scorecardresearch

Premium

अभिजात: ब्रिटनला समृद्ध करणारा वारसा

आपल्याकडे जनमानसात स्वर्गीय लता मंगेशकरांना जे आदरयुक्त प्रेमाचं स्थान आहे, तसं ब्रिटनमध्ये जलरंगात ‘तरल तरंग’ निर्माण करणाऱ्या चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नरना (१७७५-१८५१) आहे. देशभरात जेवढी काही कलासंग्रहालये आहेत.

अभिजात: ब्रिटनला समृद्ध करणारा वारसा

अरुंधती देवस्थळे
आपल्याकडे जनमानसात स्वर्गीय लता मंगेशकरांना जे आदरयुक्त प्रेमाचं स्थान आहे, तसं ब्रिटनमध्ये जलरंगात ‘तरल तरंग’ निर्माण करणाऱ्या चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नरना (१७७५-१८५१) आहे. देशभरात जेवढी काही कलासंग्रहालये आहेत, त्यातील प्रत्येकात त्यांचे एक तरी चित्र किंवा प्रतिकृती असते. जुन्या पिढीतल्या कोणा ब्रिटिश कलासमीक्षकाशी टर्नरबद्दल बोलाल तर ते भरभरून बोलतात आणि दुर्मीळ, फारसे ज्ञात नसलेले, फक्त इंग्लंडमध्येच उपलब्ध असलेले संदर्भ तुम्हाला तत्परतेने पुरवतात, हा अनेकांचा अनुभव! ३७,००० पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण चित्रांचा खजिना आणि शेकडो स्केचबुक्समधील रेखाटनं आनंदाने जगासाठी सोडून जाणाऱ्या जे. एम. डब्ल्यू. टर्नरशिवाय कला किंवा कलेच्या इतिहासाचा अभ्यास पुरा होणं केवळ अशक्य आहे.
केवळ हातातलं दैवी कौशल्य आणि निसर्गावर मनस्वी प्रेम यांतून साकारणाऱ्या टर्नर यांच्या कलेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुनियाभरात गाजलेलं ‘नॉरहॅम कासल सनराइज’ (१८४५) हे चित्र. त्याचं कम्पोझिशन खरं तर वर्णनापलीकडचं! एरव्ही फक्त जलरंगातच शक्य वाटणारी, वाहती, नाजूक subtlety तैलरंगात टर्नरने ९०.८ सें. मी. x १२१.९ सें. मी. कॅनव्हासवर कशी उतरवली असेल? स्कॉटलंडच्या सीमेवर ट्वीड नदीच्या किनारी आता पडझड होऊन टेकाडावर उभा असलेला फक्त किल्ला गर्द निळाईत उभा. त्याचं प्रतिबिंब उगवतीच्या स्वच्छ, कोवळ्या प्रकाशात नदीच्या पात्रात पडलेलं. मंद, प्रशांत निळ्या आकाशाच्या असीम क्षितिजावर फक्त किल्ल्यामागच्या आकाशात सूर्योदयाची चाहूल. नदीकाठचं उघडय़ा माळावरलं जग अजून निळ्या दुलईत गाढ झोपलेलं. दोन घोडे- एकमेकांपासून अंतरावर- पाणी प्यायला आलेले. नदीवरच्या अस्पष्ट तरंगांवर पेंगुळलेली शांतता.. ही एक मालिकाच झाली होती. टर्नर चकवा लागल्यासारखे अनेकदा हा किल्ला, समोरची नदी आणि प्रकाशाची जादू बघायला वेगवेगळ्या ऋतूंत आपला कॅनव्हास घेऊन तिथे जात. हे चित्र हे लिखाण वाचणाऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने बघावंच. मूळ चित्र लंडनच्या टेटमध्ये आहे. प्रतिकृतीही अगणित आहेत. जगात कुठल्या ना कुठल्या संग्रहालयात हे चित्र दिसेलच. एरवी कदाचित दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला टर्नरमुळे अजरामर झाला आहे. या चित्राने देशातल्या अनेक कलावृत्तींच्या अनेकांना इथे आणलंय.
टर्नरनी त्यांचं उभं आयुष्य फक्त चित्रकलेला दिलेलं! घरातलं वातावरण आणि भाषेचा पोत खेडवळ. वडील न्हावी, व्यवहारी वृत्तीचे. आणि लेकाला तर आपण चित्रकारच व्हायचं, हा बोध बालपण संपता संपताच झालेला! त्यांनी गुणवत्तेबद्दल प्रचंड दबदबा असलेल्या रॉयल आर्ट अॅाकॅडमीत प्रवेश मिळवला. नंतर काही वर्षांनी ते तिथेच प्रोफेसर म्हणून अध्यापनही करू लागले. त्यांना उच्चभ्रू कलावर्तुळातील टिपिकल व्हिक्टोरियन तौरतरीके आवडत नसत. आणि ‘ते आपल्याला जमावेत असा आपण प्रयत्न करू इच्छित नाही.. मापदंड फक्त कला हाच असावा, इतर काहीही नाही,’ असं त्यांनी आपल्या रॉयल अॅूकॅडमीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच आठवडय़ात सांगितलं होतं. टर्नरना आपण दिसायला चांगले नसल्याचा गंड होता, म्हणून ते आपलं पोट्र्रेट काढू द्यायला तयार नसत. अॅंकॅडमीच्या परंपरेनुसार त्यांचं पोट्र्रेट हॉलमध्ये लावायचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्या एका विद्यार्थ्यांकडून आठवणीतून ते कसंबसं करावं लागलं. त्यांनी चोविसाव्या वर्षी केलेलं सेल्फ पोट्र्रेटच अनेक र्वष चलनात राहिलं.. अगदी आजवर.
टर्नरने सुरुवातीला अभिजात पारंपरिक शैलीत चित्रं काढली. पण ती परंपरा पुढे नेण्यासाठी नव्हे. ग्रीक वा रोमन पुराणातील गोष्टी किंवा बायबलमधल्या कथा चित्राचा विषय बनवून तिच्या आधुनिक मांडणीचा प्रयत्न त्यात असावा कदाचित. उदाहरणार्थ, ‘अपोलो अँड दी पायथन’ या ऑइल ऑन कॅनव्हास चित्राला दिलेली उजाड निसर्गाची पार्श्वभूमी. क्लासिकल चित्रांत भर पात्रांवर, घटनेवर असे. निसर्ग आवश्यक असला तरच. ‘सन इज गॉड’ ही सूर्याच्या महतीचं चित्रगान करणारी, त्यांचं प्रिय तत्त्व वेळोवेळी अनेक रूपांमधून मांडणारी मालिका. या नावाचं एक पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. त्यातही कमालीची सुंदर शंभरेक तैलचित्रं आणि जलरंगातील चित्रं आहेत. कमाल म्हणजे काही चित्रांत दोन्हींचा बेमालूम एकमेकांत मिसळणारा उपयोग आहे. सूर्याच्या उत्पत्तीबद्दलच्या मनुष्यनिर्मित पुराणकथांमधून तपशील निवडण्यापेक्षा अमर्याद ताकदीच्या निसर्गासमोर माणूस किती नगण्य आहे हे नैसर्गिक शक्तींच्या गतिशीलतेतून दाखवलं आहे. टर्नरचं प्रत्येक निसर्गचित्र म्हणजे पंचमहाभूतांना, निसर्गाच्या अक्राळविक्राळ रूपांना, विराट शक्तीला चित्रमाध्यमातून केलेलं आदरयुक्त अभिवादन आहे. पुढे त्यांची निसर्गचित्रं अमूर्त, पूरक रंगछटांचा मुक्त वावर असलेली बनली. क्रोमॅटिक पॅलेटमधून घडवून आणलेली जादू माध्यमावर असलेली त्यांची पकड दाखवणारी! रोरावणारे वादळ, झंझावाती भोवरे, समुद्राकाठची नीरव शांतता असा टर्नरच्या अध्यात्माचा विस्तार ‘निर्गुण निर्भय रे गुण गाऊंगा..’
टर्नरची आणखी एक भरीव कामगिरी म्हणजे त्यांनी देशाच्या इतिहासातील घटनांवर आधारित काही जबरदस्त चित्रं काढली आणि तो इतिहास अक्षरश: लोकांच्या डोळ्यासमोर उभा केला. याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे ‘दी फायटिंग टेमेरे’ (९०.७ x १२१.६ सें. मी., ऑइल ऑन कॅनव्हास) हे रॉयल आर्मीचं जागोजागी मोडकळीला आलेलं जहाज- ज्याने ट्रॅफल्गारची फ्रेंच आणि स्पेनविरुद्धची लढाई ब्रिटिशांना जिंकून दिली. हे चित्र देशाचा कलावारसा म्हणून लंडनच्या नॅशनल गॅलरीत लावलेलं आहे. त्यांच्या माघारी हे चित्र २० स्टर्लिग पौंडाच्या नोटेवरही विराजमान झालं. बॅटल ऑफ ट्रॅफल्गारवर काढलेल्या अनेक चित्रांत एक चित्र फार हृदयस्पर्शी.. ॲडमिरल नेल्सन यांच्या देशासाठीच्या बलिदानाचं! ‘गड आला, पण सिंह गेला’ अशीच अवस्था. खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी, धडकांनी जीर्णशीर्ण झालेलं जहाज, तोफगोळ्यांच्या धुराने वातावरणात आलेलं करडेपण बाजूला सारून आत येणारा प्रकाश, त्यावर प्राणपणाने लढून एका अज्ञाताच्या गोळीला बळी पडून ‘थँक गॉड, आय डीड माय डय़ुटी’ म्हणत प्रिय मित्राच्या सान्निध्यात प्राण सोडणारा देशभक्त नेल्सन एका कोंडाळ्यात आणि व्याकूळ मनाने आता जिंकलेल्या लढाईची सैनिकी इतिश्री करण्यात गुंतलेले सैनिक दुसऱ्या. चित्रं सुंदर आहेतच, पण उदात्ततेनं भारलेली. या विषयावर साहजिकच अनेक चित्रं आहेत आणि त्यात टर्नरच्या चित्रमालेचं मानाचं स्थान आहे. टर्नरना पाणी, प्रकाश आणि जहाजे यांचं खूप आकर्षण असावं. त्यांनी या तिघांचा एकमेकांवर प्रभाव दाखवणारी अनेक सरस चित्रं रंगवली आहेत.
स्वदेश आणि संस्कृतीवर अतिशय प्रेम असणाऱ्या टर्नरनी एकटय़ा लंडन ब्रिजचीच शेकडोंनी चित्रं काढली आहेत.. ऋतुचक्राच्या असंख्य विभ्रमांत आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या वेगवेगळ्या मूडमध्ये, माध्यमे आणि शैलींच्या वैविध्यानुसार रंगसंगती वापरून! त्यांना निसर्गवेडय़ा रोमँटिक कवितांचंही वेड होतं. ‘वाय व्हॅली’ आणि वर्डसवर्थचा प्रिय ‘टींटर्न अॅाबी’ किंवा लेक डिस्ट्रिक्ट ही त्यांचीही आवडती ठिकाणं. परत परत इथली चित्रं काढायला ते इथे निघून येत. विशेषत: मंद रंगछटांचा जलरंगात मांडलेला खेळ आणि रेषेवरची त्यांची अद्भुत पकड ही टर्नरची वैशिष्टय़ं. रोमँटिक कवितांवर टर्नरनी चित्रं काढली आणि माघारी त्यांच्या चित्रांवर काही कवींनी सुंदर कविता लिहिल्या.. हेही सुंदरच.
खरोखरच जिनियस असलेल्या चित्रकार टर्नरमध्ये कायम एक अस्वस्थता, नव्याचा शोध दडलेला असावा. नवनवीन विषयांच्या शोधात ते दरवर्षी युरोपच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या ऋतूंत निसर्गाचे विभ्रम टिपण्यासाठी भटकत असत. प्रकाशाच्या पाण्याबरोबरच्या खेळाशी आयुष्यभर टिकलेलं प्रेम प्रकरण तर होतंच. इतकं, की त्यांच्या जलरंगांतच नव्हे, तर नंतर सुरू केलेल्या तैलरंगांतील चित्रांमध्येही ‘यलो फीवर’ जाणवत राहतो, असं विनोदानं म्हटलं जातं. पण याला कारण सूर्याकडे फार वेळ टक लावून पाहण्यामुळे निर्माण झालेला दृष्टिदोषही असावा असा तज्ज्ञांचा अंदाज. हे सगळं असलं तरी काळाने औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर उभ्या केलेल्या टर्नरची वृत्ती ‘विथ इट’ होती. तंत्रयुगाच्या प्रगतीचं त्यांना कौतुक होतं आणि ती गौरवणारीही काही चित्रं त्यांनी काढली आहेत, हे विशेष. यंत्रयुगात प्रवेशणाऱ्या दुनियेला रंगवण्यासाठी त्यांनी आपलं तंत्र बदललं! ‘रेन, स्टीम आणि स्पीड वेस्टर्न रेल्वे’ इथे चित्राचा विषय जाणिवेत हरवलेला. ‘My job is to paint what I see, not what I know’ या एका वाक्यात टर्नर स्वत: मिशन सांगून टाकतात. याच प्रेरणेचे पुढे फ्रेंच इम्प्रेशनिस्ट शैलीत पडसाद उमटले असावेत का? टर्नरच्या चित्रांचा खजिना कालक्रमानुसार पाहण्याचा जमेल तितपत प्रयत्न करू म्हटलं तर त्यात एका कलावंताची प्रायोगिकता आणि वैविध्य दिसतंच, पण त्याबरोबरच कलेची समृद्धीकडे होत गेलेली वाटचालही! त्यांनी कलेत केलेल्या प्रयोगांबद्दल फक्त अंदाज करता येतात, निश्चितपणे काही म्हणता येत नाही. ते रॉयल अॅपकॅडमीत कला शिकवत असले तरी त्यांच्या स्टुडिओत मात्र कोणाला प्रवेश नसे.
टर्नरच्या मृत्युपत्रानुसार त्यांची बरीच जलरंगांतली आणि तैलरंगांतली सगळीच चित्रं लंडनच्या नॅशनल गॅलरी ऑफ ब्रिटिश आर्टला सुपूर्द करून टाकली गेली होती. आजवर चित्रकारांनी आपली चित्रं देशाला देऊन टाकण्याची जी उदाहरणं आहेत, त्यातही टर्नरचं परिमाण कोणी गाठू नाही शकलेलं. त्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. चित्रं सुरक्षित राहून कलाप्रेमींना पाहता यावीत, नातेवाईकांना देऊन ती एकाच कुटुंबात राहिली असती आणि त्यांचं पैशांत होणारं मूल्यच महत्त्वाचं ठरलं असतं. कलावंतांचा वारसा त्या कलेच्या जाणकारांकडे जावा, आंधळेपणे कुटुंबाचा गल्ला भरणारा नसावा, हा सुज्ञ विचार! एका कलाकाराची इतकी चित्रं एके ठिकाणी ठेवणं नॅशनल गॅलरीला शक्य नसल्याने तो खजिना तीन-चार वेगवेगळ्या संग्रहालयांना सोपवण्यात आला. टेटमधलं ‘टर्नर विंग’ हे एक सौंदर्यस्थळ आहे.
त्यांच्या आयुष्याचं शेवटचं वर्ष व्याधींनी ग्रासलेलं होतं. आधी कॉलरा झाला आणि नंतर हृदयरोग. सूर्यप्रकाश आणि मोकळ्याढाकळ्या निसर्गावर जिवापाड प्रेम करणाऱ्या टर्नरना घरात कैद झाल्यासारखं वाटत होतं. भर डिसेंबर महिन्यात अंथरुणाला खिळून असलेल्या टर्नरच्या खिडकीतून अचानक त्यांना प्रिय असलेला एक स्वच्छ उन्हाचा कवडसा त्यांच्या बिछान्यावर आला आणि नंतरच्या काही क्षणांत टर्नर शांतपणे अनंतात विलीन झाले..
arundhati.deosthale@gmail.com

kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की
alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?
Full CCTV footage of Mahesh Gaikwad attack video goes viral
कल्याण : महेश गायकवाड हल्ल्यातील संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण प्रसारित
Kailash Kulkarni
Money Mantra : लक्ष्मीची पावले  : फंड विश्वातील अनुभवी सेनानी.. – कैलाश कुलकर्णी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Britain rich heritage art museum art reviewer history of art amy

First published on: 08-05-2022 at 00:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×