आले आहे.
‘अभिजन प्रियजन’ – मृदुला प्रभुराम जोशी
विश्वसखा प्रकाशन, बदलापूर,
पृष्ठे-१६६, मूल्य- १७० रुपये.