कुणी काहीही म्हणो, अचानक उंदीर दिसला की पळता भुई थोडी होते. त्याचीही आणि आपलीही. (म्हणजे माझीही!) ‘अरे, उंदीर काय करतोय? उलटा तो आपल्यालाच घाबरून पळतो. एकदा स्वत:चा आकार बघ, त्याचा बघ.’ हे ऐकून जरी बरं वाटलं (फक्त ऐकूनच!) तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. तो प्राणी इतका बिनडोक असतो, की मांजराशिवाय दुसऱ्या कुणाला घाबरून पळायचं हेसुद्धा त्याला कळत असेल असं वाटत नाही. कधी कधी तर तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेलात की तो उलटा तुमच्या अंगावर धावून येतो. अंगावर अचानक उडी काय मारतो! पळण्यात मग त्याची आणि आमची चुरस लागते. गणपतीचं वाहन वगैरे कल्पना करण्याइतपत ठीक आहे. पण तेसुद्धा निव्वळ दोघांच्या आकारमानातून होणाऱ्या विनोदनिर्मितीकरता कल्पिलेली एक संकल्पनाच असली पाहिजे. नाही तर गणपतीसारखी एवढी बुद्धीची देवता असल्या बिनडोक, समोर दिसेल ते कुरतडणाऱ्या प्राण्याला वाहन म्हणून कशाला वापरेल? पण काहीही म्हणा, गणपतीबरोबर उंदीर दिसतो मात्र छान. पण फक्त मूर्तीमध्ये किंवा चित्रातच. ‘खालमुंडय़ा पाताळधुंडय़ा’ ही म्हण बहुधा त्याला बघूनच सुचली असणार. बरं, वस्तू खाऊन संपवल्या तर त्या कुणाच्या तरी उपयोगी आल्याचं समाधान तरी मिळेल. पण उगाच सगळ्या गोष्टी कुरतडून, घाण करून कचरा करायचा. म्हणजे कुणालाही उपयोगात येणारं काम करायचं नाही. सरकारी कारभारात यांचा वावर जास्त असतो असं म्हणतात. उदाहरणार्थ, सरकारी फायली कुरतडणे, सरकारी गोदामांतील धान्याचा नायनाट करणे, सरकारी वास्तूंमध्ये बिळं करणे, सरकारी इस्पितळात ठाण मांडून बसणे. पालिका/महानगरपालिकांसारख्या सरकारी ठिकाणी या उंदरांमुळे जनसामान्यांच्या उपयोगी न पडण्याची आणि त्यांचा मेंदू कुरतडण्याची सवय सरकारी कर्मचाऱ्यांना पण लागली आहे. तर अशा या पिटुकल्या चतुष्पाद प्राण्याने नुसत्या त्याच्या दर्शनाने आमच्या घरातल्या पाचजणांच्या आयुष्यातला अख्खा एक दिवस कुरतडला. अफजलखानला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी जशी तयारी केली असेल, जवळपास त्या पद्धतीची जय्यत तयारी त्या दोन इंच बाय दीड इंच प्राण्याला मारण्यासाठी आम्ही सर्वानी केली, यावर सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचं असं झालं.. हा शत्रू एक दिवस आमच्या घरी आला. कसा आला, कळलं नाही; पण रोज रात्री-अपरात्री स्वयंपाकघराच्या ट्रॉलीज्मधून काहीतरी खुडबुड केल्याचा आवाज यायचा. एक दिवस आम्ही सगळ्या ट्रॉलीज् उघडून त्यातली भांडी, डबे बाहेर काढून अगदी डोळ्यात तेल का काय म्हणतात तसं घालून पाहिलं. बरं, घरातल्या एकटय़ा-दुकटय़ाने नाही, तर सर्वानी पाहिलं. पण नेमके महाशय कुठे गायब व्हायचे, ते कळायचंच नाही. सर्व भांडी, डबे नीट ठेवून ट्रॉलीज् बंद करून जरा कुठे सगळे जण अंथरुणावर आडवे झाले की परत खुडबुड सुरू! हा ट्रॉलीज् बाहेर काढून परत जिथल्या तिथे सगळं ठेवायचा उद्योग आम्ही एक-दोनदा करून बघितला. पण कुणालाच तो दिसला नाही. दुसऱ्या वेळी तर अजिबात आवाज न करता आम्ही हा सगळा कार्यक्रम पार पाडला. आपापसात पण आम्ही खुणांच्या भाषेत बोलत होतो. माझ्या भावाने तर त्याच्या एका डॉक्टर मित्राकडून छातीचे ठोके तपासायचं ते यंत्र स्टेथॅस्कोप का काय, तो पण आणला. पण त्याचं नक्की काय करायचं, ते कुणालाच कळेना. ‘म्हणजे नक्की कुठल्या ट्रॉलीतून खुडबुड ऐकू येतेय, हे स्टेथॅस्कोप ट्रॉलीवर लावून निश्चित करता येईल. उगाच सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढायला नको..’ भावाने स्पष्टीकरण दिलं. आम्हाला वाटलं, अचानक जर तो दिसलाच, तर कुणाच्या छातीचे ठोके सगळ्यात जास्त पडताहेत ते मोजायला आणलंय की काय!

मराठीतील सर्व गाजराची तुतारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikhil ratnaparkhi article for lokrang
First published on: 18-09-2016 at 04:33 IST