कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

तुम्चं मंजी फटफटीसारखं हाई सदाभौ. तिला बी रिवर्स गिअर नसतुया. हरघडी आप्लं बुंगाट म्होरं म्होरं धावायचं. मागं वळून बगायचं न्हाई. तुमास्नी बी जिंदगीची क्याशेट रिवाईंड कराया आवडत न्हाई, कसं?

बालपनीच्या आटवनी तुमाला नकुशा जाल्या हाईत,  मोट्या मान्साचं लक्षन हाई सदाभौ. आवं, बालपन हे आंब्याच्या लोणच्यावानी आसतंया. आंबटगोड. येकदम खट्टामीठा. जिंदगीच्या डिनर टायमाला बुढाऊ लोग बचपन की यादों में हरवून जात्यात. तवाची मजा आटवून गालामंदी खुदूक हसत्यात. आटववनींच्या ह्य मुरलेल्या लोणच्याची चव आखिर तक पुरते.

ह्य़े मंजी बायकू तरास देते म्हून येडींग आनिवर्सरी ईसरल्यावानी जालंया.

आपुन आप्ले लगीन जाल्यानंतरचे पयले गुलाबी रोमांटीक दीस आटवायचे.बाकी रोजची गनगन ईसरून जायाचं. सदाभौ, आवं येखादी बचपन की सहेली आटवून ऱ्हायली की न्हाई? शिशूवर्गातली. बाहुला-बाहुलीचं लगीन. तुमी जाल्ता बाहुला. ती जाल्ती बाहुली. बाहुलीशी लगीन कराया बाहुल्यानं क्येलेली फायटींग. मस दोगाचौघांचं गुडगं फोडलं असनार तुमी. काय जालं? तुमी यादों की बारातमंदी खोया-खोया चाँद ढूँढून ऱ्हायलाय की काय सदाभौ? आवं जरा थोबाडपुस्तक खंगाळून बगा. त्या सहेलीला शोधून काडा. न्हाई तर त्या झुक्याचा काय ऊपेग? फ्रेन्ड रिक्वेश्ट धाडा तिला. तिचा आताचा फोटू डोळं भरून बगा. चायकाफीचं आवतान द्या. ती भ्येटली की घुटक घुटक काफी पीत, तिच्यासंगट काफी सारी बचपन की बातें बोलून ऱ्हावा. होऊ दे खर्च. मंग बगा. तुमास्नी बचपन येकदम सुहाना वाटंल. तुमी साळंत त्ये संस्कृत सुभाषित शिकलं असनार बगा. नीर क्षीर ईवेक. आम्चा त्यो ईषय वाईच जरा आप्शनला हुता. तरीबी कायबाय आटवतंय आजून बी. आपुन आपलं त्या हंसावानी आसाया पायजेल. बचपनच्या आटवनींच्या स्ट्रॉमदनं फकस्त गोड आटवनी तेवडय़ा ओरपायच्या. कडू समद्या ईसरून जायच्या. मंग जिंदगीची खीर लई ग्वाड लागून ऱ्हायलीय ना सदाभौ!

तुमी बालपनीची आटवण काडली आन् आमी लगोलग साळंत पोचलू. येकदम पिक्चरमदल्या फ्लॅशब्याकवानी. आम्च्या साळंचं नाव हुतं ‘जीवन शिक्षण मंदिर’. जगावं कसं? संकटावर मात कशी कराया पायजेल? े समदं आम्च्या साळंनं शिकवलं बगा आमास्नी. येकमेका साह्य़ करू, अवघे धरू सुपंथ ! गणित ईषय माझ्या नावडीचा. आवं आम्च्या काय समद्याच पोरांच्या नावडीचा त्यो. काय बी करा टकुऱ्यात शिरायचाच न्हाई. दिगंबर वैद्य नावाचं येक बेणं हुतं आम्च्या वर्गात. लई मंजी लईच हुश्शार! गणित मंजी तेच्या डाव्या हातचा मळ. लई आखडू. परीक्षेच्या टायमाला त्येच्या पेपरातलं येक बी अक्शार बगू दीना माग्च्या पोरास्नी. मंग काय? हाण तेच्या आयला! पेपरच्या आदी हग्या दम दिल्ता त्याला. त्येचा पेपर येक घंटय़ाम्ांदी लिवून जाला. बिचारा करंगळी वर करून मुतारीत. लई भारी फिल्डिंग लावल्येली आमी. तो गेल्यानंतर येक-येक पोरगं करंगळी वर करून मुतायला पळतंय. सामुदायिक ‘शु- क्रिया’. दिग्यानं सांगितल्येलं ज्ञान पटाटा तळहातावर लिवायचं अन् मागारी. दिग्याची कृपा.

सबका साथ, सबका ईकास. देनाऱ्यानं देत जावं आन् घेनाऱ्यानं घेत जावं. घ्येतल्येलं तळहातावर लिवीत जावं. पोरं पास जाली. पर ज्येच्यापाई ो जुगाड जमून आल्ता, त्या दिग्याला कुनी बी ‘शुक्रिया, मेरे दोस्त’ आसं बी म्हन्लं न्हाई. गरज सरो अन् वैद्य मरो.

समदी पोरं पास जाली आन् कुलकर्नी मास्तरांना डावूट आला. समद्यास्नी डांबून ठय़ेवलं. धू धू धुतलं. येक बी पोरगं त्वांड ऊचकटायला तयार न्हाई.

मास्तर बी लई हुश्शार गडी. येकेकाला कोपच्यात घ्येतला. खरं बोलशीला, तर धा मार्क वाढवून देतू, क्लीन चीट देतू, अशी आफर दिली.  फोडाफोडीचं राजकारन लई वंगाळ सदाभौ. दोन चार पोरं फुटली. पर्दा हो पर्दा! पर्दा टराटरा फाटला आन् गुपित ऊगड जालं. मास्तरांनी मस प्रसाद दिला. आन घरी आबासायेबांनी येगळी पूजा बांधली.

तवापास्नं कानाला खडा. कापीच्या भानगडीत पडायचं न्हाई. सुदरलो म्हना की. पर राजकारनाची शाळा अशी शिकत ग्येलो. आमास्नी आटीवतंय, आमी पाचवीला ग्येलो तवा पहिल्यांदा बेंचवर बसाया चान्स गावला. तवर आपलं जिमिनीवर गोणपाटावर बसायचू. येखाद्या आर्टश्टिला कोरा कॅन्व्हास भेटल्यासारकं जालं. आमास्नी ताज्या ताज्या कविता होवू लागल्या. सुविचार मनामंदी येवू लागले. कुटं लिवनार ो समदं अक्शर साहित्य? आमी त्ये ब्येंचवर कर्कटकानं कोरून कोरून लिवलं. आम्च्या काही दोस्तांनी जरा टाईप ‘ए’ वाली साहित्यसंपदा मुतारीतल्या भिंतीवर लिवून काडली.

पुडं आटवी नववीत गेल्यावर आम्च्या काही दोस्तांनी वधूवर सूचक मंडळ काडलं.‘त्या’चं नाव ‘ति’च्याबरूबर जोडलं जावू लाग्लं. मुतारीच्या भिंतींवर मस ‘जोडय़ा लावा’च्या पताका फडकू लाग्ल्या. काही संस्कृतीरक्षक गद्दार पोट्टे असल्या बातम्या मास्तरांपाशी लीक करायचे. कर नाही त्याला डर कशाला? ह्य़ो खजिना कायआप्पावरल्या पोश्टांवानी. फकस्त फारवर्ड करायचा. कुनी लिवला, कंदी लिवला  ईतिहासाच्या पानांवर कंदी नोंदलं जात न्हाई सदाभौ! कुनाचं कान धरनार? मास्तरलोग हात वर करून हेल्पलेश. गिपचीप भिंतीवर चुना मारला जाई. चुन्याला चुना लावून येका रात्रीत भिंती पुन्यांदा या साहित्याने सुशोभित व्हायाच्या. सदाभाऊ, तुम्च्या फिल्म ईन्डश्ट्रीत वळखी हाईत का? गेलाबाजार येखाद्या नेटफ्लिक्सवाल्या वेबशिरीजच्या डायरेक्टरला गावाकडं धाडा. शाळंतल्या मुतारीतल्या भिंती दावा तेस्नी. मस ‘हिट अ‍ॅन्ड हाट’ ईषय गावतील त्येला. गावाकडं टॅलेन्ट कूट कूट के भरल्येलं हाई. ते फकस्त असं जगाम्होरं यायला पायजेल.

सदाभौ, आमच्या वर्गात बी येगयेगळं क्लास असायचं. पुडच्या बेंचवरली मंजी हुश्शार, मेहनती, कष्टाळू. मान मोडून काम करनारी, सौतावर ईश्वास असनारी. ही समदी पोरं आता पुन्यामुंबला हाईत. डाग्दर, विंजीनेर, न्हायतर प्रोफेसर झाल्यात. पांढरपेशा. शेटल्ड. टूरिश्ट डेस्टिनेशनला यावं तशी येत्यात गावाकडं. गावाशी नाळ तुटल्येली जनू. मदले बेंचवाले मंजी वटवाघूळ. न घर का ना घाट का! अभ्यासामंदी नरमगरम. दंगा बी हातचा राखून. पिवर मिडलक्लाश. ही लोकं तालुक्याला मास्तर न्हाईतर गावाकडं प्रगतीशील शेतकरी. ब्याक बेंचवाल्यांचा क्लास येगळाच. येकदम डिफरंट. रगेल! मनगटाच्या जोरावर समदे प्रश्न सोडविनार. रग रग में पालीटीक्स. ह्य लोकान्चा येज्युकेशन शिश्टीमवर ईश्वास न्हाई. निम्मी लोक कंचं ना कंचं वेसन करून ऱ्हायली. आविष्याचा ईस्कोट. उरल्याली राजकारनात. तशी राजकारनात चांगली लोकं बी हाईत. पर लई कमी. जादा पाप्युलेशन या संधीसाधू लोकान्ची. समदे वाहत्या गंगेत हात धून घेनारे. चालतंय की.

तुमास्नी सांगतू सदाभौ, दरसाली दिवाळीच्या टायमाला आम्चं ग्येट टूगेदर होतंया. मस मोटी फ्रेन्डलिश्ट हाई. थोबाडपुस्तकावानी व्हर्चुअल न्हाई. सौ फीसदी रिअल. झाडून समदे शाळासोबती गावाकडे येत्यात. फ्यामिलीसंगट. दोन दिस नुस्ती धमाल. जुन्या आटवनींचा रवंथ करतु. आता कंचा बी क्लास न्हाई. समद्या भिंती भुईसपाट. फकस्त एकच क्लास. दोस्तीचा. गावाकडची पोरं पुन्यामुंबला शिकायला जात्यात. तिथल्लं आम्च दोस्त हवं नको त्ये बगत्यात. सनासुदीला तेन्ला जेवाया बोलवत्यात. अडीअडचनीला धावून येत्यात. गावाकडची लोकं शिटीवाल्या दोस्तांच्या म्हाताऱ्या आईबापाकडं ध्यान ठिवून असत्यात. घरदार, जिमीन समदीकडं लक्ष ठेवत्यात. पालीटीक्सवाली मंडळी दोस्त लोकांची सरकारी कामं मार्गी लावत्यात. सरकारी मदत मिळवून देत्यात. डाग्दर मंडळी सगळ्यांच्या तबीयती सांबाळत्यात. अजून काय हवं?  मागच्या साली आम्चा एक शाळूसोबती सततच्या दुष्काळाला कटाळला. जीव देयाचा परयत्न क्येला. कसाबसा जीव वाचला. येका रात्रीत समदे दोस्तलोग हजर. पटापटा पकं जमा केलं. त्याचं कर्ज फेडलं. घरात सालभराचं राशन. पोरांच्या साळंच्या फिया. न सांगता, न मागता. ही फकस्त बचपन के दोस्ती की कमाल हाई सदाभौ! आता नव्या दमानं ऊभा ऱ्हायलाय गडी.

आपल्या दोस्तांना घेवून पुडं जायाचं, तेंच्या परगतीचा आनंद साजरा करायचा, अडचनीला धावून जायाचं, ेच खरं ‘जीवन शिक्षन मंदिर.’ बालपनीची शाळा म्हातारपनापर्यंत जगायची. ती शाळा संपतच न्हाई कंदी. शाळूसोबती हमेशा संगट हवेत फकस्त. आसल्या शाळंचं जल्मभर ईद्यार्थी राहनार आमी.

आमास्नी काय वाटतं सांगू?

आपल्या समद्यांमदी येक खोडकर बाळ लपला हाई. जो मोटा हुनार न्हाई कंदी. तो मनापासून हसतुया. दुसऱ्याच्या आनंदात नाचतुया. दोस्तांच्या दु:खात रडतुया. गंगेवानी निर्मळ, छोटासा, प्यारासा, नन्हासा, ईटुकला पिटुकला! मोठेपनाच्या गर्विष्ठ भिंती पाडून त्ये बाळ भाईर पडायला हवं. मंग बगा. लई भारी जादू होतीय आपूआप. भांडण, तंटा, लोभ, आसूया, मत्सर, राजकारन, कायबी दिसनार न्हाई. आवं लहान पोरांच्या माईंडमंदी त्येला जागाच न्हाई. तिथं फकस्त  पिरेम, माया, आपुलकी.

ईस्वेस्वरा, मला आक्षी आसंच लहान ऱ्हावू दे. आन समद्यास्नी सुदिक समद्यांच्या माईंडमदला त्यो ‘बाळ’ जोवर जित्ता हाई तवर रोजच बालदिन! दिल तो बच्चा है जी! उसे बच्चा रेहने दो. तरच दुनिया बचेगी.

क्या समझे बच्चमजी?

तुम्चा जीवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com