रघुनंदन गोखले

बुद्धिबळ हा खेळ मेंदूपेशींना सातत्याने लढवत ठेवणारा. पण एका खेळाडूने अनेकांशी लढत देण्याच्या करामती तरी किती कराव्यात? भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युएल एरन यांनी चाकाच्या खुर्चीत बसून अनेक खेळाडूंवर मात केली.. माजी जगज्जेता कॅपब्लांका एकावेळी १०३ जणांशी खेळत होता.. इराणी एहसान मघामी याचा ६०४ प्रतिस्पर्ध्याना झुंजवत ठेवण्याचा विश्वविक्रम अजून अबाधित राहिलेला आहे.. असामान्य खेळाडू आणि त्यांच्या अद्भुत लढायांविषयी..

Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
Numerology Mulank Five People
Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात बुद्धिमान आणि हुशार, कामाच्या ठिकाणी होते त्यांचे कौतूक
The rules of Citizenship Amendment Act passed by Parliament are gazetted by Government
पहिली बाजू: ‘सीएए’च्या वचनपूर्तीचे समाधान!

नुकतीच माझ्या वाचनात एक बातमी आली. नव्यानंच ग्रँडमास्टर झालेला मुंबईकर आदित्य मित्तल हा युवक मुंबईमध्ये एका वेळी १० खेळाडूंशी सामना खेळला. अशा प्रदर्शनीय लढती म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अजब आणि आश्चर्यकारक गोष्ट असते. बुद्धिबळ खेळाडूंची स्मरणशक्ती आणि त्यांची दृश्यीकरण शक्ती

( Visualisation power ) याविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये आदरभाव असतो. एखादा खेळाडू एका वेळी अनेकांशी लढत देत असल्याची बातमी आली की वर्तमानपत्रेदेखील त्याची छायाचित्रं आवर्जून प्रसिद्ध करतात. मागच्या लेखात आपण आठ वर्षांच्या सॅम्युएल रेशेव्हस्कीविषयी वाचलं. खरं तर वेगवेगळय़ा खेळाडूंना वेगवेगळय़ा गावांमध्ये पाठवून बुद्धिबळाविषयी कुतूहल निर्माण करणं अनेक देशांना/ बुद्धिबळ संघटनांना सहज शक्य आहे. जुन्या सोव्हिएत संघराज्यांनी बुद्धिबळ लोकप्रिय करण्यासाठी हीच पद्धत वापरून बुद्धिबळाला आपल्या राष्ट्राचा प्रमुख खेळ बनवला होता. आज आपण एक खेळाडू अनेक प्रतिस्पर्ध्याशी लढत असतानाचे अनेक प्रकार आणि त्याविषयी रंजक माहिती घेऊ या.

पहिला प्रकार आहे तो म्हणजे, एखादा अनुभवी खेळाडू लहान मुलांशी अथवा नवख्या खेळाडूंशी एका वेळी खेळतो. सामान्यपणे हा प्रकार हाताळणं कसलेल्या बुद्धिबळपटूला इतकं कठीण नसतं; कारण अनुभवी खेळाडूला अनेक पटांवर लक्ष देऊन खेळता येतं. फक्त शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कारण कधी कधी हे प्रदर्शन काही तासही चालतं. या संदर्भात भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युएल एरन यांची एक गंमत आठवते. कोलंबो (श्रीलंका) इथं एका वेळी अनेक जणांशी खेळण्यासाठी मॅन्युएल एरन यांना निमंत्रण होतं. तिथं पोहोचल्या पोहोचल्या त्यांचा पाय मुरगळला आणि त्यांना चालणंही अशक्य झालं. पण एरन यांना तेथील खेळाडूंचा हिरमोड होईल याची जाणीव होती. म्हणून त्यांनी आयोजकांना चाकाच्या खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलं. आयोजकांनी इस्पितळात फोन करून एक चाकाची खुर्ची मागवली, पण त्यांनी पाठवलं स्ट्रेचर! वर निरोप पाठवला की ‘खुर्चीपेक्षा रोग्याला हे जास्त सुखकारक होईल.’ मग आयोजक स्वत: गेले आणि चाकाची खुर्ची घेऊन आले. अशा रीतीनं मॅन्युएल एरन यांच्या आयुष्यातील अनेक प्रदर्शनीय सामन्यांपैकी एक चाकाच्या खुर्चीत बसून खेळला गेला.

शंभर वर्षांपूर्वीही असे अनेक प्रदर्शनीय सामने खेळले जायचे. माजी जगज्जेता कॅपब्लांकाशी निकालाच्या बाबतीत कोणीही बरोबरी करू शकणार नाही. १९२२ मध्ये अमेरिकेतील क्लिव्हलँड येथे ७ तास चाललेल्या या सामन्यात कॅपब्लांकाने तब्बल १०३ जणांशी लढत दिली आणि त्यापैकी एक बरोबरी वगळता बाकी सर्व डाव जिंकले. तरुण कॅपब्लांका नुकताच जगज्जेता झाला होता आणि तोही २७ वर्षे अजिंक्य राहिलेल्या डॉ. इम्यानुएल लास्कर याच्या विरुद्ध! १०३ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढत देऊन या प्रकारे त्यानं आपल्या नव्या विजेतेपदाचा आनंद साजरा केला. याच कॅपब्लांकानं आपला आव्हानवीर ठरलेल्या अलेक्झांडर अलेखाइनला त्या काळी १०,००० डॉलर जमा करून त्या रकमेसाठी जगज्जेतेपदाची स्पर्धा खेळण्याची अट घातली. (जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जन्माआधी जगजेत्यांची मनमानी चालत असे. किंबहुना आपले आव्हानवीरही तेच निवडत असत. बक्षिसाची रक्कमही आव्हानवीराला जमा करावी लागे.) बिचारा अलेखाइन! त्यानं युरोप आणि अमेरिकेत असंख्य प्रदर्शनीय सामने खेळून १०,००० डॉलर जमवले आणि स्वत:च्या गुर्मीत असणाऱ्या कॅपब्लांकाचा पराभव केला.

एका वेळी अनेक खेळाडूंशी खेळणं ही गोष्ट आता सहज शक्य आहे म्हटल्यावर एकावर एक विक्रम केले गेले आहेत. एका वेळी शंभरपेक्षा जास्त खेळाडूंशी खेळणं हे युरोप अथवा अमेरिकेमध्ये नेहमीचं झालं. पहिली नोंद केली स्वीडनचा ग्रँडमास्टर उल्फ अ‍ॅण्डरसन यानं स्टॉकहोममध्ये. १९९६ साली उल्फनं तब्बल ३१० प्रतिस्पर्ध्याशी लढत देऊन त्यापैकी २६८ जिंकले आणि फक्त २ गमावले. बाकी ४० सामने बरोबरीत सुटले. हा विक्रम ८ वर्षे अबाधित राहिला. २१फेब्रुवारी २००४ रोजी  इंग्लंडमधील क्रोवथॉर्न येथील विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात आंतरराष्ट्रीय मास्टर अ‍ॅंड्रय़ू मार्टिन यानं ३२४ खेळाडूंशी लढत देऊन २९४ डाव जिंकले आणि अवघा एक गमावला. महिलाही या विक्रमांमध्ये कमी नाहीत असं सुसान पोलगार या माजी विश्वविजेतीनं दाखवून दिलं. १ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडामधील पाम बीच गार्डन या गावाच्या मॉलमध्ये हे प्रदर्शनीय सामने झाले. ३२६ खेळाडूंशी एका वेळी लढताना सुसाननं ३०९ डाव जिंकले आणि फक्त ३ डावात पराभव पत्करला.

ग्रँडमास्टर किरील जॉर्जीव या बल्गेरियाच्या ग्रँडमास्टरंनं २१ फेब्रुवारी २००९ ला सोफियामध्ये ३६० खेळाडूंशी लढत दिली. सतत १४ तास चाललेल्या या सामन्यात किरीलनं २६४ सामने जिंकताना फक्त ६ गमावले आणि गिनेस बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली. अवघ्या सहा महिन्यांत इराणचा ग्रँडमास्टर मुर्तझा महजूब यानं १३ ऑगस्ट रोजी इराणमधील तेहेरानमध्ये लढत देऊन ५०० खेळाडूंशी २४ तास चाललेल्या प्रदर्शनात तब्बल ४० किलोमीटर चालण्याचा पराक्रम देखील नोंदवला. ५०० पैकी ३९७ डाव जिंकणाऱ्या मुर्तझानं अवघ्या ६ डावांत पराभव स्वीकारला. सध्याचा विश्वविक्रम ९ वेळा इराणी विजेतेपद जिंकणाऱ्या ग्रँडमास्टर एहसान मघामी याच्या नावावर आहे. ८-९ फेब्रुवारी २०११ साली खेळल्या गेलेल्या या प्रदर्शनीय सामन्यात मघामी यानं तब्बल ६०४ खेळाडूंशी एका वेळी लढत दिली आणि  ५८० डाव जिंकले होते.

जर एखादा उच्च दर्जाचा खेळाडू आपल्यापेक्षा थोडय़ा कमी दर्जाच्या मर्यादित खेळाडूंबरोबर खेळणार असेल तर त्यासाठी बुद्धिबळाच्या घडय़ाळांची  मदत घेतली जाते. उदाहरण द्यायचे तर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद ६ इंटरनॅशनल मास्टर्स विरुद्ध खेळणार असेल तर सगळय़ा खेळाडूंना समान वेळ देण्यात येते. म्हणजे सगळय़ांच्या घडय़ाळात ३०-३० मिनिटे लावण्यात येतात. त्यामुळे आनंदला सरासरी ५ मिनिटे मिळतात, पण सर्व प्रतिस्पर्ध्याना ३० मिनिटांचा लाभ होतो.

माजी जगज्जेता गॅरी कस्पारॉव्ह म्हणजे आत्मविश्वासाचे मूर्तिमंत प्रतीक! अनेक ग्रॅण्डमास्टर्स खेळत असतानाही त्यानं त्या त्या देशांमध्ये जाऊन त्यांच्या संघांना पराभूत केलं. पेरू, अर्जेटिना, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका (ज्युनिअर ) अशा बलाढय़ संघाना त्यानं स्वत:च्या सहा पट / चार पट वेळ देऊनही पराभूत केलं. फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं ग्रँडमास्टर बाचर कुवातली विरुद्ध मिळवलेला विजय देदीप्यमान होता आणि आजही माझ्यासारखे प्रशिक्षक उत्तम हल्ल्याचं प्रात्यक्षिक म्हणून तो डाव विद्यार्थ्यांना दाखवतात.

कास्पारॉव्हचा जर्मन संघाविरुद्धचा प्रदर्शनीय सामना मर्सिडीझ बेंझ कंपनीनं पुरस्कृत केला होता. तरुण ग्रॅण्डमास्टर्सच्या जर्मन संघाला गॅरीनं धूळ चारली आणि बेंझ कंपनीनं आपली सर्वोत्तम नवी कार गॅरीला भेट दिली. गॅरीनं ती पत्नी माशा हिला भेट दिली (आणि काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला). त्याच्या जर्मन संघाविरुद्धच्या विजयाचं वैशिष्टय़ म्हणजे गॅरीचा झंझावाती खेळ. अनेक वेळा गॅरी चॉकलेट खात वाट बघत असे आणि त्याचे सहाच्या सहा प्रतिस्पर्धी डोकं धरून बसलेले असत. लक्षात घ्या! प्रत्येकाला त्याच्या घडय़ाळात १ तास आणि गॅरीलाही तेवढाच वेळ! म्हणजे एखाद्यानं चाल केली की तो आपलं घडय़ाळ बंद करून गॅरीचं घडय़ाळ सुरू करत असे. म्हणजे तिथे येऊन चाल करेपर्यंत गॅरी कस्पारॉव्हचं घडय़ाळ सुरू असे. थोडक्यात, गॅरीला सरासरी प्रत्येक डावासाठी १० मिनिटं मिळत असत.

काही खेळाडू लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करून स्वत:ची फजिती करून घेतात. एका देशाचा राष्ट्रीय विजेता ६५ वर्षांपूर्वी सोव्हिएत संघराज्याच्या दौऱ्यावर गेला होता. तिथल्या एका शाळेला भेट दिली असता त्यानं तेथील छोटय़ा मुलांशी खेळायची इच्छा दर्शवली. हेडमास्तर बाईंनी लगेच १० वर्षांखालील १० खेळाडूंना बोलावलं आणि सामना सुरू झाला. थोडय़ाच वेळात सर्व डाव हरून त्या अनुभवी खेळाडूला काढता पाय घ्यावा लागला. परंतु यामध्ये आश्चर्य वाटण्याची गरज नाही. सोव्हिएत संघराज्यात लहान मुलांना बुद्धिबळ शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकवलं जात असे. थोडं विषयांतर करून एक गोष्ट मला आठवते ती सांगतो.

लहान असताना अनातोली कार्पोव (भावी जगज्जेता) आणि राफेल वॅगानियन (भावी ग्रँडमास्टर) यांना (त्या वेळच्या) युगोस्लाव्हियामधील एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवण्यात आलं आणि तिथं गेल्यावर त्यांना कळलं की, ही मुलांची स्पर्धा नसून मोठय़ांची आहे. इतक्या दुरून आलेल्या मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून कार्पोव आणि वॅगानियन यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला. आणि अहो आश्चर्यम्! कार्पोव आणि वॅगानियन दोघांनीही पहिले दोन क्रमांक पटकावले!!

एका वेळी अनेकांशी लढत! आपल्याला हे सगळे अद्भुत वाटत असेल, पण यापेक्षाही एक कठीण प्रकार बुद्धिबळातील प्रदर्शनीय सामन्यांमध्ये खेळला जातो. तो म्हणजे पटाकडे न बघता खेळाडूंशी लढत देणे. याविषयी पुढच्या लेखात.

gokhale.chess@gmail.com